रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

राष्ट्रीय चारित्र्य

हिंदुस्थानवर ज्या मोठमोठया आपत्ती कोसळल्या, त्यातून पार पडून हे राष्ट्र उभे आहे. याचा अर्थ अजून राष्ट्राचे हृदय शाबूत आहे, असाच करावयास हवा. राष्ट्रे जगतात ती त्यांच्या पुण्यांशावर. राष्ट्राच्या जीवनात जे काही टपोरे, निर्मळ असते त्यातूनच राष्ट्र प्राणमय शक्ती मिळवत असते. प्राचीन काळापासून ॠषीमुनींनी, संतांनी, महात्म्यांनी, अज्ञात अशा कोटयवधी जीवांनी तेथे जी तीळतीळ पवित्रता ओतली, प्रेम ओतले, मानवता दाखविली, त्याग केले त्याच्यावर भारत उभा आहे. आज सर्वत्र बुजबुजाट असला तरी या सर्व विषांना पचवून ती पूंजीभूत पारंपारिक पुण्याई राष्ट्राला नवजीवन देत आहे. परंतु राष्ट्राचे हे पूंजीभूत भांडवल संपले तर? आज नवीन चारित्र्य निर्माणच होत नसेल तर, भर पडत नसेल तर मात्र धोका आहे.

महायुध्दाच्या वेळेपासून सदगुणांचा र्‍हास झाला आहे. लहानांपासून मोठयापर्यंत तात्पुरत्या दोन दिडक्या मिळून चैन कशी करता येईल इकडे लक्ष आहे. गिरणी मालकांनी, धान्यवाल्यांनी, लोक उपाशी आहेत, लोक उघडे आहेत, हे पाहूनही बेसुमार नफेबाजी केली आणि लहानांनीही तेचे केले. आगगाडीतील चहा विकणारा, सहा कपांचे दूध आठ कपांना पुरवून दोन कपांची किंमत खिशात टाकतो; रेशनिंगचे धान्य, कापड आणून, त्याचा काळाबाजार करून, त्या पैशात दारू पिणारे वा सिनेमा पाहणारे गरीबही आहेत. रेल्वे तिकिटांच्या काळयाबाजारालाही अशीच सीमा नसते. लोक तर चढतातच. पावती मागणाराजवळ भर दाम-दंडासह, बाकीचे हात ओले करून निसटतात. जेथे पाहावे तेथे घाणच घाण दिसते. या सर्व लहान-थोरांना एकच प्रार्थना की हे राष्ट्र जिवंत राहायला हवे असेल तर पूर्वीची पुण्याई पुरणार नाही. तुम्ही सारे अनीतीचे, खोटयानाटयाचे, लाचलुचपतीचे, फसवणुकीचे पुतळे होत असाल तर या देशाला आशा नाही.

आज देशाला सोन्यापेक्षा, डॉलरपेक्षा चारित्र्याची जरुरी आहे. शेक्सपियर कवीने म्हटले आहे, ''जो माझे पैसे चोरतो तो कचरा नेतो, परंतु माझे चारित्र्य कोणी चोरले तर त्याने माझे सारे काही नेले असे होईल.'' ज्या देशात लोकमान्य महात्माजी, रवीन्द्रनाथ, मदनमोहन मालवीय अशी नररत्ने झाली - त्या देशात काळाबाजार का? लाचलुचपत का? सत्यासाठी प्रसिध्द असलेल्या भारतात सत्याचा अस्त का व्हावा? सदगुण असतील तर वैभव. लक्ष्मी चंचल नाही, मनुष्य चंचल आहे. जेथे गुण असतील तेथे भाग्य येईल. आपल्या देशात सामाजिक जीवनाची आज जाणीव नाही, म्हणजेच धर्म नाही. सर्वांच्या धारणेचा जेथे विचार होतो तेथे धर्म आहे. तुम्ही काय निर्माण करीत आहात हा प्रश्न आहे. त्याग, ध्येय-निष्ठा, सत्यता, बंधुता, मानवता, अखंड उद्योग, करुणा, दया, धैर्य हे गुण राष्ट्रात सतत दिसले पाहिजेत. चार मोठया माणसांनी राष्ट्र मोठे होत नाही. सर्व जनतेची उंची वाढवायला हवी. नवीन पिढी चारित्र्यसंपन्न होवो. आज भारताला अन्नवस्त्राहून चारित्र्यसंपन्न माणसांची जरूरी आहे. प्राण गेला तरी खोटे बोलणार नाही, अनीतीने पैसे मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुलर्‍यास सतावणार नाही, अशा वृत्तीची निःस्पृह, निर्मळ,  सेवापरायण माणसे राष्ट्राला हवी आहेत. कोणत्याही विचारसरणीचे असा, परंतु असत्याचे आणि अन्यायाचे असू नका. काही वृत्तपत्रेही किती असत्य लिहितात ते सांगायला नको. चुकून असत्य लिहिले तर क्षमा मागता येते, परंतु जाणूनबुजून असत्याचा प्रचार करणे हेच ज्यांचे व्रत त्यांना काय सांगायचे? आणि पुन्हा सत्य-अहिंसेचा उदो उदो ही पत्रे करीत असतात. थोडी तर सदबुध्दी शाबूत ठेवा म्हणावे, हे राष्ट्र महान व्हावे, वैभवसंपन्न व्हावे, थोर भूमिकेवरून जावे असे तुम्हा सर्वांना वाटते? महात्माजींचे नाव ना येता-जाता घेता? मग थोडा प्रांजलपणा का दाखवीत नाही? परंतु हे कोणी कोणास सांगायचे?  अंतःकरण मृतवत असेल तर काय करायचे?

