सोमवार, आँगस्ट 19, 2019
   
Text Size

मानवजातीचें बाल्य

- ६ -

बुध्द प्रेमधर्मांचे आचार्य, कन्फ्यूशियस न्यायाचे उद्गाते, जेरेमिया शांतीचा संदेश देणारे आणि प्लेटो सौंदर्याचे महान् सद्‍गुरू, सौंदर्याची उपासना प्लेटो शिकवितो.  त्यानें अशी एक नगरी बांधली कीं, जींत थोर मानव नांदत.  ही नगरी प्रकाश-देवतेला-अपोलोला त्यानें अर्पण केली.  ही नगरी त्यानें तारामंडळांत ठेवून दिली.  अशा हेतूनें कीं, भविष्यकालीन शिल्पकारांनीं आदर्श म्हणून, स्वत:च्या क्रांतिकारक स्वप्नांसाठीं एक दिव्य उदाहरण म्हणून, तिच्याकडे सदैव बघावें.

परंतु केवळ नवीन समाजसृष्टीचें एक स्वप्न खेळवून, एक दिव्य चित्र रंगवूनच, समाधान मानणारा प्लेटो नव्हता.  कन्फ्यूशियसप्रमाणें स्वत:च्या तात्त्विक व ध्येयवादी विचारांना प्रत्यक्षांत आणण्यासाठीं त्यानें धडपड केली.  सायराक्यूसचा राजा डायानिशियस यानें प्लेटोला आदरानें बोलावलें.  प्लेटो सिसिली येथें गेला.  त्यानें डायोनिशियसला शहाण्या माणसाप्रमाणें राज्य कसें करावें हें शिकविलें.  परंतु प्लेटोचे कांही क्रांतिकारक विचार ऐकून तो राजा घाबरला.  त्यानें प्लेटोला गुलाम करून विकलें व प्लेटोच्या क्रांतीतून स्वत:ला वांचविलें.

प्रामाणिक व न्यायी राज्यपध्दतीला जग अद्याप तयार नव्हतें.  प्लेटोच्या एका शिष्यानें त्याची खंडणी भरली आणि प्लेटो मुक्त झाला ; त्याचें स्वातंत्र्य त्याला मिळालें.  तो पुन्हां अथेन्सला आला, आणि आपल्या त्या तत्त्वज्ञानमंदिराच्या उपवनांत बसून तो पूर्वीप्रमाणें पुन्हां तात्त्विक विचार देत राहिला, आपलीं उपनिषदें देत राहिला.  किती तरी वर्षे असा हा महान् ज्ञानयज्ञ त्यानें चालविला होता ; तो प्रकाश देत होता आणि आतां तो एक्याऐशीं वर्षाचा झाला.  एका तरुण मित्राचें लग्न होतें.  आशीर्वाद देण्यासाठीं म्हणून तो तेथें गेला होता.  तेथें लग्नांतील थट्टाविनोद चालला होता.  सर्वत्र गडबड, हंशा, आनंद होता.  तो आनंदी गोंधळ त्याच्या प्रकृतीस मानवला नाहीं.  तो थकला. 'माफ करा' असें म्हणून तो जरा विश्रांति घेण्यासाठीं, थोडी झोंप घ्यावी, डुलकी घ्यावी म्हणून शेजारच्या खोलींत गेला.  इकडे थट्टामस्करीस ऊत आला.  खानपानगान जोरांत चाललें.  त्या लग्नाच्या वर्‍हाडाला जणूं त्या थकल्याभागलेल्या वृध्द तत्त्वज्ञान्याची विस्मृतिच झाली ! इकडे हा सारा धांगडधिंगा चालला असतां थोडी विश्रांति मिळावी म्हणून तो तिकडे धडपडत होता.

परंतु त्या पलीकडच्या खोलींत प्लेटोला गाढ झोंप लागली होती—शेवटचीच गाढ झोंप ! या जगांतील अर्थहीन आवाज, निरर्थक गोंगाट अत:पर त्याची शांति भंगविणार नाहींत, त्याची विश्रांति मोडणार नाहींत.  तत्त्वज्ञान्यांचा हा राजा, तत्त्वज्ञान्यांचा हा सम्राट्, याला शेवटीं समदृष्टि अशा त्या मृत्युदेवाच्या आदर्श राज्यांतील आमंत्रण आलें.

