बुधवार, जुलै 24, 2019
   
Text Size

श्यामची आई

रात्र चाळिसावी

शेवटची निरवानिरव

"त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाल.' आई वातात बोलत होती. त्या वातात, तिने स्वत:च्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती. आजारी व अशक्त होती, तरी झाडांना ती पुरण घाली. त्यांना पाणी घाली. त्यांची पाने किडे खातात की काय ते पाही. आईच्या हातची किती तरी    झाडे परसात होती! मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते. इतर सारे मेले; पण आईने लावलेला तेवढाच जगला होता. प्रेमाने लावलेला म्हणून का तो जगला?

पहाटेची वेळ होती. वातात आई बोलत होती. त्या बोलण्यात मेळ नसे. क्षणात 'झाडांना पाणी घाला' म्हणे; तर क्षणात 'ती पहा दवंडी देताहेत, मला कानांत बोटे घालू दे.' असे म्हणे. पुरूषोत्तम फक्त निजला होता. बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती. सा-यांची तोंडे उतरून गेली होती; म्लान झाली होती. जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता!

'तो पाहा, त्या खुंटीवर श्याम बसला आहे. खाली ये रे गुलामा. लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला- ये, मला भेट. आईजवळ नाही हट्ट करायचा, तर कुणाजवळ- पण आता पुरे. ये, मला भेट!' आईचे वातात बोलणे चालले होते.
'अक्का ! अक्का!' मावशी आईला हाक मारीत होती; शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती.

'नमू! तुझे तेल परत नाही केले. रागावू नको हो. श्याम ! ये रे तुझे थंड हात ठेव कपाळावर!' आईचे शब्द ऐकून सा-यांचे डोळे भरून आले होते. कोणी बोलेना. सारे स्तब्ध.

'तुमची मांडी हीच माझी अब्रू; दवंडी देतात. द्या म्हणावं- तुमचे पाय आहेत ना मला, कुंकू आहे ना कपाळाला, कोण माझी अब्रू नेणार? कोणता सावकार अब्रू नेईल? माझी अब्रू- ती का दागदागिन्यांत, घरादारांत, शेताभातांत आहे? त्यांचे पाय, त्यांची मांडी, त्यांचे प्रेम यांत माझी अब्रू! द्या रे त्यांची मांडी द्या!' असे म्हणून आई उठू लागली. ती कोणाला आवरेना. सा-यांनी तिला निजविले.

वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले. 'पाणी, पाणी!' आई म्हणाली. मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातले.

'अक्का!' मावशीने हाक मारली. आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही, काही नाही, असे हात हलवून दाखविले. थोडा वेळ

आई शांत होती. 'घेतलंय् माझं डोक मांडीवर?' आईने विचारले.

'होय हो. हा पहा, मी तुझ्याजवळ आहे. बोलू नको.' असे वडील म्हणाले.

काही वेळ गेला. 'मला का रे भेटायला आलास? चंद्री पण आली? या सारी. पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास? तुझ्याजवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस. आलास, तर मग ये- असा रूसू नको, श्याम! मी दळायला लाविले म्हणून रूसलास? आता नाही हो दळायला लावणार. आता संपले. ये श्याम! नाही काय म्हणता! तो पाहा, मला दिसतो आहे समोर- श्यामच तो- तुम्हाला ओळखता नाही आला, म्हणून आईला का नाही ओळखता येणार?'

अशी वातात रात्र गेली. दिवस उजाडला. पुरूषोत्तमला मावशी म्हणाली, 'राधाताईंकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव जा.' हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात. दोन मिनिटे आणखी जरा धुगधुगी राहते. मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना. एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते!

 

'आई! मी येथेच राहू तुझ्याजवळ? राहू का? काय करायची नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल, तर नोकरी कशाला? आई ! मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई! तुझे पाय, तुझी सेवा यांतच माझे कल्याण, माझे भाग्य माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई! तू सांगशील, तसे मी करीन. राजीनामा. मी लिहून आणला आहे. देऊ का पाठवून?' दादा गहिवरून बोलत होता.

