रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size


मृत्यूचे काव्य

परंतु मी काय सांगू? जगलों तर आहें. मेलों तर मनानें आहे. प्रेसला शक्य झाले तर माझ्या भावास थोडी मदत मधून मधून लागली तर करावी. सुधाचें शिक्षण, डॉ. जोशी उंबरगांवचे त्यांना करायला माझ्या वतींने सांगावे.

मी मेलोंच तर निमूटपणें खोलीतून मित्रांनी म्यु. गाडींतून न्यावें. कोणाला कळवू नये. साधनेतून द्यावेच लागेल. इतर पत्रांत आपण होऊन नये देऊ. माझ्या भावास धीर द्यावा. प्रेसमधील सर्वांना प्रणाम, त्यांचे अनंत उपकार. श्रीरंग, नारायण, यदु, आंबे, क्षमा करा.

प्रेसचा एस. एम्., अण्णासाहेब, कोष्टेच्या विचाराने ट्रस्ट करा. मी काय सांगू ?
(हे फक्त तूच वाच व फाड. हे तुझ्या व माझ्यात.)

: सहा :
१०-६-५०

प्रिय मधू,

मला बहुतेक देवाचें बोलावणें आहे. कर्तव्य कठोर असतें. तूं धरणगाव, एरंडोल, अंमळनेरला जाच. माझी अखेरची इच्छा सांग की लोकशाही नि सत्याग्रही समाजवादी ध्येयानें खानदेशनें, महाराष्ट्रानें जावें. परंतु मी कोण? खानदेशचा मी चिरॠणी आहे. त्यांनी पैसे जमवले असले मला द्यायला तर ते मी समाजवादी कार्यास द्या सांगत आहे. खानदेशनें मध्ये मला १५००० हजार रुपये दिले. त्यांतील जवळजवळ ११ हजार वर्षभर खानदेशांतील कार्यास दिले. दोन हजार उरले ते साधना प्रेस मध्ये घातले आहेत. क्षमस्व खानदेशा, तुला विसरणार नाही. मधु क्षमस्व.
(मधु लिमये यांना पत्र)

गुरुजींची इच्छा

''अंगावरच्या कपडयांतच न्या. मृताची इच्छा पाळा.
अखेरच्या विधीसाठीं''

 

: पाच :
प्रिय नारायण

तुलाच बाळ हे पत्र. तू भेटलास माझे काम पुढे चालवायला. मी मनाने व शरीरानें अस्वस्थ आहे. झोपेचे औषध घेऊन पडत आहे. चिरझोंप लागली तर? मधूला म्हणावे खान्देशांत जा. माझा शेवटचा निरोप सांग की लोकशाही, सत्याग्रही समाजवाद हे ध्येय धरा. तें तारील. खान्देशचा मी चिरॠणी आहे. त्यांनी माझ्या नावे पैसे जमवले असतील तर ते कामाला घ्या. नारायण, तू परीक्षेत नापास म्हणून मला वाईट नाही वाटत. तूं गुणी आहेस. साधना प्रेस चालवा. दू रावसाहेब पटवर्धनांस साधनेचे संपादक व्हायला गळ घाल. प्रिय वसंता व यदु सहसंपादक नाहीतर वसंता संपादक, यदू सहसंपादक. सारे मिळून चालवा. तू आजोबांजवळून थोडे भांडवल माग वेळच पडली तर.

प्रिय सुधाच्या शिक्षणाबद्दल डॉ. रामभाऊंस सांग. प्रिय अप्पास मदत लागली तर प्रेसमधून प्रेस चालला, साधना चालली तर देत जा.

वसंता, यदू, गजानन जोशी, रावसाहेब, मधू, डिच्चू, राजा कुलकर्णी, एस. एम्., रावसाहेब, अच्युतराव सारे मिळून साधना सुंदर चालवाल. विविधता आणाल. मी मनानें तुमच्यांत राहीन. श्रीरंगला अपार कष्ट माझ्यामुळे. माधव आंबे तुम्ही सर्व, कृतज्ञ व आभारी. खोलींतील सर्वांचा ॠणी. सर्वांचे स्मरण व मंगल चिंतून झोपी जात आहे. जर शेवट झाला तर गुपचूप हार्टफेल डिक्लेअर करा. म्यु. गाडी आणा. चार जणास कोणाला कळवू नका. अप्पांचे समाधान करा. साधनेतून द्यालच. इतर वर्तमानपत्रांना कळेल. कोणासही तुम्ही कळवू नका. खोलीतील चार पुरेत.