 

ज्या मनुष्याला सामाजिक बुध्दि नाहीं, सर्वांशीं मिळून मिसळून कसें वागावें, सर्वांच्या हितसंबंधींस अविरोधी वर्तन कसें ठेवावें हें ज्याला कळत नाहीं, अशा मनुष्याला केवळ बहिष्कृत किंवा अस्पृश्याप्रमाणें मानून तो सुधारेल असें नाहीं.  गुन्हेगार वेडा असेल तर त्याचें वेडेपण तुम्हीं दूर केलें पाहिजे.  तो अज्ञानी असेल तर तुम्हीं त्याचें अज्ञान दूर केलें पाहिजे.  परंतु सूडबुध्दीनें तुम्हीं त्याला कधींहि, केव्हांहि, शासन करतां कामा नये, शिक्षा देतां कामा नये.
मानसिक रोगटपणाप्रमाणेंच शारीरिक रोगटपणाहि अज्ञानजन्यच असतो.  नीट काळजी घेतली तर रोगराई बर्‍याच प्रमाणांत कमी करतां येईल, आरोग्य वाढवतां येईल.  परंतु ज्यांचे रोग दु:साध्य आहेत त्यांना मरायचें असेल, आत्महत्या करायची असेल, तर कारुण्यबुध्दीनें त्यांना तशी परवानगी देण्यांत येईल.  कारण अशा घुटमळणार्‍या व कंटाळवाण्या रोगापेक्षां मरण बरें.

वकील म्हणजे एक पीडाच.  परंतु आदर्श राज्यांत त्यांची जरुरी राहणार नाहीं.  या अनावश्यक आपत्तीचा त्रास प्लेटोच्या राज्यांत नाहीं.  कारण जेथें ज्ञान आहे, समंजसपणा आहे, तेथें कोर्टकचेर्‍यांची, फिर्यादींची वगैरे जरुरीच नाहीं.  आदर्श राज्यांत कायदे फारच थोडे असतील आणि त्यांचा अर्थ करणें सोपें व सरळ असेल.  आदर्श राज्यांतील तत्त्वज्ञानी शास्त्यांस पुरतेपणीं माहीत असतें कीं, एकादा नवीन कायदा करणें म्हणजे गुन्हेगारांचा आणखी एक नवीन वर्ग निर्माण करणें होय.  भाराभर कायदे केल्यानें गुन्हे कमी होत नसतात.  आदर्श राज्यांतील तत्त्वज्ञानी राज्यकर्ते स्वत:चें नियंत्रण कसें करावें, स्वत:वर संयम कसा ठेवावा, आपलें मन, आपल्या वासना, आपल्या इच्छा यांच्यावर ताबा कसा ठेवावा हें जनतेस शिकवितील तर मग देखरेख करण्याची, पोलीस वगैरे राखण्याची फारशी जरुरी राहणारच नाहीं.

