रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

सुंदर पत्रे

गदगला एक भीष्माच्या पादुकांचे स्थान आहे. तेथे एक तलाव आहे. परंतु पाणी नव्हते. भीष्म दक्षिणेत कधी आले  होते कोणास ठाऊक! परंतु प्रत्येक ठिकाणच्या लोकांना भारतातील सा-या पूज्य व्यक्ती केव्हा तरी आपल्याही प्रदेशात येऊन गेल्या होत्या, असे दाखवावेसे वाटते. येथे त्रिकुटेश्वर म्हणून प्रसिध्द जुने मंदिर आहे. आपल्याकडे जशी दगडावर दगड रचून केलेली हेमाडपंती देवळे आहेत तशीच ही. परंतु फार मोठी. जखणाचार्यांनी ही शिल्पपध्दती रूढ केली म्हणतात. मंदिर लांबरुंद खूप आहे, परंतु त्या मानाने उंची नाही. दगडांवर नक्षी आहे. रामायणातील वगैरे दृश्य आहेत. संसारातील व निसर्गातील नाना दृश्ये खोदली आहेत. मृदंग वाजत आहे, नृत्य चालत आहे,- अशी दृश्ये आहेत. मोर, माकडे, खोदली आहेत. त्रिकुटेश्वराच्या भोवतालचे आवार खूप मोठे आहे. परंतु येथे रमणीय असे वाटत नाही, सारे शून्य वाटते. वीर नारायणाचे मंदिर उंच आहे. हे दाक्षिणात्य मंदिरांच्या धर्तीचे. दोन गोपुरे आहेत. मंदिरावर ठायी ठायी अपार नक्षी. शेकडो छोटी गोपुरे दगडातून दाखविली आहेत.

या वीर नारायणाच्या मंदिरातील एका खांबाजवळ बसून कुमार व्यास नावाच्या कन्नड कवीने आपले कन्नड भारत रचिले. ज्या खांबावर ज्ञानेश्वर कोळशाने ओव्या लिहीत, तो जसा नगर जिल्ह्यात दाखविला जातो, तसा हा कुमार व्यासाचा खांब. या कवीने स्वत:ला कुमार व्यास ही पदवी घेतली होती.

एका लेखकाने म्हटले आहे, ''कुमार व्यास महाभारत लिहू लागले की कलियुगाचे द्वापार युग होते.'' हे महाभारत फार सुंदर आहे म्हणतात.

गदग शहराची व्युत्पत्ती या बाजूला गजग्यांची म्हणजे सागरगोट्यांची झाडे फार होती, त्यावरून गदग नाव पडले अशी लावतात. गजगा हा शब्द कन्नड भाषेतूनच मराठीत आला असेल! कोणी निराळीही उपपत्ती लावतात.

धारवाड, गदग, हुबळी इकडे अरविंदांचा संप्रदाय वाढत आहे. महाकवी बेंद्रे हे अरविंदपंथीच. हुबळी येथे अरविंदमंडळ आहे. कन्नड भाषेत अरविंद- वाङ्‌मय आणण्याची योजना  करीत आहेत. गदगचे डॉ. आनंदराव उमचिगी फार सज्जन गृहस्थ. त्यांच्या घरी लहान मुले मँटिसरी पध्दतीने शिकतात. आईच मुलांना शिकविते. आनंदराव अरविंदांचे अनुयायी. आनंदरावांचे आजोबा पुष्कळ वर्षांपूर्वी मोडीत 'सत्यवृत्त' नावाचे वृत्तपत्र चालवीत. शिळाप्रेसवर छापीत. आनंदरावांच्या घरी तसेच डॉक्टर चाफेकरांच्या घरी चांगलाच ग्रंथसंग्रह आढळला.

