मंगळवार, मे 26, 2020
   
Text Size

आपले नेहरू

पुन्हां तुरुंग

गांधीजी शिष्टाई विफल होऊन परत आले. ते मुंबईला उतरले. नवे व्हाइसरॉय विलिंग्डन यांना त्यांनीं भेटीची मागणी करणार्‍या तारा केल्या. नकार आला. जवाहरलालांना आधींच अटक झाली होती. महात्माजींनाहि अटक झाली. देशभर वणवा भडकला. माता स्वरूपराणी २६ जानेवारी १९३१ च्या स्वातंत्र्यदिनाच्या विराट सभेच्या अध्यक्ष झाल्या. लाठीमार झाला. सार्जंट हाणीत सुटले. नेहरूंच्या आईच्या डोक्यावर लाठी बसली. तुरुंगांत ती वार्ता ऐकून जवाहरलाल बेचैन झाले. म्हणाले : “मी बाहेर असतों तर माझी अहिंसा कसोटीस लागली असती.” १९२८ मध्यें सायमन कमिशनवरच्या बहिष्काराच्या वेळेस लखनौला जवाहरलालांनीं डोक्यावर घाव घेतले होते. परंतु हा आईवर प्रहार होता. सारें नेहरू कुटुंब अग्निपरीक्षेंतून जात होते.

कमला


कमला आजारी होती. आई काळजी घेत होती. पुढें चळवळ ओसरली. हरिजनांसाठीं महात्माजींचे उपवास झाले. जवाहर सुटला. कमलेजवळ थोडा वेळ बसून ते तडक बिहारमध्यें गेले. तेथें न भूतो न भविष्यति भूकंप झालेला. स्वयंसेवकांना काय करावें कळेना. नेहरू आले नि कुदळफावडे घेऊन ढिगारे खणूं लागले, प्रेतें बाहेर काढूं लागले. दहा दिवस त्यांनीं अपार श्रम केले. दहा दिवसांनीं ते अलाहाबादला आले नि बारा तास झोंपले. जाग आली का, कमला हळूच येऊन पाही. बारा तासांनंतर जाग आली. म्हणाले : “किती झोंपलों !” कमलाबरोबर, आईबरोबर बोलत चहा घेत होते. तों कलकत्त्याला केलेल्या भाषणाबद्दल वॉरंट आलें. पुन्हां खटला, शिक्षा नि तुरुंग. तुरुंग त्यांचें घरच झालें होतें. एका पत्रांत लिहितात : “येथें मनाची शान्ति आहे, विश्रांति आहे. वाचीन, मनन करीन, अधिक शहाणा होऊन बाहेर येईन.”

दुसर्‍या एका पत्रांत लिहितात : “डेहराडूनचा हा तुरुंग. बर्फाच्छादित शिखरें दिसत आहेत. मेघांनीं गाशा गुंडाळला आहे. निळें निळें गंभीर आकाश दिसत आहे. हें निळें आकाश किती आश्चर्यकारक, कसें वेड लावणारें ! हें निळें आकाश दिसावें म्हणून का अभ्रें गेलीं ?.... आतां सायंकाळ झाली आहे. सूर्याचे किरण पकडून लहान-मोठे ढग त्यांना चौफेर फेकीत आहेत. अनंत आकृति, क्षणांत बदलणार्‍या आणि रंगांची धिंगामस्ती. कांहीं वेळानें चन्द्रहि आला. जवळजवळ पूर्ण चन्द्र. विविधतेंत आणखी भर.”

ग्रन्थवाचनांत रमणारा, सृष्टीचें वेड असलेला, त्याला तुरुंग का कंटाळवाणा वाटेल ? परंतु प्रियजन दूर असतात. प्रत्यक्ष कार्य करतां येत नाहीं. हेंच शल्य असतें. जवाहरलालांनीं इंदिरेला विश्वेतिहासावर पत्रें लिहिलीं. तीं आतां प्रसिद्ध झालीं आहेत. जणुं इंदिरेचें निमित्त करून भारतीय मुलांसाठीं लिहीत होते. पुढें आत्मचरित्र लिहायला घेतले. इकडे कमला अधिकच खंगत चालली. मधून तिला भेटायला ते येत. चार दिवस संपतांच पुन्हां तुरुंगांत जात. कमलेला शेवटीं युरोपांत पाठवायचें ठरलें. तिला भेटायला तुरुंगांतून ते दोन दिवस घरीं आले. तिला निरोप देऊन जड मनानें ते पुन्हां तुरुंगांत गेले.