आदर्श राज्यांतील शासनसंस्था एकच गोष्ट सदैव पाहील.  प्रजेचें हित, मंगल कसें होईल,  प्रजेला सुख कसें लाभेल, याच एका गोष्टीकडे तेथले शास्ते रात्रंदिवस पाहतील.  सुख, स्वास्थ्य, शांति, निरामयता, इत्यादि गोष्टी प्रजेस देणें हें शासकांचें काम राहील.  इमर्सन म्हणतो, ''मला आरोग्य द्या व प्रकाश द्या.  मग मी मोठ्या सम्राटांचा दिमाखहि हास्यास्पद करीन.  त्यांच्याहून मी अधिक सुखी व खुष असेन.'' प्लेटोच्या दृष्टीनें आरोग्य, समाधान व प्रकाशपूर्ण आयुष्य--सौंदर्यमय असा हा जीवनक्रम म्हणजे सुखाची सीमा होय.  निळ्या आकाशांत सुंदर सोनेरी प्रकाश असावा, तद्वत् जीवनांत सुखसमाधान असावें, सौंदर्य असावें.  प्लेटोचें ध्येय काय ?  सौंदर्याचें जीवन, न्यायाचें जीवन, प्रेममय जीवन, 'सत्यं-शिवं-सुंदर' चें जीवन.  प्लेटोचें हें ध्येय आहे.  प्लेटोच्या तत्त्वज्ञानांत हे तिन्ही शब्द जणूं समानार्थकच आहेत.  सज्जन मनुष्य म्हणजेच सुखी मनुष्य ; सुखी असणें म्हणजेच सज्जन असणें, चांगलें असणें ; आणि हा सज्जन नेहमीं न्यायी असतोच.  जो सुखी व सज्जन असतो त्याच्या जीवनांत अविरोध असतो, त्याच्या जीवनांत प्रमाण असतें, मेळ असतो ; म्हणून त्याच्या जीवनांत शांतीचें संगीत असते.  असा मनुष्य सौंदर्यासाठी तहानलेला असतो.  सर्वत्र मधुरता असावी, सुंदरता असावी, अशी उत्कंठा व कसोशी त्याला असते.  सौंदर्य सर्वत्र व्हावें, दिसावें, म्हणून तो प्रयत्न करीत राहतो ; सौंदर्यनिर्मितीसाठीं तो धडपडतो.  आपल्या सुंदर मुलांच्या रूपानें, कलात्मक कृतींच्या रूपानें किंवा उदात्त व उदार अशा कर्मांच्या रूपानें, तो स्वत:मधील सौंदर्यच प्रकट करीत असतो.  शारीरिक, बौध्दिक व आंतरिक सौंदर्य तो मूर्त करूं पाहतो.  सौंदर्य ही अमृतत्वाची जननी आहे.  जेथें सौंदर्य आहे तेथें अमरता आहे.  सौंदर्य असेल तर अमृतत्वाचा अमरपट्टा मिळेल.  सुंदर वस्तु निर्मून आपण मृत्यूवर विजय मिळवितों, मरणाला जिंकून घेतों.

 

दुसर्‍यांच्या जीवनाला वळण देण्याची जबाबदारी उचलण्यापूर्वीच जीवन काय आहे हें त्यांनीं अनुभवलें पाहिजे, जगांतील टक्केटोणपे त्यांनी खाल्ले पाहिजेत,  पंधरा वर्षे प्रत्यक्ष जगांत त्यांनीं वावरलें पाहिजे.  आतां वय पन्नास वर्षांचे होईल.  आतां तत्त्वज्ञानी राजे-राण्या व्हायला तीं सारीं समर्थ ठरतील.  आदर्श राज्यांत तत्त्वज्ञानीच शास्ता होण्यास पात्र असतो.  ''तत्त्वज्ञानी तरी शास्ते झाले पाहिजेत किंवा शास्त्यांनीं तरी तत्त्वज्ञानी बनले पाहिजे.  जोंपर्यंत अशी स्थिती येत नाहीं तोपर्यंत जगांतील दु:खांचा अंत होणार नाहीं.'' शिक्षणामुळें व नैसर्गिक योग्यतेमुळें तत्त्वज्ञानी हेच उत्कृष्ट स्त्री-पुरुष.  शासनसंस्थेनें जे उत्कृष्ट स्त्री-पुरुष निर्माण केले ते म्हणजे हे तत्त्वज्ञ.  आणि जे उत्कृष्ट आहेत त्यांनींच राज्यकारभाराचें सुकाणूं हातीं घेणें योग्य.  या तत्त्वज्ञानी शासकांचा शेवटचा, तिसरा, परमोच्च वर्ग.  खालच्या व मधल्या वर्गांनीं या उच्च वर्गांचें ऐकलेच पाहिजे.  या उच्च वर्गीय शास्त्यांत प्रामाणिकपणा असावा म्हणून त्यांची खासगी मालमत्ता असतां कामा नये.  त्यांचें जें कांहीं असेल तें सारें सामुदायिक.  ते सार्वजनिक भोजनालयांत जेवतील, बराकींतून झोंपतील.  स्वार्थी वैयक्तिक हेतु नसल्यामुळें हे शास्ते लांचलुचपतीच्या अतीत राहतील.  एकच महत्त्वाकांक्षा सदैव त्यांच्या डोळ्यांसमोर असेल आणि ती म्हणजे मानवांमध्यें न्यायाची कायमची प्रस्थापना करणें.

