रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत

म्हणून आपण क्षुद्र कुंपणे घालून बसता कामा नये. व्याप वाढवाल तर वैभव वाढेल. संकुचितता सोडा. सारे प्रांत एकमेकांजवळ प्रेमस्नेहाने वागोत. भारताचे एक हृदय असो. प्रांत एकजीवी असोत. प्रांतभारती आणि विश्वभारती अशी आमची दोन ध्येय आहेत. ते थोर पूर्वज म्हणाले,

'कृण्ववन्तो विश्वमार्यम्'

आपण सर्व विश्वाला आर्य म्हणजे उदरा, सुसंस्कृत करू. म्हणून चिनी भाषा शिकून त्या भाषेत प्राचीन पंडितांनी ग्रंथ लिहिले. विनोबाजी अरबी शिकून कुराणाचा महिमा मुसलमानांना आज सांगत आहेत.

प्रांतांचा परस्परांशी आणि भारताशी प्राणमय संबंध - याला आपण प्रांतभारती ध्येय म्हणू.

दुसरे, रवींद्रनाथांनी उदघोषिलेले विश्वभारतीचे. भारताचा सर्व जगाशी संबंध ठेवणे. असे हे संबंध संयम नि सहानुभूती विशाल व थोर दृष्टी, ही असतील तरच निर्माण होतील. प्रांतांचे भारत हृदय नि भारत विश्वाचे हृदय होईल.

 

आळा कशाने घालता येईल? परस्परांची भाषा अभ्यासून. विनोबाजी आज सांगत असतात की, एखादी तरी द्रविडी भाषा आपल्याला आलीच पाहिजे, मातृभाषा नि हिंदुस्थानी याशिवाय. जयप्रकाश मद्रासमध्ये हिंडताना आधी चार वाक्यें तामिळीमध्ये बोलत. लोकांना आनंद होई. भाषा अहंकरासाठी नसून हृदयाला पोचविण्यासाठीच आहे. सेनापती नि मी अस्पृश्यता निवारणार्थ हिंडत असता गडहिंग्लजला गेलो. मला चिठ्ठी आली ''गुरुजी कानडीत बोला.'' मी म्हटले, ''तुरुंगात वाचायला शिकलो, परंतु बोलायला नाही.'' सेनापतींना वाईट वाटले, आमची मोटरलॉरी सारखी जात होती. बरोबरच्या सेवादल पथकांत कुतूब होता. त्याला कानडी येई.

सेनापती म्हणाले, ''बंधू-भगिनींनो वगैरे मला कानडीत शिकव.'' सेनापतींनी चार वाक्ये पाठ केली. पुढच्याच सभेत ''बांधव रे मत्तु भगिनी रे'' त्यांनी म्हटले; - टाळयांचा कडकडाट झाला! हृदयाला ते शब्द भेटले. विवेकानंद शिकागोला सर्वधर्म परिषदेला गेले. सारे प्रतिनिधी ''सभ्य नर-नारींनो'' असा आरंभ करीत. विवेकांनद ''बंधू-भगिनींनो!'' म्हणाले आणि टाळया थांबता ना. त्या एका शब्दाने त्यांनी सारी हृदये जिंकली. अशी ही मौज आहे. कानडी भाषा बोलत असले म्हणजे 'काय यंडु-गुंडु चालवले आहे?' असे म्हणू नये. गुजराथीला 'सामळो' असे हिणवू नये. ती ती भाषा कानावर पडली तर भावाची भाषा भेटली म्हणून नाचावे. थोडे थोडे शब्द येत असावेत, गाणी येत असावीत. आनंद वाटावा.

या मुंबईस माटुंग्याच्या उडपीवाल्याच्या खानावळीत जातो. तेथे कानडी, मद्रासी सारे येतात. मला अपार आनंद होतो. बंधूंचे दर्शन होते. मी देशभर कधी हिंडू फिरू? मला मित्र म्हणतात, ''इतक्या लांब कशाला जाता?'' तेथे मला माझा प्यारा भारत भेटतो. हा आनंद त्यांना काय कळे? विनोबाजी एकदा म्हणाले, ''आकाशातील सप्तर्षी पाहून मला नकाशातील काश्मीर नि युक्त  प्रांत आठवतात.'' जेथे जातो तेथे भारताचे भव्य दर्शन. असे भारतमय आपण होऊ. हिमालय माझे डोके, विंध्याद्री माझा कंबरपट्टा, पूर्व-पश्चिम तीर माझे पाय, सर्व भारताच्या रूपाने मला नटू दे. सार्‍या माझ्या भाषा, सारे माझे भाऊ, माझे मोठे कुटुंब आहे. १०-१२ लाखांचे हे तुटपुंजे राज्य नाही. ३० कोटींचे. मग मोठया कुटुंबावर जबाबदारी अधिक. शिका दोनचार भाषा. प्रांताच्या सीमेवरचे भाग तर संगमाप्रमाणे तीर्थक्षेत्रे माना. ते इकडे का तिकडे भांडू नका. सीमा समितीचा निकाल मान्य करून प्रेम-स्नेहाने नांदा.