आई विचार करून हळूच म्हणाली, 'गजू! सध्या सखूमावशी येथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही. मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव. त्यांना पाच रूपये पाठवत जा. दोन पाठविलेस, तरी चालतील. परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही. तितके माझे भाग्य नाही. झिजत झिजत मी मरणार. फारच अधिक वाटले, तर पुन्हा तुला बोलावून घेईन हो बाळ.'

दादा परत मुंबई जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचे दर्शन, अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले. आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले. आईने त्याच्या तोंडावरून, डोक्यावरून आपला कृश हात, प्रेमाने थबथबलेला हात फिरवला, तो मंगल हात फिरवला. 'जा, बाळ; काळजी नको करू. श्यामला मी बरी आहे, असेच पत्र लिहा. उगीच काळजी नको त्याला. सारी प्रेमाने नांदा. एकमेकांस कधी अंतर देऊ नका!' आईने संदेश दिला.

जड अंत:करणाने दादा गेला. कर्तव्य म्हणून गेला, संसार मोठा कठीण, हेच खरे.

 

रात्र एकोणचाळीसावी

सारी प्रेमाने नांदा

श्यामच्या गोष्टीस सुरूवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते; त्यांची ती कुत्री होती. 'सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी, ह्याचे ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिने घातले. स्वत:च्या अंथरूणावरची चादर तिने आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून दोन दिवशी आईचे अंग नीट कढत पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाढू लागला, तर कोलनवॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. आईच्या खाली मेणकापडावर कागद घालून त्यावरच आईला शौच करावयास ती सांगे. तो कागद मग ती काढून घेई व दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणे शक्य होते, तितकी ती घेत होती, आईला ती भात देत नसे. तिने रतिबाचे दूध सुरू केले. सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी. ते गाळून घेई; नाहीतर त्यात लोणी यावयाचे. असे ते अदमुरे ताक मावशी आईला द्यावयाची. येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून पूरवून त्यांचा रसही ती देत असे. सा-या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती, अशी मावशीने ठेवली होती. सा-या जन्मात हाल झाले; परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाहीत. मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ व सेवा! अत्यंत निरलस व व्यवस्थित.

"ती मथी सारखी म्यांव म्यांव करते आहे. तिला आज भात नाही का रे घातलास?' आईने विचारले. आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मथी होते. मथी दुधाणीला कधी तोंड लावीत नसे. तिला थेंबभर दूध घातले, म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे.

"अक्का, तिला भात घातला; परंतु ती नुसते तोंड लावी. दुधा-तुपाचा भात; परंतु तिने खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीरबिंदीर.' मावशी म्हणाली.

'नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे. मुकी बिचारी! बोलता येत नाही; सांगता येत नाही.' आई म्हणाली.
आईचे दुखणे वाढतच होते. दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता. मुंबईहून मोठा भाऊ चार दिवसाची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठया मिनतवारीने चार दिवसांची रजा मिळाली.

आईला पाहून त्याला भडभडून आले. 'आई! काय, ग, तुझी दशा! तू इकडे होतीस, काम करीत होतीस. आई! आम्ही तिकडे खुशाल खात होतो; परंतु तुला घास मिळत नव्हता!' असे म्हणून तो रडू लागला. धाकटया पुरूषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली होती. आईने कसे हाल काढले, दवंडी कशी पिटली, ते सारे त्याने सांगितले. दादाचे हृदय दुभंग झाले.

आई म्हणाली, 'चाललेच आहे. बाळांनो, या देहाला चांगले दिले काय, वाईट दिले काय, जोपर्यंत देवाला यंत्र चालवावयाचे आहे, तोपर्यंत ते चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता? तूही दिवसभर काम करतोस. तू पाच रुपये पाठविलेस, मला धन्य वाटले. तू एकोणीस रूपयांतून त्यांना पाच रूपये पाठविलेस- खरेच मुठभर मांस मला चढले. मुलाकडून आलेली पहिली मनीऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला. आता मला चिंता नाही. तुम्हांला तयार करणे एवढेच माझे काम! तुम्ही गुणी निघालात- चांगले झाले. तुम्हांला पैसे मिळोत वा न मिळोत; तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे- आता मला काळजी नाही. श्याम तिकडे आहे; ह्या पुरूषोत्तमाला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या. परस्परांस विसरू नका.' आई जणू निरवानिरव करीत होती.

