रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति

एका काळच्या ह्या शास्त्रीय भूमीत सध्यां शास्त्राचा अत्यन्त लोप झालेला आहे. प्राय: ह्या देशांतील यच्चयावत लोकांची स्थिति आफ्रिकेंतील निग्रोंच्या स्थितिच्या जवळ जवळ आलेली आहे. ज्यांना ग्राजुएट म्हणतात त्यांच्याजवळही शास्त्र नाहीं व ज्यांना शास्त्री म्हणतात त्यांच्याजवळही शास्त्र नाही. एक पाश्चात्य सटर फटर पुस्तकें वाचून घोकून खर्डेघाश्या गुलाम बनलेला आहे व दुसरा पौवार्त्य ग्रंथ घोकून मद्दड झालेला आहे. अशा ह्या दुहेरी कंगाल समाजाला सुधारण्याचें म्हणजे शास्त्रीय स्थितीस नेण्याचें बिकट कृत्य, कोणाचेंहि साहाय्य मिळण्याची आशा न करितां पार पाडावयाचें आहे. राजकीय, सामाजिक, वाड्.मय वगैरे कोणतेंहि कृत्य ह्या देशांत ज्या कोणाला करण्याची उमेद आली असेल त्यानें अंगिकारिलेल्या कृत्याच्या विस्ताराचा अंदाज घ्यावा, त्यांत व्यंगें व दोष कोठें आहेत त्याची विचक्षणा करावी, व ते दोष, व्यंगे काढण्यास स्वतांच लागावें, इतर कोणीची वाट पाहूं नये. कारण ममतेनें धावून येण्यास कोणीच नाही. स्वजनहि नाहीत व परजन तर नाहीतच नाहीत. अशी एकंदर फार हलाखीची स्थिति आहे. आणि ही स्थिति कांही उत्साह विघातक नाही. संकट यावें तर असेंच यावें. ह्या संकटांतच आपल्या कर्तबगारीची खरी परिक्षा आहे.'

राजवाडे यांस सर्व शास्त्रांची कशी जरुर भासे हेंही त्यांनी वरील लेखांतच पुढें लिहिलें आहे ते लिहितात 'व्याकरणशास्त्रावांचून सध्यां काय अडलें आहे, असा बालिश प्रश्न कोणी कोणी करतात. त्यांना उत्तर एवढेंच की हरएक शास्त्रांवाचून तर देशाचे सर्वत्र नडत आहे; जितकें रसायनशास्त्रावांचून नडत आहे, जितकें राज्यशास्त्रावांचून नडत आहे, जितकें युध्दशास्त्रावांचून नडत आहे, तितकेच व्याकरण शास्त्रावांचूनहि नडत आहे' राष्ट्राच्या प्रगतीला व व्यवहाराला सर्व शास्त्रांची जरुरी आहे. हें लक्षांत आणूनच राजवाडे अकुंठित गतीनें वनराजाप्रमाणें सर्व ज्ञानक्षेत्रांत मिळावा ही त्यांची महत्वाकांक्षा होती. भारतीयांचा देह पारतंत्र्यांत असो; पण मानसहंस तरी स्वतंत्र होवो हें त्यांचें दिवारात्रीचें स्वप्न होतें. भारतीयांच्या विचार विहंगमास ज्ञानाच्या गुलामगिरीतून त्यांनी मुक्त करावयाचे कठिणतर कर्तव्य स्वीकारले होतें. बंगालमध्यें आशुतोष मुकर्जी यांनी जें कार्य केलें, तेंच कार्य एकाकी राजवाडे यांनी महाराष्ट्रांत दृढमूल करण्याचा प्रयत्न केला. राजवाडे यांचा स्वभाषावलंबाचा मार्ग मात्र आशुतोषजीच्या मार्गापेक्षां निराळा होता. आशुतोष यांनी बंगाली भाषेस उत्तेजन दिलें. परंतु इंग्रजी लिखाणावर त्यांचा कटाक्ष नसे. या कठोर कर्तव्यास्तव ते आमरण कष्टत असता सुसंपन्न ग्राजुएटही सरकारच्या कच्छपी कसे लागतात याचें त्यांस राहून राहून नवल वाटे. आपला भिकारडा चारित्र्यक्रम तिरस्कृत मानावा असें ते या ग्राजुएटांस सांगतात. 'जोंपर्यंत शास्त्रांत तुम्ही गति करुन घेणार नाहीं तोंपर्यंत तुमच्या तरणोपायाची आशा नाही' असे त्यांचे शब्द आहेत. स्वराज्याच्या गप्पा मारणारे व गुलामगिरीचें दिवसभर काम करून रात्री देशभक्तांच्या कामाची उठाठेव करणारे लोक त्यांस तिरस्करणीय वाटत ते म्हणत दिवसभर राज्ययंत्र चालविण्यासाठी त्यास तेल घालीत असतां व रात्री मात्र त्या राज्ययंत्राचा वाचिक निषेध करितां - यांत काय अर्थ आहे ?' कधी कधी संतापून ते या लोकांस Biped द्विपाद पशू अशी संज्ञा देत.काय, शाळेंत मास्तर आहांत- गाढव आहांत झालें. असें ते स्पष्टपणें म्हणत. कारण शाळेंत शिकून सरकारचें राज्ययंत्र सुरळीत चालविणारे गुलामच बाहेर पडणार ना असें ते म्हणत व जोपर्यंत हा गुलामाच्या उत्पत्तीचा धंदा तुम्ही सोडला नाही तोंपर्यंत तुम्ही पशूच नाही तर काय असें राजवाडे बेमुर्वतपणें म्हणत- यांतील इंगित वाचकांच्या लक्षांत येईलच.