सहज बसल्यावर अनेक गोष्टी निघत. तू भूगोलात म्हैसूर संस्थानातील 'श्रवणबेलगोला' येथील गोमटेश्वराच्या प्रचंड पुतळ्याविषयी वाचले असशील. गोमटा म्हणजे सुंदर. कोकणी भाषेत हा शब्द नेहमी वापरतात. आपण फक्त 'गोरागोमटा' या शब्दप्रयोगात ठेवला आहे. गोमटेश्वर म्हणजे सुंदर ईश्वर. ५७ फूट उंच असा हा पाषाणमय पुतळा आहे. अंगावर साप, वेली वगैरे दाखविल्या आहेत. गोमटेश्वर म्हणजे जैन तीर्थकर, महान साधू. तो तपश्चर्या करीत आहे, व तप करता करता अंगावर वेली वाढल्या तरी तो तपस्पेतच तन्मय होता. हे सारे त्या पुतळ्याच्या अंगावरील वेली वगैरेंनी दर्शविले आहे. दर बारा वर्षांनी गोमटेश्वराला दुधाचा महाभिषेक होतो. पहिली घागर कोणी ओतायची? म्हैसूर सरकार चढाओढ लावते. ज्याचे जास्त पैसे त्याची पहिली घागर. मला वाटते ४० किंवा ४१ साली मागे जेव्हा हा द्वादश- वार्षिक अभिषेक झाला होता, तेव्हा इंदूरचे श्री हुकुमचन्द शेठ यांनी २ लक्ष रुपये देऊन पहिली घागर ओतली! दुस-या घागरीला असेच काही रुपये. असे नंबर लावतात. म्हैसूर सरकारला उत्पन्न होते. सरकार व्यवस्थाही सुंदर ठेवते.

 

चि. प्रिय सुधास,

सप्रेम आशीर्वाद.

मी इकडे सध्या हिंडत फिरत आहे. आणि तुझे पत्रही हिंडत हिंडत येऊन मला एके ठिकाणी मिळाले. त्यातील वार्ता वाचून वाईट वाटले. बाळतात्या देवाघरी गेले. ते थकले होते. सत्तराहून अधिक वर्षांचे. सारे जीवन श्रमाचे नि कष्टाचे. ते घरी शेती करायचे. सकाळी उठून शेणाची टोपली डोक्यावर घेऊन शेतावर जायचे. तेथे दोनचार तास काम करून दुपारी ११ वाजता घरी यायचे. मग आंघोळ, देवपूजा व देवळास जाऊन येणे. जेवल्यावर जरा पडायचे व मग जानव्यांसाठी सूत काढायचे. पुन्हा चार वाजले की चालले शेतावर. बांध घालतील, कवळ तोडतील, वाडा शिवतील, लावणी करतील, भात झोडतील, दो-या वळतील. त्यांना शेतीचे अमुक एक काम येत नसे असे नाही. तुझे आजोबा व बाळतात्या यांचे एकमेकांवर फार प्रेम. बाळतात्या वयाने लहान. बाळतात्या चिलीम भरायचे व भाऊ ओढायचे. थंडीच्या दिवसांत, पावसात दोघे चिलीम ओढून कामाला जात. बाळतात्यांना पानाचाही षोक होता. त्यांच्याकडे पानवेल होती. झाडाला एक कळक लावलेला. कळकावरून चढायचे. पाने काढायची. कळकाला प्रत्येक पेराजवळ पाय ठेवायला पुढे आलेली शिरी असते.

बाळतात्या नेहमी आनंद नि प्रसन्न. गावात सर्वांजवळ त्यांची मैत्री. तुझ्या वडिलांनी  त्यांच्याबरोबर एकदा नाटकात काम केले होते, व दादा झाले होते गणपती! सोंड हालवणारे दादा अजून माझ्या डोळयांसमोर आहेत.

त्यांचा नेहमीचा पोषाख म्हणजे पंचा व खांद्यावर एक फडका. क्वचित उपरणे असे. शेतावर उघडे जायचे. थंडीच्या दिवसांत कोपरी घालायचे. उत्सव समारंभाच्या वेळेस धोतर नेसत. त्यांचा एक पांढरा बंदाचा आंगरखा होता. डोक्यावर मोठे पागोटे. कथाकीर्तनाच्या वेळेस ते बुक्का लावायचे. कोणत्याही कामात ते हजर असायचे. त्यांना अभिमान नव्हता. कोणी टिंगल केली तर स्वत:ही हसून त्यात भाग घेत.

