बुधवार, आँगस्ट 21, 2019
   
Text Size

तीन मुले

‘चल मधुरी.’ बुधाने हाक मारली.
मधुरी गेली. बुधा गेला. थोडया वेळाने त्याने डोक्यावरील पांघरूण काढले.

‘घाम आला वाटते?’ म्हातारीने विचारले.
‘नाही. परंतु वरची ती घोंगडी काढा. जड वाटते ती.’ तो म्हणाला. म्हातारीने घोंगडी काढली.

मघा मधुरी आली होती.
‘ती तुमच्या गोष्टीतील मधुरी?’
‘हो. तिने फळे आणून दिली. काल तिला सांगितले होते. तुमची गोधडी तिला आवडली.’
‘ही गोधडी?’

‘हो. तिने हात लावला.’
आजीबाई, ती गोधडी माझी नाही. माझ्या गावच्या समुद्रतीराला ती वहात येऊन पडली होती. मी ती घरी नेली, धुतली व वापरू लागलो. फुटले असेल गलबत. कोणा मुशाफराची. मला ती उपयोगी पडत आहे, एवढे खरे.’

‘बोलू नका फार. थकवा येईल.’
आणि मंगा पडून राहिला. मधुरी आली त्या वेळेस तिच्याकडे पहावे असे कितीदा त्याच्या मनात आले. डोक्यावरून पांघरूण काढावे, मधुरीचे हात हातात घ्यावे, तिच्या मांडीवर डोके ठेवावे असे विचार किती आले; परंतु ते त्याने दडवून ठेवले. त्याने चलबिचल होऊ दिली नाही.

सायंकाळ झाली होती. मधुरी व बुधा घरी परत जात होती. ती म्हणाली, ‘बुधा, तू जा घरी मोतीला घेऊन. मी आजीकडून जाऊन येते.’

‘लौकर ये हो, नाही तर मी पहायला येईन.’ तो म्हणाला.
‘मी इकडेच राहणार असे वाटते?’ ती म्हणाली.

‘बसशील पुन्हा टेकडीवर जाऊन, शिरशील पाण्यात.’ तो म्हणाला.
‘तुझेही बंध आहेत हो मला. मुलांचे बंध आहेत. कोठे जाईल मधुरी? मधुरी तुम्हां सर्वांची कैदी आहे. जा तू. मी लौकरच येईन.’

बुधा गेला व मधुरी झोपडीकडे आली.
‘आजी, कसे आहे त्यांचे?’
‘पडून आहे. त्याच्या घरच्या आठवणी येतात. रडतो. त्याला वाटते की आपण मरणार. काल मरणाच्याच गोष्टी बोलत होता.’

‘आता झोप लागली आहे?’
‘असे वाटते?'

 

आजारी
मंगा आता चांगलाच आजारी पडला. फणफणून ताप त्याच्या अंगात असे. ताप निघेना. घाम फुटेना. दुखणे हटेना, म्हातारी सेवाश्रूषा करीत होती.

‘तुम्हांला उगीच त्रास.’ मंगा म्हणे.
‘मी आता बरा नाही होणार. तुमच्या झोपडीतच माझी कुडी पडेल. येथूनच प्राण उडेल.’

‘असे नका बोलू. बरे व्हाल हो.’
म्हातारी धीर देई. एके दिवशी म्हातारी औषध आणायला बाजारात गेली होती. मंगा एकटा अंथरुणावर होता. शांतपणे पडून
होता. हळूहळू तो रडू लागला. ओक्साबोक्शी रडू लागला. थोडया वेळाने म्हातारी आली.

‘हे काय? रडू नका असे. अशाने दुखणे वाढते.’
‘वाढू दे दुखणे. मरू दे लौकर.’

‘मी तुम्हांला मरू देणार नाही. निजा.’
‘आजी, माझी नका करू शुश्रूषा. कोणासाठी जगविता?’

‘असतील तुमची मंडळी त्यांच्यासाठी आणि कोणी नसले म्हणून काय झाले? मला तरी कोण आहे? तरी मी जगतेच.’
‘तुम्ही थोर आहात.’