 

महाभारत, ब्राम्हणें या कालांतील अनेक गोष्टीवर शेंकडों निबंधाची रुपरेखा त्यांच्या मनांत होती. तसेंच वेदमंत्रांचें वर्गीकरण करुन संगति लावून आपण स्वत: बसविलेल्या उपपत्तीप्रमाणें वेदांचा खरा अर्थ करून दाखवावा व या विषयावर हजार दोन हजार पानांचा ग्रंथ लिहावा असा त्यांचा मनोदय त्यांनी सातवळेकरांजवळ अनेकदा व्यक्त केला होता. त्याप्रमाणेंच आर्य लोकांच्या विजयाचा एक मोठा ग्रंथ ते लिहिणार होते. या ग्रंथाची त्यांनी खालीलप्रमाणें रुपरेखा आंखली होती.

१ क्षेत्रांतील पंडयांच्या वह्यांवरून अखिल हिंदुस्थानांतील आर्यांची आडनांवे संगतवार लिहून काढणें व त्यांचें सामाजिक वर्गीकरण फार काळजीपूर्वक करणें.
२ नंतर हिंदुस्थानांतील बाहेरच्या देशांतील गांवांची नांवे पाहून त्या आडनांवाचा व त्या स्थानांचा संबंध ऐतिहासिक व सामाजिक दृष्टीनें निश्चित करणें.
३ शक्य तितक्या अधिक गांवांचें अति प्राचीन नांव शोधून काढून आर्यांच्या हालचालीच्या दृष्टीनें त्यांचें महत्व निश्चित करणें.
४ या व अशा अनेक महत्वाच्या मुद्यांचे संगतिकरण करून आर्यांच्या एकंदर क्रांतीचें व विजयाचें स्वरुप दाखविणें अशा प्रकारच्या अलौकिक ग्रंथाला त्यांनी आरंभ केला होता हें मागें सांगितलेंच आहे. परंतु त्यांचें हें काम आतां कोण करणार ?
मरेपर्यंत अशी सांस्कृतिक व उब्दोधक कामगिरी ते करणार होते. ८५वर्षेपर्यंत ही कामगिरी करून मग ते एकान्तवासांत रहाणार होते. केवढा हा आत्मविश्वास व आयुष्याच्या सार्थकतेसंबंधी कोण ही महनीय खटपट.