त्यांची एकच बहीण होती. बयोआते आम्ही म्हणत असू. त्यांनी बहिणीला अडचणीच्या काळात स्वत:च्या पडवीत जागा दिली होती. बहिणीच्या मुलांना स्वत: गरीब असून आधार देत.

सुधा, या जुन्या माणसांच्या जीवनांत एक प्रकारचा अखंड कर्मयोग असे. देह थकला म्हणजे पडायचा. देहाने पुरेपूर सेवा जणू ते करीत. मी कधी सुट्टीत गावी गेलो म्हणजे बाळतात्या किती प्रेमाने हाक मारायचे. त्यांनी पाठीवरून हात फिरविला तरी कृतार्थ वाटे. प्रणाम त्यांच्या स्मृतीला.

जुन्या पिढीपैकी आता रामकृष्णकाका आहेत. त्यांना एकदा भेटून यावे असे मनात येत. त्यांना नातू झाला आहे. काका- काकू नातवाला खेळवीत असतील. ते एक परम समाधान असते.

सुधाताई, मी इकडे कर्नाटकात हिंडत आहे. कर्नाटकाचे थोडेफार दर्शन घेत आहे. परवा गदगला गेलो होतो. डॉ. अण्णासाहेब चाफेकरांकडे उतरलो होतो. त्यांच्या घरचे वातावरण प्रेमळ व मोकळे. सायंकाळी सारी मुले देवासमोर जमतात. आरत्या, श्लोक वगैर म्हणतात. मी मुलांना गोष्टी सांगितल्या. डॉक्टरांचा लहान मुलगा विनय हळूच माझ्याकडे यायचा. मी विचारायचा 'विनय काय हवंय?' मग म्हणे, 'गोष्ट सांगता!' मोठा लाघवी गोड मुलगा. आणि त्याची बहीण माहेरी आली होती. तिची मुले आईला 'छबा' म्हणतात. मोठी माणसे हाक मारतात तीच लहान मुलेही मग मारू लागतात. छबाची मुलगी किती मोठी गोड! तिची माझी गट्टी जमली. मी तिला म्हणे, 'टोपी घालतेस माझी?' तर म्हणायची 'मी का पुरुष आहे? माझ्या वेण्या बघा.' एवढीशी चिमुरडी पण किती बोले, नि किती गोड बोलणे!

 

निंदा, उपहास, टीका सहन करून ६३ वर्षांच्या श्री. भागीरथीबाई ही संस्था चालवीत आहेत. त्यांचा दत्तक मुलगाही सेवा करतो. संस्थेने अनाथ मुलींची पुन्हा लग्ने लावून दिली. भागीरथीबाई एका लहान खोलीत राहतात. त्या म्हणाल्या, ''देवाचं बोलावणं येईपर्यंत इथं मी असेन.'' त्या एकदाच जेवतात. प्रणाम त्यांच्या ध्येयोत्कट निस्सीम जीवनाला! सेवापरायणतेला! त्यांची मातृभाषा कन्नड; परंतु मराठीही बोलतात; इंग्रजीतूनही परवा कोणाचे त्यांनी आभार मानले. साधे पांढरे पातळ नेसलेली ती सोवळी सेवापरायण अनाथ मुलींची प्रेमस्नेहमयी माता! सुधा, समाजाचे हे आधार! मी तेथे म्हटले, ''धारवाडात परमेश्वर कुठं असला तर तो इथं आहे. आईला उपेक्षितांची चिंता असते. परमेश्वर अशांजवळ असतो. जग ज्याला दूर लोटतं तो देवाच्या दारात पोचतो. अशा देवानं जवळ घेतलेल्यांची येथे सेवा होत आहे.''