‘आणि तुम्ही का चोर आहोत? पडून रहा.’
मंगा झोपला. त्याने आता शांतपणे पडून राहावयाचे ठरविले.
तिसरे प्रहरी बुधा व मधुरी आली होती.

‘आजी, ही घे फळे.’ बुधा म्हणाला.
‘कोठे आहे तो वाटसरू?’ मधुरीने विचारले.
‘झोपला आहे.’ म्हातारी म्हणाली.

मधुरी आत आली. तिने पाहिले. काय दिसणार? पाहुण्याच्या अंगावरून पांघरूण होते. परंतु ती गोधडी घोंगडीतून बाहेर पडलेली दिसत होती. त्या गोधडीकडे मधुरी पाहू लागली. तिला मंगाची आठवण झाली. ती खाटेजवळ गेली. त्या गोधडीला तिने हात लावला. एकदम थरारला. जणू भाजला. ती मागे आली.

‘आजी, छान आहे गोधडी नाही?’ मधुरी म्हणाली.
‘तेवढयाने त्याची थंडी राहते.’ म्हातारी म्हणाली.

 

‘येणा-या वाटसरूची आई बनून मी आईचा आनंद लुटते.’

आणि म्हातारीने मंगाला कढत कढत काढा दिला. तो काढा पिऊन तो झोपला. ती गोधडी त्याने अंगावर घेतली.
‘आणखी पाहिजे का पांघरूण !’ तिने विचारले.
‘एवढी गोधडी पुरे होते. कितीही थंडी असली तरी एवढी पुरते. फार ऊबदार आहे ही.’

‘परंतु हाताला तर ऊबदार नाही लागत.’
‘तुम्ही केव्हा पाहिले?’’
‘संध्याकाळी केर काढताना. घालू का पांघरूण? मजजवळ घोंगडया आहेत. पाहुयांना उपयोगी पडतात. संकोच नका करू.’

‘बरे तर, द्या एक घोंगडी.’
म्हातारीने एक घोंगडी त्याचे अंगावर घातली.
‘आजीबाई, तुम्ही झोपा.’
‘माझे काय म्हातारीचे?’

आजीबाई आता झोपली होती. सर्वत्र सामसूम होते. मंगाही झोपेत होता. तो एकदम ‘मधुरी, मधुरी’ करून ओरडला. म्हातारी जागी झाली. मंगा जागा झाला.

‘काय हो?’ तिने विचारले.
तुमची ती गोष्ट. ती स्वप्नात दिसली. तो म्हणाला.

   

मुले असे बोलत होती आणि फकीर, मो मंगा कोठे गेला? तो त्या टेकडीकडे गेला. टेकडीवर त्याला बुधा व मधुरी दिसली. तोही गेला. बाजूस पाठमोरा बसला. त्यांचे बोलणे त्याच्या कानावर येत होते. तो ऐकत होता.

‘बुधा, वाटते की या टेकडीवर बसावे. येथे मला बरे वाटते. येथे मंगा आहे असे वाटते. तो एकदम येऊन माझे डोळे धरील, माझे हात धरील असे वाटते. माझे डोके मांडीवर घेऊन गाणे म्हणेल असे वाटते. समुद्रातून एकदम नाचत येईल व मला हृदयापाशी धरील असे वाटते. या टेकडीवरील कणन् कण मला काही तरी सांगत असतो.’

‘मधुरी, अशा आठवणी येणारच. त्या तुझ्या पवित्र व कोमल आठवणी जाव्यात अशी मी कधीही इच्छा करणार नाही. म्हणून तर मी तुला घेऊन येथे येतो. इतक्या आठवणी तुझ्या हृदयात उसळत असूनही तू मला जवळ केलेस, माझ्या जीवनातही प्रकाश आणलास, सुगंध आणलास, तू थोर मनाची आहेस.’

‘मी थोर की घोर? मी चांगली की वाईट? देव मला जवळ घेईल की दूर लोटील?’
‘देवाला हृदय असेल तर तो जवळ येईल. मधुरी, तुझा विचार करता माझी मती गुंग होऊन जाते. त्या दिवशी रात्री तू झोपली होतीस. मी जागा होतो. तुझ्याविषयी मी विचार करीत होतो. मी एकदम हळूच उठलो व तुझ्या पायांवर डोके ठेविले. तू मला त्यासमयी देवता वाटलीस.’