   

'श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे?' नमूने विचारले. 'त्याला कळवू नका, असे मी त्यांना सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल. उगीच कशाला त्याला काळजी? येण्याला पैसे तरी कोठे असतील त्याच्याजवळ? येथे आला, म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय का ही लांबची येणीजाणी होतात? येथे कापात जवळ होता, वाटेल तेव्हा येत असे; परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेवो, म्हणजे झाले. माझे काय?' आई म्हणाली.

नमुमावशी निघाली. 'कुंकू लाव, ग. तेथे कोनाडयात करंडा आहे.' आईने सांगितले. नमूमावशीने स्वत:च्या कपाळी कुंकू लाविले व आईलाही लावले व ती निघून गेली.

'आई! हे बघ मावशीचे पत्र. मला सारे लागले. वाचू मी?' असे म्हणून पुरूषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखविले. मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली.

'इंदू ! उद्या येणार हो सखू. तू पत्र लिहिले होतेस ना! हे बघ तिचे पत्र. दे रे इंदूताईला.' आई पुरूषोत्तमास म्हणाली.
इंदूताईने पत्र वाचले व म्हणाली, 'मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा. वाटे, की केव्हा त्यांना बघेन.' इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. 'पुरूषोत्तम! चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे, चल.' इंदू म्हणाली.

'जा बाळ, त्या परक्या नाहीत, हो.' असे आईने सांगितले. तेव्हा तो गेला.

'माझ्यामुळे तुझे असे हे हाल. तुला नीट खायला-प्यायलाही मला देत येत नाही. मी अभागी आहे. काय करू मी तरी?' वडील आईजवळ बसून म्हणत होते.

'हे काय असे? तुम्हीच जर हातपाय गाळून रडायला लागलेत. तर धाकटया पुरूषोत्तमाने काय करावे? पुरूषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊन नका. तुमच्या जिवावर मी पूर्वी उडया मारल्या. सारी सुखे भोगली. वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो. आले आहेत चार कठीण दिवस, जातील. मी पाहिले नाही, तरी मुलांचे वैभव तुम्ही पाहा. तुमच्या डोळयांत मी येऊन बसेन हो.' असे आई बोलत होती.

'तू सुध्दा बरी होशील. सखू येत आहे, ती तुला बरी करील.' वडील म्हणाले.

'कशाला खोटी आशा आता! आतून झाड पोखरले आहे सारे, ते पडणारच हो. माझे सोने होईल. भरल्या हातांनी मी जाईन. सुवासिनी मी जाईन. तुम्हांस कोण? म्हणून फक्त वाईट वाटते; नाहीतर काय कमी आहे? तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते? या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दु:खेही मला आनंददायकच वाटतात.' असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कढत हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता.

'पाणी, थोडे पाणी द्याना तुमच्या हाताने.' आईने प्रेमाने सांगितले. वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले.

'तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा; अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ. जाऊ नका कोठे. मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो.' असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन, आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर, गहिवर आणणारे पावन असे ते दृश्य होते.

इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या.

'या इंदूच्या आई, या.' म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला. केस जरा सारखे केले. 'पहाटे येणार वाटतं तुमची बहीण?' त्यांनी विचारले. 'हो पत्र आले आहे. इंदूने वाचले.' आई म्हणाली.

'तिनेच सांगितले. बरे होईल. प्रेमाचे माणूस जवळ असले, म्हणजे बरे वाटते.' राधाताई म्हणाल्या.

'सारी प्रेमाचीच माणसे आहेत. ते जवळ आहेत. तुमचा शेजार आहे. आणखी काय पाहिजे?' आई म्हणाली.

थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या.

मावशी पहाटे येणार होती. पुरूषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाडयांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणा-या बैलगाडया पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली, असे वाटताच पुरूषोत्तम धावत जाई व पाही. परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेडयाशी थांबली.

'आपल्याच बेडयाशी थांबली रे!' आजी म्हणाली. दुर्वांची आजी पोतेरे घालीत होती. पुरूषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय मावशीच आली होती. पुरूषोत्तम करंडी घेऊन आला; वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवान निघून गेला.

'आई, मावशी आली ना! ही बघ, खरेच आली.' आईला हलवून पुरूषोत्तम म्हणाला, पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते.

