रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

निसर्ग

महात्माजी येरवडयाच्या तुरुंगात असतांना आकाशातील देवाचे हे, काव्य अभ्यासू लागले, चाखू लागले. आकाशातील तार्‍यांचे महान् उपासक श्री. काकासाहेब कालेलकर तेथे होते. महात्माजी तुरुंगातून आश्रमातील मुलांना तार्‍यांसंबंधी पत्रे लिहू लागले. महापुरुषांना नेहमी नवीन नवीन शिकावेसे वाटते. त्यांना जीवनाचा कोठेही कंटाळा येत नाही. आपण आकाशाकडे कधी पहातही नाही. प्रभात काळी अद्याप झुंजमुंजु आहे. ती कशी मौज असते त्याचा आपणास अनुभव नाही. आकाशात आता थोडे ठळक ठळक तारे दिसत असतात. महाकवी मुक्तेश्र्वांनी म्हटले आहे तो अरुण हंस येत आहे. त्याने आकाशातील तारारूपी मौक्तिकांचा फराळ चालविला आहे. आता. थोडेसेच मोती शिल्लक आहेत तेही तो खाईल.

हळूहळू तारे जातात. पूर्वेकडे रंग पसरतात, किती प्रसन्न शोभा, परंतु आपण कधी पाहातो का? रात्री आकाशात तार्‍यांची अमर व मनोरम मौज दिसते. परंतु कोण बघतो!

दिवसा थकलेल्या जनतेच्या डोळयांना आनंद देण्यासाठी देव वर फुलबाग फुलवितो. परंतु आपण डोळयांना दिपविणार्‍या  झगझगीत बोलपटांनाच जाऊ. बोलपट पाहू, पण ईश्वराचा हा मुका चित्रपट पहा.

 

परवा सकाळी झाडांवर दूर बगळे बसलेले पाहिले. हिरव्या हिरव्या झाडांवर ते पांढरे जणू गुच्छ ! किती सुंदर दिसत होते. ते दृश्य ! एखादे वेळेस सायंकाळी निळया आकाशातून हे बगळे रांगेने जात असतात. जणू आकाशात कोणी रांगोळी काढीत आहे, आकाशाच्या निळया फळयावर रेघ ओढीत आहे असे वाटते. बगळा दिसतो ढवळा, परंतु आत काळा! ध्यानस्थ बसेल नि पटकन् मासा मटकावील. पंपासरोवरावर रामलक्ष्मण येतात. राम म्हणतो, ''लक्ष्मणा, ते बघ धर्मनिष्ठ बगळे!'' -पश्य लक्ष्मण पंपायाम्  बकः परमधार्मिकः॥''

पाऊस ओसरला. मी परवा बाहेर पडलो. सृष्टी धुतल्यासारखी दिसत होती. नद्यानाले पुन्हा खळखळ वाहत होते. पाणी पुन्हा स्वच्छ झाले होते आणि चरायला नेलेल्या म्हशी पाण्यात बसल्या होत्या. तोंडे तेवढी वर ठेवून रवंथ करीत होत्या. एकमेकींच्या अंगावर माना ठेवीत होत्या. जणू त्या सुखावल्या होत्या. म्हशींना पाऊसपाणी फार प्रिय. लठ्ठ प्राण्यांना पाण्याशिवाय जगवत नाही. हत्तींनाही जलक्रिडा फार आवडते. वरून पाऊस पडत असावा, म्हशी सुखाने चरत असतात, त्यांच्या त्या तुळतुळीत काळसर पाठी आकाशातील काळया ढगांसारख्या दिसतात. मृच्छकटिक नाटकात हा 'मेघ आर्द्र महिषादरतुल्य काळा' असे सुंदर वर्णन आहे. मृच्छकटिक नाटकाचा कर्ता पावसाचा भक्त असावा! चारुदत्त व वसंतसेना जातात. मोठा सुंदर प्रसंग. वरून देवाघरची वृष्टी हृदयाकाशातून प्रेमाची वृष्टी!

