गुरुवार, जुन 20, 2019
   
Text Size

राजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष

गुरु शिष्याला बजावतो आहे, सेनापति सैन्यास हुकूम करतो आहे असें त्यांचे लेख वाचतांना वाटतें. आपला सिध्दांत बरोबर आहे, आणि आपल्या विचारसरणीचे अधिकारी पुरुष आपणच आहोंत अशा आत्मविश्वासानें त्यांचे लेख भरलेले आहेत. बुध्दीचा स्वच्छपणा व भाषेचा जिवंतपणा त्यांच्या लेखांत स्पष्टपणें पाहावयास मिळतो. लेचेपेचें व गबाळ लिहिणें त्यांचें नसावयाचें. खंबीर, अर्थगंभीर असें त्यांचें लिहिणें आहे. विचारांच्या प्रखर जोरामुळें, भावनांच्या उद्रेकामुळें त्यांत समयोचित भाषा आपोआप स्फुरत असे. अथानुरुप त्यांची भाषा आहे. 'वाचमर्थोनुधावति' अशा ऋषिकोटींतील हा लेखक आहे असें दिसून येतें. सागराचें गांभीर्य व गगनाचे गौरव आपणांस त्यांच्या लेखांत प्रतीत होतें. भाषेंतच ते गुंगत राहात नाहीत. भाषा हें गहन अर्थ स्पष्ट करावयाचें एक साधन असें ते समजत-म्हणून भाषा सजवणीला त्यांनी अवकाश दिला नाही. ते वाड्.मय राष्ट्रांतील संन्यासी आहेत. संन्याशास ज्याप्रमाणें विलास सुचत नाहीत त्याप्रमाणें भाषेचे विलास राजवाडे यांस सुचत नसत. त्यांच्या लिहिण्यांतील प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, प्रत्येक शब्द मोलाचा आहे. त्यांची लेखणी तीक्ष्ण होती. तिच्यांत स्पष्टपणा व कडवेपणा असे. यामुळें ती पुष्कळांस झोंबे. त्यांचे सडेतोड सिध्दांत वाचून दुसरा थक्क होई. राजवाडे यांच्या सिध्दांतावर टीकाही त्यामुळें पुष्कळ झाल्या. राजवाडयांच्या गागाभट्टीवरील ठाकरे यांची कोदंडाचा टणत्कार ही टीका नमुन्यादाखल म्हणून नमूद करतों. त्यांचे इतरही सिध्दांत व मतें यांच्यावर पुष्कळांनी टीका केल्या आहेत. राजवाडे हे दुस-यावर कसून टीका करीत व दुस-या पासूनही ते मुळमुळीत टीकेची अपेक्षा करीत नसत. या बाबतीत राजवाडे व टिळक यांचें साम्य आहे. प्रतिपक्षी- यांची रेवडी कशी उडवावी हें उभयतांस फार चांगलें साधे.

राजवाडे यांची भाषा संस्कृत शब्दप्रचुर आहे; तरीपण ती जातिवंत व शुध्द मराठी वळणाची वाटते. त्यांचें लिहिणें फार परिणामकारक असे. त्यांच्या प्रस्तावना वाचावयास वाचकांच्या कशा उडया पडत हें पुष्कळांस माहीतच असेल. त्यांची भाषा दुस-यांस अनुकरण करण्यास येत असे. त्यांच्या प्रत्येक शब्दावर त्यांचा ठसा आहे. राजवाडे यांची भाषा ताबडतोब समजून येते. एखादें वाक्य, एखादा उतारा वाचला म्हणजे हा राजवाडी असला पाहिजे असें ताबडतोब सांगता येते. इंग्रजीमध्यें कार्लाईलची भाषाशैली जशी अगदी निराळी व स्पष्टपणें उमटून पडणारी दिसते, तसेंच राजवाडी भाषेचें आहे. थोडक्यात बव्हर्थ आणण्याचीं राजवाडी हातोटी क्वचितच इतरांस साधते. त्यांच्या लिहिण्यांत निरर्थक व उगीच विस्तार आढळणार नाहीं. त्यांच्या लेखांत त्यांच्या प्रतिमेचें व त्यांच्या बुध्दीचें स्वच्छ प्रतिबिंब पडलें आहे. Style is the man-भाषाशैली म्हणजे ग्रंथकाराचें पूर्ण स्वरूपच-असें जें म्हणतात तें राजवाडे यांच्या बाबतीत खरें आहे. त्यांच्या स्वभावाचे गुण दोष त्यांच्या लिखाणांत आहेत. निर्भीडता, कळकळ, स्वतंत्रप्रज्ञा जोरदारपणा, विलास व नटवेगिरीचा तिटकारा - या त्यांच्या स्वभावाचे आविष्करण त्यांच्या सर्व लेखनसाहित्यांत झालें आहे.

राजवाडे यांच्या लेखणीसारखी तीक्ष्ण, कार्यकर्ती, प्रभावशाली लेखणी महाराष्ट्रांत कोणी धरिली नाही. त्यांच्या लेखणतील तल्लखपणा, सडेतोडपणा ही त्यांच्या सिध्दांच्या सत्यत्वापासून उत्पन्न झालेली असत; आत्मविश्वासाचा तो परिणाम होता.