मी इकडे आहे. परंतु काल मुंबईस आमच्या खोलीत जमशेदपूरहून श्री आला असेल. जयप्रकाशांनी त्याला तिकडे तीन महिन्यांसाठी नेले आणि दोन वर्षे तो तिकडे राहिला. तिकडे कामगारांत तो सुंदर काम करतो. तिकडे संप झाले. श्रीवर खुनाचेही आरोप. त्यांच्यावर खटले चालू आहेत. अशोक मेहतांनी लिहिले, 'काडीलाही न दुखवणारा बगाराम, तो का खून करील?' जेलमध्ये चेंडू-लगो-यांचा खेळ असायचा. बग्याचा खेळ मुरारजीभाई बघत राहायचे. बगारामला त्याच्या बहिणी श्री म्हणतात. त्याचे नाव श्रीनिवास. परंतु कोणी बगाराम म्हणतात. जयप्रकाश म्हणाले, ''आमच्याकडे 'व्याघ्रराम' नाव असते.'' मी म्हटले, ''वचा ब होतो. व्याघ्राचं वाघ, वाघ, असं होता होता बगाराम झालं असेल.''

सुधा, श्री खेळण्यात, पोहण्यात पटाईत. मागे औदुंबरला कृष्णेच्या डोहात उडी घेतली. पोहत पलीकडे गेला. बाहेर आला तो सुसरी दिसल्या. कृष्णेच्या डोहात मगरी आहेत, सुसरी आहेत, त्याला माहीत नव्हते! देवाने वाचवले. श्रीला काही येत नाही असे नाही. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या परीक्षेत तो पहिला आला होता. सायन्स, गणित त्याला येतेच. तो इंग्रजीही छान लिहितो. तुरुंगात मार्क्सच सारे 'कॅपिटल' त्याने वाचले. विरोधविकासावरचे अनेक ग्रंथ वाचले. मी त्याला म्हणायचा, ''तुला सारं येतं. मला काही येत नाही.'' सुधा, खरेच कधी कधी वाटते, आपल्याजवळ काय आहे? परंतु मी मनाचे समाधान करतो. तुझ्याजवळ थोडे उदार हृदय आहे. ते का तुच्छ? जोवर आपल्या जगण्याने एखाद्या तरी माणसाच्या जीवनात आनंद निर्मिता येत असेल तोवर आपल्या जीवनात अर्थ आहे असे समजावे.

श्री तिकडे दोन वर्षांनी आला असेल. खोलीतील मित्र आनंदले असतील. मुंबईचे बापूराव, सोहनी, बबन, काळे, केळुस्कर, राजा वगैरे म्हणतील, ''बगाराम आता जाऊ नकोस. आम्ही जयप्रकाशांना सांगू.'' परंतु जयप्रकाश का त्याला आता सोडतील? सारा देश आपला. जेथे काम असेल, अडचण असेल तेथे गेले पाहिजे.

मी बगाराम आला असता दूर आहे तोच बरा. सुधा, मित्रांना सर्वस्व द्यावे असे मला वाटते, परंतु आज मजजवळ काय आहे? आणि त्यांच्या कार्यातही मी मदत करू शकत नाही. माझा पिंड राजकीय नाही. मला संघटना करता येत नाही. चर्चा करता येत नाही. मित्र माझ्यापासून या अपेक्षा करतात. मला त्या पु-या करता येत नाहीत. आपणाला मित्रांच्या अपेक्षा पु-या करता येऊ नयेत यासारखे दु:ख नाही. म्हणून सर्वांपासून दूर जावे असे मला कधी वाटते. मला शेकडो प्रेमळ सखे असूनही मनात एकटे वाटते व माझे डोळे भरून येतात. हे लिहितानाही अश्रू येत आहेत बघ! किती वेळ मी तुला लिहीत आहे. बाहेर वारा सूं सूं करीत आहे. झिमझिम पाऊस आहे. मलाही थोडे गारगार वाटत आहे. पांघरूण घेऊन पडू का? किती वाजले असतील? पहाट झाली असावी. परंतु कोंबडा आरवलेला ऐकला नाही! कोंबडयाचे घडयाळ हजारो वर्षांचे आहे. पाणिनीनेही या घडयाळाचा उल्लेख केला आहे.

तुम्ही सुखी असा. सुट्टी थोडी राहिली. खेळून घ्या. सुट्टीच्या महिन्या- दीड महिन्यात भरपूर आनंद जीवनात  साठवून घ्यावा; जो पुढच्या सुटीपर्यंत पुरेल. खरे ना? अप्पा, ताई, बरी आहेत? ताईचे दिवस भरत आले आहेत. सुखरूप पार पडो. जपा हं सारी. अरुणाला गोड पापा की धम्मक लाडू? तिला हवे असेल ते द्या. तुझ्या मैत्रिणींस स. आ.