पहाटे फिरायला गेले की कृत्तिकांचा, द्राक्षांच्या घडासारखा सुंदर पुंजका दिसतो. कार्तिक स्नान करणारे हे नक्षत्र दिसत आहे तोच थंड पाण्याने आंघोळ करतात. आश्विनाच्या वद्य प्रतिपदेपासून कार्तिक स्नानास आरंभ करतात. लहानपणी आई मला उठवी. मी विहिरीवर जाऊन स्नान करायचा. ते सारे आठवले.

अपार धुके पडले होते. उंच गवतामधून मी जात होतो. अंगावरचे सारे कपडे ओले होते. दवाने भिजलेले गवत मलाही आर्द्र करीत होते. समोरचे दिसत नव्हते काही. दव पडू लागले म्हणजे पाऊस गेला असे म्हणतात. कोळी गवतांमधून किंवा कुंपणांतून जाळी विणतात. सूर्यप्रकाशात ही जाळी हिर्‍या माणिकांप्रमाणेच चमकतात. जणू परींची सोनेरी, रुपेरी मंदिरे आणि या जाळयांत अनेक जीवजंतू अडकतात. कोळी मेजवानी करतो!

वर अनंत आकाशात अनंत तारे दिसत. भारताचा सारा इतिहास वर रंगवून ठेवला आहे. डोक्यावर आशीर्वाद देण्यासाठी पूर्वज आहेत. तो धृव वर आहे. ते सप्तर्षि आहेत. ययातिशर्मिष्ठा आहेत. ते सत्यवचन मृग तेथे आहेत. तो श्रावण आईबापांना कावडीत नेणारा तेथे आहे. प्रोफेसर आपटे आम्हाला तार्‍यांची माहिती सांगताना रंगत. खेडयातील वृध्द माणसांना तार्‍यांची किती माहिती परंतु आम्हाला एक चंद्र ओळखता येतो. बाकिच्यांची माहिती शून्य.

 

ज्येष्ठ महिना संपला आहे. आषाढ सुरू झाला. आर्दा नक्षत्र होऊन गेले, तरी आर्द्रता कोठे नव्हती. कसे होईल वाटत होते. तो चारी दिशांनी ढग आले. पश्चिमेचे वारे येऊ लागले, आकाश मेघांनी भरले. जो तो अंगणात येऊन पाहू लागला. सोनारआळीची बया आते म्हणाली, ''देव भरून आला आहे.'' ढग म्हणजे देव! किती यथार्थ ! जो आधार देईल तो आपला देव. महात्माजी एकदा म्हणाले, ''चरका माझा देव! कारण तो अन्न देतो, स्वाभिमानाची भाकर देतो, स्पर्धातीत धंदा देतो.'' बया आते पावसाला देव म्हणाली. आपले धर्मग्रंथ वेद. त्यांत पर्जन्यदेवाची सुंदर स्तोत्रे आहेत. आकाशात देव भरून आला, कारुण्याच्या अमृताने ओथंबून आला आणि गडगडाट होऊ लागला. वीजही चमकली. मेघांना फाडून ती बाहेर येऊ पाही. पाऊस आला, आला! किती आनंद झाला सर्वांना ! मला संस्कृतीमधील कवी कालिदास यांच्या मेघदूतातील त्या सुप्रसिध्द चरणांची आठवण झाली. कालिदास मोठा निसर्गप्रेमी. त्याने लिहिलेल्या शाकुंतल नाटकातील शंकुतला फुलपल्लवही तोडीत नाही, इतके तिचे झाडांवर प्रेम. ''वृक्षांनो, पल्लवांवर प्रेम असूनही जी तोडीत नसे ती ही शकुंतला आज सासरी जात आहे. तिला आशीर्वाद द्या.'' असे शकुंतलेला पाळणारा कण्वॠषी म्हणतो. कालिदासाचे कोमल, प्रेमळ, निर्सगप्रेमी हृदयच येथे प्रकट होत आहे असे वाटते. पावसाळयात हा कवी आकाशाकडे बघत असावा आणि तो म्हणतो,