 

१९३० साल उजाडलें

स्वातंत्र्याचा ठराव झाला. पुढें काय ? महात्माजी स्वस्थ नव्हते. त्यांनीं व्हाइसरॉयकडे त्या ऐतिहासिक अकरा मागण्या धाडल्या. दोन ओळींचा नकार आला. गांधीजी म्हणाले : “भाकर मागितली, मिळाले दगड !” १९३० च्या १२ मार्चला महात्माजी दांडीयात्रेला बाहेर पडले. म्हणाले : “आधीं मी सत्याग्रह करीन, मग सारे करा.” आणि त्याप्रमाणें झालें. सारें राष्ट्र उठावलें. सर्वत्र लाठीमार, गोळीबार. जवाहरलालांना अटक झाली. जूनमध्ये मोतीलालांनाहि झाली. परंतु आजारीपणामुळें त्यांची सुटका करण्यांत आली. ते मसुरीला जाऊन राहिले. इतक्यांत जवाहरहि सुटले. मुलाला भेटायला पिता येत होता. जवाहर स्टेशनवर होता. गाडीला उशीर झाला. तिकडे सभेला जवाहरलालजींना जायचें होतें. शेवटीं ते गेले. पिता स्टेशनवर उतरला तों समोर पुत्र नव्हता. घरीं ते मुलाची वाट पहात होते. परंतु तिकडेच त्याला अटक झाल्याची वार्ता आली. क्षणभर मोतीलाल खिन्न झाले. परंतु म्हणाले : “अत:पर औषधें नकोत. माझा आजार गेला. मलाहि काम करूं दे.”

मोतीलाल गेले


परंतु प्रकृति सुधारेना. १९३१ च्या जानेवारींत जवाहर सुटला तो घरीं येऊन सरळ पित्याच्या खोलींत गेला. पितापुत्रांनीं मिठी मारली. मग मोकळा होऊन पुत्र अंथरुणावर बसला. अखेर अश्रु आलेच. मुलगा भेटला म्हणून मोतीलालांचें मुख फुललें होतें. जवाहरलालांच्या डोळ्यांत करुण वेदना होती. येरवड्याहून गांधीजी सुटले. तेहि तडक अलाहाबादला आले. मोतीलालांना ४ फेब्रुवारीस क्षकिरणोपचारांसाठीं लखनौस नेण्यांत आलें. ५ तारखेस रात्रीं प्रकृति अधिकच बिघडली. पत्‍नीला म्हणाले : “मी पुढें जातों. तुझी वाट बघेन.” कृष्णा रडूं लागली. तिला जवळ घेऊन म्हणाले : “माझ्या छोट्या मुलीनें शूर असलें पाहिजे.” गांधीजींना म्हणाले : “मी स्वराज्य पहायला नाहीं. परंतु तुम्हीं तें आणलेंच आहे.” मुखावर शान्ति पसरली. गायत्री मंत्राचा जप करीत हा पुण्यप्रतापी पुरुष ६ फेब्रुवारी १९३१ ला पहाटे देवाघरीं गेला !

असा भाऊ कुठें मिळेल ?

गांधीजी दिल्लीला वाटाघाटींसाठीं गेले. दु:ख गिळून जवाहरहि गेले. आयर्विनबरोबर तडजोड झाली. कराचीला राष्ट्रसभेचें अधिवेशन होतें. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना सरकारनें फांशीं दिलें. भगतसिंगांना जवाहरलाल भेटले होते. त्या घटनांचा अमिट परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. कराचीला मूलभूत मानवी हक्कांचा ठराव पास झाला. गांधीजी लंडनला निघाले. नेहरू घरीं थोडी व्यवस्था लावीत बसले. त्यांनीं लहान बहिणीला लिहिलें : “घर व जें कांहीं आहे तें तुझें व आईचें. मी विश्वस्त म्हणून सारें पाहीन. मला व माझ्या कुटुंबाला फारसें लागणार नाहीं. आपण नीट राहूं.” बहीण कृष्णा ‘ना खंत ना खेद’ या पुस्तकांत लिहिते : “असा भाऊ कुठें मिळेल ?”