महाराष्ट्रा, तू पैशाने गरीब असलास तरी सार्वजनिक चारित्र्याच्या संपत्तीत तरी गरीब होऊ नकोस. सदगुणांनी संपन्न हो. महाराष्ट्रातील तरुणांनो, कोणत्याही दृष्टीकोनाचे असा, परंतु सत्य व प्रामाणिकपणा यांना विसरू नका. पेपर कळले म्हणून विद्यार्थ्यांना आनंद झाला असेल तर राष्ट्रमातेच्या डोळयांतून खिन्नतेचे अश्रू आले असतील. ती माता असत्यातच मोठेपणा मानणार्‍या , आनंद मानणार्‍या  मुलांविषयी का अभिमान बाळगील? कोटयवधी अशी सत्त्वहीन संताने असण्यापेक्षा मी निपुत्रिक असते तरी सत्त्वाने जगले असते, असे भारतमाता म्हणत असेल. ही भरतभूमी सत्यासाठी विश्वविख्यात होती. सत्यासाठी वनात जाणारा प्रभू रामचंद्र यांची जयंती आपण केली; ते सत्य जीवनात नसेल तर कोठला राम? आणि जेथे सत्याचा राम नाही ते राष्ट्र असून नसल्यासारखे आहे. भारतभूमीचे इतर सारे गेले तरी पर्वा नाही. तिचे सत्व न जावो, तिची सदगुणसंपत्ती न जावो हीच प्रार्थना.

 

परंतु परीक्षेत हे जे असत्याचे विराट दर्शन झाले ते सर्वत्रच आहे. व्यापारी, कारखानदार यांच्याजवळही सत्य ही वस्तू नाही. माल जवळ असून खुशाल नाही सांगतात. अधिक पैसा देतो त्याच्या घरी पाठवतात. नियंत्रित दराने मिळणे कठीण जाते. मधले दलाल दुप्पट किंमत घेऊन इंजिनें देतात. आणि काँट्रॅक्टर लोक व बोर्ड, म्युनिसिपालटया यांचा कारभार तर केवळ असत्यावर चालला आहे म्हणाना. रस्ते दुरुस्तीसाठी इतकी खडी घातली म्हणून बिले तयार होतात, परंतु काँट्रॅक्टर निम्मी सुध्दा खडी घालत नाहीत. रस्ते पुन्हा रद्दी. बिले होत आहेत, पैसे जात आहेत, एका जिल्हा बोर्डाच्या अहवालात एक लोखंडी तुळई वाळूने खाऊन नाहीशी केली. मुंबईच्या म्युनिसिपालिटीतही मागे हिशोबाची चर्चा झाली. जमाखर्च तपासणार्‍याने शेरा मारला आहे म्हणतात की, कशाला काही मेळ नाही. तरीही सारे साजिरे केले गेले. सत्य म्हणून वस्तूच नाही. एका गृहस्थाजवळ एक इंजिनिअर बोलत होते. ते म्हणाले, ''लढाईत खड्डे खोदण्याचे एक कंत्राट घेतले. २० हजारांच्या कामात काँट्रॅक्टरला दहा हजार फायदा झाला. त्या गृहस्थाने विचारले, ''हे कसे शक्य?'' ''अहो, वरच्या अधिकार्‍याला दहा हजारांची लाच दिली. दहा मी खिशात टाकले. खड्डे खणले होते, पण काही उपयाने ते बुजले असा शेरा मारला.'' महायुध्दाच्या काळात मिलिटरी काँट्रॅक्टरनी लाखो रुपये मिळविले. लाच दिली की सारे होईल, हीच सवय आजही आहे कसे या देशाचे व्हायचे? परकी सरकार जाऊन स्वतःचे सरकार आले तरी जोवर सार्वजनिक सदगुण नाही तोवर सारे फोल आहे.

