शुक्रवार, ऑक्टोबंर 18, 2019
   
Text Size

श्यामची आई

देवाला सारे कळत आहे. बुध्दी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. दोन गोड शब्द बोलावयास या. तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या, बाकी काही नको, शिव्या नको. नाना! बोलते याची क्षमा करा! सरदार घराणे. नाना! नव्हते का सरदार घराणे! सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहोर येईल; झाड वाळून गेले, तर पुन्हा पालवी फुटेल. नाना! रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे होवो. परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नका बोलू. माझे एवढेच मागणे आहे.' असे म्हणून आई खरोखरीच नानांचे पाय धरावयास गेली.

'बयो! ऊठ. तुझी इच्छा आहे, तर हा पाहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही. समजलीस ! माझे म्हाता-याचे काय अडले आहे!'

'नाना! असा अर्थाचा अनर्थ करू नका; त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी, तशीच त्यांची पत्नी. मला सा-यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्हीही हवेत व हेही हवेत. नाना! आम्हांला भाग्य सोडून गेले; भाऊबंद सोडून गेले; तुम्हीही सोडून जाणार का? नाना! तुम्ही येत जा, प्रेमाने आम्हांला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना?' आईचा गळा दाटून आला.

'नाही, मी आता येणार नाही, जेथे आपल्या शब्दाला मान नाही, तेथे कशाला जा?' असे म्हणत नाना निघून गेले.

'नाना! तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले. काय करायचे? जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का? म्हणजे शांत वाटेल.' आईवडिलांना म्हणाली.

'या कपाळकरंटयाच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आत जा. मला एकटाच पडू दे.' वडील त्राग्याने म्हणाले.

गरीब बिचारी आई! ती उठून गेली. धाकटा पुरूषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरूण सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे? तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते.

 

'भाऊ! मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसते. बोलाचीच कढी, बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणे आई, कशी विकायची? दुस-याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्या वेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुस-याची आई! मला नका नीती सांगण्याचा आव आणू. एके वेळी तुम्ही दुस-यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणीत असा. जमीन विकतात, विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली. रोजगारधंदा नीट लागला, तर पुन्हा घेतील जमीन विकत. ही जमीन नाही, तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा, राखणार कशा? जप्तीची दवंडी पिटतील, पोलिस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल! म्हणजे मग बरे, की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे, हे बरे? नानांनी विचारले.

'माझ्या अब्रूचे मी पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना?

भाऊ म्हणाले, 'माझीही आहे, म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात, हे विसरलात वाटते? 'लोक म्हणतील, अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली. तुमच्या अब्रुत माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू ती माझीच. जरा विचार करा. आपला हेका मूर्खासारखा धरणे चांगले नाही!' नाना म्हणाले.

'मूर्ख म्हणा, काही म्हणा. तुम्हांला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा!' भाऊ म्हणाले.

'म्हणेनच, म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले! आम्ही म्हणे सरदार! सरदार घराण्यातले, म्हणून मुलगी दिली! हुंडा दिला! मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली! तिच्या अब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी! तुम्ही सरदार ना, हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड ल्यायला, ना खायला! हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहे, हेच का सरदार? नाही नीट घरदार! नाही काही! हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार! केवढी ऐट होती! तीस वर्षे संसार केलात, का धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळविलीत! सा-यांनी तुम्हांला फसविले व हाकलून दिले. डोळे उघडा थोडे, सरदार! भिका-याची लक्षणे आणि म्हणे सरदार! बरे, बोवा, स्वत:ला अक्कल नाही, तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले. तेही नाही. हा काय चावटपणा चालविला आहे? या गाढवपणाला काय म्हणावे? भाऊ! हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो, तसे करा!' असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तेथे आली.