या सर्व श्रमांची गुरुकिल्ली आपल्या समाजास जागें करणें यांत आहे. या बाबतींत ते कधी कधी उद्विग्न होत व हताश होत. परंतु पुनरपि प्रयत्नास लागत. शारदामंदीराच्या अध्यक्षस्थानी असतां त्यांनी मराठी भाषेचें व एकंदर भारतवर्षाचें एक दुर्दैवी चित्र काढलें होते. मराठी भाषा मरत जाणार व हिंदुस्थान म्हणजे गुलाम व मजुरांचे राष्ट्र होणार असा भयसूचक ब्युगूल त्यांनी वाजविला. परंतु अशी निराशा दिसत असूनही ते प्रयत्न अखंड करीत होते. निराशेची आशा त्यांच्या जवळ होती. दामले यांच्या वाकरणाचें परीक्षण करून ते शेवटी म्हणतात 'प्रत्येकानें आपापलें काम स्वत:च करावें हें श्रेयस्कर, कां की, प्रस्तुत काली आपल्या देशांतली परिस्थितीच अशी आहे. कोणतेंही शास्त्रीय काम करण्याला ह्या देशांत प्राय: अनेक तर सोडून द्या पण अर्धाहि माणूस तयार झाला नाही. तेव्हा श्रमविभाग होण्याची आशा करणें आणीक पन्नास शंभर वर्षे ह्या देशांत अयुक्त होय. कधी काळी चुकून माकून एखाद्याच्या मनांत कांही शास्त्रीय कृत्य उठविण्याचें सुदैवानें मनांत आलें व मनांत येऊन त्या कृत्याचा अंत पाहण्याचा उत्साह त्याच्याठायी वर्षोनवर्ष कायम राहिला तर त्यानें ह्या देशांत इतर कोणाच्याही साहाय्याची अपेक्षां करुं नये, हें उत्तम. कारण साहाय्य होण्यासारखी परिस्थिती नाही.

 

'शिवकालीन समाज रचना' या निबंधांत राजवाडे लिहितात 'अठरापगड जातीचे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्वधर्मभ्रष्ट झाले असतां ते बहुतेक मुसलमान बनल्यासारखेच झाले इतकेंच कीं, त्यांनी सुंतेची दीक्षा मात्र घेतली नाही. तीही त्यांनी घेतली असती परंतु त्यांच्या आड एक मोठी धोंड आली. ती धोंड महाराष्ट्रांतील साधु व संत हे होत. भांडणें, तंटे, अपेयपान, अभक्ष्यभक्षण यांचे साम्राज्य सर्वत्र मातलेलें पाहून ही बजबजपुरी कांहीतरी ताळयावर यावी या सद्हेतूनें साधुसंतांनी सर्वांना सहजगम्य व सुलभ असा भक्तिमार्ग सुरु केला. धर्मज्ञान लोपलें होतें; विधिनिषेधाची प्रतिष्ठा राहिली नव्हती; प्रायश्चित्तास कोणी पुसत नव्हतें. अशी सर्व प्रजा वृषलवत् अथवा बहुतेक म्लेंछवत् बनली होती. ही प्रजा सनातन धर्मास व आर्य संस्कृतीस सोडून जावयाच्या पंथाला लागली होती. बरेच सोडून गेलेहि होते. बाकी राहिलेल्या लोकांचा मगदूर पाहून साधुसंतांनी परम कारुणिक बुध्दीनें भक्तिमार्ग सुरु केला. सद्हेतूनें कीं, कसेंहि करून हे लोक पुन: कर्मनिष्ठ बनण्याचा संभव राहावा. संतांनी वर्णाश्रमधर्मलोपप्रधान अशी ही महाराष्ट्रांतील दुर्दैवी प्रजा दोन अडीचशे वर्षे आर्यसमाजांत मोठया शिताफीनें थोपवून धरिली व आर्यसंस्कृतीचें रक्षण केलें. तेव्हां संतांनी आपल्या या देशावर उपकार बिनमोल केले यांत काडीचाहि संशय नाही. संतानी प्रजेची बुध्दि धर्मांत ठेविली. परंतु ती प्रपंच प्रवण केली नाही. पुढें ऐतिहासिक तत्वज्ञानाचा म्हणजे प्रपंच व परमार्थ यांच्या एकवाक्यतेचा उदय रामदासांच्या हस्तें झाला. एकनाथ तुकारामादि संतांचे कार्य व रामदासांचे कार्य हें परस्पर सापेक्ष आहे. संतांनी मुसलमानी धर्मापासून जनतेचें रक्षण केलें नसतें, स्वधर्मंनिष्ठ त्यांस ठेविलें नसतें तर रामदासांनी तरी 'विद्या, व्याप, वैभव' याचा उपदेश कोणास केला असता ? असो. तर राजवाडे यांनां संताच्या कामगिरीची किंमत कळत होती. परंतु लोक जेव्हा खरें कार्य विसरुन संतांच्या पाठीमागें लपण्याचा मार्ग स्वीकारतात त्याचा त्यांना तिरस्कार वाटे. ही संन्यास प्रवणता आहे त्यांतच खितपत पडून राहण्याची प्रवृत्ति राजवाडे यांस नाहीशी करावयाची होती- व यासाठीच त्यांना प्राचीन इतिहासाची स्मृति जागी करावयाची होती. प्राचीन इतिहासाची स्मृति जागी करुन पूर्व वैभवाचें यशोगान करून, त्याप्रमाणेंच पूर्वीच्या चुका स्पष्टपणें दाखवून स्वाभिमानपुरस्सर नवीन कार्याचा पाया घालणें हें त्यांचें जीवित कार्य होतें. सर्व जन्मभर देशाहितकारक कामगिरी व्हावी म्हणून या थोर पुरुषास कोण कळकळ असे. ते आपल्या एका उद्बोधक टिपणांत लिहितात 'आषाढ शुध्द अष्टमीस व विशाला नवें ४६ वें वर्ष लागलें. ५४ वर्षे राहिली. त्यांत सर्व जगताला हितकारक व राष्ट्राला पोषक अशी कृती होवो. आजपर्यंत फक्त राष्ट्रीय स्मृति तयार करण्यांत काळ गेला. यापुढें कृति, कृति, कृति झाली पाहिजे. नाही तर व्यर्थ ! चाळीस वर्षे आणखी सतत मेहनत झाली पाहिजे. आरोग्य, उत्तम हवा, उत्तम पाणी, उत्तम जागा, उत्तम शुध्द अन्न ही मिळाली तर हेंही होईल. ईश्वराची कृपा अपरंपार पाहिजे' याच टिपणाच्या दुस-या बाजूस १८९४ पासून १९०९ पर्यंत केलेल्या कामगिरीचा तपशील दिला आहे व ७५०० पृष्ठें आतांपर्यंत मजकूर लिहून झाला-छापला असें सांगितलें आहे. या थोर पुरुषाची राष्ट्रकार्याबद्दलची ही तळमळ पाहून कांहीतरी करण्याची स्फूर्ति कोणास होणार नाही ? हा उदारभाव, हा आशावाद मेलेल्यासही चैतन्य देईल. परंतु आम्ही मेलेल्याहून मेलेले आहोंत; त्यास कोण काय करणार ? राजवाडे औंध येथें श्री.वैदिक पंडित सातवळेकर यांच्याजवळ राहणार होते. सातवळेकर त्यांस एक आश्रम बांधून देणार होते. तेथें राहून राजवाडे यांच्या मनांतून एक मासिक चालवायाचें होतें. वैदिक, पूर्ववैदिक, उत्तर वैदिक इतिहास यांत येणार होता. ऐतिहासिक व समाज विषयक शास्त्रपूत वृत्तान्त या मासिकांत यावयाचा होता. या मासिकांत दरमहा १०० पानांचा मजकूर ते स्वत:च देणार होते.