आई दु:खी होती. पतीच्या आधीं आपण भरल्या कपाळानें, भरल्या हातांनीं जाऊं, असें तिला वाटे. परंतु उलटें झालें. वेळ मिळे तेव्हां मातृभक्त जवाहरलाल आईजवळ बसून तिचें दु:ख हलकें करायचे.

 

व्यापक दृष्टीचे शिक्षक

ते बहीण कृष्णा हिला म्हणाले : “हा जिनीव्हाचा नकाशा घे. हें ट्रामचें वेळापत्रक. हीं तिकिटांचीं कूपनें. जा हिंड फीर. हा इंग्लिश-फ्रेंच शब्दकोश घे.” तिनें फ्रेंच शिकावें म्हणून एकदां रागावले. प्रत्येकानें कांहीं शिकावें, वेळ फुकट दवडूं नये, परावलंबी नसावें, असें त्यांना फार वाटतें. बरेंच सामान घेऊन मंडळी चालत जात होती. कृष्णा म्हणाली : “पाय थकले. मोटार कर ना रे भाई ?” भाई म्हणाला : “मोटार केली तर मग रात्रीं नाटकाला नाहीं जायचें. काय पाहिजे बोला.” नाटकाचा आनंद गमावण्याऐवजीं सगळ्यांनीं पायीं जायचें कबूल केलें.

उन्हाळ्यांत युरोपांतील अनेक विद्यार्थी जिनीव्हाला जमतात. तो महान् मेळावा असतो. हिंदी, चीनी, सिलोनी, अमेरिकन, फ्रेंच, जर्मन सारे तेथें जमावयाचे. जवाहरलाल त्यांच्यांत मिसळावयाचे. प्रख्यात फ्रेंच साहित्यिक रोमाँ रोलाँ यांनाहि ते मधून भेटत. घरीं कृष्णा स्वयंपाकपाणी करी. जवाहरलालहि मदत करायचे. कृष्णाला खिजवायचे : “तूं फार सुखांत वाढलीस. काम करीत जा. श्रम करीत जा. श्रम करीत जा. सुखासीन जीवनानें व्यक्तिमत्त्वाचा विकास नाही होत.” अनेक क्रान्तिकारक भेटायला यायचे. धनगोपाल, वीरेन्द्र चट्टोपाध्याय यायचे, थोडावेळ रहायचे, जायचे. जवाहरलाल इटलींतही नेपल्स वगैरे पाहून आले. पॅरिसला अनेक फेर्‍या व्हावयाच्या.

ब्रूसेल्स येथें साम्राज्यविरोधी संघाची स्थापना करण्यांत येत होती. जवाहरलालांना हिंदचे प्रतिनिधि म्हणून आमंत्रण देण्यांत आलें. ते गेले. आजच्या इंडोनेशियाचे पुढारी त्या वेळेस प्रथमच जवाहरलालांना भेटले. थोड्या दिवसांनी मोतीलालहि युरोपांत आले. १९२७ मध्यें रशियन क्रांतीच्या १० व्या वार्षिक दिनाला मॉस्कोहून पितापुत्रांना आमंत्रण आलें होतें. मंडळी तिकडे गेली. जवाहरलाल बरेंच बघून आले. १९२७ च्या डिसेंबरांत कोलंबोला सारी मंडळी आली. मद्रासला १९२८ मध्ये काँग्रेसचें अधिवेशन होतें. तें आटोपून आनंदभवनांत हे प्रवासी पुन्हा आले.

