रविवार, ऑक्टोबंर 20, 2019
   
Text Size

श्यामची आई

सहा कोस वडील चालून आले, का आले? तो खर्वस ती एक खर्वसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरे प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात! हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वत:च्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खर्वस दिला असता तर? एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर? शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा, असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा?

परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजीत होते, म्हणून थोडेतरी प्रेम मला आज देता येत आहे, माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्या वेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत, माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावीत होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे, ओसाड नाही, रूक्ष भगभगीत नाही.

मुले मला हसतील, 'ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट!' असे म्हणून चिडवतील, ह्याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारे जण 'अहं वेद' असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे. 'अहं!' सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढयता, आपली अब्रू, सारे आपलेच.' आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वत:स विसरू शकत नाही, तो काय प्रेम करणार?

वडील म्हणाले, 'श्याम! तुझ्या आईने तुला खर्वस पाठविला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या.' त्यांनी खर्वसाची बोगणी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, 'श्याम! अरे, बघत काय बसलास? टाक उरकून! लाजायला काय      झाले? या, रे मुलांनो! तुम्हीही घ्या. श्यामला एकटयाने खावयाला लाज वाटत असेल. एकटयाने नाही तरी नयेच खाऊ. चारचौघांना द्यावे.' इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांडयाचे फडके सोडले. 'ये रे श्याम! या रे आपण फन्ना करू. फडशा पाडू.' असे तो म्हणाला. आम्ही सारे खर्वसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खर्वस घेतला नाही. आम्ही देत होतो, तर म्हणाले, 'तुम्हीच खा. मुलांनीच खाण्यात गंमत आहे.'

आम्ही सारा खर्वस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घण घण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, 'झाला, रे, खाऊन? आण ते भांडे. मी नदीवर घासून घेईन.' ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, 'अभ्यास नीट कर, हो. प्रकृतीस जप. गाईचे वासरू चांगले आहे. पाडा झाला आहे.' असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो.

मला माझी शरम वाटत होती; अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतघ्न मुलगा आहे, असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली; परंतु रूखरूख लागून राहिली. सहा कोस केवळ खर्वसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई! या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीणभावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन. तर त्यानेच थोडे अनृणी होता येईल. येरव्ही नाही.

 

रात्र सत्ताविसावी

उदार पितृहृदय

आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईचे दुधाच्या खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खर्वस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली.

'श्यामला खर्वस पाठविला असता, कोणी येणार-जाणारे असते तर!' आई वडिलांना म्हणाली.

वडील म्हणाले, 'कोणी येणारे-जाणारे कशाला? मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खर्वस. श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील?'

'त्या शेराच्या भांडयात करून देईन. ते भांडेच घट्ट खर्वसाने भरलेले घेऊन जावे.' आई म्हणाली.

आईने सुंदर खर्वस तयार केला, खर्वसाची ती बोगणी घेऊन वडील पाणी पायी दापोलीस यावयास निघाले.

शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत जणू ती वानरेच बनत व भराभर उडया मारीत.

मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती. कोणी झाडावर बसून गात होती, कोणी फांदीवर बसून झोके घेत होती. कोणी खेळत होती, कोणी    झाडाखाली रेलली होती, कोणी वाचीत होती, तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंडया लावीत होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिम्न वगैरे येत होती; शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी, यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुस-या बाजूस; तरी मी त्यांच्यावर भेंडया लावीत असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत.

आम्ही भेंडया लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले 'श्याम, अरे श्याम' अशी हाक मारत आली. त्यांतील एकजण मला म्हणाला, 'श्याम! अरे, कोणीतरी तुला शोधीत आहे. आमचा श्याम कोठे आहे, अशी चौकशी करीत आहे.' इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही.

मी विचारले, 'भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो.' वडिलांचा तो कसातरी गबाळयासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणा-या मुलांत मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते. सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही! मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतरदृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदयमंदिरातील सत्यदृष्टी दाखवीत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. ह्या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते, तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्त्वाची, जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे.

 

'नारदा, आता चिंधी कुठे शोधू? हा पीतांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ. ही मोलवान पैठणी. नारद! चिंधी नाही रे!' असे सुभद्रा म्हणाली.