- ५ -

आदर्श शासन-पध्दतीचें असें हें संपूर्ण चित्र आपण पाहिलें.  या आदर्श राज्य-पध्दतीच्या नगरीच्या दरवाजावर ''न्यायाची नगरी ती ही'' अशीं अक्षरें आपण खोदून ठेवूं या.  या न्यायाच्या नगरींत शिरून तिच्यांतील कांही मनोहर विशेष, कांहीं प्रसन्न व गंमतीचे प्रकार, पाहूं या.  पहिली गोष्ट म्हणजे या तत्त्वज्ञानी शासकांनीं ग्रीकांचा धार्मिक आचार्य व उद्गाता महाकवि जो होमर त्याला व त्याच्या महाकाव्यांना हद्पार केलें आहे.  त्या महाकाव्यांतील देव वासनांविकारांनी बरबटलेल्या मानवांप्रमाणेंच आदळआपट करितात.  इलियडमधील देवदेवता पोरकट वाटतात.  किती त्यांचे अहंकार !  किती त्यांचे काम-क्रोध ! असला हा धर्म निकामी आहे ;  त्याची शुध्दता केली पाहिजे ; त्याच्यांतील सारा रानटीपणा नष्ट केला पाहिजे.  दुष्ट रुढि, भ्रामक कल्पना, चमत्कार, इत्यादि गोष्टी धर्मांतून हद्दपार केल्या पाहिजेत.  मानवी बुध्दीला न पटणारा, तिच्याशीं विसंगत असणारा असा धर्म असण्यापेक्षां धर्म नसलेला बरा.

प्लेटोच्या आदर्श राज्यामध्यें देवदेवतांची ही अशी दुर्दशा आहे.  परंतु मानवां-मानवांतील संबंध कसे राखायचे ? मानवांतील व्यवहार कसे चालवायचे ? मुख्य गोष्ट म्हणजे या सर्व व्यवहारांत न्यायबुध्दि असावी.  केवळ धंदेवाईकपणा ही गोष्ट त्याज्य आहे.  ती मानवाचा अध:पात करणारी आहे.  धंदेवाईक माणसाला यशस्वी रीतीनें धंदेवाईक होणें व प्रामाणिकहि असणें या दोन्ही गोष्टी कशा साधतील ?  प्लेटोच्या आदर्श राज्यांत गुन्हेगारांना करुणेनें वागविण्यांत येतें, त्यांच्यावर अंकुश असतो, बंधनें असतात ; परंतु त्यांना शिक्षा देण्यांत येत नाहीं.  मनुष्य गुन्हा करतो ; कारण त्याला नीट शिक्षण मिळालेलें नसतें.  ज्याला स्वत:चे ज्ञान नाहीं, आपल्या सभोंवतालच्या बंधूंविषयींहि ज्याला ज्ञान नाहीं, अशा अज्ञानीं पशुसम मनुष्याची कींवच करायला हवी.  खोडसाळ व दुष्ट घोडा फटके मारून साळसूद होणार नाहीं.  वठणीवर येणार नाहीं.

   

वयाची वीस वर्षे होईपर्यंत अशा प्रकारचें शारीरिक व मानसिक शिक्षण या आदर्श राज्यव्यवस्थेंत मुलांना दिलें जाईल.  मुलें वीस वर्षांचीं झालीं म्हणजे एकदां चाळण मारायची, निवड करायची.  पुढें आणखी शिकायला जीं असमर्थ असतील त्यांना शूद्र वर्गांत घालावयाचें, त्यांनीं शारीरिक श्रम उचलायचे, तसेंच वैश्यकर्महि उचलायचें.  शेतकरी, कामकरी व वैश्य हे सारे या वर्गांत.  आदर्श राज्यव्यवस्थेंमधील हे हीन धातू.  यांना काढून टाकल्यावर जे राहतील त्यांचें शिक्षण पुढें चालू करायचें.

