रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

समाजवाद

ती निष्ठा जोवर नाही तोवर खरी जीवनदृष्टीच आली नाही असे मी म्हणेन. मी समाजवादी तत्त्वज्ञानाकडे केवळ राजकीय द्दष्टीने नाही पाहात तर मानवतेच्या द्दष्टीने पाहतो.

समाजवादी लोकांना श्रमाची महती वाटत नाही. वगैरे वाटेल ते मोठमोठेही बोलतात. समाजवादी तर सर्वांना काम द्या म्हणत आहेत. परंतु त्यांच्या श्रमातून उत्पन्न होणारी धनदौलत व्यक्तीच्या हातात न जाता सर्व राष्ट्रासाठी असावी असे त्यांचे म्हणणे.

जोवर भरपूर उत्पादन नाही तोवर नफा राष्ट्राचा होणार असेल तर ते अधिक श्रमतील. पुढे उद्योगधंदे भरपूर वाढले म्हणजे थोडे कामाचे तास कमी करून भागणार आहे असे वाटले तर तास कमी करून मिळालेली विश्रांती ज्ञान, विज्ञान, कला यांच्यासाठी ते दवडतील. सारा समाज संस्कृती-विकासात रमेल असे हे जीवन-दर्शन आहे. सर्वांगीण विकासाचे नवदर्शन; त्यांची टिंगल नका करू.

अद्वैत कृतीत आणणे म्हणजे समाजवाद. ही तुच्छ वस्तू नाही. कृतीत आणलेला वेदान्त म्हणजे समाजवाद. 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु' असे पुटपुटून का सारे सुखी होतील? सर्वांना सुखी करण्याच्या योजना हव्यात. त्यांचा प्रचार करायला हवा. तशा माणसांचे सरकार व्हावे म्हणून धडपड हवी. एकीकडे पून्जीपती आणि एकीकडे उपाशी जनता ही का समाजाची धारणा? विषमता म्हणजे धर्म नव्हे. समता म्हणजे धर्म. समाजवाद आणणे म्हणजेच धर्म आणणे. सर्वांचा विकास व्हायला संधी निर्माण करणे याहून श्रेष्ठ धर्म कोणता?

 

मी समाजवादी पक्षाचा सभासद नाही, परंतु माझी सहानुभूती त्या पक्षाला आहे. काँग्रेसमध्ये राहणे नव्या घटनेमुळे समाजवादी पक्षास अशक्य झाले, तो अलग झाला. महात्माजी काँग्रेसमध्ये समाजवादी असावेत असे इच्छित. नरेन्द्र देवांना अध्यक्ष करा, ते म्हणाले. परंतु त्यांचे तरी ऐकतो कोण? ते तर या राष्ट्रात समंजसपणा यावा म्हणून गेले. ज्या स्वराज्यासाठी धडपडत होते ते अजून यायचे आहे.

नियंत्रणे उठवा, किंमती उतरतील. भांडवलदार महात्माजींना म्हणाले. नियंत्रणे उठली. किंमती उतरण्याऐवजी वाढल्या. आपल्या देशातील भांडवलदार, व्यापारी यांना पैशापलिकडे काही नाही. परंतु सरकार त्यांच्या बाबतीत दयाशील. आम्ही दहा-वीस वर्षे भांडवलदारांस हात लावू इच्छित नाही ते म्हणतात. हिंदुस्थानच्या भोवती लाल ज्वाळा आहेत. लौकर समाजवादाकडे पावले टाकल्याशिवाय सोय नाही.

समाजवादी राजवट आली तरी एकदम स्वर्ग नाही येणार. परंतु संस्थानिक, भांडवलदार सर्वाची अधिक संपत्ती राष्ट्राची करण्यात येईल. अशी आर्थिक समता आणून कामगारांना मंत्र सांगू, की अजून काटकसरीनेच राहू. जे अधिक उत्पादन होईल ते अधिक उद्योगधंद्यासाठी वापरू. अशा रितीने पुढे जाऊ. समाजवादी वातावरण निर्माण होईल.

तुम्हांलासुध्दा जर एकदम स्वर्ग नसेल निर्माण करता येत तर काँग्रेसला का नावे ठेवता असे कोणी विचारतात. त्यांना उत्तर हे की, काँग्रेस त्या दिशेने पावलेही टाकीत नाही. समाजवादी पक्ष आता सांगितल्याप्रमाणे महिना ५०० रुपयांहून अधिक उत्पन्न असता कामा नये असे ठरवून त्या दिशेने वेगाने नियोजनपूर्वक जाईल.