स्वातंत्र्याचा ठराव

१९२८ च्या डिसेंबरांत कलकत्ता काँग्रेस भरली. मोतीलालजी अध्यक्ष होते. वसाहतीच्या स्वराज्याचा ठराव तेथें मंजूर झाला. जवाहरलालांचा विरोध होता. महात्माजी म्हणाले : “सरकारला एक वर्षाची मुदत देऊं. नाहींतर स्वातंत्र्याचा ठराव करूं व त्यासाठी लढा देऊं.” एक वर्ष हां हां म्हणतां गेलें. देशभर युवक चळवळी उभ्या राहिल्या. उत्तर प्रदेशांतील युवक चळवळीचे पंडितजी अध्यक्ष होते. अखिल भारतीय कामगार चळवळीचेहि ते अध्यक्ष झाले. याच सुमारास हिंदी कम्युनिस्टांवर सरकानें खटला भरला. मीरत खटला म्हणून तो प्रसिध्द आहे. त्यांच्यासाठीं जवाहरलालांनीं बचावसमिति नेमली. परंतु खटल्यांतील व्यक्ति आपापलींच प्रचंड वक्तव्यें आणीत व न्यायमूर्तींसमोर वाचीत. बचावसमितीशीं ते सहकार करीत. ना. जवाहरलालांना वाईट वाटलें. १९२९ ची लाहोर काँग्रेस आली. जवाहरलालांचें नांव अध्यक्ष म्हणून उत्तर प्रदेशानें सुचविलें. गांधीजींनी तें उचलून धरलें. त्यांनीं लिहिलें : “तो स्फटिकाप्रमाणें निर्मळ आहे. शूर आहे. त्याचा उतावीळपणाहि त्याला शोभतो. राष्ट्र त्याच्या हातांत सुरक्षित आहे.” लाहोरची काँग्रेस भरली. महात्माजींनीं दिलेली वर्षाची मुदत संपली होती. ३१ डिसेंबर १९२९ रोजीं स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला. रावी नदीच्या तीरावर रात्रीं बारा वाजता जवाहरलालांनीं स्वातंत्र्याची प्रतिज्ञा सांगितली, लाखोंनीं ती उच्चारली. २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्याचा देशभर आदेश गेला.

   

पहिला तुरुंगवास

त्या वेळेस राजपुत्र भारतांत यायचे होते. राष्ट्रसभेनें त्यांच्या स्वागतावर बहिष्कार घातला. मोतीलाल व जवाहरलाल यांना अटक करायला अधिकारी आले. आनंदभवनांत पोलीस घुसले. घरांतील नोकर संतापले. जवाहरलालजींच्या आईनें नोकरांना शान्त केलें. पितापुत्रांना अटक झाली. खटला सुरू झाला. सरकारी वकील मोतीलालजींचा मित्र. तो त्यांच्याकडे बघायला लाजत होता. सहा महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा देण्यांत आली. दंडासाठीं घरांतील वाटेल तें मोलवान सामान नेण्यांत आलें. सरकारनें दीड महिन्यानेंच सोडलें, परंतु जवाहरलालांना पुन्हा लगेच शिक्षा झाली. तुरुंगांत जाणें-येणें आतां नित्याचें झालें.

आजारी पडले

जवाहरलाल कधीं आजारी पडत नाहींत. ‘माझी प्रकृति पोलादी आहे’ असें ते अभिमानानें म्हणतात. ते एकदांच आजारी पडले. नाभा संस्थानांत जुलूम चालला होता. पंडितजी तिकडे जाऊन आले. परंतु त्या हवेंतून ते विषमाचा ताप घेऊन आले. ताप हटेना. सर्वांच्या तोंडचें पाणी पळालें. परंतु एके दिवशी ताप निघाला. सर्वांचा जीव भांड्यांत पडला. १९२३ मधील त्या आजारानंतर आजवर ते कधीं आजारी पडले नाहींत. तुरुंगांत असोत वा बाहेर, ते नियमित व्यायाम घेतात. मोजकें खातात.

