शुक्रवार, मे 29, 2020
   
Text Size

कर्जबाजारी रामराव

“रामराव हा व्यवहार आहे. तुम्ही जे पैसे नेणार त्याची फेड होणें शक्य आहे का? तुम्हांला तरी तसे वाटतें का? तुमच्याजवळ कांहींहि उरलेलें नाहीं असें तुम्हीच म्हणतां. तुम्हांला फुकट देण्याइतका मी उदार नाहीं.”

रामराव पैसे घेऊन गेले. गुणाची त्यांनीं जरा थाटानें मुंज केली. गुणा मोठा होऊं लागला. तो इंग्रजी शाळेंत जाऊ लागला. तो हुशार होता. मुलगा पुढें नाव काढील असें सारे म्हणत. परंतु रामरावांना वाईट वाटे. आपल्या मुलाला शिकवण्याला त्यांच्याजवळ पैसे कोठें होते? तुमच्या गुणाला खूप शिकावा. तो हुशार आहे. असें कोणीं म्हटलें म्हणजे त्यांना वाईट वाटे. ते म्हणत, “नसता हुशार तर बरे झालें असतें. त्याची हुशारी वायां जाणार. त्याची बुद्धि फुकट जाणार. दरिद्री व कर्जबाजारी पित्याच्या पोटीं कशाला आला?”

“तो शिष्यवृत्ति मिळवील व अभ्यास करील. तुम्हांला काळजी नको.” लोक म्हणत.

“परंतु आपणांस मदत करतां येत नाहीं याचें वाईट वाटणारच मला.” रामराव दु:खाने उत्तर देत.

 

रामराव यांना एकच मुलगा होता. त्यांचे नांव गुणा. गुणावर त्यांचें फार प्रेम होतें. तो त्यांची आशा. तोच जणुं त्यांची इस्टेट. बाहेर त्यांना आतां फार मान मिळत नसे. कधीं कधीं अपमानहि होत. परंतु घरीं येऊन गुणाला पाहिलें कीं सारे अपमान ते विसरून जात. गुणा खरोखर गुणांचा होता. दिसे सुंदर, हंसे सुंदर. त्याच्या भिवया फारच सुंदर होत्या. कान लांब होते. जणुं देवाची मूर्ति असा तो दिसे.

आणि आतां गुणाची मुंज करावयाची होती. जवळ तर दिडकी नाहीं. परंतु नांव तर मोठें. थाटानें मुंज नको का करायला? परंतु कर्ज देणार कोण? कोणाकडे जावयाचें? शेवटीं रामराव पंढरीशेटकडे गेले. पंढरीशेट म्हणाले—

“हें पहा रामराव, आतां तुम्हांला पैसे देण्यांत अर्थ नाहीं. कोणीहि शहाणा सावकार तुम्हांला आतां पैहि देणार नाहीं.”

“तुम्ही कांहीं करा, परंतु माझी अब्रू सांभाळा. गुणाची मुंज केलीच पाहिजे. आणखी किती आतां वाट पहावयाची? परंतु नुसती लंगोटी थोडीच लावायची? मोठें नांव पडलें ना? थोडा फार खर्च करायलाच हवा.”

“परंतु असे कसे पैसे द्यावयाचे?”

“पंढरीशेट, माझ्याजवळ आतां काय राहिलें आहे? सारी शेती गहाण पडली. घरांत दागदागिना राहिला नाहीं. मी तुमचे पैसे परत करीन. कर्ज फेडल्याशिवाय मी मरणार नाही.”

“अहो, कसे फेडणार कर्ज? शब्दांनी का फेडतां येते? तुमचे राहते घर आहे. तें देता का लिहून? कांहीतरी आधार हवा. आधाराशिवाय मी कसे देऊं पैसे? देता घर लिहून? बोला.”

“वडिलोपार्जित वाडा गहाण ठेवायला वाईट वाटतें.”

“परंतु त्याशिवाय पैसे मिळणार नाहींत.”

रामराव निराश होऊन घरीं गेले. त्यांनी आणखी कांहीं ठिकाणीं प्रयत्न केला. परंतु पैसे कोठेंहि मिळत ना. शेवटीं रामरावांनी आपलें राहतें घर गहाण ठेवलें. ते लिहून दिलें. अर्थात् त्यांना त्या घरांत रहावयास परवानगी होती. घर लिहून देतांना त्यांच्या डोळ्यांत पाणी आलें.

“पंढरीशेट, तुम्हीं शेवटीं मला रडविलेंत!”