परंतु ही जीवननिष्ठा देणे हे का पाप? हवा, पाणी, प्रकाश ही सर्वांना हवीत. त्यांच्यावर व्यक्तीची मालकी नसावी. त्याप्रमाणे मोठमोठे कारखाने राष्ट्राच्या मालकीचे करावेत असे म्हटले तर का पाप आहे? जमिनी सामुदायिक सहकारी पध्दतीने कसाव्यात, म्हटले तर का पाप?

राजकारण म्हणजे पाप नव्हे. महात्माजी म्हणत, राजकारणही आपण आध्यात्मिक करू. नामदार गोखलेही म्हणत की, निर्मळ भूमिकेवरून राजकरण करू आणि नुसती लोकसेवा करून का सारा समाज सुखी होणार आहे? श्रीमंतांच्या जवळून देणग्या घेऊन, समाजाच्या दुःखावर मलमपट्टी करीत बसल्याने रोग हटणार नाही. कीव करणे याहून वाईट गोष्ट ती कोणती?

जो रात्रंदिवस श्रमतो, त्याची कीव करून त्याला कपडे नका वाटू; त्याचा हक्क नाही का? जो काम करायला तयार आहे त्याला काम द्या, स्वाभिमानी भाकर त्याला खाऊ दे. हे सारे करावयाचे म्हणजे समाजवादी दृष्टीच हवी. ती देणार्‍या पक्षांविषयी निष्ठा असली म्हणून काय बिघडले?

 

खर्‍या  शेतकर्‍याला कमी धान्य पिकावे अशी इच्छा नसते. त्याला पत्रकांनी शिकवण्याची जरूरी नाही, परंतु त्याला गूळ, तेले, कापड, साखर, लोखंडी सामान, रॉकेल, सिमेंट, सारे महाग, याचे भय. तो धान्याऐवजी तंबाखू, भुईमूग, कपाशी पेरतो. वस्तू स्वस्त करा. भांडवलदार करणार नाहीत म्हणून कारखाने राष्ट्राच्या मालकीचे करा. दरवर्षी नफा उरेल, तो पुन्हा नवीन उत्पादनात घाला. ५०० कोटी रुपये दडवलेला काळा नफा बाहेर खेचा. संस्थानिकांची पूंजी, वर्षासने थोडी उद्योगधंद्यासाठी घाला. असे योजनापूर्वक कराल तर बेकारी कमी होईल. मग शेतकरी धान्य अधिक पिकवतील. मुळात हात घातला पाहिजे. काँग्रेस सरकारची ही हिंमत नाही.

गांधीजींच्या जीवनाचा यांना विसर पडला आहे. म्हणतात, गांधीजी गेले आणि सत्याग्रहही गेला. श्री. किशोरलालभाईंनी विचारले, 'मग का रक्तपात हवे आहेत.' अन्याय दूर करण्याचा मार्ग गांधीजींनी तुम्हांला दाखविला. तो दूर सारलात तरी आम्ही दूर सारू इच्छित नाही. काँग्रेसला समाजवादी प्रतिष्ठा वाढवून द्यायची नाही. १९३१ मध्ये धुळयाच्या धर्मशाळेत व्यापार्‍या समोर बोलताना विनोबा म्हणाले, 'गांधीजी आहेत, म्हणून रक्तपात नाहीत, परंतु उद्या हा मोठा बांध दूर झाला व तुम्ही शोषणाचे धोरण बदलले नाहीत तर गरीब लोक तुम्हांला काकडीप्रमाणे खाऊन टाकतील.'

त्या शब्दांची काँग्रेस कार्यकर्त्यास मी नम्रपणे आठवण देऊ इच्छितो. जबाबदार काँग्रेस कार्यकर्ते म्हणत असतात. 'आम्ही तरी राज्य करू नाही तर कम्युनिस्ट तरी राज्य करतील.' मध्ये एक समाजवादी पक्ष सत्याग्रही मार्गाने जाणारा आहे, हे ते विसरतात.

काँग्रेसवर टीका करताना मला आनंद नसतो. वाटे डोळे मिटावे, नवजन्म घेऊन नवा लढा करावयास यावे. परंतु या देहात राहूनही नव-जन्म घेता येतो. माझी ध्येयभूत काँग्रेस माझ्या हृदयात आहे. त्याच ध्येयांची समाजवादी पक्ष पूजा करीत आहे. ती प्रत्यक्षात यावी म्हणून सत्याग्रहाच्या मार्गाने जात आहे.