‘बुधा, तूही थोर आहेस. किती वर्षे एकटा राहिलास! आमच्या सुखाचा हेवादावा केला नाहीस, काही नाही. नाहीतर प्रेमभग्न लोक क्रूर होतात हो. ते खूनही करतील.’

‘मोती बघ ऐकतो आहे गोष्टी.’
‘त्याला समजत असेल हो. लहान मुलांना सारे समजते.’
‘चल आता जाऊ. उन्ह झाले. तुला बाधेल.’

ती दोघे उठली व निघाली गेली. फकिराने, त्या मंगाने वळून पाहिले. परंतु त्याच्या अश्रुपूर्ण दृष्टीला काही दिसत नव्हते.
दिवस असाच गेला आणि रात्र आली. रात्री मंगा असाच कोठे जायला निघाला. मधुरीच्या घराजवळ आला. वरती संगीत चालले होते. सोन्या गात होता. गोड गोड गाणे म्हणत होता आणि बुधा बासरी वाजवीत होता. फकिराची, आमच्या या मंगाची, ते गाणे ऐकता ऐकता समाधी लागली. तो तेथे स्तब्ध उभा राहिला.

गाणे थांबले. बासरी थांबली. मंगा वर पहात होता. त्या संगीताचा, त्या आनंदाचा का त्याला मत्सर वाटला? तो मुकाटयाने तेथून माघारा वळला. तो बंदरावरच्य झोपडीत आला.

‘किती वेळ झाला?’ म्हातारी म्हणाली.
‘डोके सुन्न झाले आहे.’ तो म्हणाला.

‘तुम्ही शांत पडून राहत नाही. तुम्हांला काढा कारून ठेवला आहे. तो कढत कढत घ्या. घाम येईल.’
‘तुम्ही जणू आईप्रमाणे बोलत आहात.’

 

मंगा बाहेर उभा होता.
‘सोन्या, बघ दाढीवाला.’ रुपल्या म्हणाला.
‘खरेच की.’ मनी येऊन म्हणाली.

सोन्याही आला. त्या दाढीवाल्याकडे तिघ पहात राहिली.
‘कोण पाहिजे तुम्हांला?’ सोन्याने विचारले.
‘तुमच्या दिवाणखान्यात एक मोठे चित्र आहे; ते मला पहावयाचे आहे.’

‘पहिल्या बाबाचे?’ रुपल्याने विचारले.
‘हो.’ मंगा म्हणाला.

‘या वरती. कसे छान आहे चित्र! आईला फार आवडते. या वर.’
त्या मुलांनी मंगाला वर नेले. सुंदर दिवाणखाना होता. मऊ-मऊ गालिचे पसरलेले होते आणि ती सुंदर तसबीर होती.
‘हे आमच्या पहिल्या बाबाचे चित्र.’ सोन्या म्हणाला.

‘आणि हे आमच्या आईचे.’ रुपल्या म्हणाला.
मंगाने मधुरीचे ते चित्र पाहिले. स्वत:चेही चित्र पाहिले. तो उभा राहिला.

‘तुम्हांला आवडली का ही चित्रे?’ सोन्याने विचारले.
‘हो. सुरेख आहेत. कोणी काढली ही?’
‘बुधाकाकांनी.’

‘तुम्ही का त्यांना बुधाकाका म्हणता?’
‘कधी कधी बाबाही म्हणतो.’ रुपल्या म्हणाला.

‘तुम्हांला आवडतात का ते?’
‘हो. ते आम्हांला जवळ घेतात. खाऊ देतात. गोड गोष्टी सांगतात.’

‘बरे मी जातो.’
मंगा गेला. मुले पहात राहिली.
‘तो बोवा का रडत होता आईचे चित्र पाहताना?’ रुपल्याने विचारले.

‘आईसुध्दा कधी कधी बाबांचे चित्र पाहताना रडते.’ मनी म्हणाली.
‘त्याची दाढी छान दिसे नाही?’ सोन्या म्हणाला.
‘मला तर भीती वाटे.’ मनी म्हणाली.

   

पुढे जाण्यासाठी .......