अण्णा

साधना, ३ जून १९५०.

   

एके ठिकाणी फणसाचे गरे खाल्ले. आंबे तर सारखे खात होतो. धारवाडचे पायरीचे आंबे फार मधुर. आणि एके ठिकाणी मला बाळयाकाकांची आठवण आली. मी दापोलीस शिकायला होतो. ३५ वर्षे त्या गोष्टीला झाली. मे महिन्याची सुट्टी संपून आम्ही पुन्हा शाळेला आलेले असू. जवळच्या जालगावी बाळयाकाका राहात. मी आतेकडे असे. बाळयाकाकांचा व आतेकडच्यांचा फार घरोबा. ते नेहमी यायचे. गोड हसणे व गोड बोलणे. अति साधे. तो एक सदरा, अंगावर उपरणे, डोक्याला लालसर जुना रुमाल. आम्हां मुलांना म्हणायचे, ''अरे, आंबे-फणसे खायला या.'' आणि आम्ही रविवारी जात असू. त्या बाजूला रस्त्याला जंगल, वाघ येईल की काय भीती वाटायची. रात्रीच्या वेळेत अंधार असला तर वाघाला भीती वाटावी म्हणून लोक पेटवलेली चूड हातात घेऊन म्हणे जायचे. परंतु आतेचे यजमान आम्हांला म्हणायचे, ''कधी कधी वाघ हातांतल्या चुडीवर झडप घालून ती विझवतो.'' अशा गोष्टी ऐकलेल्या. आम्ही झपाझप जायचे आणि बाळयाकाकांच्या अंगणात किंवा माजघरात आंबे- फणस ओ येसतो खायचे. ते दिवस मला आठवतात. बाळयाकाकांचे, त्यांच्या घरचे ते प्रेमळ, उदार वातावरण आठवते. दोन तीन महिन्यांपूर्वी बाळयाकाका जवळ जवळ ८० वर्षांचे होऊन देवाघरी गेले. सुधा, त्यांचे थोर जीवन होते! लहानपणी ते मुंबईस होते. हॉटेलातही त्यांनी काम केले होते. पुढे त्यांना ३ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. ते संस्कृत शिकले. ते शास्त्री झाले. दापोली तालुक्यात त्यांच्यासारखा शास्त्री नव्हता. ते शेती करायचे. आपल्या मुलांनी कधीही सरकारची नोकरी करू नये असे त्यांना वाटे. आणि खरेच, पित्याची इच्छा मुलांनी पाळली. त्यांनी आपली मुले सरकारी शाळेत घातली नाहीत. लो. टिळकांच्या स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या चळवळी सुरू झालेल्या. बाळयाकाकांच्या संसारात या गोष्टी होत्या. त्यांनी परदेशी वस्तू शक्यतो टाळली. मुलांना स्वावलंबी शिक्षण दिले, राष्ट्रीय शाळेत शिकविले. अग, फैजपूरला खेडयात काँग्रेस भरली. त्या वेळेस ते मुद्दाम आले होते. मी तेथे स्वयंसेवक होतो. मला ते मुद्दाम भेटले. मी त्यांच्या पाया पडलो. माझ्या डोळयांत पाणी आले. त्यांनी मला कोकणातून पोहे आणले होते. पोह्यांची ती पुरचुंडी मी हृदयाशी धरली. माझ्या गरीब कोकणातील श्रीमंत हृदयाची ती अमृतमय भेट होती. ते अलीकडे थकले होते. आणि मरणही किती धन्यतेचे! अंथरुणावर पडून वेद म्हणत होते. एक गंमत झाली. म्हणाले, ''मी गायीचा भक्त, परंतु आपल्याकडे सध्या एकही गाय नाही. गोठयात पूर्वी किती असायच्या.'' तर काय आश्चर्य! त्यांनीच एका शेतक-याला एक गाय दिली होती. ती गाय अकस्मात आली. अंगणातून ओटीवर आली व ओटीवरून माजघरात येऊन बाळयाकाकांच्या अंथरुणावर उभी राहिली. त्यांच्या प्रेमाने गोमाता धावून आली. वत्सासाठी तिला पान्हा फुटला! असे हो बाळयाकाका! आणि  मरताना म्हणाला, ''मी मेल्यावर पिंडदाने वगैरे करू नका. आत्मा मुक्त होणार, देह सुटणार, तेथे कावळे कसले पिंडांना शिववता? मुक्त होणा-या आत्म्याला का पिंडाची इच्छा असते? आणि भटजीला गायबीय देऊ नका. गायीची कोणी काळजी घेत नाहीत काही नाही. सारे गायींना मारणारे. '' बाळयाकाका हे जुन्या पिढीतले शास्त्री. कोकणातील खेडयाचे राहणारे. परंतु आगरकरांसारखे हे विचार! 