सरकार दारूंबदीवर आपली शक्ती केन्द्रित करीत आहे. परंतु शेकडो ठिकाणी दारूच्या भट्टया गुप्तपणे चालत आहेत. या कोण पकडणार? लोकांचे संवाद कानी येतात. भट्टीवाल्याकडून मोठमोठया रकमा पोलिस अधिकार्‍यांकडे जातात. हे खरे का? कोणाला साडेतीन हजारांचा हप्ता, कोणाला पाच हजारांचा हप्ता, कोणाला सात हजारांचा असे पैशाचे रतीब लागलेले आहेत असे लोक म्हणत असतात. पूर्वीचे राजे वेष पालटून हिंडत असत. लोक काय बोलतील असतील तर? खरे  म्हणजे सर्व बडया अधिकार्‍यांच्या इस्टेटीची एकदा चौकशी झाली पाहिजे. दोनशे रुपये पगार असेल तर मी मौल्यवान फर्निचर ठेवू शकेन का? मोटर ठेवू शकेन का? हिंदुस्थानभर गेल्या आठ दहा वर्षात सार्वजनिक नीतीचा चक्काचूर झाला आहे. लाचलुचपतीची जडलेली ही सवय राष्ट्र पोखरून टाकीत आहे. परंतु पोलिस खातेच असे असेल असे नाही. सर्वत्र तीच तर्‍हा.

कारखानदारांची 'आम्ही सचोटीने वागू, प्रामाणिकपणाने वागू' अशी एक संस्था आहे. ठरलेल्या स्टँडर्डप्रमाणे जो वागू इच्छील त्यानेच या संस्थेचे सभासद व्हायचे असते. हिंदुस्थानातील फक्त १७ कारखानदार या संस्थेचे सभासद आहेत. त्यांतही बरेचसे विदेशी आहेत. प्रामाणिक वागायला हिंदी कारखानदार का मूर्ख आहेत? एका गिरणीतले एक अधिकारी सांगत होते की, 'मँचेस्टरचे अमुक एक कापड स्टँडर्ड ठरले म्हणजे ते स्टँडर्ड कधी खाली येत नाही. परंतु आपल्याकडे एखाद्या गिरणीने नवीन चांगला नमुना काढावा, त्याचा बोलबाला झाला की लगेच दोनचार महिन्यात मिक्सिंग करतील, वाईट कापूस वापरतील, ते स्टँडर्ड नाहीत.'' आमची दानत का अशाने वाढेल? हे चित्र पाहून मन एक प्रकारे सचिंत होते.

महात्माजींनी ह्या देशाला, जगाला मौल्यवान देणग्या दिल्या आहेत. सर्व देणग्यांचे सार म्हणजे महान् नैतिक शक्ती त्यांनी दिली. ते म्हणत, ''सदगुणसंवर्धन म्हणजेच स्वराज्य'' अशी पृथ्वीमोलाची वाक्ये वाचून काही लोक टिंगलही करीत. परंतु आज त्या वाक्यांकडे अधिकच तीव्रतेने लक्ष जात आहे. गांधीजींवर अमेरिकन लेखक डॉ. स्टॅन्ले जोन्स याने जे नवीन पुस्तक लिहिले आहे त्यात तो म्हणतो, ''गांधीजींची चळवळ म्हणजे चारित्र्य निर्माण करणारी थोर शक्ती होती.''

 

साहित्य आणि संस्कृती ही राष्ट्रीय चारित्र्य घडविण्याची प्रभावी साधने आहेत. राष्ट्रीय चारित्र्याच्या अभावी देशाची प्रगती अशक्य आहे. राष्ट्र चारित्र्यसंपन्न का नाही? कोणत्या मार्गाने आज लोकजीवन भ्रष्ट करण्यात येत आहे, त्याची विदारक मीमांसा.....

भगिनी निवेदिता यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ''परिस्थिती कोणतीही असो, राष्ट्रीय चारित्र्य सतत प्रकट होत राहिले पाहिजे. जे राष्ट्र कोणत्याही परिस्थितीत नैतिक उदारता सोडीत नाही ते धन्य होय. जय की पराजय, स्वातंत्र्य की पारतंत्र्य हाही मुख्य सवाल नाही. सवाल हा आहे की राष्ट्राचे हृदय शुध्द आहे की नाही?'' हरिभाऊ उपाध्याय हे एक नामवंत हिंदी साहित्यिक आहेत. त्यांनी एके ठिकाणी पुढील अर्थाचे लिहिल्याचे स्मरते. ''पारतंत्र्यातही लोकमान्य टिळक, देशबंधू, महात्माजी, रवीन्द्रनाथ, अरविंद, प्रफुल्लचंद अशी पृथ्वीमोलाची नवरत्ने आम्हांला लाभली. त्या पारतंत्र्यासही प्रणाम करावा असे वाटते.''