युरोपांत हवापालट

लढ्याची पहिली लाट ओसरली होती. पहिली उसळी मंदावली होती. कमला अति उत्साही, ज्वालेप्रमाणें तेजस्वी. परंतु तिची मूळची नाजूक प्रकृति या सुमारास बरीच खालावली. जवाहरलाल त्या वेळेस आपल्याच ध्येयसृष्टींत वावरत. ते युक्तप्रान्तांतील किसानांत भटकत होते, हजारों खेड्यांतून हिंडत होते, पायीं जात होते. त्यांना कंमलेची जणूं आठवण नव्हती. पत्‍नी म्हणजे का त्यांना बंधन वाटत होतें ? कमलाहि त्यांच्यासंगें हिंडली असती, वणवण करीत. परंतु ती स्वाभिमानी होती. आपण होऊन ती काय म्हणून सांगेल ? जवाहरलालांना कमलेचें हृदय, तिच्या आकांक्षा त्या वेळेस कळल्या नाहींत.

कमलाच्या प्रकृतीसाठी जवाहर तिला व छोट्या इंदिरेला घेऊन युरोपला निघाले. पुढें छोटी बहीण कृष्णाहि तिकडे गेली. जिनीव्हा हें आंतरराष्ट्रीय भेटीगांठींचें स्थान. तेथें ही मंडळी राहिली. स्वित्झर्लंड सृष्टिसौंदर्याचें माहेरघर. जवाहर म्हणजे निसर्गाचें बाळ. पर्वतांवर चढावें, दर्‍यांतून उतरावें, विमानांतून उंच आकाशांत जावें, समुद्रांत डुंबावें, बर्फावरून घसरावें, फुलें-पांखरे बघावीं, आकाशांतील रंग बघावे, तारे निरीक्षावे, ही सारी त्यांना हौस. एकदां बर्फाच्या पर्वतावर मंडळी गेली होती. जवाहरलालांना कोणाचा धक्का लागला नि चालले खालीं घसरत. उजवीकडे प्रचंड कडा होता. मोठ्या प्रयासानें घसरतां घसरतां ते कुशीवर वळले. थोड्या वितींच्या अंतरानें खोल दरींत न पडतां दगडांशीं जाऊन अडकले. आणि भारताचा महान् पुत्र वांचला. पांचदहा सेकंदांचा तो अवधि परंतु युगाप्रमाणें वाटला. रात्रीं एका शेतकर्‍याकडे मग जेवले, झोंपले.

 

१९१८ मध्यें पहिलें महायुद्ध थांबलें. हिंदूस्थानला स्वयंनिर्णयाचा हक्क द्या, असें सांगण्यासाठीं राष्ट्रसभेचें शिष्टमंडळ विलायतला गेलें होतें. लो. टिळकहि गेले होते. मध्यंतरीं काय सुधारणा देतां येतील तें बघायला माँटेग्यू साहेब या देशांत येऊन गेले होते. परंतु सुधारणा देणें दूरच राहिलें. रौलेट कायदा भारताच्या डोक्यावर बसाला. महायुद्धाच्या काळांत देश स्वतंत्र करण्यासाठीं भारतांत गदर चळवळ झाली. तळेगांवच्या समर्थ विद्यालयांतील दामोदर पिंगळे त्यांतच फांशीं गेला. रासबिहारी घोष जपानकडे गेले. स्वातंत्र्योत्तर काळीं अमेरिकेंत नेहरू गेले असतां सॅनफ्रानसिस्को येथें गदर चळवळींतले जुने देशभक्त भेटले. ज्या स्वातंत्र्याच्या ध्येयासाठीं त्यांनीं यमयातना भोगल्या, मातृभूमीपासून दूर वनवास भोगले तें ध्येय पूर्ण झालेलें पाहून त्यांना किती कृतार्थता वाटत होती !  स्वतंत्र झालेल्या आपल्या मातृभूमीच्या एका सत्पुत्राचा अमेरिकेंत झालेला तो जयजयकार पाहून त्या वृद्ध देशभक्तांचे हृदय आनंदानें उचंबळलें. अशी ती गदर चळवळ त्या वेळेस झाली. ब्रिटिश सरकारनें चौकशी केली. चौकशी-समितीनें अहवाल प्रसिद्ध केला. त्याच्या आधारें सरकारनें रौलेट कायदा पास केला. संशयावरून वाटेल तेव्हां पकडण्याचा या बिलानें पोलिसांना अधिकार देण्यांत आला होता. महात्माजी साबरमतीच्या तीरावरून म्हणाले : “मानवाची ही विटंबना आहे. सार्‍या राष्ट्रानें बिलाचा निषेध करावा.”