   

इंग्रजांस लाथा मारुन घालवून देण्याची शक्ति आमच्यांत आल्याशिवाय आमचा तरणोपाय नाहीं असें ते म्हणत.' त्यांचें ध्येय हें अशा प्रकारचें आहे. या ध्येयार्थ त्यांनी सर्व आयुष्य खर्च केलें. रसायन शास्त्रांसारख्या शास्त्रांचा आपण अभ्यास केल्याविना इंग्रजांस देशाबाहेर घालविण्यास आपण समर्थ होणार नाही हें ते तरुणांस पुन: पुन्हा सांगत. रसायनशास्त्र, इतर भौतिकशास्त्रें यांत पारंगत व्हा. सर्व कला आपल्याशा करा, असें ते विद्यार्थ्यांस वारंवार बजावीत. याच कार्यासाठी त्यांनी रासायनिक मंडळ ही पुण्यास काढलें होतें परंतु लोकांस हौस व उत्कंठा लागली आहे कोठे ? एका प्रचंड प्रयोग शाळेंत अनेक विद्यार्थी निरनिराळे शोध लावीत आहेत व त्यांच्यावर आपण देखरेख करीत आहोंत; जगाच्या ज्ञानांत भर पडत आहे- अशा सुख-स्वप्नात त्यांचा आत्मा तरंगत असे. परंतु वस्तुस्थिती कशी होती ? रसायन शास्त्रांतील नैपुण्य मिळविण्याऐवजी त्यांस जुनी इतिहासाची दफ्तरे झाडण्याचें काम करावें लागलें. राजवाडे म्हणत 'मी जर श्रीमंत व लखपति असतों तर मोठा रसायनशास्त्रवेत्ता झालों असतों; परंतु भिकारी असल्यामुळें इतिहास संशोधनाचा व भाषा संशोधनाचा बिनभांडवली धंदा मला पत्करावा लागला.' मरावयाचे आधी कांही दिवस ते सृष्टिशास्त्र, रसायनशास्त्र यावरील ग्रंथ वाचूं लागले होते व आपण आतां मोठे रसायनशास्त्रवेत्ते होऊं असें ते म्हणत.

