शुक्रवार, जुलै 19, 2019
   
Text Size

मृत्यूवर विजय

‘आणखी पुढे’ हाच त्याचा मंत्र. पायाखालच्या तलवारी वर हवेतच आहेत, असे त्याला भासते व त्यांच्यावरून तो नाचत जातो. पायाखालचे निखारे गुलाबच आहेत असे समजून पुढे जातो. तो आजूबाजूचे सारे विसरतो. तो देहातीत होतो, जीवन्मुक्त होतो.

श्रीरामकृष्णांबद्दल विवेकानंद म्हणत, “त्यांना दुबळेपणा माहीत नव्हता. परंतु रामकृष्ण म्हणून कोणी व्यक्ती आहे हेही ते विसरूनच गेले होते.”  मातृपूजा करणाराला हे असले अलोट धैर्य, हा अतुल व अदम्य उत्साह प्राप्त होत असतो. ज्याने अनंतात बुडी मारली, त्याला कोणाचे भय ? त्याला जगात सारेच सज्जन व सारेच सोयरे. त्याला जगात सारेच मंगल व सारेच गोड.

“मधुनक्तमुतोषसि। मधुमत्पार्थिव रज:-” सारे त्याला गोडच गोड.
उषा मला गोड, निशाही गोड.

अंधार त्याला जितका प्रिय, तितकाच प्रकाशही प्रिय. आकाशातील तारे त्याला जितके सुंदर, तितकीच पृथ्वीवरील धूळही त्याला सुंदर ! अशाला कशाची भीती ? त्या मृत्यूलाही तो मारून जातो. तो मृत्यूचा घोट करतो व त्याला आपल्या पोटात ठेवून देतो.

यस्यच्छाया अमृतं यस्य मृत्यु: ।

अशी त्याची स्थिती होते. जीवन व मरण दोघांनी व्यापून तो उरतो. त्याला सुख व दु:ख विभिन्न दिसतच नाहीत. मायेचा पडदा टरकावून तो फेकून देतो व त्या पडद्यापलीकडील अनंताचे, सच्चिदानंदाच्या मूर्तीचे दर्शन घेतो. तो कवी जार्ज इलियट म्हणतो,

“संत हे मग जगासाठी जळतात व प्रकाश देतात.”  दुसर्‍यांच्या विकासासाठी स्वत: जळत राहण्यातच सूर्याप्रमाणे त्यांना धन्यता वाटते. पदार्थ जळणे व पेटणे म्हणजेच त्याचे जीवन. विलासात त्यांचा जीवन गुदमरतो; कष्टांच्या आगडोंबातच त्यांना शांत व शीतळ लाभते. तेथेच त्यांना मोकळेपणाने श्वासोच्छ्वास करता येतो.

संतो तपसा भूमिं धारयन्ति ।

आपल्या तपाने व जळण्याने ते पथ्वीचे धारण करितात. हे शब्द खरे आहेत. कारण खरी शक्ती अशीच असत. त्या विश्वमातेचे पुत्र असेच असतात व असावयाचे.

 

ही मातृपूजा म्हणजे वीरांचा निर्भय वेदांत आहे. माता म्हणजे सर्वस्व, माता हीच आदिशक्ती, मूळ कारण. माता म्हणजेच अनंत शक्ती, अनंत ज्ञान. अशा या शक्तीशी एकरूप होणे म्हणजे समाधी. स्वत:ला पुसून टाकून स्वत:चे व्यक्तित्व विसरून, केवळ निरहंकारी होऊनच त्या दिव्य दृष्टीचा, त्या महान अनुभवाचा लाभ होणे शक्य आहे. श्रुती सांगते, “जेव्हा वासना मरते, सर्व संशय जेव्हा नष्ट होतात, सर्व वृत्ती जेव्हा विरून जातात, तेव्हाच मर्त्य अमर्त्य होतो, जीव शिव होतो.”

