सोमवार, सप्टेंबर 28, 2020
   
Text Size

क्रांती

२९. भविष्यवाणी

माहेराहून माया मनोहर बालक घेऊन परत आली होती. प्रद्योतचे लग्न लावून आली होती. गीतेचा व दयारामचा विवाह झाला होता. आश्रमाला मीनाच्या वडिलांची मदत आली होती. क्रांती सर्वांची होती. एकाच पाळण्यात कधी क्रांती व कधी क्रांतिकुमार यांना झोपवण्यात येई.

मोहनने मरता-मरता केलेला पाळणा गीता म्हणे आणि माया, तीही एक पाळणा म्हणे. मुकुंदरावांनी तो पाळणा मायेला कधीच करून दिला होता. तो पाळणा बंगालमध्ये बाळ पाळण्यात घालताना म्हणण्यात आला होता. माया गोड आवाजात पाळणा म्हणे. गीता एके दिवशी म्हणाली, ''मला उतरून घेऊ दे तुमचा पाळणा. माया म्हणू लागली व गीता उतरून घेऊ लागली.

बाळा जो जो रे । बाळ जो जो रे ।
सुख-कंदा, अभिनवपरमानन्दा, बाळा जो जो रे ॥ धृ.॥

तू भगवंताचे, सानुले रूप परम चांगले,
आलासी भुवनी, सुंदरा,मनोहरा, सुकुमारा ॥बाळा.॥

तू शुभ मंगल, उज्ज्वल, महाराष्ट्र बंगाल -
ऐक्याची मूर्ति, निर्मळ, तेजाळ, स्नेहाळ ॥ बाळा.॥

भेदाभेद किती भारती, नष्ट करायासाठी
आली तव मूर्ती, मोहना-अतुल-मधुर लावण्या ॥ बाळा.॥

रोमी-रोमी तुझ्या, सुस्वर-वरदा, भागिरथी नी गोदा
मातांचे प्रेम, अनुपम, विपुल, विमल, उत्तम ॥बाळा.॥

बाळा मोहना, भूषणा, निजकुलनवमंडना
भूषण संसारा, तू होई होई, भारत विभवी नेई ॥बाळा.॥

तू आमची आस, उल्हास, सुखद बंधुवृंदास
झिजुन अहोरात्र, हो पात्र, होई पवित्र-चरित्र ॥ बाळा.॥

सद्गुण लेणी तू, लवोनी, शीलावर पांघरुनी
प्रेमाची वंशी, वाजवी, भारतभू हर्षवी ॥ बाळा.॥

होई वीर गडया, मार उडया, करि क्रांतीचा झेंडा
बळकट दृष्ट धरुनी, क्रांती करी, भारतभू उध्दरी ॥ बाळा.॥

हो दीर्घायुषी, होई ऋषी व सत्कीर्ती वधूसी
हेचि मागतसे प्रभूपाशी, देवो करुणा-राशी ॥ बाळा.॥

''गोड आहे नाही पाळणा?'' मायेने विचारले.

''परंतु मोहनचा अधिक परिणाम करतो.'' गीता म्हणाली.

 

मी हिंदुस्थानभर भटकल्ये. किती संकटातून गेले. विश्वभारतीत तुमचा पत्ता लागला. तेथे तुमचा मोठा फोटो पाहिला. किती आनंद झाला तेव्हा. 'भेटले-भेटले' असं मी नाचत म्हटलं. तेथील मंडळींनी मला वेड लागलं आहे असं ठरवलं. मी वेडीच होते. प्रेमवेडी होते. प्रेमवेडी, मुकुंदाची वेडी. '' मीना म्हणाली.

''ते दहा हजार रुपये आणलेस तेव्हा वडील काय म्हणाले? त्यांच्याकडूनच आणलेस, मी समजलो.'' मुकुंदराव म्हणाले.