समाजवादी पक्षाला सहानुभूती द्या. तो खरा नवधर्म. कोणी संस्कृतीच्या गप्पा मारतात. जोवर कोटयवधी संसार उद्ध्वस्त आहेत, तोवर कोठली संस्कृती? संघाचे लोक म्हणतात, समाजवाद पाश्चिमात्य आहे. तो नको. त्यांना पाश्चिमात्य यंत्रे चालतात. आगगाडी, रेडिओ, लाउडस्पीकर, सारे हवे. नवी शस्त्रास्त्रे हवीत.

त्यांना कळत नाही की यंत्रापाठोपाठ समाजवाद येतोच म्हणून कारखाने एकाच्या हाती संपत्ती देतात. तेथे असलेले कामगार मग म्हणतात, 'ही संपत्ती आम्ही निर्मिली, आमचीच आहे.' यंत्रे हवीत तर समाजवादही हवा; नाही तर एक उपाशी, एक तुपाशी, असली विषमता राहील. ती विषमता म्हणजे का संस्कृती? असल्या संस्कृतीला दूर फेका. खरी संस्कृती सर्वांचे संसार सुखी करण्यास उभी राहील. समाजवाद प्रत्यक्षात आणणे म्हणजे संस्कृती. खोटया मृगजळात फसू नका. स्वच्छ विचार करावयाला शिका.

   

रेंगाळत बसण्याची ही वेळ नाही. कधी कधी हजार वर्षांची प्रगती एका क्षणात होत असते. एखादा समाजवादी मंत्री मध्यसरकारात येऊन परिस्थिती सुधारत नसते.

आर्थिक धोरणच जेव्हा नव्याने आखाल तेव्हा काही तरी करता येईल. ह्या सर्व गोष्टींचा गंभीर विचार मनात येतो व भारताचे भवितव्य काय असे वाटून चिंता मनाला ग्रासते. परंतु हा महान देश हजारो वर्षे जगला आहे. त्याचे भलेच होईल असे मनात तर येते. परंतु धैर्याने, प्रतिभिने, व्यापक सहानुभूतीने, मारुतीची पावले टाकत प्रगती करू तरच आशा आहे.

देशाला आज स्वच्छ विचाराची भूक आहे. सर्वांना गोंधळल्यासारखे वाटते. मी पूर्वी काँग्रेस, काँग्रेस असे करीत असे. मरताना ओठावर काँग्रेस नाव असो असे म्हणत असे. परंतु ती काँग्रेस कुठे आहे? जिचे लाखो सभासद व्हावेत म्हणून १९४० साली मी एकवीस दिवस उपवास केला, ती काँग्रेस आज नाही. ती काँग्रेस गेली. आज एक सत्ताधारी काँग्रेस पक्ष आहे.

काँग्रेस म्हणजे भांडवलशाही धोरण १५-२० वर्षे चालवू पहणारी एक पार्टी आहे. ती गरिबांना का आज विसरली? चलेजाव ठरावात म्हटले होते, जे स्वराज्य आणावयाचे ते Toiler in the field and factory -शेतात राबणारा आणि कारखान्यात राबणारा यांच्यासाठी आणावयाचे. मग शेतात राबणार्‍या ना मिळाली का थोडीफार शेती?

श्री. मुरारजीभाई म्हणतात, 'शिल्लक टाका पैसे, काटकसर करा नि घ्या जमीन.' गरीबांच्या दुःखावर डागण्या देऊ नका. १९३९ मध्ये मुरारजींना भेटावयास गेलो होतो. तेव्हाही खानदेशात ओला दुष्काळ होता. एदलाबाद पेटयातील एका पाटलाने गुरे विकून शेतसारा भरला. मी श्री. मुरारजींना सांगितले तर ते म्हणाले, 'एकदा दुष्काळ येताच का गुरेढोरे विकावी लागतात?' मुरारजींना काय माहीत खेडयातील स्थिती? खानदेशात काँग्रेसचे सभासद करीत हिंडत असताना खेडयातील कोणी बंधू म्हणत, 'गुरुजी, उडद घ्या आणि मला सभासद करून घ्या. रोख चार आणे कोठून आणू?' परंतु मुरारजीभाईंना सारी गंमत वाटते. मी खेडयातील जनतेला सांगत असे, स्वराज्यात तुम्हांला थोडी तरी जमीन मिळेल. आज त्यांना हे तोंड कसे दाखवू?