प्रांतांनी भारती व्हावे आणि भारताने अति भारती व्हावे. महात्माजी उर्दू लिपी शिका म्हणत. अरे त्या महापुरुषाची दूरद्दष्टी कोठे आहे तुमच्याजवळ? एकीकडे आशियाचा संघ करा म्हणावे. इजिप्तपासून तमाम मुस्लीम राष्ट्रांची उर्दू. फक्त तुर्कांनी रोमन लिपी घेतली. या सर्व देशांचे विचार करायला त्यांची लिपी नको का कळायला? या सर्व मुस्लिम देशांचे राजकारण वा अर्थकारण अमेरिकेच्या वृत्तपत्रांवरून का आपण वाचणार, समजून घेणार? हिंदी, मुस्लीम राष्ट्रांचे हृग्दत कळावे म्हणून उर्दू लिपी शिकणे अवश्यक आहे. युरोपातील लोक अनेक भाषा शिकतात. झेक राष्ट्रात हिंदीचे वर्ग चालतात. काय त्यांना जरूर ?

 

१९३० मध्ये आम्ही मुंबई प्रांतातले राजबंदी त्रिचनापल्लीला पाठवले गेलो. सायंकाळी प्रार्थना झाल्यावर कोणी काही लिहून वाची. व्यंकटाचम् म्हणून मुंबईचा एक राजबंदी माझा मित्र झाला होता. मी त्याला इंग्रजीत काही लिही, मी मराठीत अनुवादून वाचीन, असे सांगितले. त्याची भाषा मल्याळी. त्याने ''मलबारकडचा एक दिवस'' म्हणून लेख लिहिला. मी त्याचे भाषांतर करून वाचले.

''सकाळी बायका उठतात, चूल सारवतात, सडांसमार्जन करतात. मग कॉफी होते. आजीबाई भाजी चिरते. आजोबा पूजेला बसतात. सुना तळयावर धुणी घेऊन जातात...'' असे ते वर्णन होते. ऐकल्यावर महाराष्ट्रीय मित्र म्हणाले, ''आपल्याकडच्यासारखेच आहे.'' मी म्हटले, ''भारताचे हृदय एकच आहे.''

तेलगू भाषेत आपल्या ''शारदा'' नाटकासारखे नाटक आहे. तेच प्रश्न, त्याच सामाजिक समस्या. हुंडे. स्पृश्यांस्पृश्यतेचे प्रकार. म्हणून मी म्हणतो की, भारतीय संस्कृती एक आहे; प्राताप्रांताच्या विशेष अलग अशा नाहीत.

परंतु एकदा कोठे शुध्दीच्या नावावर हकालपट्टी सुरू झाली म्हणजे ती कोठे थांबेल ते सांगता येणार नाही. मराठीतून उर्दू शब्द हाकला चळवळ सुरू झाली. नाना शब्दांच्या नाना छटा असतात. आकाश शब्द नि अस्मान शब्द आपण एकत्र नाही घालणार, परंतु विविक्षित छटा दाखवायला अस्मान शब्द सुंदर वाटतो. सार्‍या  जगातून घ्यावे, पचवावे अन् बलवान व्हावे. इंग्रजी कोषात, राजा, सरदार, जंगल इत्यादी शब्द आढळतील. शेकडो ठिकाणचे त्यांनी शब्द घेतले. भाषाशुद्धीची चळवळ आणि प्रांत शुद्धीची चळवळ, हिंदुना मुसलमानांना हाकलावे, मुसलमानांनी हिंदु-शिखांना हाकलावे, एकमेकांची घाण जणू दूर काढावी असे प्रकार सुरू झाले; परंतु मुसलमानांनी हिंदू-शिखांना आणि हिंदू-शिखांनी मुसलमानांना हाकल्यानंतर पुढे काय?