''मी तुमची वेडी व वडील माझ्यासाठी वेडे. ते रोज गावाबाहेर टेकडीवर जात अन् माझी वाट बघत. 'एक दिवस मिनी येईल' असं म्हणत आणि मला समोर पाहताच रडू लागले. 'आलीस? दया आली पित्याची,' असं म्हणू लागले. मला जायचं आहे लगेच. असं जेव्हा सांगितलं तेव्हा म्हणाले, 'जा; हे सारं तुझं आहे. घेऊन जा.' 'मला दहा हजार रुपये आता द्या' मी म्हटलं. त्यांनी पुडकी आणून दिली. मी निघताना ते म्हणाले, ''मिने, मी आता वाचणार नाही. तू गेलीस म्हणजे तुझ्यासाठी थांबलेले प्राण उडून जातील. ही सारी इस्टेट कोणाला देऊ, सांग.' मी सांगितलं, 'सोनखेडीच्या दयारामच्या आश्रमाच्या नावे करा.' ते म्हणाले, 'बरं, तसं करून कागद पाठवीन.' परंतु त्या दिवशी पावसातून तुम्हाला आणलं. ओळखलं का मला?'' तिने विचारले.

''मला फक्त त्या कित्येक वर्षांपूर्वीच्या गोष्टींची आठवण झाली. मला घेऊन अशीच तू घोडा पळवीत होतीस. मी ओळखलं नाही. परंतु दारापाठीमागे लपून उभी राहिलीस तेव्हा ओळखलं व पळालो. भीतीनं का आनंदानं देवाला माहीत. मी आता डोळे मिटतो. तूही मीट.'' ते म्हणाले.

''मृत्यूला येऊन भेटू दे. आपण उघडेच ठेवू. ओठ बोलू देत. डोळे बघू देत. कान ऐकू देत. माझी खाट जरा जवळ ठेवायला सांगा. म्हणजे हातही हातात राहील. हातात हात घेऊन स्वर्ग चढू म्हणजे पडणार नाही. खरं ना? हसलेत. हसा जरा. मीनेकडे बघून  गोडसं हसा.'' ती म्हणाली.

इतक्यात रामदास आला.

''काय बातमी?'' दयारामने प्रश्न केला.

''पगारवाढ २० टक्के नाही, परंतु १७॥ टक्के मिळाली. तडजोड केली. मागील पगार पूर्वीचाच. उद्यापासून नवीन करार. या पाहा कामगारांच्या विजयगर्जना- 'क्रांती यशस्वी होवो' रामदास म्हणाला.

''मी आता सुखानं मरतो, सुखानं झोपतो.'' मुकुंदराव म्हणाले. मीना व मुकुंदराव दोघांना ग्लानी आली होती.

''हे पाहा माझे बाबा वर चालले. आपल्यापुढे त्या पाहा शांताबाई, ते मोहन. चला, चला.'' मीना जणू वातात बोलत होती.

बाहेर हजारो कामगारांचा समुद्र उचंबळला होता.

''माझी खाट जरा सरकवा ना तिकडे.'' मीना म्हणाली.

रामदासने मीनेची खाट मुकुंदरावांजवळ आणली. मीनेने मुकुंदरावांचा हात घेऊन हातात ठेवला. दोघांचे डोळे मिटले होते. इतक्यात गीता आली. चिमुकली क्रांती तिच्या हातांत होती. तिने ती लहानगी क्रांती मुकुंदराव व मीना यांच्याजवळ नेली.

''क्रांती चिरायू होवो !'' हजारो किसान-कामगार बाहेर गर्जले. मुकुंदराव व मीना यांनी डोळे उघडले. तो त्यांच्याजवळ कोण होते? ती छोटीशी बिटुकली धिटुकली क्रांती. दोघांनी आपले हात क्रांतीच्या अंगावरून फिरविले.

''क्रांती चिरायू होवो.'' दोघांनी क्षीण स्वरात म्हटले.

गीता क्रांतीला घेऊन उभी राहिली. रामदास, दयाराम, अहमद उभे राहिले. मीनेने मुकुंदरावांचा हात अधिकच एकदम बावळट धरला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले व कायमचे डोळे मिटले. चिर-मीलन झाले; चिर-जीवन आले.

 

''दयाराम, माझ्या खोलीत व तेथे कपाटात एका सुंदर रुमालात एक शाल गुंडाळलेली आहे ती घेऊन ये.'' मुकुंदराव हळूच म्हणाले.