आषाढस्य प्रथमदिवसे
मेघमाश्लिष्टसानु
वप्रक्रीडापरिणतगज-
प्रेक्षणीयं ददर्श


-आषाढाचा पहिलाच दिवस आणि डोंगरावर ढग उतरले. मत्त हत्तीप्रमाणे जणू ते दिसत होते. परवा खरोखरच असे ढगांवर ढग आले आणि पाऊस, वारा, गडगडाट, चमचमाट सारे प्रकार सुरू झाले. मी ओटीवर बसलो होतो. सुखावलो होतो. शेजारच्या सुंदराताईची छोटी विभा आली होती. तिची आईही होती. विभा रडू लागली. मी तिला म्हटले, ''ये, पाण्यांत होडी टाकू.'' आणि मी कागदाची होडी केली. विभाने पाण्यात टाकली, तिने टाळया वाजवल्या. पागोळया मोत्यांच्या सराप्रमाणे गळत होत्या. विभाने आपले चिमुकले हात पागोळयासमोर केले. हातांवर पडलेले पाणी ती प्यायली. मौज. अंगावरचे घामोळे जावे म्हणून गोविंदभटजींचा वामन अंगणात नाचत होता.

शरदॠतु म्हणजे प्रसन्नतेचा काळ. शेते-भाते पिकत असतात. नद्या शांत वहात असतात. आकाश निरभ्र होते. रात्री स्वच्छ चांदणे पडते. अशा या रमणीय काळातच कृष्ण वेणू वाजवी. सर्व गोकुळाला वेड लावी. शरद् ॠतुतच कमळे. शरद् ॠतुतच फुलकाखरे. हजारो, लाखो सर्वत्र बागडताना दिसतील.

देवाघरचे जणू रंगीबेरंगी लखोटे. ही फुलपाखरे त्या त्या फुलांना का संदेश पोहोचवीत असतात? आणि फुलांवर ती हळूच बसतात. प्रथम ती चिमणे पंख जरा हलवतात, परंतु पुढे अगदी मिटून घेतात. जणू त्यांची समाधी लागते. अशाच वेळेस मुले त्यांना पकडतात. आणि चतुर! परींची जणू छोटी विमानेच! त्याचे पंख कसे पारदर्शक असतात. लहान मुले चतुरांना पकडतात, त्यांनी दोरा बांधतात नि सोडून देतात. परंतु या लहान प्राण्यांना, सृष्टीतील या मुक्या सजीव खेळण्यांना त्रास देणे बरे नाही.

   

आई मुलाला चिमण्या, कावळे दाखवीत जेवविते. तुळीशीरामायणात राम बर्फीचा तुकडा कावळयाला दाखवतो व त्याला पुढे पुढे आणतो, असे मनोरम वर्णन आहे. सेवादलाची मुले जर जंगलात आठ दहा दिवस राहतील तर पक्ष्यांची सुरेल सृष्टी त्यांच्या परिचयांची होईल आणि कधी रात्री वाघ दिसेल, तरस दिसेल, कोल्हा दिसेल. कधी जवळून सळसळ करीत साप जाईल. अनेक अनुभव येतील. अनुभवाने समृध्द करणे याहून महत्त्वाचे दुसरे काय आहे.

ॠतूंमध्ये हा पहिला वसंत । वाटे जनांना बहुधा पसंत ।


असा एक श्लोक होता. सार्‍या सृष्टीत नवजीवन येत आहे, बहर आहे. सृष्टी जणू रंगपंचमी खेळत आहे. लाललाल फुले सर्वत्र दिसतात. शेबरी, कळस, कांचन, सर्वत्र लाललाल फुले. मुंबईस एक प्रकारचा पारिंगा रस्त्याच्या बाजूला लावलेला आढळतो, त्यावरही लाल तुरे दिसतात. कोकणात पारिंग्यावर लाल फुले मी कधीही पाहिली नव्हती. हा का विलायती पारिंगा? कांचनाचेही किती प्रकार! कांचनाची फुले वास्तविक नावानुरुप पिवळी हवीत. कांचन म्हणजे साने. परंतु या ॠतूंत फुलणार्‍या कांचनाला लाल फुले असतात. जाडसर पाकळया. काही कांचनाची झाडे पावसात फुलतात.