त्यांची बुध्दि सर्वंकषा असल्यामुळें ती कोणत्याही शास्त्रांत अंकुठित रीतीनें चाले. लोक निजले आहेत, घोरत आहेत असें पाहून तेच निरनिराळया शास्त्रांस चालना देत. इतिहास संशोधन, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, रसायनशास्त्र सर्वत्र त्यांची दृष्टि होती. हेतू हा कीं निरनिराळया लोकांपुढें निरनिराळीं कार्यक्षेत्रें मांडावी. त्यांची प्रतिभा दिव्य व ज्ञानचक्षू निर्मळ यामुळें एकाच विषयाची निरनिराळी अंगे आपल्या ओजस्वी निबंधांतून ते लोकास सांगत. सर्व शास्त्रांस त्यांनी गति दिली; चालना दिली. असा चतुरस्त्र महाघी पुरुष महाराष्ट्रांत झाला नाही.

त्यांनी स्वत: प्रचंड काम केलें. परंतु अद्याप किती तरी काम झालें पाहिजे असें ते म्हणत. पूर्ववैभव, प्राचीन पूर्वजांची थोर स्मृति लोकांच्या अंतरंगी जागृत करून त्यांस कार्यप्रवण करावयाचें होतें. आलस्य व किंकर्तव्यमूढता त्यांस घालवून द्यावयाची होती. राजवाडे लिहितात 'तात्त्वि हवेच्या संन्यासप्रवण व मांद्योत्पादक दाबाखाली चिरडून गेल्यामुळें प्रपंचाची म्हणजे इतिहासाची हेळसांड करण्याकडे लोकांचा जो आत्मघातकी कल आहे, तो घालविण्यासाठी इतिहासज्ञानप्रसाराची व तत्साधन प्रसिध्दिची आवश्यकता सध्यां विशेषच आहे असें माझें ठाम मत आहे. काल, देश, मूळ या त्रिविध दृष्टिनें भारतवर्षाच्या व महाराष्ट्राच्या नानाविध चरित्राचा अफाट विस्तार पाहतां, आजपर्यंत प्रसिध्द झालेली साधनें जलाशयांतून एखाद्या बेडकानें मोठया प्रयासानें आपल्या शूद्र ओंजळीत वाहून आणलेल्या बिंदूप्रमाणें आहेत. त्या बिंदूमात्राने संन्यास प्रवणतेची मलीन पटलें धुवून जाणार कशी ? हें मालिन्य साफ नाहीसें करावयाला जलाशयांतून शेंकडों मोठमोठे पाट फोडून संन्यास प्रवणतेवर सतत सोडून दिलें पाहिजेत.' राजवाडयांचा सर्वव्यापी अनिरुध्द खटाटोप लोकांस कार्यप्रवण करण्यासाठी होता. महाराष्ट्रांत जी एक कार्यनिरिच्छता उत्पन्न झालेली आहे तिचा निरास करण्यासाठी राजवाडे खपले व ती नाहीसी करण्यासाठीच टिळकांनी गीतारहस्य लिहिलें. साधु संतांच्या उपदेशानें महाराष्ट्र संन्यासप्रवण झाला; स्वाभिमान त्यानें सोडला असें कधी कधी राजवाडे म्हणत. तथापि संतांची खरी कामगिरी त्यांच्या डोळयांआड नव्हती.

 

त्यांना डॉ.जॉन्सन याप्रमाणें जगाचें, जगांतील लोकांच्या मनोवृत्तीचें ज्ञान नीट झालें नाही. डॉ.जॉन्सन लोकांवर प्रथम असाच संतापे. परंतु तो पुढें कमी संतापूं लागला; कारण तो म्हणतो. 'जगापासून मी अपेक्षाच थोडी करितों-त्यामुळें आतां जग मला चांगलें दिसूं लागलें आहे' जॉन्सरला मनुष्य स्वभाव कळला. मनुष्य हा जात्याच आळशी सुखलोलुप आहे. राजवाडे यांस हा लोकांचा स्वभाव कळला असेल: परंतु तो कळून जॉन्सनप्रमाणें ते संतुष्ट न होतां उलट जळफळत. लोकांचा त्यांस तिरस्कार वाटे. गुलामगिरीमध्येंच गौरव मानूं पाहणारे आपले भाईबंद पाहिले म्हणजे त्यांच्या स्वाभिमानी मनाचा भडक होई. यामुळें ही सर्व मंडळें स्थापूनही कार्य करावयास लोक तयार नाहीत हें पाहून ते पुनरपि एकाकीच काम करूं लागले.

