शुक्रवार, मे 29, 2020
   
Text Size


मित्रांची जोडी

“आई, तुम्ही असें कां बोलतां? आम्हां मित्रांचें प्रेम तुम्हांला कोणालाच कसें समजत नाहीं?”

जगन्नाथचे डोळे भरून आले. गुणाची आई गहिंवरली.

“जगन्नाथ, तुझें मन मोठें आहे. परंतु जग खोटें आहे. गुणालाहि हे दागिने शोभतात हो. चांगला दिसतो हो तो.”

“माझ्यापेक्षां नाहीं दिसत चांगला?”

माझ्या आईच्या डोळ्यांना तो तुझ्याहूनहि चांगला दिसत आहे. दोघांवरून दृष्ट काठायला हवी. असेंच प्रेम मोठेपणीं दाखवा हो. लहानपणचे खेळ पुढें विसरूं नका. जगन्नाथ, गुणाचें कोणी नाहीं. आम्ही अशीं दरिद्री. तूंच त्याचा पुढें आधार हो.” असें म्हणून मातेनें डोळ्यांना पदर लावला.

“आम्ही मोठेपणीहि मित्र राहूं. एकमेकांना अंतर देणार नाहीं.” जगन्नाथ म्हणाला.

दोघे मित्र वर गेले.

“जगन्नाथ, गाणें म्हणू; मी वाजवतों.”

“म्हणूं गाणें? म्हणतों.”

जगन्नाथ, गाणें गाऊं लागला. गुणा सारंगी वाजवूं लागला. त्या दिवाणखान्यांत संगीताच्या लाटा उसळत होत्या. आणि मित्र-प्रेमाच्या लाटा त्यांत मिसळल्या होत्या. रामरावहि येऊन बसले. आईहि चूल सोडून वर आली. गाणें संपलें. वाद्य थांबलें.

“गुणा, जगन्नाथ, पुढें जीवनांत असेंच संगीत निर्माण करा. असेच एकरूप व्हा. एकमेकांस अंतर देऊं नका. गुणाला पुढें कोण, ही माझी चिंता आज दूर झाली. गुणाला दोन मित्र आहेत. एक जगन्नाथ व एक दी सारंगी. त्याला आतां कांहीं कमी पडणार नाहीं. नेहमीं विजयादशमी, सदैव आनंद.” रामराव म्हणाले.

 

“ मी जातों जगन्नाथ.”

“थांब रे, चल माझ्या खोलींत.”

इतर मंडळी खालीं गेली. दोघे मित्र खोलींत गेले. गुणानें जगन्नाथच्या गालांवरून हात फिरवले. त्याला रडूं आलें.

“माझ्यामुळें हें सारें. तुझे गाल, फुलासारखे गाल, त्यांचेवर मार. मागें आपण पन्हाळ्याला जात होतों. एक फुलपांखरूं येऊन तुझ्या गालावर बसलें होतें. आठवतें? तूं झाडाखालीं डोळे मिटून पडला होतास. मी शेजारीं वाजवीत होतों; आणि ते फुलपांखरूं तुझ्या गालांवर. जणुं फूलच आहे असें त्याला वाटलें, नाही? आणि त्या गालंवर मार! दुष्ट आहे तुझा दादा. जगन्नाथ, तूं असें नको करीत जाऊं. आपली मैत्री मनांत असूं दे. मी आतां जातों. हें सारें येथेंच राहूं दे. घरीं आई व बाबा यांना वाईट वाटेल. म्हणतील, आपला मुलगा आशाळभूत आहे. म्हणतील, याला स्वाभिमान नाहीं. मी ऐटीचा, दागिन्यांचा लोभी आहें, असें त्यांना वाटेल व असे स्वत:ला देतां येत नाहींत म्हणून त्यांना मेल्यासारखें होईल. इतर लोकहि हंसतील. म्हणतील उसनी ऐट.”

“गुणा, मी तुझ्याबरोबर येतों. मी तुझ्या आईला सांगेन. आज आपण संध्याकाळीं बरोबर जाऊं शिलंगणास. दोघे सारखे दिसूं. तूं हें सारं काढणार असशील तर घरांतून मी बाहेर पडणार नाहीं बघ.”

गुणाचें मित्रापुढें फारसें चालत नसे. जगन्नाथ मित्राला पोंचवायला निघाला. गुणाची आई वाट पहात होती. वाटेंत जाणारे येणारे गुणाकडे बघत. शाळेंतलीं मुलें हंसत. गुणाचे घर आलें. रामराव घरीं नव्हते.

“गुणा, हें रे काय? कोठून आलास नटून?” आईनें विचारलें.

“मित्राच्या घरून; मित्राच्या हातांनी.” तो म्हणाला.

“आई, आम्ही दोघांनीं आज सारखा पोषाख करायचा, सारखे दागिने घालायचे असें ठरविलें. आणि कोण चांगला दिसतो तें तुम्हांला विचारायला आलों. आई, कोण दिसतो अधिक चांगला?”