'कसली श्राध्दे नि पिंडदाने' असे म्हणणारे! मला ते सारे ऐकून बाळयाकाकांच्या जीवनाची अधिकच भव्यता वाटली! निर्भय, नि:स्पृह, स्वावलंबी, स्वाभिमानी, प्रेमळ, उदार, व्रती जीवन! अशी जीवने समाजाला आधार असतात. समाजाला आतून ओलावा देत असतात. बाळयाकाकांची मंदमधुर हसणारी मूर्ती माझ्या डोळयांसमोर आहे. मी त्यांना कधी विसरणार नाही. मी त्यांना, तुला हे लिहिताना, क्षणभर थांबून हात जोडले. प्रणाम! बाळयाकाका, तुम्हांला प्रणाम! फणसाप्रमाणे, आंब्याप्रमाणे तुम्ही रसाळ नि गोड!
धारवाडला 'वनिता-सेवा समाज' म्हणून एक संस्था आहे. १९२८ साली एका गतधवा सोवळया स्त्रीने स्वत:ची सारी इस्टेट देऊन ही संस्था सुरू केली. भागीरथीबाई त्यांचे नाव. दहाव्या वर्षी त्यांना वैधव्य आले. जीवनाचे काय करायचे? स्त्रियांच्या सेवेला वाहून घ्यायचे मनात येई. स्वत:ची इस्टेट देता येईल का? वकील म्हणाले, 'नाही देता येणार!' तेव्हा एकाला दत्तक घेऊन त्याच्याकडून ही इस्टेट या संस्थेला बक्षीस म्हणून देवविली. हे दत्तक पुत्र वैद्य आहेत, निसर्गोपचाराचे भक्त! अनाथ स्त्रियांना आधार देणारी संस्था. मुलीचे जरा पाऊल चुकले तर सारा समाज कावकाव करतो. स्त्रियाच का केवळ अपराधी! पुरुष नाहीत? परंतु ते तर सुटतात. फळ मुलीला भोगावे लागते. कोण आधार देणार? आजही अपहृत स्त्रियांना हिंदू समाज परत घ्यायला तयार नसतो. गांधीजींनी किती तळमळीने लिहिले. आपण अनुदार आहोत. अशा अभागी भगिनींना आधार घ्यायला ही भगिनी उभी राहिली. अनेकांनी टीका केल्या. येथे आलेल्या मुलींचे पुन्हाही काही चुकले तरी त्यांना क्षमा करून घेतले जाते. आई का मुलाचा एकच अपरा क्षमा करते? वनिता सेवा समाज आईसारखा आहे. त्याचे दार नेहमी मोकळे राहील. येथे जवळ जवळ ४० मुली आज आहेत. सातवीपर्यंत शिक्षण मिळते. शिवण, हातमाग, भरणे, विणणे, नाना उद्योग शिकविले जातात. तेथे प्रसूतिसदन आहे. मुलींना नर्सिंगचे शिक्षण मिळते. काही मुली सूतिकेचे काम करू शकतात. सोप्या औषधांची त्यांना माहिती दिली जाते. लाठी वगैरे शारीरिक शिक्षण, संगीत याचेही शिक्षण आहे. सारे स्वावलंबन आहे. स्वत: दळतात, स्वयंपाक करतात, भांडी घासतात, झाडलोट करतात, फुले, फळभाज्या करतात. इमारती बांधताना स्वत: मातीच्या, विटांच्या टोपल्या मुली देत. भागीरथी बाई सांगत होत्या व मी उचंबळत होतो. मुलींनी सुंदर लाठी केली, सुंदर गीते म्हटली. तेथे एक लहान परित्यक्त मुलगी सांभाळण्यास आली आहे. दोन वर्षांची असेल. ती 'जयहिंद' म्हणाली. केवढी थोर सेवा येथे चालली आहे! भागीरथीबाई रोज भिक्षा मागून आणतात. महिन्याचा दोन हजार खर्च आहे. संस्थेच्या शाळेत नि उद्योग-वर्गात गावातीलही दोनशे मुली येतात. शिक्षक आहेत. त्यांना पगार द्यावा लागतो. सरकारची या सुंदर संस्थेला मदत नाही असे कळले. पंढरपूरच्या थोर संस्थेसही सरकारी मदत नाही म्हणतात. कायद्यात म्हणे बसत नाही! आग लावा  त्या कायद्यांना. वाटेल ते वटहुकूम काढणाऱ्या सरकारला अनाथांना आधार देणा-या संस्थांना मदत देता येऊ नये?