ज्याची शक्ती आपल्या शक्तीपेक्षा फारच मोठी असते, त्याचा आपण तिरस्कार करतो, बहुधा आपण त्याच्यावर प्रेम करीत नाही. नायगारा धबधब्याजवळील एका गुहेत एक बाई चुकून मागे राहिली. ती बाई परत आल्यावर सांगे, ‘त्या धबधब्याची प्रचंड गर्जना ऐकून मला त्याचा तिरस्कार वाटे, तिटकारा येई’  हा तिरस्कार म्हणजे तिच्या मनातील भीतीचेच ते प्रत्यक्ष सक्रिय स्वरूप होय. भीतीचे तिरस्कारात रूपांतर होते. मोठा पुरूष जवळ असला म्हणजे आपली पूजा येथे कशी होईल, अशी छोटयाला भीती वाटते. अशा भीतीतच अहंतेचा जन्म होतो. मध्यरात्रीचे आकाश आपणास फार सुंदर वाटते. कारण लाखो लहान लहान तारका तेथे लुकलुक करीत असतात, परंतु आपणास जर आकाशात जाता आले व त्या लहान तारकांऐवजी कोट्यवधी प्रचंड जळते गोल आपल्याभोवती जर दिसले, तर आपण त्यांचा मनात तिरस्कार करू. कारण त्या प्रचंड विराट समूहात आपण म्हणजे कोणीच नाही, असे आपणास वाटेल. आपला अहंकार दुखविला जाईल. कळत वा न कळत आपण पावलोपावली सभोवतालच्या चराचर जगाची स्वत:शी तुलना करीत असतो. त्या तुलनेत आपण जर मोठे ठरलो तर आपणास आनंद होतो, गुदगुदल्या होतात, तोंडावर हास्य खेळते. परंतु त्या तुलनेत जर आपण फारच कमी पडतो, हिणकस ठरतो असे दिसले, तर आपण चिडखोर, त्रासिक व तिरस्कार करणारे-थोडक्यात माणूसघाणे होतो. आपल्या सार्‍या भावनांचा उगम या तुलनेपासूनच होत असतो. ही तुलना आपले जीवन रंगवीत असते. आणि या तुलनेचा जन्म आपल्या अहंपूजेत असतो. जगात साक्षी होऊन राहण्यात जो दिव्य आनंद आहे, तो फारच थोड्या भाग्यवंतांना लाभत असतो व आईशी एकरूप होण्यातील, आईशी चिरयुक्त होण्यातील तो परमानंद चाखणारा तर या जगात नाहीच कोणी म्हणाना.

परंतु ज्यांना हा दिव्य आनंद चाखावयाचा आहे, त्यांनी मरणाचे उपासक झाले पाहिजे. दु:खाचा भरलेला पेला पटकन् पिऊन रिकामा करून तो मातेपुढे करा व म्हणा, “और लाव.”  बलवंताला माघार माहीत नसते. शूराला दु:खाची दरकार नसते, निश्चयी व निर्मळ नरसिंहाला निराशा कधी शिवत नाही, पश्चाताप करण्याची कधी पाळी येत नाही. काव्यांतून ज्या निराशेची वर्णने येतात, ती निराशा सामर्थ्यसंभव नसते, ती निराशा अहंकारोध्दव असते. आपणाला ज्या क्षणी अहंकार घेरतो, ज्या क्षणी स्वत:ची जाणीव होते, त्या क्षणीच आपण दुबळे आहोत असे आपणांस वाटू लागते. आपण एकटे आहोत, असे वाटू लागते. कारण आईपासून आपण त्या क्षणी दूर झालेले असतो. स्वत:ची स्मृती होताच माता दुरावते व आपणास आपला दुबळेपणा व अगतिकत्व यांची जाणीव होते. वीराला स्वत:ची जाणीवच नसते. स्वत:ची शुध्दच नसते. त्याचे देहभान हरपते. कड्यावरून बेधडक उड्या घेत सागराकडे जाणे एवढेच नदीला माहीत असते. स्वत:च्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या तरी तिला पर्वा नसते. पुढे काटे आहेत का दरी आहे काहीही ती पाहत नाही. वीराचे तसेच नाही. काटे असोत वा फुले असोत, तो आपल्याच नादात असतो. सारे तुडवीत पुढे जातो. फुलांना कवटाळण्यासाठी धावत नाही, काटे पाहून रडत बसत नाही. मार्गामधील सर्व द्वंद्वांना काटीत छाटीत तो पुढेच जातो.