आम्ही परतंत्र होतो ही गोष्ट खरी, परंतु हिंदुस्थानभर एक महान लाट गेली शंभर वर्षे होती. किती तरी मोठी माणसे दिसतात. त्याग दिसतो. सर्वसाधारण नीतीची उंचीही अधिक दिसते. परंतु आज भारतात सार्वजनिक चारित्र्य शिथिल झाल्याप्रमाणे वाटत आहे. ४२चा मोठा लढा झाला. नेताजींनी अमर असा स्वातंत्र्य संग्राम केला, खलाशांनी स्वातंत्र्याचे बंड पुकारले. अखेर स्वराज्य आले. विभागणीच्या रूपाने आणि नंतरच्या कत्तलीच्या स्वराज्याची किंमत द्यावी लागली. द्वेषमत्सराचे वणवे भडकले. गोकुळातील आग गोपाळकृष्णाने गिळली. महात्माजी राष्ट्रातील वणवे गिळावयास उभे राहिले. त्यांचीही अखेर आहुती पडली. स्वातंत्र्याच्या सूर्योदयाबरोबर द्वेषमत्सराचा सैतान हैदोस घालू लागला. महात्माजी गेले, परंतु एक प्रकारे शांती निर्मून गेले. असे वाटले, दिल्लीच्या अखेरच्या प्रवचनातून तो राष्ट्रपिता सर्वांना राष्ट्रीय सदगुणांचा संदेश देत होता. परंतु आपण त्यांचा संदेश कितपत ऐकत आहोत प्रभू जाणे! आज आम्ही असत्याचे जणू उपासक झालो आहोत. अशाने हे राष्ट्र कसे टिकेल? पश्चिमात्य राष्ट्रांत सार्वजनिक सदगुण म्हणून काही वस्तू आहे. राष्ट्रे वाढतात, समृध्द होतात, ती काही तरी चारित्र्य असते म्हणूनच. कचर्‍यातून अंकुर कधी वर येत नसतो. कचर्‍या बरोबर दाणा असेल तर तो दाणा अंकुरतो. राष्ट्राच्या जीवनात काही सत्त्वच नसेल, सारा कचराच असेल तर नवीन अंकुर तरी कशाचा येणार? गांधीजी कधीपासून सांगत होते की, सदगुण संवर्धन म्हणजे स्वराज्य. सदगुण जर राष्ट्रात नसतील तर स्वराज्य यायचे कसे? आले तरी फलद्रूप व्हायचे कसे?

मुंबईस मॅट्रिकची परिक्षा झाली, तिचा प्रकार जगजाहरी आहे. बोर्डाने म्हणे ती परीक्षा घेतली व बहुतेक सार्‍या  प्रश्नपत्रिका फुटल्या. जिल्ह्यांत हा प्रकार. वेळेवर पुरेशा प्रश्नपत्रिका निघाल्या नाहीत. कधी सायंकाळी मिळाल्या, कधी मिळाल्या नाहीत, इत्यादी गोष्टी बाजूला ठेवू. बोर्डाला अनुभव नाही; पुढील वर्षी सुधारणा होईल असे समजू. परंतु प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांस कळतात कशा? प्रश्न सांगितले गेले हे खरे असेल तर किती वाईट. परीक्षा म्हणजे एक गंभीर वस्तू आहे. तेथे काही प्रामाणिकपणा हवा. ही एक सार्वजनिक बाब आहे. राष्ट्रीय चारित्र्याचा हा प्रश्न आहे. जर आपण असे करू लागलो तर त्यांनी का राष्ट्राचा मोठेपणा वाढतो? महाराष्ट्रांतील विद्वान मंडळींनी याचा विचार करावा. प्रश्नपत्रिका काढणारे, त्यावर देखरेख करणारे, यांना विद्वान नाही समजायचे तर कोणाला? परंतु राष्ट्राची तरुण पिढी बनवण्याचे ज्यांचे पवित्र कार्य, तेच जर सत्य, प्रामाणिकपणा, सार्वजनिक जबाबदारी यांना तिलांजली देतील तर या राष्ट्राला आशा कसली? महाराष्ट्राचे नाव अनेक रीतीने बदनाम होत आहे. ते आणखी बदनाम नका करू म्हणावे. सत्याला तिलांजली देऊन राष्ट्र मोठे होत नसते, आणि असल्याने क्षणभर मोठे दिसले तरी ते मातीला मिळाल्याशिवाय राहणार नाही.