डोक्यांत असह्य वेदना. काय करू? जवळच्या झोपेच्या गोळया घेत आहें. झोप लागेल का? का चिरनिद्रा लागेल? तसें झालें तर चुकल्या माकल्याची क्षमा करा.

चित्रशाळेला एक हजार रुपयांसाठीं पुस्तकें लिहून न झाल्यामुळे त्यांना 'विनोबा व देशबंधु दास' ही पुस्तकें त्या रकमेंत कायमची विकत घ्यायला सांगून कृपाकरून म्हणावे ॠणमुक्त करा. साधनेला ज्यांचे देणे आहे त्यांना प्रेसला ती देणगी द्या म्हणून माझ्या वतीनें विनवा. आंतरभारतीसाठी हजार अकराशे रुपये जमले. तेवढयात काय करणार?
श्री. शहाणे यांस दोनशें रुपये पाठवा. म्हणजे ते मराठींतून कन्नड अनुवाद करतील. इतर पैशांतून एखादा कन्नड ग्रंथ अनुवादून घ्यावा. तो छापावा. विकून पैसे आले तर दुसरा छापावा. अनुवादकाला मोबदला द्यावा. लेखकासही हक्कासाठीं. निरनिराळया भाषेंतून असे अनुवाद करवून घ्यावेत. ''आन्तरभारती मला'' असें नांव द्यावे. मराठीतीलहि इतर भाषेंत करवावेत.

 

: तीन :
३ जून १९५०


मी बगाराम आला असता दूर आहे तोच बरा. मित्रांना सर्वस्व द्यावे असे मला वाटते, परंतु आज मजजवळ काय आहे? आणि त्यांच्या कार्यातही मी मदत करू शकत नाही. माझा पिंड राजकीय नाही. मला संघटना करता येत नाही. चर्चा करता येत नाही. मित्र माझ्यापासून या अपेक्षा करतात. मला त्या पुर्‍या  करता येत नाहीत. आपणाला मित्रांच्या अपेक्षा पुर्‍या करता येऊ नयेत यासारखे दुःख नाही. म्हणून सर्वांपासून दूर जावे असे मला कधी वाटते. मला शेकडो प्रेमळ सखे असूनही मनात एकटे वाटते व माझे डोळे भरून येतात. हे लिहितानाही अश्रू येत आहेत. किती वेळ मी लिहित आहे. बाहेर वारा सूं सूं करीत आहे. झिम झिम पाऊस आहे. मलाही थोडे गारगार वाटत आहे. पांघरुण घेऊन पडू का? किती वाजले असतील? पहाट झाली असावी. परंतु कोंबडा आरवलेला ऐकला नाही! कोंबडयाचे घडयाळ हजारो वर्षांचे आहे. पाणिनीनेही या घडयाळाचा उल्लेख केला आहे.

: चार :
१० जून १९५०


गदगला त्या दिवशी रात्री थोडा पाऊस आला. सारी झोपली होती. पाऊस आला म्हणजे माझे मन नाचते. उचंबळते. पावसातून फिरायला जावे असे मला नेहमी वाटते. बाहेरच्या झाडावर टपूटपू आवाज होत होता. कोकणात आपल्या घराजवळ केळीची झाडे असायची. केळीच्या पानांवर पावसाचे थेंब कसे वाजतात, नाही? मी खिडकीतून बाहेर हात घातला. पावसाचे थेंब हातावर पडले. मी तो ओला हात तोंडावरून फिरवला. परंतु हा क्षणिक पाऊस. खरा पावसाळा अजून नाही सुरू झाला. होईल लवकरच. ढग दोन आले होते, रिते होऊन ओलावा देऊन गेले. ते जाताच पुन्हा चंद्र दिसू लागला. मी खिडकीतून त्याच्याकडे बघत होतो. निळया आकाशातून तो हसत होता. चंद्र म्हणजे विश्वंभराचे मुके भावगीत आहे! खिडकीतून मध्यरात्री माझ्यासारखा कोणी वेडापीर त्याच्याकडे बघत असेल का?