 

कोणी कोणी परमेश्वराने मदत करावी, आपले दु:ख व दैन्य त्याने हरण करावे म्हणून पूजा करतात. त्या सर्व सामर्थ्यवान् प्रभूची आपणास धीर मिळावा म्हणून प्रार्थना करतात. आणि अशा आर्त भक्तांना धैर्य प्राप्त होते यात शंकाच नाही. कारण शत्रू कोणीही असो, परमेश्वर आपल्या बाजूस आहे, अशी अशा आर्त भक्तांची साहजिकच भावना असते. परंतु अशा आर्तभक्तीत दोष येतोच आर्तभक्तीत देवाला आपण राबवितो, त्याला आपले काम करावयास लावतो, आपली जी पै किंमतीची क्षुद्र सुखे ती प्राप्त करून घेण्यासाठी देवाला आपण एक साधन बनवितो. देवाहून आपण आपल्या कामनांनाच श्रेष्ठ केले !

काही लोक दैववादी असतात. परंतु यातही धोका आहे, दोष आहे. कारण त्यामुळे दैवच सर्व काही करीत आहे. कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुं अशा दैवाच्या हातातील आपण केवळ बाहुली आहोत, असे आपण मानू लागलो. परंतु वस्तुस्थिती याच्या उलट असते. कार्य करणारे क्रियावान् आपण असतो व दैव हे निष्क्रिय व पंगू असते. आपणच दैवाचे नियंते असतो, दैव घडवीत असतो. दैववादी अरब शिपाई घोड्यावर स्वार होतो, भाला सरसावतो व ‘किस्मत’ अशी गर्जना करून शत्रूवर तुटून पडतो आणि क्षणभर तो अजिंक्य भासतो. परंतु शत्रुचा जोराचा हल्ला येऊन त्याला माघार घ्यावी लागताच तो कपाळाला हात लावून बसतो व ‘किस्मत दुसरे काय ?’ असे म्हणतो. तो अरब शिपाई लढाईस तेथे पुन्हा उभा राहू शकत नाही.

या दोन प्रकारांपेक्षा तिसराही एक प्रकार आहे. तो म्हणजे ईश्वराला आई म्हणून पुजून त्यापासून मिळणार्‍या धैर्याचा. ही जी दिव्य मातृपूजा आहे, तेथे मरणाला मिठी मारावयाची आहे. तेथे दु:खाचा खाऊ आहे. अलोट धैर्य हाच आनंद आहे. आईचा हात मृदूच असेल असे नाही, तर तो कठोरही असेल. तो अमृताप्रमाणे गोडच असेल असे नाही, तर विषासारखा कडूही असेल. आई तारीलही किंवा मारीलही. परंतु आईने मुलाला कितीही झोडपले, मारले, पिटले, तरी मूल तिच्या पदराला धरणार, तिच्याच ओच्यात डोके खुपसणार. आई जे जे देईल ते ते सारे गोडच आहे, चांगले आहे, पूज्य आहे. दु:खातही आईची करुणाच आहे. आपत्ती हा तिनेच पाठविलेला आशीर्वाद, तिचाच तो पवित्र दूत. त्याचे स्वागत केले पाहिजे. आई मुलाचे वाटेल ते करील, त्याला रडवील किंवा हसवील; चढवील किंवा पाडील. परंतु भक्त विचारतो, ‘आई, तू नाहीस तरी कोठे ? ’सर्वत्र तूच आहेस. नाना रुपांनी तूच येतेस. मारावयास आलेली राक्षसीण तूच, तारावयास आलेली देवता तूच. कोणत्याही वेषात तू ये, तुला शोधून काढण्यास मी शिकतो आहे. तुझा लपंडाव मी चालू देणार नाही.’

“जेथे जातो तेथें ।  तूं माझा सांगाती
विठ्ठल सखा । विठ्ठल दु:खा ।।”

“सर्वस्वी तुझाच स्पर्श मी अनुभवून राहिलो आहे. पंख लावून मी आता समुद्रापलीकडे गेलो तरी तेथही तूच मला दिसतेस. मी स्वर्गात गेलो तरी तेथे तू व नरकात पडलो तरी तेथे तू.”