'बरे तर, मी द्रौपदीताईंकडे जातो.' असे म्हणून नारद निघाले.

द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. 'ये नारदा! हा हार तुझ्याच गळयात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे, म्हणून आलास, नाही रे? याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावयाचे! पण माझा कृष्ण सारा लुटू नका, हो मला ठेवा थोडा.'

'द्रौपदी! थट्टा करावयाला वेळ नाही, बोलावयाला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. एक चिंधी दे आधी.' नारद, घाब-या घाब-या म्हणाला.

'खरे का, नारदा! कितीसे रे, कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरेरे!' असे म्हणून नेसूचा पीतांबरच फाडून तिने चिंधी दिली.

भरजरि ग पीतांबर दिला फाडून। द्रौपदीस बंधू शोभे नारायण।

माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की, मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढावयाचे विसरून गेलो होतो.

गाणे झाले. मला आई म्हणाली, 'श्याम! आवडले की नाही? ऐकलेस की नाही नीट?'

आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, 'आई! आजीला तू हेच गाणे आज म्हणावयास का सांगितलेस, ते ओळखू?'

'ओळख बरे. तू का मनकवडा आहेस? आईने म्हटले.

मी म्हणालो, 'आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना. तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यावयाचे होते होय ना? मला लाजविण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणावयास सांगितलेस. खरे, की नाही सांग.'

आई म्हणाली. 'होय. तुला लाजविण्यासाठी नाही; तर तुला प्रेम शिकविण्यासाठी.'

मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले, 'दादा! आजपासून मी तुला 'नाही' म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन. भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर.'

दादा म्हणाला, 'श्याम! हे काय रे? क्षमा नि बिमा कसची मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग. तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे, हेही मला माहीत आहे, आई! आम्ही कधी एकमेकांस अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो, तरी फिरून एकमेकांस मिठी मारू.'

आई म्हणाली, 'तुम्ही परस्पर प्रेम करा. त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद.'

   

आई म्हणाली, 'आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे. तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे. मीही पुष्कळ दिवसांत ऐकले नाही.' आईने आजीस सांगितले.

दूर्वांच्या आजीला गाणी येत असत, म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधींचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले, काही तरी 'प-ह्यातली पातेरी कोण हुक् करी' अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे भिकार गाणे, चांगले पीतांबराचे तरी आजी म्हण. असे म्हटले.

आजी म्हणाली. 'श्याम! ऐक तर खरे. त्या चिंधीच्या गाण्यात पीतांबर पैठण्याच आहेत.'

आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हालवून गाणे म्हणे, भावनामय होऊन गाणे म्हणे, विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकडकडवे-ध्रुवपद असे होते.

'द्रौपदीसी बंधु शोभे नारायण'

हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप; म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे. त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यांतही जणू अभिन्नत्व, अद्वैत आहे, असे दाखविण्यासाठी द्रौपदीसही 'कृष्णा' नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे. कृष्णाचे पाठल्या बहिणीवर-सुभद्रेवर- प्रेम कमी; परंतु द्रौपदी- ही मानलेली बहीण - हिच्यावर जास्त. असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे.

प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकांत म्हणजे सुर, नर, असुर या तिन्ही लोकांत- सात्त्वि राजस व तामस; श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकांत फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्ये पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर, कोठे कोप-यात सुगंधी फुल फुललेले असले, तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामे ते करीत असावयाचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे. कारण ते नि:स्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत.

या वेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमलिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, 'देवा! आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, नि:पक्षपाती, असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, 'नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टी नि काय?' मी काय बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे. तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का. ते सांग.'

कृष्ण म्हणाला, 'नारदा? मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील, तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे; परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणून लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही, त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली, त्यांच्या घरात वारा शिरला. त्यांच्या घरात प्रकाश शिरला, जितके दार उघडाल, तितका प्रकाश व हवा आत जाणार. तसेच माझे. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वत: निष्क्रिय आहे. लोकी नि:स्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी' हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहावयाची आहे का? हे बघ, मी सांगतो, तसे कर. सुभद्रेकडे धावत-पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली, तर घेऊन ये. तिने न दिली, तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग.'

नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, 'ये रे नारदा! प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात, कोठे काय पाहिलेस, सांग. तुझे आपले बरे. सारीकडे हिंडतोस. तुला नारदा, कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुवन. बैस. अरे, एवढी घाई काय आहे?'

नारद म्हणाले, 'सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. भळभळ रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे.'

 

दादा आईला म्हणाला, 'आई! तू उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हांला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीचे फाळके काढून?'

आई म्हणाली, 'जा रे, श्याम, फाळके काढून आण. सुय-याचे पाने नको, हो कापू! ते पानकापे घे व वरची पाने काप, जा.'

मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पडल्या. पाने नीट कापून घरी आणली. 'अण्णा! टाटोळा मला वाजवायला दे. मी फटेफटे करीन.' बाबुल्या म्हणाला.

आई पानग्या करावयास बसली. कढत कढत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते. त्यामुळे फारच छान लागत होती. 'अरे, पहाटे तुळशीला नैवेद्य दाखविलेली लोणीसाखर तेथे शिंपीत असेल, ती घ्या!' आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणीसाखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे. दादाने कांदेपाक आणला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली, 'श्याम, उद्या नको हो मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको, हो. पडायला. ऐकलेस ना, श्याम? आता शहाणा हो.'

मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही. दादाने मला विटीदांडू खेळावयास बोलविले. मी गेलो नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणांनी खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, 'दादा! त्या झाडांना का दुखवतोस? त्यांच्या आंगतून रक्त काढतोस?'

'दादा म्हणाला, मग विटीदांडू खेळावयास येतोस?'

'माझे अडले आहे खेटर! मी नाही येत जा!'

फणका-याने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते; परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहात होतो! ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही, तो झाडावर काय करणार!

दुपारची जेवणे झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हातांनी कुरवाळीत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्षे झाली, तरीही त्याच्या तळव्यांची आग होते; मग त्या वेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायांवर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहात होता; मुकेपणाने मला बोलावीत होता. परंतु त्याच्या पायांवर पाय द्यावयाचे नाहीत, असे मी ठरविले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला, 'श्याम! देतोस का रे तळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते, हो. रोज रोज तरी तुला किती सांगावयाचे? पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. येथे तू आहेस, म्हणून सांगतो, दे रे जरा.'

दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात. त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्या वेळेस मी ठरविले होते. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही.

आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुऊन आली. मी जागचा हाललो नव्हतो, हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली व म्हणाली, 'गजू! मी देते हो, तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? भाऊ सख्खे दाईद पक्के!' असे म्हणत आई खरेच दादाच्या पायांवर, त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी-खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती; परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये, म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई! मोठया मनाची आई! एक शब्दही मला ती बोलली नाही; माझ्यावर रागवली नाही. शेवटी मीच शरमलो. माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो व म्हटले, 'आई! तू जा. मी देतो पाय. आई, हो ना दूर.'

आई म्हणाली, 'द्यायचे असतील. तर नीट हळूहळू दे. धसमुसळयासारखे नको देऊ. त्याला झोप लागेपर्यंत दे. मग खेळायला जा. श्याम! तुझाच ना तो भाऊ?' असे म्हणून आई गेली. उष्टयांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली. दादाच्या पायांवर मी पाय देत होतो. माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली.

माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तास जाऊ लागला, तसतसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. रात्रीची जेवणे झाली. आईचे उष्टेशेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळयात तुळशीवर एका मडक्यात लहान भोक पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येताजाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती. परंतु अंगणात दिव्याची जरूरी नव्हती. सुंदर चांदणे पडलेले होते.   माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरूषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो! दूर्वांची आजी, आईसुध्दा बसल्या होत्या. शेजारच्या जानकीवयनीसुध्दा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपडया पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटले, 'आई! तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. 'पडला अभिमन्यू मन्यू वीर रणी । चक्रव्यूह रचिला द्रोणांनी । पडला अभिमन्यू । ' म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता, ते शोधावयास जातात; मुखाने 'कृष्ण कृष्ण' असा मंजुळ जप अभिमन्यू करीत असतो, त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल, असे त्यांना वाटले. कसे छान आहे गाणे! आई! म्हण ना, ग!'

   

पुढे जाण्यासाठी .......