पुढें आणखी दहा वर्षे म्हणजे मुलें तीस वर्षांचीं होईपर्यंत त्यांना विज्ञानविद्या शिकवायची.  अंकगणित, भूमिति, ज्योतिर्विद्या, हें विषय शिकवायचे.  हे विषय व्यवहारोपयोगी म्हणून नाहीं शिकवायचे, तर सौंदार्यदृष्टि यावी, प्रमाणबध्दता यावी, म्हणून शिकवायचे.  अंकगणिताचा उपयोग केवळ बाजारांत-देवघेवीसाठीं करणें हें कमीपणाचें आहे, असे प्लेटोच्या आदर्श राज्यामधील प्रतिष्ठित सज्जन मानीत.  गणिताचा उपयोग हिशोबासाठीं किंवा इमारती बांधण्यासाठीं, पूल बांधण्यासाठीं किंवा यंत्रें करण्यासाठीं करणें हें आदर्श राज्यांतील सन्मान्य नागरिक कमी प्रतीचें मानीत.  प्लेटो या बाबतींत समकालीन ग्रीकांशीं सहमत होता.  ग्रीक लोकांना यांत्रिक संशोधनांत किंवा भौतिक सुधारणा करण्यांत गोडी वाटत नसे ; त्यांना ती आवड नव्हती.  तिकडे त्यांची प्रवृत्ति नसे.  मूर्त व प्रत्यक्ष इंद्रियगम्य ज्ञानापेक्षां अमूर्त व अप्रत्यक्ष इंद्रियातील ज्ञानाकडेच ते भरारी मारूं पाहत. अंकगणिताचा अभ्यास प्लेटोच्या मतें फक्त दोन गोष्टींसाठींच करणें बरें.  वस्तूंच्या दृश्य विविधतेंतून शाश्वत एकतेकडे जाण्यासाठीं तत्त्वज्ञान्याला गणिताचें साह्य होतें ; दुसरी गोष्ट म्हणजे लष्करी सेनापतीला त्यायोगें आपले शिपाई नीट रांगांत उभे करतां येतात, त्यांच्या चारचारांच्या रांगा करतां येतात, निरनिराळ्या छोट्यामोठ्या पलटणी करतां येतात, दहांच्या, शंभरांच्या, हजारांच्या अशा टोळ्या करतां येतात.  गणिताचा सखोल अभ्यास फक्त तत्त्वज्ञानी व सेनानी यांनींच करावा.

तीन वर्षांचे वय होईपर्यंत मुलांचा विज्ञानाचा अभ्यास पुरा होईल.  आणि मग पुन्हा चाळण मारायची, पुन्हां निवड.  अधिक उच्च शिक्षण घेण्यास जे असमर्थ ठरतील त्यांना बाजूस काढायचें, त्यांचा मध्यम वर्ग बनवायचा.  शिपायांचा, सैनिकांचा, लढवय्यांचा हा वर्ग.  आदर्श राज्याचे हे पालनकर्ते, रक्षणकर्ते.  प्लेटो जरी परम थोर विचारस्त्रष्टा होता तरी चिनी, हिंदू व ज्यू यांची थोर दृष्टि त्याच्याजवळ नव्हती.  शांतीचें ध्येय ग्रीक मनोबुध्दीच्या कक्षेच्या पलीकडचें होतें.  अति उत्कृष्ट असें ग्रीक मत, अति सुसंस्कृत व परमोन्नत असें ग्रीक मत सुध्दां शांतीचें ध्येय, शांतीचा आदर्श कल्पूं शकत नव्हतें.  प्लेटोच्या आदर्श राज्यांत सैनिकांना महत्त्वाचें कार्य आहे. 'सैनिकांशिवाय राष्ट्र' ही गोष्ट 'गुलामांशिवाय राष्ट्र' याप्रमाणेंच अशक्य वस्तु आहे असें प्लेटोला वाटे.  राज्य म्हटलें म्हणजे तेथें दास हवे तसे सैनिकहि हवे !  प्लेटोच्या भव्य-दिव्य प्रतिभेचें व अपूर्व बुध्दिमत्तेचें कौतुक वाटतें.  आपणांस त्याच्याबद्दल परम आदर वाटतो.  परंतु युध्दावरचा त्याचा विश्वास व गुलामगिरीला त्यानें दिलेली परवानगी या दोन गोष्टींचा कलंक त्याच्या प्रतिभाचंद्रिकेला लागलेला आहे.