 

एरंडोलच्या आसपास किती तरी आमराया. एरंडोलचे आंबे फार प्रसिद्ध, रसाळ, गोड, चवदार आंबे. एरंडोल कागदासाठीं प्रसिद्ध होतें, आंब्यासाठी होतें. परंतु न्यायासाठी सर्वात अधिक प्रसिद्ध होतें. एरंडोली न्याय ही म्हणच पडली आहे. एरंडोलचे लोक समतोल, शांत व निश्चयी म्हणून प्रसिद्ध होतें. विचारपूर्वक आचार करणारे अशी त्यांची ख्याति होती. परंतु एरंडोलची पूर्वीची ही ख्याती आतं तितकी राहिली नव्हती.

एरंडोलचीं जुनीं खानदानी घराणीं साफ बसलीं होतीं. तीं कसेतरी दिवस काढीत होतीं. नवीन श्रीमंतवर्ग जन्माला आला होता. पूर्वीच्या श्रीमंत घराण्यांत जे कारभारी, गुमास्ते म्हणून वावरत होते, तेच आज सावकार होऊन बसले होते व ज्या मालकांकडे ते नोकर होते, ते मालक आज लाचार होऊन त्यांच्याकडे कर्ज मागायला येत असत. ज्या मोठमोठ्या वाड्यांतून पूर्वी मेजवान्या झडत, संगीताचे जलसे होत, त्या वाड्यांतून आतां केवळ उपासमार होती. जेथें गडीमाणसें हिंडत, जेथें गाड्याघोडीं असत, तेथें आज केवळ दारिद्र्य दिसून येत होतें.

एरंडोलमध्यें पंढरीशेट शिंपी म्हणून एक असेच नवीन सावकार होते. ते पिढीजात सावकार नव्हते. असेच उपरे सावकार. त्यांनीं कोठेंतरी डल्ला मारला होता असें म्हणतात. कोणी म्हणतात कीं एक मोठा दरोडेखोर डाका घालून त्यांच्याकडे लपला होता. सारी संपत्ती त्यांच्याकडे ठेवून तो गेला. परंतु तो परत आलाच नाहीं. ती जी संपत्ति मिळाली तीवर पंढरीशेटचे घराणें वर आलें. खानदेशांत बहुतेक ठिकाणीं ही डाक्यांची संपत्ति आहे. चोपडें शहरांत अजून खूप संपत्ति आहे म्हणतात. परंतु ही आली कोठून? खानदेशांत बहुतेक ठिकाणी ही डाक्यांची संपत्ति आहे म्हणतात. परंतु ही आली कोठून? खानदेशांत एक जुनी म्हण आहे, “धरणगांव में धन बडा, पारोळे में बाकी साकी; चोपडें में जावे पानी पीनेकू तो बतावे तापी.” चोरीची संपत्ति घरांत. त्यामुळे चोपड्याच्या श्रीमंतांना कोणीं घरांत येऊं नये असें जणुं वाटे. न जाणो उघडकीस काहीं यायचें. खानदेशभर अशा या डाक्यांतील संपत्तीच्या गोष्टी आहेत. त्यांतून गांवोगांवचे सावकार व धनिक वर आले.

पंढरीशेट श्रीमंत होते. परंतु त्यांच्या घरांत खानदानीपणा नव्हता. एक प्रकारची उदार व दिलदार वृत्ति नव्हती. इतकी श्रीमंती होती तरी घरी नीट भाजी खाणार नाहींत. दरिद्र्याप्रमाणे राहतील. दूध व ताकहि विकतील. खेड्यापाड्यावरून कुळें आलीं तर त्यांना गूळपाणी देणार नाहींत, त्यांच्या खाण्यापिण्याची चौकशी करणार नाहींत. पंढरीशेटजींस कोणीहि बरें म्हणत नसे. त्यांना कर्जदारांची कधीं दया येत नसे. पैसा म्हणजे माझा प्राण असें ते म्हणत.

याच एरंडोल शहरांत रामराव म्हणून एक घरंदाज गृहस्थ होते. पूर्वी ते श्रीमंत होते. परंतु आज त्यांना वाईट दिवस आले होते. त्यांना खूपच कर्ज झाले होतें. त्यांना आतां नवीन कर्ज द्यावयास कोणी तयार होतं नसे. परंतु कर्जाशिवाय तर त्यांचें पदोपदीं अडे. कोणाकडे तोंड वेंगाडावयाचें?