दयाराम गेला. तेथे आता कोणी नव्हते. मीना पलंगावरून उठू बघत होती. तिला उठवत नव्हते. शक्ती नव्हती. परंतु सारी शक्ती ती एकत्र करू पाहात होती. खाटेचा आवाज कुरकुर होत होता. मुकुंदराव एकदम चमकले. ते एकदम कुशीवर वळले व ''मीना, उठू नको. पडशील. येथे कोणी नाही.'' ते म्हणाले. ''कोणी नाही? तुम्ही आहात ना? कोणी नाही म्हणूनच उठू दे. तुम्हाला मिठी मारून मरू दे, तुमच्या पायी कुडी पडू दे. मी येणार भेटायला. तुमची मिनी या नात्यानं तुम्हाला उठते भेटायला. ही पाहा उठले. आले.'' असे म्हणून बावरलेली मीना खरेच उठू लागली.

''मीना, माझं नाही ऐकावयाचं?'' मुकुंदरावांनी विचारले.

''तुमचं नाही ऐकावयाचं तर कोणाचं?'' ती म्हणाली.

''मग पडून राहा. उठू नको. तू का माझ्या जीवनात नाहीस? तू दिलेली शाल, दिलेली नाही तरी मी तुझी खूण म्हणून पळविलेली शाल, माझ्याजवळ आज इतकी वर्षं झाली तरी आहे. नीज, पडून राहा, थोडी कळ सोस. हे देहाचे पडदे गळून पडतील व आत्मे कायमचे भेटतील. देहांचा आंतरपाट धरून मृत्यू मंगलाष्टकं म्हणेल व अंतरपाट पटकन टाळी वाजवून दूर करून तुझ्या-माझ्या आत्म्याचं चिर लग्न लावील. मीना, पडून राहा.'' मुकुंदराव म्हणाले.

''परंतु माझ्याकडचे तोंड तिकडे नका पुन्हा वळवू. तुम्हाला माझ्याकडे नसेल बघायचं तर तुम्ही डोळे मिटून पडून राहा. मी तुम्हाला पाहत राहीन. तुम्हाला बघत बघत जीवनात साठवीत मीना डोळे मिटील. मीनेचं मीनत्व मरेल व मीना म्हणजे तुम्हीच व्हाल.'' ती म्हणाली.

दोघे शांत होती, दयाराम शाल घेऊन आला.

''दयाराम, ही शाल माझ्या अंगावर घाल. ही शाल माझं प्रेतवस्त्र होऊ दे.'' मुकुंदराव म्हणाले.

दयारामने ती शाल त्यांच्या अंगावर घातली.

''किती सुंदर दिसता तुम्ही !'' मीना म्हणाली.

''तो परमेश्वर किती सुंदर असेल.'' मुकुंदराव म्हणाले.

''माझे परमेश्वर तुम्ही. मीना लहान आहे. तिला लहान देव पुरे. साडेतीन हात देहातील देव पुरे. तुम्ही मोठे आहात. तुम्हाला विश्वंभर पाहिजे. तुम्हाला तो डोळे उघडे ठेवून दिसणार नाही. डोळे मिटून त्याला पाहावं लागेल. परंतु माझा देव मला उघडया डोळयांनी दिसतो. गोड-गोड देव.'' मीना म्हणाली.

''मुकुंदराव, मीनाबाई, तुम्ही बोलू नका, थकवा येईल.'' दयाराम म्हणाला.

''वेळ तर थोडा आहे. बोलून घेऊ दे. सार्‍या आयुष्यातील, शेवटच्या क्षणी बोलून घेऊ दे. आता थकवा नाही. उलट अपार उत्साह वाटतो आहे.''

''मिने, मी येथे आहे हे तुला कसं कळलं?'' मुकुंदरावांनी विचारले.

   

२८. चिर-मीलन

दवाखान्यातील एका प्रशांत दालनात दोन खाटा होत्या. एकीवर मुकुंदराव होते. दुसरीवर कोण आहे ते? हे आनंदमूर्ती नव्हते. कोण आहे ते? ''मरणाच्या दारी आपण आहो. आताही या गरीब मीनेकडे नाही का पाहणार? मरताना तरी आपलं लग्न लागू दे. जे जीवनानं झालं नाही ते मरणानं होऊ दे. मंगल मरण. रामदास, त्यांना माझ्याकडे तोंड करायला सांगा. त्यांना वळवत नसेल तर माझी खाट उचलून तिकडच्या बाजूला न्या. मी त्यांच्याकडे वळून बघेन.'' मीना डोळयात पाणी आणून म्हणाली.