रानात जाऊ तर नाना प्रकारची फुले लतावेलीवर आढळतील. त्यांची नावे गावे कोण जाणे? कुसरीचे वेल पांढर्‍या फुलांनी बहरलेले दिसतील. परवा मी एका गावी जात होतो. दुतर्फा जंगल होते. जंगलात मधून लाल काही दिसे. मला वाटे ही कसली फुले? परंतु ती फुले नव्हती. ती लालसर कोवळी पाने होती. पायरीच्या झाडांची ती पाने किती सुन्दर दिसत दुरून!

परवा वारे अशा सोसाटयाचे सुटले! माझे अंथरूण उडून जाईल असे वाटले. खाटेसकट मला वारा घेऊन तर नाही ना जाणार असा गंमतीदार विचार मनात आला. पालगड गावाकडील खर्‍यांकडची गोष्ट आहे. ते म्हणे रात्री अंगणात माच्यावर झोपले होते. सकाळी ते उठले तेव्हा ते तांब्याच्या माळावर होते! त्यांच्या माच्यासकट रात्री तांब्यांच्या माळावर आणून टाकले कोणी? अंतर तरी का कमी? चांगले मैल पाऊण मैल. भुताने त्यांना खाटेसकट उचलून नेले असावे, असे लोक म्हणाले. आम्ही लहानपणी अंगणात रात्री झोपलो म्हणजे ही दंतकथा डोळयासमोर येत असे. झोप लागेपर्यंत भीतीही वाटे, परंतु कधी कोणाची खाट दूर गेली नाही. परवाच्या रात्रीच्या वादळाच्या वेळेस ती गोष्ट आठवली!

वारा म्हणजे अदभुत वस्तू! तो दिसत नाही, परंतु त्याचे अस्तित्व सारखे भासते. कोठून येतो तो, कोठे त्याचे घर? तो दरीत राहतो की गुहेत राहतो? वनात राहतो की डोंगरात? आकाशात की पाताळात? वार्‍या वर आपले जीवन अवलंबून आहे, हवा म्हणजे वाराच ना? हवा अधिक चलनवलन करू लागली म्हणजे आपण तिला नाना नावे देतो. वारा झाडामाडांशी खेळेल, फुलांजवळ गुजगोष्टी करील, लाटांजवळ धिंगामस्ती करील, मनुष्य घामाघूम झालेला असावा, वार्‍याची झुळकू आली तर परमानंद होतो. परंतु हा खेळकर प्रेमळ वारा कधी कधी रुद्र रूप धारण करतो. मग तो डोंगर उडवील, समुद्रात पर्वत-प्राय लाटा उठवील. वाळूचे ढीग वर नेईल व एकदम खाली फेकील, झाडे मोडील, घरे पाडील. फुलांना नाचवणारा फुलांच्या फाडफाड थोबाडीत देईल. प्रत्येकाचे सौम्य व रुद्ररुप असते. कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला विराट रुप दर्शविले तेव्हा अर्जुन म्हणाला. ''देवा, तुझे ते सौम्य रुपच दाखव.''

 

काल रात्री मी अंगणात एकटाच फिरत होतो. किती वाजले होते कळेना. थोडया वेळाने कोंबडा आरवला. म्हणजे प्रहरभर रात्र असावी. पाऊस थांबला होता. केळांब्याच्या डोक्यावर चंद्र होता. ढगांबरोबर तो लढत होता. क्षणात ढगांच्या लाटात तो बुडे, गुदमरे. त्याच्या धडपडीचा प्रकाश ढगांतूनही थोडा थोडा दिसे, परंतु क्षणात अजिबात दिसेनासा होईल. तो पुन्हा तोंड वर करी आणि हसे. मी बघत होतो. आपले मन असेच आहे. अंधाराशी, निराशेशी ते झगडत असते. क्षणात निरुत्साही विचार त्याला बुडवतात, परंतु पुन्हा उत्साहाचे त्याला भरते येते. मोठी गंमत आहे. जीवन म्हणजे ओढाताण. परंतु आपण विजयी होऊ या श्रध्देनेच धडपडत राहिले पाहिजे. आत्मविश्वास हवा. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याच्या जीवनाला काय अर्थ?