मी माझ्या पदरचे सांगत नसे. आमच्या सरकारला हे का करता येऊ नये? यांना जमीनदारी, कारखानदारी पाहिजे आहे, ते स्वच्छ तसे सांगतात. उत्पादन कसे वाढणार? प्रगतीहीन भांडवलदार का उत्पादन वाढवणार आहेत? त्यांची ती दृष्टी तरी आहे का? उत्पादन वाढले नाही तर वस्तू स्वस्त होणार नाहीत. वस्तू स्वस्त नाही झाल्या तर शेतकर्‍याला धान्याचा भाव कमी मिळतो म्हणून तो अधिक धान्य पिकवावयास तयार होणार नाही.


 

खादीचे प्रचंड सामर्थ्य लक्षात आणा. कामगारांना उगीच फार दुखवू नका. मालकधार्जिणे बनू नका. समाजवादाकडे झापाटयाने जा. जमीनदारांना कोटयवधी नुकसानभरपाई द्यायला हवी, चलनवाढ कशी थांबेल? म्हणून जमीनदारी राहो'' असे मूर्ख तत्त्वज्ञान नका सांगू. जमीनदारांना उद्योग करू दे. त्यांचे वाडे, इमले, दागदागिने आहेत, ते का फूटपाथवर पडणार आहेत? कशाला नुकसान भरपाई? आणि द्यायचीच तर ती १९७० मधील लांबच्या कॅशसर्टिफिकेटात द्या.

तीव्रता असली म्हणजे सारे करता येते, तीव्रता कृत्रिमपणे निर्माण करता येत नसते. मोले रडाया घालणे फोल आहे. गरीब जनतेच्या दुःखाशी, दैन्याशी सर्वभावाने एकरूप व्हाल तर सारे उपाय दिसतील. आणि ते अंमलात आणायला खंबीरपणे, गंभीरपणे उभे राहाल.

आशिया खंडात नवीन युगाचा उदय होत आहे. आम्ही ऍटलीकडे जातो, आम्ही ट्ररुमनकडे जाणार, कारणा आम्हांला सुरक्षित वाटत नाही. का नाही सुरक्षित वाटत? देशात सर्वत्र असंतोष आहे म्हणून का? हिंदला बाहेरच्या संकटाचे भय आहे का? तीस कोटींचे हे राष्ट्र आतून खंबीर असेल तर तितके भिण्याचे कारण नाही.

आता स्वराज्य मिळून दोन वर्षे होतील. निर्वासितांचे गंभीर प्रश्न, काश्मीर युध्द, ही संकटे होती व अजून आहेत. निर्वासितांची पुनर्वास्ती अजून व्हायची आहे. काश्मीरचे घोंगडे अजून भिजत पडले आहे. संस्थानांचा प्रश्न बराचसा सुटला आहे. परंतु या प्रश्नाला तोंड देत असताही आम्ही यातील प्रगतीशील धोरण आखले पाहिजे होते.

झपाटयाने जमिनदार्‍या नष्ट करावयास पाहिजे होत्या. जमीनदारांना मोबदला किती द्यायचा याची गणिते करीत आम्ही बसलो. जवळ शेजारी क्रांतीच्या लाल ज्वाळा पेटलेल्या. अशा वेळेस आकडेमोडीने भागत नाही. प्रतिभासंपन्न उज्ज्वल आर्थिक धोरण आखावे लागते.

वर्तमानपत्रातून भरमसाट बातम्या बंगालमधून येत आहेत. त्या का भिववण्यासाठी? आणि बंगालमध्ये समजा कम्युनिस्टी लाटा उसळल्या, तर त्या बिहार, युक्त प्रांताकडे नाही का येणार? मोठया जमीनदार्‍या, लोखंड, सिमेंट, साखर यांचे कारखाने तिकडेच. तुमचे धोरण प्रतिभाहीन, भांडवलशाहीला गोंजारणारे. केवळ बंगालमधून हा लाल रंग सर्वत्र पसरत येईल. म्हणून बंगालमध्ये थोरामोठयांनी गेले पाहिजे. तेथील जनतेला साफ विचारले पाहिजे, समजावून दिले पाहिजे. बंगालचे आजचे सरकार नको असेल तर तुम्ही निवडणुकीने नवीन आणा परंतु रक्तपात नको, अशातून हुकूमशाही येईल, निराळीच संकटे येतील हे समजावून सांगा. बंगालमध्येच नव्हे तर सर्व देशभरच नवे प्रतिभासंपन्न आर्थिक धोरण अवलंबा.

   

पुढे जाण्यासाठी .......