श्री. भागीरथीबाई म्हणाल्या, ''येथील म्युनिसिपालटी ५ एकर जागा देणार होती. परंतु आता मिळेल का नाही कोण जाणे. त्या जागेचे प्लॉट पाडून म्हणे विकणार आहेत. आम्हांला का सत्याग्रह करावा लागेल?''अशा संस्थेला जागा मिळू नये? येथील कलेक्टरचा बंगला व कचेरी यासाठी म्हणे दोन अडीचशे एकर जागा आहे! आणि येथे पाच एकर मिळू नये? मिळेल, मिळेल. धारवाडचे नगरपिते का उदार नसतील?

 

कन्नड साहित्य समृध्द आहे. सुंदर आहे. हिंदुस्थानात पहिल्याने लघुकथा कुठे सुरू झाल्या असतील तर कन्नड भाषेत. जुन्या कन्नड साहित्यात थोर थोर कवी आहेतच. परंतु आजचे कन्नड कवीही थोर आहेत. माझे मित्र मला अनेक कवींचा इतिहास सांगते झाले. अनेकांच्या गंमतीही. कन्नड भाषेत श्री. बेन्द्रे म्हणून महाकवी आहेत. सोलापूरला ते प्राध्यापक आहेत. त्यांच्या कविता उत्तम आहेत. प्रतिभा आणि शब्द दोहोंची अपार समृध्दी त्यांच्या काव्यात आहे. ते अरविंदांचे भक्त. १९२९-३० साली त्यांनी देशभक्तीपर एक अमर कविता लिहिली. सरकारने त्यांना एका गावी स्थानबध्द केले. ते शाळेत शिक्षक होते. त्यांची नोकरी गेली. घरी अडचण. चुलते मदत करीत. पुढे चुलतेही वारले. बेळगावला कन्नड साहित्य संमेलन एकदा भरले होते. त्यांनी आपली ''हक्किहारुतिदे- पक्षी उडत आहे.'' ही भव्य कविता म्हटली. काळ हाच कोणी पक्षी, अशी कल्पना करून केलेली ही कविता आहे. म्हैसूरकडून आलेले एक थोर साहित्यिक ती कविता ऐकून वेडे झाले. ते मोठे सरकारी अधिकारी होते. ते श्री. बेन्द्रे यांना म्हणाले, ''मला तुमचा भाऊ माना. तुमची आर्थिक अडचण आहे. मी मदत पाठवीन ती प्रेमाने घ्या. मनात काही आणू नका.'' आणि हे मित्र मदत पाठवीत. आता बेंद्रे सोलापूर कॉलेजात कन्नडचे प्राध्यापक आहेत. त्यांची वृत्ती अति समाधानी! त्यांची शान्ती कधी ढळत नाही, ते एकदा कोणत्या तरी गावी होते. तेथे चिंचेचे एक मोठे झाड होते. त्याला ना फूल ना पान. जवळजवळ वर्षभर त्या झाडाला पान फुटत नाही. बेन्द्रे तेथून धारवाडला आले, परंतु काही महिन्यांनी त्या चिंचेच्या झाडाचे काय झाले म्हणून ते पाहायला पायी गेले तो ते झाड पानाफुलांनी नटले होते. बेन्द्रे उचंबळले. त्यांनी 'बहरलेला चिंचवृक्ष' या अर्थाची सुंदर कन्नड कविती लिहिली. सुधामाई, अशा कथा ऐकताना मी रंगत होतो. आणि कवी