आपण दोन वर्ग पाहिले.  शेतकरी, कामकरी व व्यापारी यांचा खालचा वर्ग व नंतर हा क्षत्रियांचा दुसरा मध्यम वर्ग.  विसाव्या वर्षी ज्यांची मनोबुध्दि कमी दर्जाची दिसेल त्यांचा खालचा वर्ग.  तिसाव्या वर्षी मनोबुध्दीचा अधिक विकास करून घ्यायला जे असमर्थ दिसतील त्यांचा मध्यम वर्ग.  या दोन चाळण्यांनंतर जे उरतील त्यांनीं तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावयाचा.  आतां हीं तीसवर्षांचीं वेंचक मुलें आहेत.  आदर्श राज्यकारभार चालवण्यास योग्य अशी ही मंडळी.  प्लेटोच्या आदर्श राज्यांत लैंगिक समानता आहे.  स्त्रीपुरुषांना विकासाची, गुणवर्धनाची, पूर्ण मोकळीक आहे, समानता आहे.  दोघांनाहि समान शिक्षण, समान संधि ; जीवनाचीं महत्त्वाचीं कामें अंगावर घेतांना स्त्रीपुरुषांना कोणतेंहि स्थान आपापल्या योग्यतेनुरूप देण्याची मुभा आहे.  पांच वर्षे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यावरहि अभ्यासक्रम पुरा झाला असें नाहीं.  चांगला राज्यकारभार चालवायला हीं मुलें अद्याप समर्थ नाहीं झालीं ; अजून कसोटी आहे.  विचाराच्या राज्यांतून प्रत्यक्ष कार्यक्षेत्रांत उतरून त्यांनीं आतां परीक्षा द्यावयाची.

 

आईबापांनीं आपले लैंगिक अनुभव त्या त्या ठरीव व्यक्तिपुरतेच मर्यादित ठेवावें असें नाहीं.  मुलें सरकारच्या स्वाधीन केल्यावर त्यांना स्वेच्छाविलास करण्याची इच्छा असेल तर त्यांनीं खुशाल तसें करावें.  परंतु त्यांनीं अशा संभोगांतून मुलें जन्माला येऊं देतां कामा नये.  त्यांनीं गर्भपात करण्याची दक्षता घ्यावी.  अशा रीतीनें अनिर्बंध प्रेमाची गोष्ट व्यक्तिच्या सारासारविवेकावर सोंपवून दिली आहे.  या बाबतींत स्त्रियांना व पुरुषांना सारखीच मोकळीक.  नागरिकांच्या खासगी जीवनांत सरकारनें लुडबूड करूं नये.  आतां आपण त्या मुलांकडे वळूं या.  जन्मतांच मुलांस सरकारी संगोपनगृहांत पाठवायचें.  या सर्व मुलांना तीं वीस वर्षांची होईपर्यंत एकत्र शिक्षण द्यावयाचें.  या प्राथमिक शिक्षणांत संगीत आणि शरीरसंवर्धक व्यायाम यांचा अन्तर्भाव व्हावा.  व्यायामानें शरीर प्रमाणबध्द व सुंदर असें होईल.  संगीतानें आत्म्याचें सुसंवादीपण वाढेल, मनाची प्रसन्नता वाढेल. ''ज्या माणसाच्या आत्म्यांस संगीत नाहीं, तो विश्वासार्य नाहीं.'' अशा माणसाचें मन खुरटलेलें असतें, पंगू व विकृत असतें ; अशाचे वासनाविकार असंयत असतात ; तेथें ताळ ना तंत्र ; संयम ना विवेक ; सदसतांबद्दलच्या अशा माणसाच्या कल्पना सदैव दुषित व विकृत असतात.  त्याची सद्‍सद्विवेक शक्तिच जणूं भ्रष्ट होते.  संगीत म्हणजे प्लेटोला परम ऐक्य वाटे,  परम सुसंवादिता वाटे.  संगीत ऐकूं येणारें असो वा ऐकूं न येणारें असो, तें बाह्य असो वा आंतरिक असो, ध्वनीचें असो वा आकाशांतील तार्‍यांचे असो, सर्व विश्वाच्या पाठीमागें संगीताचें परम तत्त्व आहे ; तें नसतें तर या जगाचे, या विश्वाचे, कधींच तुकडे झाले असते व जगांत साराच स्वैर गोंधळ माजला असता, सर्वत्र अव्यवस्थेचें साम्राज्य पसरलें असतें.  संगीत म्हणजे विश्वाचा प्राण, विश्वाचा आत्मा.  ग्रह व तारे म्हणजे विश्वाचें शरीर.  हें संगीत जर या विश्वशरीरांत नसेल, संगीताचा प्राण जर या पृथ्वींत नसेल, तर ही पृथ्वी म्हणजे नि:सार वाटेल.  मग पृथ्वी म्हणजे केवळ जळून गेलेला कोळसा, केवळ नि:सार राख ! स्वर्गांत व अंतरिक्षांत जर संगीत नसेल, या अनंत तार्‍यांत व ग्रहांत जर संगीत नसेल, तर हे तारे, हे सारे तेजोगोल, म्हणजे चिमूटभर राखच समजा.