   

एरंडोल हें खानदेशांत सुप्रसिद्ध आहे. अति प्राचीन असें हें गांव आहे. महाराष्ट्रांत इतकीं जुनीं गांवें क्वचितच असतील. प्राचीन काळीं १५०० वर्षापूर्वी दिग्विजयी समुद्रगुप्तानें महाराष्ट्रांत मी एरंडपल्ली जिंकलें असें आपल्या विजयस्तंभावरील दिग्विजयाच्या यादींत लिहिलें आहे. एरंडोलला पांडवांचा वाडा अद्याप दाखवतात. आज त्यांत मशीद आहे. ज्या एकचक्रा नगरीत पांडव भिक्षेक-यांच्या रूपानें एका ब्राह्मणाकडे राहत, ती नगरी एरंडोलच्या जवळच होती असें सांगतात. आणि एरंडोलपासून चारपांच मैलांवर पद्मालय म्हणून निसर्गसुंदर स्थान आहे. तेथें जंगलांत बकासुर राहत असे. तेथेंच भीमानें बकासुरास मारलें. तेथें पांढरे पांढरे ठिपके असलेले दगड आहेत. लोक म्हणतात की हा त्या गाड्यांतील दहींभात आहे. तेथें दगडांत खळगे आहेत. तीं भीमाचीं व बकासुराचीं पाउले आहेत असें म्हणतात.

असें हें प्राचीन शहर आहे. मध्यकाळांतहि एरंडोल भरभराटींत होतें. एरंडोलला कागदीपुरा आहे. येथील कागद नागपूरापासून कोल्हापूरपर्यंत जात असे. येथें किती तरी कागदाचे कारखाने होते. परंतु परदेशी यांत्रिक कागद येउं लागला व येथील हा भरभराटलेला भाग ओस पडला. परंतु पुन्हा उद्योग मिळूं लागला आहे. पुन्हा कागदीपुरा गजबजूं लागला आहे. कागदाला मागणी येत आहे व गरीब मुसलमान बंधुभगिनी काँग्रेसला व महात्माजींच्या ग्रामोद्योगास दुवा देत आहेत.

एरंडोलच्याभोंवतीं जुना तट आहे. गांवांतील पाणी वगैरे वाहून जाण्याची पूर्वी फार सुंदर व्यवस्था होती. गांवाला लागून सुंदर नदी आहे. तिचें नांव अंजनी. अंजनी नदीला पूर्वी बारा महिने पाणी असे. पूर्वी पाऊस जास्त पडे. आतां पाऊस कमी झाला. लोक म्हणतात कीं पाप झालें म्हणून नदींचे पाणी कमी होऊं लागलें. कोणी कोणी दंतकथा सांगतात कीं एकदां एका ऋषीनें आपली छाटी तीरावर वाळत घातली होती. परंतु एकाएकीं पूर आला व छाटी वाहून गेली. ऋषि रागावला. त्यानें नदीला शाप दिला. “तूं फार उन्मत्त आहेस. तुझें पाणी कमी होईल.” त्या वेळेपासून पाणी पळालें. परंतु कोणी विचारवंत म्हणतात, “लहानशा लंगोटीसाठी सर्व जगाचें पाणी बंद करणारा हा क्रोधी ऋषि, त्याची का वाणी खरी होईल? या दंतकथेंत अर्थ नाहीं. जंगले कमी होऊं लागलीं त्यामुळें पाऊस कमी पडूं लागला व म्हणून नदीचें पाणी उन्हाळ्यांत कमी राहूं लागलें.”

अलीकडे पाऊस पुन्हा अधिक पडूं लागला आहे. नदीला पाणी राहूं लागलें. स्वच्छ सुंदर पाणी. बायकांची धुण्याची गर्दी असते. दूरवरच्या बाजूला लोक स्नानास जातात. मुलें डुंबत असतात. गाईगुरे येत असतात. गांवात नदी असली म्हणजे गांवांत चैतन्य असतें.

एरंडोलला जुन्या इमारती आहेत. जुन्या सुंदर मशिदी आहेत. मोठमोठे जुने वाडे आहेत. एके काळचें शहराचें वैभव त्यावरून दिसून येतें. परंतु आज तें भाग्य कोठें आहे? जुन्या वैभवाची पडकी माती फक्त आज आहे. त्या वेळचे देशमुख, देशपांडे आज गरीब झाले आहेत. एके काळीं ज्यांच्याकडे हत्ती झुलत, त्यांना आज खाण्याची पंचाईत पडूं लागली आहे. लक्ष्मी ही चंचल आहे. मनुष्याला गर्व वाटूं नये म्हणून का ती एके ठिकाणी राहत नाहीं? परंतु लक्ष्मी चंचल नसून मनुष्यच चंचल आहे. लक्ष्मी नेहमीं ---- जवळ राहते. ज्या देशांत उद्योग अधिक, संघटना अधिक, सहकार्य अधिक, बुद्धि अधिक, निश्चय अधिक, बंधुभाव अधिक, त्या देशांत संपत्ति राहते. तेथे लक्ष्मी राहते. आळस व विलास आले कीं लक्ष्मी पलायन करूं लागते.