हाकलावयाची तर गोडी वाटू लागली. मग बंगाल्याने बिहार्‍याला चले जाव म्हणावे, बिहारीने बंगालीला, तामीळ बंधूने तेलगू बंधूस, तेलगू बंधूने तामीळ बंधूस, कानडी बंधूने महाराष्ट्रीयांस, महाराष्ट्रीयांनी गुजराथीयांस- असे का एकमेकांना खो देत राहावयाचे? आज हे प्रकार सुरू होत आहेत. श्री. जयप्रकाश मद्रासच्या दौर्‍यावर असताना आम्हांला स्वतंत्र द्रविडीस्थान द्या, आर्यांनी आमचा नाश केला, आर्य भाषेतील शब्द काढून टाका, अशा चाललेल्या चळवळी त्यांनी पाहिल्या. त्यांना दुःख झाले. कोठे आहे भारत? प्रत्येक प्रांत का सर्वतंत्र स्वतंत्र होणार? हे असहिष्णु प्रकार कोण थांबवणार? आपणच याला आळा घालू या.

   

आज स्वतंत्र भारताची टोलेजंग इमारत उभारावयाची आहे. भाषावर प्रांतरचना पूर्वीच मंजूर झालेली आहे, परंतु अशी रचना केली जात असता द्वेष, मत्सर न फैलावीत परस्पर प्रेम राहो, सहकार्य राहो. भारताचे एक हृदय आहे- ही जाणीव सर्वांना असो.

परमेश्वराला सहस्त्रशीर्ष, सहस्त्राक्ष अशी विशेषणे आपण देतो, परंतु सहस्त्र-हृदय असे विशेषण कधीच आढळत नाही. परमेश्वराला हृदय एकच, त्याप्रमाणे भारताचे प्रान्त अनेक झाले तरी अंतकरण एक असो.

भारताची एक संस्कृती आहे. प्रत्येक प्रांताची एक विशिष्ट अशी संस्कृती कोठे आहे? थोडेफार फरक असतील, परंतु तेवढ्याने संस्कृती भिन्न नाही होत. भारतातील प्रत्येक प्रान्ताची का भिन्न संस्कृती आहे? भारतीय संस्कृतीची ध्येये आपल्या संस्कृत ग्रंथातून आहेत.

वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, स्मृतिपुराणे-दर्शन यातूनच आपणास ध्येये मिळाली. संस्कृतातीलच हे ध्येय-घोष प्रांतीय भाषांतून जनतेचे कैवारी जे संतकवी त्यांनी दुमदुमविले. कृतिदासांचे रामायण बंगालीत, श्रीधरांचा रामविजय मराठीत, कंश्रयचे रामायण तामीळमध्ये. परंतु त्या त्या प्रान्तांतील जनतेला त्यांच्या त्यांच्या भाषेतून राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान यांचे जे आदर्श मिळाले ते का निरनिराळे आहेत? भगवान शंकराचार्य जन्मले मलबारात, परंतु तो ज्ञानसूर्य हिंदुस्थानभर गेला. द्वारका, जगन्नाथपुरी, बदरीकेदार, शृंगेरी-चारी दिशांना चार पीठे स्थापून संस्कृतीचे ऐक्य निर्माण करता झाला.

शंकराचार्याच्या अद्वैताचा सुगंधच सर्व प्रान्तीय भाषांतील साहित्याकाला येत आहे. तुकारामाच्या अभंगात, नरसी मेहतांच्या भजनात, रवींद्रनाथांच्या गीतांज्जलीत, श्री बसप्पांच्या वचनात एकाच संस्कृतीची ध्येये दिसून येतील. भारतीय संतांनी आणि आचार्यांनी भारतीय संस्कृती एकरूप केली.

नामदेवांचे अभंग शिखांच्या धर्मग्रंथात जातात, कबीराची गाणी नि दोहरे, मीराबाईंची उचंबळवणारी गीते, गोपीचंदांची गाणी सर्व हिंदुस्थानभर गेली आहेत. दक्षिणेकडील यात्रेला उत्तरेकडील लोक येत. उत्तरेच्या यात्रांना दक्षिणेकडील. संस्कृतातून चर्चा चाले. तीच प्रांतीय भाषांतून मग जाई. अशा प्रकारे अखिल, भारतीय संस्कृती आपण निर्मिली.