'आली? माझी वाट मोकळी झाली !' असे आई म्हणाली. अर्धवट शुध्द, अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती! आईची दशा पाहून, तो अस्थिचर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले.

'अक्का!' मावशीने हाक मारली. त्या हाकेत, त्या दोन अक्षरांत मावशीचे प्रेमळ व उदार अंत:करण ओतलेले होते.

'आलीस सखू, बस तुझीच वाट पहात होत्ये. म्हटले, केव्हा येतेस! पण आलीस लौकर. प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं, तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन. सखू!' आई रडू लागली.

'अक्का! हे काय वेडयासारखे. मी आल्ये आहे. आता बरी होशील हो. तुला बरे वाटू दे; मग तुला व पुरूषोत्तमला मी घेऊन जाईन. आता मला नोकरी लागली आहे.' मावशी म्हणाली.

'नको हो आता कोठे येणे-जाणे. आता फक्त देवाकडे जाऊ दे. या मठीतच कुडी पडू दे. मी आग्रह करकरून झोपडी बांधविली. ही स्वतंत्र झोपडी बांधविली. येथेच, माझ्या राजवाडयातच देह पडू दे. त्यांच्या मांडीवर, तू जवळ असता, मरण येऊ दे. माय मरो व मावशी जगो, असे म्हणतात, ते खरे ठरो सखू! तुला ना मूल, ना बाळ. तुझा संसार देवाने आटपला; जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर. तूच त्यांची आई हो!' आई बोलत होती.

'अक्का! हे काय असे? बोलू नकोस. बोलण्याने त्रास होतो. जरा पड. मी थोपटते हं.' असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते.

मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली. गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते.

 

इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरूषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली.

'बाळ, पाणी दे रे!' आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला.

'चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल, चमचा नसला कुठे तर.' असे आईने सांगितले. तसे पुरूषोत्तमाने पाणी पाजले.

'या जानकीबाई, या हो, बसा.' जानकीबाई समाचाराला आल्या होत्या.

'पाय चेपू का जरा?' त्यांनी विचारले.

'चेपू बिपू नका. ही हाडे, जानकीबाई, चेपल्याने खरेच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले.' आई म्हणाली.

'आवळयाची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल.' जानकीबाईंनी विचारले.

'द्या तुकडा आणून.' क्षीण स्वरात आई म्हणाली.

'चल पुरूषोत्तम, तुजजवळ देत्ये तुकडा, तो आईला आणून दे.' असे म्हणून जानकीवयनी निघून गेल्या. पुरूषोत्तमही
त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळयाची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरूषोत्तम जवळ बसला होता.

'जा हो बाळ, जरा बाहेर खेळबीळ, शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल, त्या दिवशी आता शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे?' असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली.

पुरूषोत्तम बाहेर खेळावयास गेला.

तिसरे प्रहरी नमूमावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणची मैत्रीण. ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हंडी-बोरखडयाने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळयावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पूजिली होती. एकमेकींकडे वसोळया म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावाच्या टोकाला. शिवाय तिलासुध्दा मधूनमधून बरे नसे.

'ये नमू, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आई?' आईने नमूला विचारले.

'बरे आहे. चाफ्याच्या पानांनी शेकविले. सूज ओसरली आहे. पण, तुझं कसं आहे? अगदीच हडकलीस. ताप निघत नाही अंगातला?' नमूमावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली.

'नमू, तुझ्याबरोबर पुरूषोत्तम येईल, त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारकाकाकू ओरडते. तुला सारे समजते. मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस? गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले.' आई म्हणाली.

'बरे, हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू. धीर धर.' नमू म्हणाली.

'आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहाळे तेवढे पुरेत.' आई म्हणाली.

'तिन्हीसांजचे असे नको ग बोलू. उद्या की नाही, तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन. खाशील ना?' नमूमावशीने विचारले.

'नमू! डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाणे, लाजिरवाणे हे जिणे?' आई डोळयांत पाणी आणून म्हणाली.
'हे काय असे? बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील. तुझे श्याम, गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का?' नमूने विचारले.

'महिन्यापूर्वी लागली. परंतु अवघा एकोणीस रूपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठविणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा पाच रूपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल.' आई सांगत होती.

   

पुढे जाण्यासाठी .......