“घरी कोण कोण आहेत?”
“मोठा भाऊ आणि त्याची बायको. आता मुलेबाळे असतील. एक बहीण मागे आलेली. दुसरी एक बहीण मी घर सोडले तेव्हा सातआठ वर्षाची होती. तिचे कदाचित लग्न झाले असेल. वडील आमचे मागेच वारले. आई आहे ती माझ्यासाठी कंठात प्राण आणीत असेल. आहे की नाही ते तरी काय माहीत? मी घरीत जातो. भारतमातेचे हिंडून दर्शन घेतले; आता जन्मदात्या आईजवळ जातो. तिच्या सेवेत भारताची सेवा येऊन जाईल.”
“तुला येथे राहणे म्हणजे हृदयवेदना असे वाटत असेल तर तू जाणेच बरे.”
“हो मी जाणेच बरे. घना, तुझी येथे ओळख झाली. मैत्री जडली. पत्र पाठवीत जा.”
“तू जाणार आणि मी येथे राहणार? माझे तरी काय कर्तव्य? तुझ्यासारखे धैर्य, तुझी तीव्रता माझ्याजवळ नाही. आपण कोण-कोठले! थोडे दिवस एकत्र आलो. एवढाच का ऋणानुबंध होता? आणखी नाही का आपल्या भेटीला अर्थ?”
“प्रभू जाणे.”
आता अंधा-या छाया पडू लागल्या, दोघे मित्र संस्थेत आले. इतरांची जेवणे आटोपली होती. सखाराम आणि घना दोघेच राहिले होते.
“रुपल्या, तू जेवलास का?” सखारामने विचारले.
“तुम्ही जेवा, मग मी जेवेन.” तो म्हणाला.
“अरे आमच्याबरोबर ये, बस.”
“नाही दादा, आम्ही मागून बसू.”
शेवटी सखाराम आणि घना दोघेच बसले.
रुपल्या पळून गेला.
दोघे मित्र जेवून गेले. घना आपल्या खोलीत वाचीत बसला. सखाराम बगीचात जाऊन अभंग गुणगुणत बसला. रातराणीचा सुगंध सुटला होता.
सायंकाळच्या गाडीने सखाराम जाणार होता. त्याला आज क्लबातर्फे मेजवाणी देण्यात येणार होती. घनाने सारी तयारी केली. केळीची पाने, रांगोळी,- सारा थाटमाट होता. परंतु आयत्या वेळी रसभंग झाला.
सखाराम ऐकत होता, दोघे मित्र आता गप्प झाले.
एकाएकी सखारामने विचारले, “काय रे घना, कामगारांच्या पगारातून या संस्थेसाठी पैसे घेतले जातात, हे खरे का? त्या दिवशी एकाने मला टोमणा मारला की, गरीबांसाठी तुम्हांला इतके वाटते तर गरीबांच्या पैशावर जगता कशाला?”
“गिरणीतील कामगारांच्या पगारातून रुपयामागे पैसा घेतला जाई. हल्ली घेतात की नाही माहीत नाही. कामगार स्वखुशीने देतात असे लिहून घेतले जाई. रुपयापाठीमागे पैसा म्हटले तरी महिन्याला आठ-नऊशे रुपये जमत. वर्षाला जवळ जवळ दहा रुपये प्रत्येक कामगाराचे या मार्गाने मिळत. गेली दहा वर्षे अशा रीतीने पैसे घेतले गेले. म्हणजे कामगारांनी जवळ जवळ एक लक्ष रुपये दिले म्हणा ना. कोणी तरी मागे वर्तमानपत्रातून याला वाचा फोडली होती. परंतु म्हणतात, त्या पत्राला पैसे देऊन ते लेख प्रसिद्ध करणे बंद करण्यात आले. मला तरी एवढेच माहीत आहे.”
“घना, मग मी या संस्थेत कशाला राहू? कामगारांसाठी आपण काही करीत नाही. नाही त्यांची रात्रीही शाळा चालवीत, नाही त्यांती संघटना करीत. माझी तर ही वृत्तीही नाही. मी झाडू हाती घेऊन स्वच्छता करीन. परंतु इतर मला नाही जमत. मी येथे न राहणे बरे. अत:पर येथे राहणे म्हणजे पाप, असेच मन रात्रंदिवस पुकारीत राहील.”
“मी तुला काय सांगू? येथून कोठे जाणार?”
“कोठे जाऊ मनाला शांती मिळावी म्हणून हिंदुस्थान पालथा घातला. विवंकानंद-आश्रमात गेलो, बेलूर येथे गेलो. ते ते महापुरुष मोठे असतील; परंतु या संस्थांतून माझ्यासारख्याला कोठून वाव? पाँडिचेरीला युरोप-अमेरिकेतून येतात, त्यांची किती व्यवस्था! परंतु तेथे मी रडकुंडीस आलो. वाटले की, हे आश्रम म्हणजे जाहिरातबाजी आहे! अरविंदांना माझे प्रणाम. आज इतकी वर्षे ते एकान्तात आहेत. आपण पाच मिनिटे एके ठायी मन निवांत करुन बसू शकत नाही. परंतु त्या आश्रमाचे बाहेरचे व्यवस्थापक! तेथे कोण घेणार गरिबांची दाद? मोठमोठ्या आश्रमांतूनही मला संकुचितता आढळली. एका मोठ्या संस्थेत गेलो. तेथे शास्त्री होते. मी रहाटाजवळ होतो. ते मला म्हणाले, विहिरीत घागर बुडवून ठेवा. मग मी काढीन. त्यांना का माझा विटाळ वाटत होता? एका आश्रमात गेलो, तो मजजवळ कोणी नीट साधे बोलेना! ही म्हणे कामाची वेळ. अरे, एक अतिथी तुमच्या संस्थेत येतो, त्याची सहानुभूताने चौकशी नको करायला? क्षणभर काम ठेवा बाजूला. घना मला तर शिरसी आली! कदाचित मी दोषैक दृष्टीने बघणारा असेन; वर्तमानपत्रांतून मोठेमोठे लेख येतात परंतु जवळ गेल्यावर भ्रमनिरास होतो. कोठे जाऊ मी? या संस्थेत आलो तर येथल्या अद्वैताचा निराळाच अवतार! मी घरी जातो. आज बारा वर्षांत मी घरी गेलो नाही. माझा मोठा भाऊ सर्वांना सांभाळत असेल, त्यालाच मदत करावी. हातचे सोडून पळत्याच्या पाठीस कशाला लागू?”