ती बोलणी घरात आईला ऐकवत ना; तरी मोठया कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, 'नाना! माझ्या घरात तुम्ही बसलेला आहात; तुम्ही आपली मुलगी एकदा दुस-याला दिलीत, आता वाटेल तसे बोलू नका! सारे जण खडे मारतात, म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना! तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी, म्हणून या भरल्या घराला अवकळा आली; वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वत:च्या मुलीचे नशीब वाईट, असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले. ते त्यांच्या पुण्याईने. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही, तर नाही. काय व्हायचे ते होईल. परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते; परंतु मने मात्र दुखावलेली राहतात. नाना! फुटलेले मोती सांधता येत नाही, मने वाईट झाली की जोडता येत नाहीत. त्यांचे मन, दुखवू नका. माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वत:च्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत; आमचे काय व्हायचे असेल काही ते होवो. ते तरी ब-यासाठीच करतात ना सारे? मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे, असे का त्यांना वाटते?

 

रात्र चौतिसावी

वित्तहीनाची हेटाळणी

श्यामने सुरूवात केली.

'आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एक दोन मोठी शेते विकली असती, तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते; आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते; परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे.

त्या रात्री आईचे वडील- आमचे आजोबा- आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते; वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहारचतुर, हिशेबी व धोरणी ते होते; परंतु त्यांना स्वत:च्या बुध्दीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुध्द कोणी बोलले, तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुध्दी असते, त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही; सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेले, असे तो मानतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता.

माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले.

नानांनी सुरुवात केली व म्हणाले, 'हे पाहा भाऊ, आज तुम्हांला शेवटचे सांगावयाला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचविले होते; परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. परंतु आता गळयाशी आले, आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाडयाचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमा घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाडयाचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे, देणे वाढत चालले आहे; याने सर्व नाश होईल. माझे मत ऐका.'

'परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरूषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का? नाना! माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हांला पाझर फुटायला नकोत!' वडील औपरोधिक बोलत होते.

'भाऊ! माझ्याने राहवले नाही, म्हणून मी आलो. पोटतिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे, म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हांला दिलेली आहे, म्हणून या एवढया रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे, या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीस लागू नयेत, म्हणून मी आलो. लौकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरे शेत पंधराशे रूपयांस तो विसापूरवाला घेत आहे, देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वारता येईल.' नानांनी हृदय ओतून सांगितले.

'नाना! पायरे शेत कसे विकावयाचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढविले, मोठे केले. मोठमोठया धोंडी उरस्फोड करून फोडल्या. कातळास सुरुंग लावले व भातजमीन तयार केली. दहा मणांचे शेत तीन खंडीचे केले. तेथे विहीर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोभ! मुले शनिवारी-रविवारी लहानपणी शेतावरच राहावयाची. तेथेच वांग्याचे भरीत व भात दूर्वांच्या आजीबरोबर खावयाची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळयाचा संबंध! जमीन सुध्दा कशी आहे! सोने पिकेल तेथे, अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळयांना दिसेनाशी होत चालली आहे. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालिता येत नाही. तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला ? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो? आपलीच जमीन आपल्याच हातांनी विकायची? आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठयातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणेही पाप! जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो!' वडील बोलले.

   

'अरे तू परक्या मुलखात चाललास. तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काही झाले, तर असू दे आपली. बाळ! आमचे येथे कसेही होईल. माझे ऐक.'

असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसांत ओठ फुटू नयेत, म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला; आगबोट लागू नये, म्हणून चार आवळयाच्या वडया दिल्या, चार बिब्बेही बरोबर असू देत, असे म्हणाली व लोटयाच्या कोनाडयातून तिने ते काढून आणिले. माझी ममताळू, कष्टाळू आई! बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते.

रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकटया भावाला म्हटले, 'आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला तू मदत कर हो,' बाळ. आईला आता तू!' असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली. ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरविला. ते काही बोलू शकले नाहीत. आणि आईच्या पायांवर डोके ठेविले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकीवयनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, 'माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा.' 'जा, हो, श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी नको करू' त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. 'सांभाळ!' ती म्हणाली. मी मानेने हूं म्हटले. निघालो. पुन्हा पुरूषोत्तम जवळ येऊन मला झळंबला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरिले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते. कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरावयाचे होते. तिठयाजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळयांना लाविले. त्याच्या चरणींचा शेंदूर कपाळी लावला. 'माझ्या मायबापांना जप!' असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. 'जप, हो, बाळ. सांभाळ.' ते म्हणाले.

मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन-समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुडया मारून मोती काढणार? हया समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील? तारू कोठे रूतेल, कोठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. 'ध्रुवाप्रमाणे जा.' आई म्हणाली! कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेंबडालेंबडा, पदोपदी चुकणारा, घसरणारा, चंचल वृत्तीचा श्याम! मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती परंतु माझे लक्ष नव्हते अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते. आई! तिची कृपादृष्टी असली, म्हणजे झाले. मग मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवचकुंडले होती. ती लेवून मी निघालो होतो. मुलाला पोहावयास शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो; कधी चिखलात रूतलो; कधी वाळूत पडलो; कधी लाटांनी बुडविले; परंतु पुन: पुन: मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही. अजूनही धोके आहेत. परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरी तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही, तरी तिची कृपा आहेच. आई मेली, तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणांस नेहमी आतून मिळतच असतो.

 

'आई! तू भाऊंची परवानगी मिळव; त्यांची समजूत घाल.' मी सांगितले.

'मी तुला ती मिळवून देईन. निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाचे काही बोलले होते.' असे आईने आश्वासन दिले.

रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते. कुळिथांचे पिठले होते. 'म्हटले, श्याम दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे, जाऊ द्यावा त्याला.' आई वडिलांना म्हणाली.

'कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एका काळी या हाताने हजारो रूपये मोजले; परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालत नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये, असे का मला वाटते? आपल्या होतकरू बुध्दिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये, असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय?' असे वडील मोठया खेदाने म्हणाले.

'तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण, म्हणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते दहा रूपये त्याला द्यावे, म्हणजे झाले.' आई म्हणाली.

'काही हरकत नाही. स्वत:च्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरीच धर, असे काही माझे सांगणे नाही. फक्त, मी शिकवायला असमर्थ आहे, एवढेच. माझा आशीर्वाद आहे.' वडील म्हणाले.

आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. 'आई! मग अण्णा जाणार वाटते? लांब जाणार, लौकर परत नाही येणार?' धाकटा पुरूषोत्तम आईला विचारीत होता.

'हो, बाळ; तो शिकेल व मग तुम्हांला शिकवील. तुम्हांला शिकविता यावे, म्हणून तो लांब जात आहे.' आई त्याची समजूत घालीत होती.

शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले.

वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता, तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो! इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले की भुर्रकन आईजवळ उडून येत होते; परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारीसुध्दा घरी जावयाचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठया सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे-जाणे थोडेच होणार! प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार ! मला दहा रूपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो; पुढे आईबापांस सुख देता यावे म्हणून जात होतो; आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो; हाच एक विचार मला धीर देत होता. डोळयांतील पाण्याला थांबवीत होता. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण? तिचे पाय सुट्टीत कोण चेपील? 'श्याम! तुझे हात कसे थंडगार आहेत. ठेव, रे, माझ्या कपाळावर, कपाळाची जशी लाही होत आहे.' असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुवील? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन घास जास्त खावे, म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावील? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? 'आई! मी थारोळे भरून ठेवतो.' म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागरकळशी कोण भरून आणील? मी घरी गेलो, की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईल, याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण? मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई; तिला सा-यांची चिंता आहे. देवाला सा-यांची दया. सा-यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच; एक तोच.

माझी बांधाबांध चालली होती. रात्रीची वेळी बैलगाडी निघावयाची होती. आज रात्री जाणार, हो जाणार; आईला सोडून जाणार! आईने दोन स्वच्छ गोधडया काढल्या. एक घोंगडी काढली. मी आईला म्हटले, 'घोंगडी कशाला मला? एक तरट खाली घालीन; त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे. मला नको.'

   

पुढे जाण्यासाठी .......