“तूंच दिसतोस हो जगन्नाथ.”

“गुणा नाहीं दिसत? मला तर गुणा अधिक चांगला दिसतो. तुम्ही कोणी खरें सांगत नाहीं. मोठीं माणसें खोटीं.”

“जगन्नाथ, गुणाच्या अंगावर दागिने नसते तर तो अधिक चांगला दिसला असता. जो तो आपल्या ख-या परिस्थितींत शोभतो. मोराच्या दोन पिसांनीं कावळा का सुंदर दिसेल? उलट अधिकच बावळट दिसेल. नाहीं?”

 

“अरे वेड्या, खाऊ व दागिने का सारखेच? खाऊची गोष्ट निराळी दागिन्यांची निराळी. हे दागिने तुझेच आहेत. की कंठी का आणा दोन आण्यांची आहे? अडीचशें रुपयांची आहे. असे दागिने का कोणी कोणाला देतात?

“आई, मित्रासाठीं प्राणहि देतात.”

“अरे तें गोष्टींतून असतें.”

“गोष्टी का खोट्या असतात? आणि माझे दागिने गुणाच्या अंगावर असले म्हणून काय बिघडलें? त्याच्या अंगावर का सोन्याची माती होते? ते का झिजतात? माझ्याच गळ्यांत सारें ओझे वागवण्यांत काय अर्थ आहे? आई, गुणा माझा मित्र. तो आला नाहीं तर मला कसेंसेंच होतें. त्याची आई त्याला आज बाहेर पडूं देत नव्हती. कां, तर नीट सदरा नाहीं घालायला, एखादा दागिना नाहीं घालायला म्हणून. त्याची आई म्हणे, जाऊं नको जगन्नाथाकडे आज. तुला सारीं हंसतील. आई माझ्या मित्राला का कुणीं हंसावे? तो माझ्यासारखा दिसावा म्हणून दिला हा शर्ट, हें धोतर, हे दागिने. बघ आम्ही दोघे सारखे दिसतों कीं नाहीं ते! खरे खरे मित्र. हंसतेस काय आई? आई मी चांगला दिसतों की गुणा?”

“तूंच चांगला दिसतोस. तुला शोभतें सारें.”

“आणि गुणाला का शोभत नाहीं? तो गरीब म्हणून वाटतें? गुणाच माझ्याहून गोड दिसतो. आई, आम्ही दोघे या आरशांत पाहत होतों. तो आले दादाराव व लागले मारायला. आजपासून मी दागिन्यांना शिवणार नाहीं. नकोतच ते मला.”

“जगन्नाथ, मी आतां जातों. माझा सदरा घालून व माझे धोतर नेसून जातों.”

“गुणा, बघ हो. तूं अस्सा घरां जा. आहेस आतां तस्सा. मी तुला पोंचवायला येतों. लोक म्हणतील रामलक्ष्मण जणुं चालले. चल, मी तुला पोंचवायला येतों.

“गुणा, आजच्या दिवस असूं दे हो सारें. नको काढूं ती कंठी, नको सोडूं तें धोतर. नाहीं तर जगन्नाथ नीट जेवणार-खाणार नाहीं. पुन्हा जेवायच्या वेळेस रडारड. असूं दे.”

“आई, आजच्याच दिवस कां? कायमचेंच गुणाला हें घेऊं दे. म्हणजे दिवाळीच्या दिवशींहि तो घालील, नाहीं?”

“दिवाळीच्या दिवशीं गुणा पुन्हा येईल व त्या दिवशीं पुन्हा त्याला दे हो. असें वेड्यासारखें करूं नये. पुढें मोठा झालास म्हणजे कर हो वाटेल तें. व्हा वेगळे व करा आपापल्या इस्टेटीचें काय करायचें तें.”


   

“गाढवा, सणावारीं असें अशुभ बोलावें का? अलीकडे फार बोलायला शिकला आहेस. बोलशील असें पुन्हा, बोलशील?” असें म्हणून दादानें जगन्नाथाच्या दोन तीन थोबाडींत दिल्या. ते कोंवळे गाल लाल झाले.

“मार, ठार मार. नकोच मला हे दागिने, नको हा गोफ.” असें म्हणून जगन्नाथनें तो गोफ भिरकावला. तो आंगठ्याहि फेंकणार, परंतु दादानें दोन्ही हात पकडले व त्याला तो आणखीच मारूं लागला. जगन्नाथ रडूं लागला. गुणाहि रडूं लागला.

“त्याला नका मारूं, मला मारा. माझ्यामुळें हें सारें झालें. नका हो मारूं!” गुणा गयावया करून सांगत होता.

इतक्यांत खालून पंढरीशेट, जगन्नाथची आई वगैरे सारीं आलीं. दादा दूर झाला. आईनें जगन्नाथला जवळ घेतलें. तो मुसमुसत होता. त्याला राहून राहून रडें येत होतें. गालावर बोटें उठलीं होतीं.