एप्रिल १९१९ चे ते दिवस. प्रार्थना, हरताळ, उपवास, सभा असा तो कार्यक्रम होता. सारें राष्ट्र नवतेजानें उभें राहिलें. नि:शस्त्र जनतेला मार्ग मिळाला. दिल्लीला गोळीबार झाले. गुरख्याच्या बंदुकीसमोर श्रद्धानंदांनीं छाती उघडी केली व म्हटलें : “चलाव तेरी गोली.” तिकडे पंजाबांत जालियनवाला बागेंत सभेला हजारों लोक जमलेले. त्यांच्यावर दारूगोळा संपेपर्यंत गोळ्या झाडण्यांत आल्या. शेकडों मेले. लष्करी कायद्याचा धिंगाणा सुरू झाला. त्या वेळेस मोतीलालजी, देशबंधू दास पंजाबांत चौकशीसाठीं गेले. मदत करायला जवाहरलालहि गेले. गांधीजीहि आले. सरकारनें सार्‍या प्रकारावर सारवासारव केली. गंगेच्या तीरावर राष्ट्रसभेचे नेते जमले. स्वातंत्र्य-प्राप्तीपर्यंत झगडत रहायला त्यांनीं निर्धार केला. परंतु कसें झगडायचें ? असहकार व कायदेभंग हाच एक मार्ग होता. जवाहरलाल तो मार्ग घ्यायला अधीर झाले. मोतीलालांच्या मनाची कालवाकालव होत होती. आजवर जीवन सुखांत गेलेलें. गांधीजींचा मार्ग म्हणजे सतीचें वाण. पितापुत्रांचे रात्ररात्र वाद होत. कधीं कधीं रागानें शब्दाशब्दी होई. बहिणींना चिंता वाटे. आईचा कंठ दाटे. हृदय फाटे. पितापुत्रांची मतभेदानें ताटातूट होणार का ?

महात्माजी एकेक मोहरा मिळवीत चालले. लोकमान्य देवाघरीं गेले होते. महात्माजी म्हणाले :
“आता एक क्षणभरहि लोकमान्यांचें निशाण खालीं ठेवतां येणार नाहीं.” मोतीलाल व देशबंधु या दोन भीमार्जुनांची जोड मिळावी म्हणून गांधीजींची पराकाष्ठा. मोतीलालजींचा फोटो पाहून ते एकदां म्हणाले : “केवढ्या पुरुषाशीं मला झगडायचें आहे ? ही हनुवटी, हे डोळे. अपार निश्चयी हा पुरुष आहे. याला जिंकून घेणें कठिण आहे.” परंतु महात्माजींनी मोतीलालांना जिंकलें. गांधीजींच्या मार्गानें जायला ते तयार झाले. पितापुत्र समरस झाले, पुन्हा मोकळेपणा आला.

आनंदभवनांत क्रान्ति झाली. ते आवडते घोडे, त्या घोड्यांच्या गाड्या, घरांतील तें उंची सामान, त्या कलात्मक वस्तु, सुंदर भांडीं नाना देशांतून आणलेलीं- सारें विकण्यांत आलें. आचारी, बटलर, अनेक नोकरचाकर, यांना प्रेमानें निरोप देण्यांत आला. घरांत साधेपणा आला. जुने बडे बडे स्नेही येतनासे झाले. आता देशासाठीं तळमळणार्‍या खादीधारी लोकांची जा-ये सुरू झाली. गांधीजींनीं राष्ट्राच्या विचारांत, आचारांत, पेहरावांत क्रान्ति केली. तें नवदर्शन होतें. जवाहरलाल म्हणतात : “माझ्यासमोर जीवनाचा स्वच्छ मार्ग नव्हता. अंधार होता. महात्माजींनीं प्रकाश दिला. त्यांच्यामुळें जीवनाचा अर्थ मला कळूं लागला, कां जगावें तें कळूं लागलें.”

   

पुढे जाण्यासाठी .......