भारतीय संस्कृतीच्या कमळाच्या अनेक पाकळया म्हणजे या प्रांतीय संस्कृती अलग नाहीत. परवा कलकत्त्यात डॉ. कटजू आले होते. त्यांचे स्वागत कताना बंगाली पुढारी म्हणाले, ''बंगाली संस्कृती निराळी आहे. तिच्या विकासात अडथळे आणू नका.'' बंगाली संस्कृती निराळी म्हणजे काय? तुमचे विवेकानंद, विद्यासागर, रामकृष्ण, बंकिम, रवीन्द्र, शरदबाबू-यांनी का असे काही दिले की जे इतर प्रान्तात नाही, जे इतर प्रान्तांच्या परंपराहून निराळे आहे? आज प्रत्येक प्रान्ताला असे वाटू लागले आहे की, आपण इतरांहून अगदी वेगळे, निराळे. बाबांनो, भाषा निराळी बोलत असाल, परंतु आईच्या दुधाबरोबर एकच संस्कृती भारतीय मुलांना पाजली जात आहे हे विसरू नका.


 

महाराष्ट्रभर गीतेवर प्रवचने देत हिंडावे, बृहन्महाराष्ट्रभर हिंडावे, प्रवचनाच्या शेवटच्या दिवशी माझ्या या प्रांतभारतीच्या स्वप्नासाठी मदत मागावी असे मनात येत आहे. महाराष्ट्रभर मजविषयी प्रेमस्नेह बाळगणारे अनेक मित्र आहेत. त्यांना माझ्या ह्या ध्येयपूर्तीसाठी मला नाही का मदत देता येणार? मी सार्‍या  महाराष्ट्रासमोर माझे चिमुकले हात पसरीत आहे. हे स्वप्न पूर्ण करायला द्याल का मदत? महाराष्ट्राला भूषणभूत ही संस्था होवो. भारतीय ऐक्याचे थोर ध्येय शिकवणारी प्रांतभारती प्रियतम महाराष्ट्रात उभी राहो.

पुण्याला मराठी साहित्यसंमेलन आहे. प्रांतभारतीच्या माझ्या स्वप्नाला पाठिंबा द्या. अशी कदाचित् मी तेथे जाऊन सर्वांना प्रार्थना करीन. परंतु माझी संकोची वृत्ती. तेथे जाऊन बोलण्याचे मला धैर्य होईल की नाही प्रभू जाणे.

तुकारामांनी म्हटले आहे. 'मेली लाज धीट केलो देवा.' माझी भीती, खोटी लाजलज्जा जाऊन या स्वप्नाच्या पूर्तीसाठी नम्रपणे निर्भयपणे साहित्य संमेलनातील सज्जनांसमोर येऊन मी सहानुभूती भिक्षा मागितली तर मला हसू नका, उपहासू नका. भारतीय ऐक्याच्या साक्षात्कारासाठी तहानलेले महाराष्ट्राचे मी एक धडपडणारे लेकरू आहे. या लेकराची आळी थोरामोठयांनी पुरवावी.

'केली पुरवी आळी
नव्हे निष्ठुर कोवळी।'


महाराष्ट्रीय जनता निष्ठूर न होता, कोवळया वृत्तीने एका मुलाचा ध्येयार्थी हट्ट, हे स्वप्न, ही असोशी पुरवील अशी मला आशा आहे.

प्रांतभारतीच्या मूर्तस्वरूपासाठी धडपडण्याचे अतःपर मी ठरवीत आहे. हा संकल्प पार पाडायला प्रभू मला शक्ती देवो. सत्य संकल्पाचा तोच एक दाता!

प्रचंड इमारत जेव्हा उभारण्यात येते तेव्हा आपल्याला काय दिसते? गवंडी दगडांना इकडे तिकडे काटीत छाटीत असतो. मगच दगडांना त्या भव्य इमारतीत जागा मिळते. ज्याप्रमाणे दगड-विटा सारख्या करून त्यांची पुढे आलेली टोके काटून छाटून घ्यावी लागतात, त्याचप्रमाणे दगडा-दगडांमध्ये, विटा-विटामध्ये सिमेंटही लागले; चुना लागतो. प्राचीन इमारती अजून भक्कम आढळतात. म्हणतात की, चुन्यात गूळही घालीत असत.

   

पुढे जाण्यासाठी .......