“किती रे मारलेंस त्याला? मीं त्याला कधीं चापटसुद्धां मारली नाहीं.” आई म्हणाली.

“म्हणूनच असा फाजीलपणा करतों. तूं त्याला लाडावून ठेवला आहेस.”

“असे, पण सणावारीं का मारावें, बोलावें? आज दस-याचा दिवस. आम्ही अजून जिवंत आहोंत तों त्याला असें छळतां, मग आमच्या पाठींमागें त्याचें काय कराल?”

“आई, तुला तो चांगला दिसतो, चांगला वाटतो. परंतु त्याला काडीची अक्कल नाहीं. तो उद्यां घरांतील सारें वांटून देईल. सर्वांना भिकेला लावील. त्या दिवशीं म्हणाला कीं काडी लावीन त्या जमाखर्चाच्या वह्यांना आणि आज गळ्यांतील गोफ, बोटांतील आंगठ्या भिरकावून द्यायला लागला. हा गोफ बाहेरच जायचा, परंतु खिडकीच्या फळीला लागून आंत पडला. आणि मी दोन्ही हात धरून ठेवले म्हणून ह्या आंगठ्या राहिल्या आणि म्हणे गुणाला हे माझे दागिने मीं दिले. उद्यां लहान इंदु, मनी यांच्या अंगावरचेहि दागिने काढून हा द्यायचा कोणाला! वाटेल तें करतो, वाटेल तें बोलतो. म्हणे मला भिकारी व्हावयाचें आहे. आज विजयादशमी, असें बोलावें का?”

“आई, ही कंठी, हा गोफ, ह्या आंगठ्या हें सारें माझें म्हणून ना तुम्हीं माझ्या अंगावर घातलें? होय ना?”

“मग माझे आहेत म्हणून मीं गुणाला दिले. पुढच्या सणावारीं उरतील तेवढेच मला घालायला द्या. जें माझें असेल तें आम्ही दोघे घेतों. गुणा व मी. मी माझ्या खाऊंतील खाऊ गुणाला देतों. गुणाला दिल्याशिवाय मी कांहीं खात नाहीं.”

 

“उसनी नाहीं आणली. हें सारें जगन्नाथाचें आहे. त्यानें गंमत केली. हा रेशमी सदरा त्याचाच व हें धोतरहि त्याचेंच. मी नको नको म्हणत होतो; परंतु तो ऐकेना. म्हणे तू माझा मित्र ना? मग घाल हें सारें, मला ऐट मुळीच नको. उसनी तर नकोच नको.” असें म्हणून गुणा गळ्यांतून काढू लागला.

“गुणा, काढूं नको गळ्यांतून, नाहींतर बघ. मी तुझ्याजवळ कधीं बोलणार नाहीं. ती कंठी माझी आहे. दादाची थोडीच आहे? माझी. वस्तु मीं तुला दिली. तूं माझा म्हणून दिली.”

गुणा काढूं पाहत होता. जगन्नाथ काढूं देईना. शेवटीं दादा संतावला व म्हणाला, “काढूं दे त्याला. ती कंठी घालून तो घरीं जाईल वाटतें! म्हणे मीं त्याला दिली! काठ रे गुणा.”

“गुणा काढूं नको. हें सारें मीं खरोखरच तुला दिलें आहे.”

“अरे दिलें म्हणजे काय? कायमचें का दिलें? म्हणे त्याला दिलें! उद्या एखाद्या भिका-यालाहि देशील अंगावरून काढून. बावळट कुठला!” दादा रागावून बोलला.

“दादा, गुणा भिकारी वाटतें?”

“भिकारी नाही तर काय? भुक्कड तर झाले आहेत.”

“दादा, गुणा माझा मित्र आहे. तो भुक्कड असेल तर मलाहि होऊं दे. मी श्रीमंत असेन तर त्यालाहि होऊं दे. तो माझा मित्र आहे. तो व मी निराळे नाहीं. याची गरिबी ती माझी व माझी श्रीमंती ती त्याची. गुणा हें सारें तुला मीं दिलें आहे. हें माझें आहे.”

“म्हणे माझें आहे! कधीं मिळवून आणलेंस, कोठें तलवार मारलीस?”

“आणि तुम्ही तरी कोठें गेले होतेत मारायला? बाबा तरी कोठें गेले होते? सारा गांव म्हणतो कीं डाक्याची संपत्ति यांच्याकडे आहे म्हणून आणि गरिबांना छळून तुम्हीं आणखी वाढवलीत. गुणा, घे. हें सारें घे. तूं तें काढणार असशील तर मीहि हे फेकींन. माझा मित्र भिकारी, तर मलाहि भिकारी होऊं दे. काय करायची ही श्रीमंती?”

   

पुढे जाण्यासाठी .......