रामदास तेथे रडत होता. काय करील बिचारा?

''तुम्ही वळता का त्या बाजूला? नका निष्ठुर होऊ. मरताना सर्वांनी मृदु व्हावं. मुकुंदराव, मी तुम्हाला सांगावं असं नाही. मीनाबाईंची इच्छा पूर्ण करा. मरताना तरी त्यांच्याकडे मीना म्हणून बघा. त्यांचा हात हातात घ्या. वळवू का कुशीवर?'' रामदासने विचारले.

''नको रामदास. आता सर्व लक्ष देवाकडे वळू दे. बाकीचे सारे विचार, सारे विकार गळू देत.'' मुकुंदराव म्हणाले.

रामदास, दयाराम, अहमद तेथे बसले होते; इतक्यात रामदासला भेटण्यासाठी कोणीतरी आले. म्हणून तो बाहेर गेला.

''रामदास'' मुकुंदरावांनी हाक मारली.

''तो बाहेर गेला आहे. कोणी तरी आले आहे महत्त्वाच्या कामासाठी. येईल लवकरच.'' दयारामने सांगितले.

रामदास आत आला.

''कशाला हाक मारलीत?'' त्याने विचारले.

''कामगार शांत आहेत ना? ते शांत राहावेत म्हणून मी प्रार्थना करीत आहे.'' मुकुंदराव डोळे मिटूनच म्हणाले.

''मालकांनी तडजोडीसाठी बोलावलं आहे. आताच एक डायरेक्टर भेटायला आले होते. मी व अहमद जातो, जाऊ ना?'' रामदासने विचारले.

''जा. कामगारांची उपासमार संपो. किती दिवस शांत राहिले !'' ते म्हणाले.

''मीसुध्दा किती दिवस शांत राहिले? मरेपर्यंत शांत. पाहा ना माझ्याकडे वळून. माझ्याकडे पाहणं म्हणजेही का पाप? त्या दिवसापासून मी मीना आहे हे तुम्हाला कळलं होतं. पुरुषाच्या वेषात मी असले म्हणजे बघवतं वाटतं माझ्याकडे? मला पुरुषाचा पोषाख द्या रे कोणी ! हे डोक्यावरचे केस कापा, नाही तर झाका. काय करू मी? सार्‍या जगाला सुखवू बघता व एका प्रेमळ सतीला मात्र रडवता.'' मीना बोलू लागली.

 

प्रेतयात्रा निघाली. आपला खांदा लागावा अशी सर्वांना इच्छा. शांतेचा देह आम्ही उचलतो असे कामगार बाया म्हणाल्या. ''असं करीत नाहीत'' कोणी तरी म्हणाले, ''ही क्रांती आहे'' गीता चिमण्या क्रांतीला पोटाशी धरून म्हणाली. शेवटी शांतेचा देह भगिनींनी उचलला. मोहनचा पुरुषांनी उचलला. शांतेच्या पाठीमागे चार-चारांच्या रांगेत हजारो स्त्रिया उभ्या होत्या. मोहनच्या पाठीमागे चार-चारांच्या रांगेत हजारो पुरुष होते. दोन्ही रांगांमधून लाल बावटयाचे स्वयंसेवक हाताला झेंडे घेऊन व्यवस्था ठेवण्यासाठी अंतराअंतरावर खडे होते.

''इन्किलाब झिंदाबाद'' गाणे सुरू झाले. विद्यार्थीसंघाचा बँड पुढे होता. एक मोठा तिरंगी झेंडा व एक मोठा लाल झेंडा फडकत होता. क्रांतीचा आवाज दशदिशांत घुमू लागला. दोन्ही चिता रचल्या गेल्या. शांता व मोहन यांचे पवित्र आत्मे आधीच देवाकडे गेले होते. त्यांचे देह अग्निनारायणाने आत्मसात केले. मुकुंदरावांनी अग्नी देण्यापूर्वी दोनच शब्द सांगितले, ''मोहन-शांता सर्वांना शांत राहा व लढा असे सांगत आहेत. मोहन व शांता आपल्या जीवनात अमर आहेत. त्यांचे देह गेले. त्यांचा संदेश सदैव आपणांजवळ आहे.