जुन्या आठवणी गंमतीच्या वाटतात. आज दादा नाहीत, वैनी नाही, परंतु या स्मृती आहेत. चैत्र-वैशाखाचे दिवस आले! असे चांदणे पाहिले  की त्या स्मृती पुन्हा जागृत व्हावयाच्यांच, नाही? जीवनात दुःखे आहेत, सुखे आहेत. परंतु सुखावर, आनंदावर दृष्टी ठेवून आशेने माणसाने वागावे. फुले, फले, पक्षी, आकाश, तारे, रवि, शशी, नद्या, सागर, वने, उपवने, मित्र, सखे-सोयरे या आनंदाच्या राशी आपल्या सभोवती आहेत. सायंकाळी हल्ली किती मस्त देखावा दिसतो! ढगांचे शतआकार दिसतात! क्षणात हत्ती तर क्षणात धावणारे ससे! क्षणात खादीचे पोशाख केलेले ढेरपोटये व्यापारी, तर दुसर्‍या क्षणी भरजरी पोशाख केलेले विश्वेश्वराचे भालदार चोपदार! अनंत रंगांची अनंत मिश्रणे ! जणू विराट नाटक चाललेले असते. किती अंक, किती प्रवेश! आणि शेवटी सारे रंग लोपतात! गंभीर अंधार येऊ लागतो! शेवटचा काळा पडदा पडतो! रवीन्द्रनाथांना सायंकाळच्या कृष्णछाया नेहमी मृत्यूचे स्मरण करून द्यावयाच्या जणू रोज सायंकाळी आपण आपलेच नव्हे तर सार्‍या समाजाचे, जगाचे थोडक्यात रूपकात्मक नाटक बघत असतो!

सुधा, मी तुला जवळजवळ गेले वर्षभर दर आठवडयास पत्र लिहीत आहे. परंतु आता हे शेवटचे साप्ताहिक पत्र. आता मी तुला केव्हा तरी अधूनमधून लिहीन. परंतु आता बंधन नको.

   

अखेरची काही पत्रे

: एक :
६ मे १९५०

मला सितारामनाना आठवल्यामुळे त्यांच्या घरचाच तो मुलगा आठवतो. दुपारच्या वेळेस तो आंबे काढावयास गेला. उंच झाड आणि वारा सुटला जोराचा. तो खाली येऊ लागला. परंतु त्याचा हात निसटला. तो खाली पडला उंचावरून, आणि तात्काळ देवाघरी गेला. घरी माणसे वाट बघताहेत-की अजून जेवायला येत कसा नाही? तो हाकाहाक कानी आली. कसले जेवण नि काय! मरण कोणाला कुठे कसे येईल याचा नेम नसतो. जणू कोणी ओढून नेतो. आपल्या विठोबारावांचा मुलगा नाही का? मागे विहिरीतून चांगला पोहून वर आला. परंतु म्हणाला, ''पुन्हा दोन उडया मारून येतो.'' आणि त्याने पुन्हा बुडी मारली. परंतु वर आला नाही. त्याला का मृत्यूने ओढून नेले? गावोगाव अशा गोष्टी असतात. मला मावशी बडोद्याची गोष्ट सांगावयाची. नर्मदाकाठच्या चांदोद कर्नाळी गावी लग्न होते. दुपारची जेवणाची पंगत मांडलेली. एक मुलगा नर्मदेवर गेला. तेथे नर्मदेत सुसरी नि मगरी. ती बघ एक सुसर तीराजवळ आहे, आणि मुलाला एकदम ओढून घेऊन ती गेली. मुलगा ओरडतो आहे! गेली सुसर! मंडपात बातमी आली. ज्याच्या त्याच्या तोंडचे पाणी पळाले. लग्नाचा समारंभ, आणि मरण येऊन उभे राहिले! सुख आणि दुःख ही जवळजवळ असतात. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, ''जीवनाच्या पोटी येथे मरण आहे.''