 

केवळ वाड्.मयवर्णन हा राजवाडे यांच्या लिहिण्याचा हेतु नाहीं. लेखणीचा विलास दाखविणें हें त्यांचे जीवित ध्येय नव्हतें. त्यांनी सर्व लिहिलें तें मराठीत लिहिलें. मराठीचा त्यांस फार अभिमान होता. इंग्रजीत एकही ओळ लिहिणार नाही ही त्यांची प्रतिज्ञा होती. मराठी भाषेसंबंधी ते ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेंत लिहितात 'शिष्ट मराठीत सात आठशें वर्षापासूनची ग्रंथरचना असून, ती महाराष्ट्रांतील सर्व प्रांतांतल्या व बडोदें, इंदूर, ग्वाल्हेर, बुंदेलखंड, तंजावर, गुत्ती, बल्लारी वगैरे संस्थानांतल्या मराठी लोकांना आदरणीय झालेली आहे. ज्या भाषेंत मुकुंदराज, ज्ञानेश्वर, सूर्य ज्योतिषि, एकनाथ, तुकाराम, रामदास, चिपळूणकर वगैरे प्रासादिक ग्रंथकारांनीं ग्रंथरचना केली ती शिष्ट भाषा महाराष्ट्रांतील सर्व प्रांतातील व जातीतील लोकांस सारखीच मान्य व्हावी यांत आश्चर्य नाही. प्रांतिक बोलणे प्रांतापुरते व जातीक बोलणें जातीपुरतें. परंतु ग्रंथिक बोलणें व लिहिणें सर्व महाराष्ट्रांकरितां आहे. प्रांतिक पोटभाषांच्या लहानसान लकवा आणि जातिक भाषणांतले बालिश अपभ्रंश ग्रंथिक राजभाषेच्या शिष्ट दरबारांत लुप्त होतात व एकच एक निर्भेळ अशी मराठयांची मायभाषा देशांतील सर्व लोकांच्या अभिमानाच्या, कौतुकाच्या व सहजप्रेमाचा विषय होते; मराठयांना स्वभाषेचा इतका अभिमान जो वाटतो तो फुकाचा नाही. मराठी भाषेंतल्या शब्द प्राचुर्याची बरोबरी पृथ्वीवरील कोणत्याही भाषेला करतां यावयाची नाही. तसेच कोणताही गूढ किंवा सूक्ष्म अर्थ नानात-हांनी यथेष्ट व्यक्त करण्याची तिची शक्ती अप्रतिम आहे. शिवाय अनेक थोर प्रासादिक ग्रंथकारांनी तिला आपल्या उदात्त, गंभीर, ललित व रम्य विचारांचें निवेदन केलें असल्यामुळें तिच्यावरील महाराष्ट्रीयांची भक्ति शुक्लेंदुवत् उत्तरोत्तर वर्धमान स्थितीत आहे.'

मराठीचा हा राजवाडे यांचा अभिमान दासोपंतांनी संस्कृतपेक्षां मराठी कशी श्रेष्ठ आहे हें दाखविलें त्याप्रमाणेंच जाज्वल्य आहे. मराठी संबंधी अशी अलौकिक भक्ति असली तरी मराठीतील नामांकित ग्रंथकार या नात्यानें त्यांस प्रसिध्द व्हावयाचें नव्हतें. राजवाडे हे वाड्.मयसेवक, महान् सारस्वत सेवक असले तरी प्रथमदर्शनी ते सिध्दांत संस्थापक आहेत. समर्थांचे काव्य महत्वाचें नसून त्या काव्यांतील तत्वें महत्वाची आहेत. He is first a philosopher and then a poet. हे जसें रामदासासंबंधी म्हणतां येईल, त्याप्रमाणेंच राजवाडे यांचे आहे. मुक्तेश्वरादि कवि, किंवा चिपळूणकर हे वाड्.मयाचे सेवक आहेत. वाणीस सजवावें कसें, उपमा दृष्टान्तादि अलंकार ठिकठिकाणी योजून सर्वांस कसें मोहून टाकावें, हें ते जाणतात. मुक्तेश्वरांची वाग्देवी अनेकलंकारांनी नटलेली आहे. चिपळूणकर आपल्या वाग्गंगेत आम्हांस स्वैर विहार करावयास लावतात; राजवाडे यांचे तसें नाही. येथें गंगाकाठी विहार करणारे निरनिराळे पक्षी, चक्रवाक्, मयूर, कोकिळादिकांचे कलरव, भृगांचे गुंजगान, पद्मांचे फुलणें, सुगंधाची लयलूट हें कांही आढळणार नाही. येथें विलास, लालित्य नाही, येथे काय आहे ? राजवाडे यांची भाषा सडेतोडे व जोरदार आहे. मृदुत्व तिला खपत नाही. येथें कौमुदीचें सुकुमारत्व, संभगत्व, शीतलत्व हें कांहीएक नसून, सूर्यप्रभेची प्रखरता व प्रज्वलता आहे. जोरकस रीतीनें सिध्दांत कसा मांडावा हेंच ते पहात असत. भाषेकडे त्यांचें लक्ष असे तथापि अर्थाकडे, सिध्दांताकडे जास्त असे. सिध्दांतस्वरुपी त्यांचे लिहिणे आहे. येथे गुळमुळितपणा नाही.