मंडळें जमवूनच सर्व काम होईल असें त्यांस वाटत नव्हतें. मंडळें निर्माण करून कांही मंडळी कार्यार्थ तयार करणें म्हणजे निम्में काम झालें असें ते म्हणत. ते लिहितात 'संशोधनार्थ विद्वान निर्माण करणें आणि त्यांची सहानुभाविकांची मंडळें स्थापण्याचें कार्य थोडें फार झाले आहे. परंतु एवढयाने संपत नाही. देशांत संशोधक मंडळें व संशोधक यांची संख्या वाढली म्हणजे पन्नास हिस्से फत्ते झाली. बाकी राहिलेली पन्नास हिस्से फत्ते एका बाबीवर अवलंबून आहे. ती बाब म्हणजे द्रव्यबल, द्रव्यबलासाठीं देशांत मायेचें व जिव्हाळयाचें Home-rule स्वराज्य होण्याची आवश्यकता नितांत भासमान होते.' स्वतंत्र देशांत निरनिराळया संशोधकांस व संशोधक मंडळास केवढा सरकारी पाठिंबा असतो हें पाहून राजवाडे यांचा जीव तुटे. आपल्या देशांतील सरकार तर बोलून चालून परकी. विद्येच्या अभिवृध्यर्थ, शास्त्र प्रसारार्थ तें जनतेस कसें साहाय्य करणार ? परंतु सरकारनें कानावर हात ठेविले.

देशांतील लोकांनी या शास्त्रसंवर्धनाच्या कार्यास हातभार नको का लावावयास ? राजवाडे संतापून लिहितात 'विद्या वृध्दर्थ द्रव्य कां, कसें व कोठें खर्चावें हें समजण्याची अक्कल अद्याप लोकांना, राजांना, परिषदांना व सभांना फुटावयाची आहे. कबुतरें, वारवनिता, पेहेलवान, तमाशेवाले यांची पारख धनिकांना होऊं शकते. विद्वान्, संशोधक व विचारद्रष्टे यांना ओळखण्याची इंद्रिये अद्याप राजांना व परिषदांना आलेली नाहीत. ती आली म्हणजे वागीश्वरांची ओळख धनेश्वरांना पटून शास्त्रे, कला, ज्ञानप्रसार व विदग्ध वाड्.मय यांनी भूमि फुलून जाईल.' आपल्याकडील धनिक वर्ग देशकार्यास व शास्त्रकार्यास मदत करीत नाहीत याचें त्यांस आश्चर्य वाटे. लोक नाटकें, तमाशे व सिनेमा यांस पैसे खर्चतात, परंतु या देशकार्यार्थच त्यांस उदासिनता कां येतें ? राजवाडे म्हणतात 'दुष्काळानें व महर्गतेनें पोटभर अन्न न मिळालें तरी चालेल; परंतु भांडी विकून व बायको गहाण ठेवून नाटकें पाहाणारे कारागीर ज्या देशांत फार झाले तो देश पक्का वेडा बनला असला पाहिजे, यांत बिलकूल संशय नाही. दहा वर्षांच्या खटपटीनें पैसा फंडाचें महाराष्ट्रांत आठ हजार मिनतवारीनें जमतात; एकटया मुंबईतील सर्व नाटक कंपन्यांचें आठवडयाचें उत्पन्न वीस हजारावर आहे ! (विश्ववृत्त सप्टेंबर १९०७)' राजवाडे यांना लोकांच्या या कर्तव्याच्या विस्मृतीची चीड येई. त्यांचा स्वत:चा जीव भारतवर्ष प्राचीन वैभवानें पुनरपि विलसूं लागेल त्याच्यासाठी तळमळत होता. इंग्रज सरकारास घालवून देऊन देश देहानें, मनानें, बुध्दीनें स्वतंत्र कसा होईल याचीच तळमळ त्यांस लागून राहिली होती. 'हिंदुस्थानांतून इंग्लिशांस घालवून देणें हेंच सुशिक्षित हिंदवासीयांचे आद्य कर्तव्य होय.' असें त्यांनी स्पष्टपणें एके ठिकाणी लिहिलें आहे.

   

पुढे जाण्यासाठी .......