होऊ दे या मरणाच्या गोष्टी. जीवन अनंत आहे. मरणही जीवनाचेच जणू रूप. मरण म्हणजे पुन्हा नवजीवन मिळविण्यासाठी घेतलेले तिकिट. सभोवती मरण असले तरी आपण जीवनाकडेच पाहतो

: दोन :
६ मे १९५०


परवा झोप येईना म्हणून मी आरामखुर्ची बाहेर टाकून एकटाच पडलो होतो. आकाश स्वच्छ होते. निळया-काळया आकाशातील तारे धुतल्यासारखे स्वच्छ होते. सर्वत्र शांत होते. मी आकाशात पाहत होतो. तार्‍यांचे मुके सकंप संगीत अनुभवीत होतो. वेदामध्ये वरूण ही आकाशाची देवता आहे. वरूण म्हणजे आच्छादन घालणारा. हा आकाशाचा देव पुढे समुद्राचा कसा झाला कोणास कळे. वेदांत वरूण ही नीतीची देवता आहे. तार्‍यांच्या हजारो डोळयांनी तो तुमचेकडे बघत आहे असे वर्णन येते. मला त्या वर्णनाची परवा आठवण झाली. जणू विराट विश्वंभर बघत आहे असे वाटले. ते सहस्त्र डोळे माझ्या जीवनात घुसत आहेत असे वाटले. मी घाबरलो. आपले सारे जीवन कोणी बघावे असे आपणास वाटत नाही. जीवनात नाना खळमळ असतात. दडून राहिलेल्या शेकडो गोष्टी. वरून  रंगीत दिसणारे कृत्रिम फळ आत मातीचे वा शेणाचे असते. मी डोळे मिटले आणि उठून घरात आलो. केव्हा झोप लागली कळलेही नाही. उठलो तो मन शांत होते. झोप म्हणजे जणू अमृत, नवजीवनदायी अमृतांजन! विश्वमातेचा प्रेमळ हात! झोपेचा केवढा उपकार! परंतु झोप म्हणजे लहानसे मरण. मोठी झोप म्हणजे मोठे मरण! म्हणून मरणाचेही उपकार! मरणही सुंदर, जीवनही सुंदर ! गंमत.

 

मृत्यू म्हणजे महायात्रा. मृत्यू म्हणजे महानिद्रा. मृत्यूचे महान् काव्य गुरुजींनी निरंतर ओठावर नाचविले... आणि एक दिवस फाटक्या कपडयाप्रमाणें आपलें जीवन सहजतेंने फेकून दिलें. त्यांच्या अखेरच्या मनःस्थितीची द्योतक अशी काहीं शेवटची पत्रें.....

मृत्यू म्हणजे महायात्रा. मृत्यू म्हणजे महानिद्रा. दररोजच्या धडपडीनंतर आपण झोपतो. झोप म्हणजे लघुमरण. सर्व जीवनाच्या धडपडीनंतर, अनेक वर्षाच्या धडपडीनंतर असेच आपण झोपतो. रोजची झोप आठ तासांची. परंतु ही झोप मोठी असते एवढाच फरक.

मरण उपकारक आहे. जीवनाने जे काम होत नाही ते काम मरणाने होते. संभाजी महाराजांच्या जीवनाने मराठयांच्यात फूट पडली, परंतु त्यांच्या महान मरणाने मराठे जोडले गेले. ते मरण म्हणजेच अमृत ठरले. ख्रिस्ताच्या जीवनाने जे झाले नाही ते त्याच्या क्रॉसवरच्या मरणाने झाले. मरणात अनंत जीवन असते.

अमवस्येला आपणास अंधार दिसतो. अमावास्येस चंद्र नाही असे आपणास वाटते, परंतु समुद्राला सर्वात मोठी भरती अमावस्येच्या दिवशीच येत असते. अमावास्या म्हणजे सर्वात मोठी परवणी. अमावस्येला चंद्र-सूर्याची भेट होत असते. चंद्र सूर्याशी एकरूप होऊन जातो. त्याप्रमाणे मरण म्हणजे जीवनाची अमावस्या होय. जीव शिवाशी मिळून जातो. जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होतो. जीव दिसत नाही. कारण विश्वंभरात विलिन झालेला असतो. मरण म्हणजे अनंत जीवनात मिळून जाणे. मरणाची अमावस्या म्हणजे जीवनाची मोठी पूर्णिमा होय.

मरण म्हणजे जगाचा वियोग, परंतु जगदीश्वराशी योग. जिवा शिवाजी लग्न घटिका म्हणजे मरण.

मृत्यु ही प्राणमात्राची आई आहे, या जगद्अंगणात मुले खेळून थकली असे पाहून आयुष्याच्या सायंकाळी ही मृत्युगंगा हळूच येते व आपल्या बाळांना निजवते व पुनः जीवनाचा रस देऊन त्यांना खेळण्यासाठी परत पाठवून देते. अमर जीवनाच्या सागरात नेऊन सोडणारी मृत्युंगंगा पवित्र आहे.