व्ही. सीतारामय्या यांची एक ''अभी: अभी:'' म्हणून उत्कृष्ट कविता आहे ती ऐकली. जगातील यज्ञ नि बर्लिदाने यांतून तोच ध्वनी येत आहे. सॉक्रेटिसाला दिलेला विषाचा पेला, ख्रिस्ताचा क्रॉस, ब्रूनोला जाळणे, या सर्वांतून ''भिऊ नका भिऊ नका'' असा घोष येत आहे. हुकूमशहांच्या छळातून, जुलमातून ''अभी: अभी:'' असा अमर आवाज येत आहे. भव्य कविता! शब्दही अर्थपूर्ण व जोरदार असे आहेत. मी ती कविता ऐकत होतो व रोमांचित होत होतो. आणि जगाची प्रगती निर्भयपणेच झाली आहे. गीतेच्या सोळाव्या अध्यायात ''अभय'' हा पहिला सद्‍गूण म्हणून सांगितला आहे. महात्माजींनी सर्वात मोठी देणगी कोणती दिली असेल तर अभयतेची. त्यांनी सर्व राष्ट्राला निर्भय केले. 'नि:शस्त्र असू तरी अन्यायासमोर मान वाकवणार नाही', 'मरू पण चलेजाव म्हणू' असे म्हणायला नि तद्‍नुरूप  वागायला राष्ट्राला त्यांनी शिकविले. जे राष्ट्र निर्भय आहे, ते मुक्त आहे. ते सर्व क्षेत्रांत जाईल, प्रयोग करील, पुढे जाईल. सा-या इतिहासाची ही शिकवण आहे. भित्र्याला मरण आहे. निर्भळ असेल तोच खरा जिवंत.
धारवाडची हवा किती सुंदर! उन्हाळयातही काहींना ब्लँकेट पांघरावे लागते! थंडगार सुंदर हवा! एक सद्‍गृहस्थ म्हणाले, ''सा-या हिंदुस्थानात अशी हवा नाही.'' परंतु येथे पाण्याचे हाल. एक दिवसाआड नळाचे  पाणी. उन्हाळयात थोडे येते. काही वर्षांपूर्वी येथील म्युनिसिपालिटीच्या भव्य उद्‍घाटनासाठी म्हैसूरकडचे एक थोर गृहस्थ आले होते. ते म्हणतात, खासगी म्हणाले, ''एवढी इमारत बांधण्याऐवजी पाण्याची व्यवस्ता करते तर? लहानशा इमारतीतही म्यु. कामकाज चालले असते!'' धारवाड शहर दूरवर पसरले आहे. चार मैल लांब, चार मैल रुंद असा घेर आहे! म्युनिसिपालटीचे उत्पन्न थोडे, परंतु शहराचा पसारा मोठा. जवळ जवळ ३२ मैलांचे रस्ते सांभाळावे लागतात. दोहोंकडची गटारे हवीत! तरीही स्वच्छता  बरी वाटली. रस्ते सुरेख आहेत. येथे पाण्याची व्यवस्था झाली तर हे  शहर झपाटयाने वाढेल . वाढायला ऐसपैसे जागा भरपूर आहे. शिक्षणाच्या सोयी आहेत. शेतकी कॉलेज, फॉरेस्ट कॉलेज अशी कॉलेजे झाले आहेत. येथे कोकणातील, देशावरची दोन्ही पिके होतात. शेतकी कॉलेजला आदर्श जागा! पाण्याच्या व्यवस्थेच्या योजना आहेत, परंतु प्रत्यक्षात येतील तेव्हा ख-या!

   

पुढे जाण्यासाठी .......