मला सेवादलाच्या मुलांना घेऊन जावे असे वाटते. सेवादलाचे वर्ग नको शहरात, नको खेडयात. ते दाट जंगलात भरवावे. सृष्टीच्या सान्निध्यात. निसर्गात राहावे आठ-दहा दिवस. तेथे नदी मात्र हवी. नदीसारखा आनंद नाही. डुंबायला, पोहायला पाणी हवे. कपडे धुवायला, भांडी घासायला नदीवर जाता येते. रानांतील झाडेमाडे, लता-वेली, फुले यांची मुलांना ओळख करून देता येईल. आपल्याला कशाची माहिती नसते. चार झाडांची, चार फुलांची नावे माहीत नसतात. मोठमोठया जंगलात प्रचंड वेली प्रचंड वृक्षावर चढलेल्या असतात. कधी दोराप्रमाणे त्यांचा उपयोग करून वर चढता येते. जणू वृक्षांनी खाली सोडलेले मजबूत दोर. कधी दोन झाडांच्या मधून या वेली गेलेल्या असतात. त्यांच्यावर झोके घेता येतात. भारतीय संस्कृती तपोवनात जन्मली, सृष्टीच्या सान्निध्यात संवर्धिली गेली.

आणि तेथे पाखरांची ओळख होते. नाना रंगाचे नि आकारांचे पक्षी. त्यांचे ते निरनिराळे आवाज. पालगडच्या किल्ल्याजवळच्या राईत मोर आहेत. लहानपणी त्यांचा आवाज ऐकला म्हणजे मी नाचत असे. मोराचा तो उत्कट आवाज मला फार आवडतो. मोरोपंतांनी देवाचा धावा मांडला. त्याला त्यांनी 'केकावलि' असे नाव दिले. 'आर्या केकावलि' व 'पृथ्वी केकावलि' अशा दोन केकावलि मोरोपंतांनी लिहिल्या. पृथ्वीवृत्तातील त्यांची केकावलि फार प्रसिध्द आहे. विनोबाजी विद्यार्थी असताना बडोद्यास केकावलितील श्लोक मोठयाने म्हणत आणि सारी आळी दणाणवीत. मला केकावलि फार आवडे. मी ती सारी पाठ केली होती. 'सुसंगति सदा घडो' वगैरे केकावलितील श्लोक पूर्वी मुलांना पाठ येत. मोराच्या आवाजाला 'केका' असा शब्द आहे. मोरोपंतांनी स्वतः मोर कल्पून या काव्याला केकावलि असे नाव दिले. पाखरांचे आवाज ऐकण्यात एक विशिष्ट आनंद असतो. दुपारची वेळ व्हावी. पक्षी वडासारख्या मोठया झाडावर दुपारी विसावा घ्यायला बसतात. गोड किलबिल चाललेली असते. अशा वेळेस झाडांच्या बुंध्याशी डोके ठेवून ती किलबिल ऐकत ऐकत झोपी जाण्यात एक मधुर सुख असते. मला पाखरे पाहण्याचा लहानपणी फार नाद होता. लहानपणी आपला आत्मा मोकळा असतो. आपल्या मनोबुध्दीला जणू त्यावेळेस पंख असतात. पुढे वाढत्या वयाबरोबर शेकडो चिंता येतात. आपले पंख जणू तुटतात. हृदयावर बोजा असतो. मग पाखरे आवडेनाशी होतात.

   

पुढे जाण्यासाठी .......