म्हणून प्रत्येकाच्या शिक्षणांत संगीत हा महत्त्वाचा व अवश्यक भाग असला पाहिजे.  मुलगा व मुलगी वीस वर्षांचीं होण्यापूर्वी त्यांना संगीताचें सम्यक शिक्षण दिलें पाहिजे.  तसेंच व्यायामाचेंहि.  ज्या शाळांतून हें शिक्षण द्यावयाचें त्या शाळा मुलांमुलींसाठीं अलग नकोत.  एकत्रच शिक्षण असावें.  मुलांमुलींनीं एकत्र काम करावें, एकत्र खेळावें.  व्यायाम करतांना मुलगे व मुली यांनी कपडे काढले पाहिजेत.  प्लेटो म्हणतो, 'माझ्या आदर्श राज्यांतील स्त्रियांना सद्‍गुणांचीं भरपूर वस्त्रें असतील.'' खोटी लज्जा करायची काय ? मूर्खपणाचें लाजणें नको.  मानवी शरीर उघडें दिसलें म्हणून त्यांत लाजण्यासारखें किंवा अश्लील वाटण्यासारखें काय आहे ? तेथें असमंजसपणें हंसण्याची, थट्टामस्करी करण्याची, जरूरी नाहीं.

मुलांच्या शिक्षणांत घोकंपट्टी नको, कंटाळवाणेपणाहि नको ; केवळ पढीकपणा नको, कवेळ हमालीहि नको ; केवळ बैठेपणा व पुस्तकीपणा नको, केवळ शारीरिक श्रमहि नको.  शिक्षणाचा बोजा न वाटतां तें परम आनंदप्रद वाटलें पाहिजे.  शिक्षण म्हणजे आपला छळ असें मुलांमुलींना वाटतां कामा नये.  योग्य अशा गुरुजनांच्या देखरेखीखालीं सर्वसाधारण मुलाला मनाची व शरीराची योग्य वाढ करून घेतां येईल, तें भरपूर खेळत व भरपूर ज्ञानानंदहि मिळवीत.  शाळा म्हणजे मनोबुध्दींचा आखाडा, बौध्दिक क्रीडांगण.  तेथें विचारविनिमयाचा मनोहर खेळ खेळण्यांत मुलें सुंदर स्पर्धा करतील, ज्ञानांत व विचारांत एकमेकांच्या पुढें जाण्यासाठीं पराकाष्ठा करतील, स्वत:मधील उत्कृष्टत्व प्रकट करण्यासाठीं धडपडतील.

   

पुढे जाण्यासाठी .......