मंडळी माघारी फिरली. कामगार-मैदानावर पुन्हा मिरवणूक जाणार होती व तेथून विसर्जन पावणार होती. इतक्यात ''मजुरांच्या लॉर्‍या आल्या, लॉर्‍या आल्या.'' एकच हाक आली. सारे वातावरण प्रक्षुब्ध झाले. मुकुंदरावांनी कण्यांतून ''शांत राहा, काल रात्री सांगितलेलं विसरू नका.'' असे गंभीरपणे सांगितले. बँड माघारी गेला. सर्वांच्या पुढे मुकुंदराव व आनंदमूर्ती झेंडे धरून उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे दयाराम व अहमद, त्यांच्या पाठीमागे पार्थ आणि मग मागे हजारो स्त्री-पुरुषांचा व्यवस्थित चार-चार रांगी समूह लॉर्‍यांना अडवायला निघाला जथा. बंदूकवाले पोलिस गर्दी करू लागले. जथ्याला अडवू लागले. गर्दी होणार, दंगा होणार, अशी लक्षणे दिसू लागली. ती पाहां, एक कामगार-भगिनी चवताळून निघाली. मॅनेजरच्या अंगावर थुंकणारी रमा, तीच ही. कोठे निघाली ही वाघीण, ही नागीण? कोणावर आहे रोख? ती पाहा शिपायाच्या हातातील बंदूक तिने ओढून घेतली. तो शिपाई बावळटासारखा पाहात राहिला. रमाने बंदूक उंच केली. ''ही पाहा साम्राज्य सरकारची बंदूक आपल्या हाती आली. ही पाहा खरी सत्ता आपल्या हाती आली !'' ती ओरडली. इन्किलाबची कानठळया बसविणारी गर्जना झाली ती बंदूक याच्या हातून त्याच्या हाती अशी नाचू लागली. परंतु रामदास एकदम धावून आला.

''चावटपणा काय आहे हा? गंभीर परिस्थिती आहे, समजत नाही ?'' त्याने ती बंदूक परत दिली. ''गोळीबार करू नका. आम्ही शांत राहतो !'' मुकुंदराव सांगत होते.

इतक्यात मोटार लॉर्‍या दुसर्‍या रस्त्याने जात आहेत असे दिसले. मुकुंदराव धावले. वार्‍याच्या वेगाने निघाले. एकच 'क्रांती' अशी आरोळी त्यांनी मारली. ती पाहा पहिली लॉरी येत आहे. तिच्या पाठीमागून आणखी येत आहेत. मुकुंदराव लाल झेंडा घेऊन उभे राहिले. परंतु लॉरीवाला ऐकेल का? तिच्यातील कामगार 'अरे, अरे' म्हणत आहेत तोच ती लॉरी मुकुंदरावांना पाडून त्यांच्या अंगावरून गेली ! तोच आनंदमूर्ती तेथे येऊन पडले. त्यांच्याही अंगावरून गेली ! आतील कामगारांनी ड्रायव्हरला ओढले. त्याने थांबविली गाडी. हजारो कामगार धावले. दोन जीव तेथे रक्तबंबाळ होऊन पडले होते. कामगार खवळले. रामदास मोटार लॉरीवर उभा राहिला. तो कर्ण्यातून सर्व शक्तीने व निश्चयी स्वरात म्हणाला, ''शांत राहा, मुकुंदराव शेवटल्या श्वासाने शांत राहा सांगत आहेत आणि हे बाहेरच्या कामगारांनो, तुम्ही आमचे भाऊ. तुमच्या मायबहिणी, तुमचे भाऊ येथे उपाशी मरत असताना, तेजस्वीपणे लढत असताना, तुम्ही येता कसे? कामगारांनी का कामगारांची मान कापावी? आम्ही तुम्हाला पाप करू देणार नाही. तुमच्या लॉर्‍यासंमोर आमच्या रक्ताचे सडे घालू. तुम्हांला पापापासून परावृत्त करण्यासाठी. आम्ही आमचे प्राण जमिनीवर पसरू. माणुसकी असेल तर खाली उतरा व शूर संपवाल्या कामकर्‍यांत मिसळा. हे पाहा थोर मुकुंदराव येथे रक्तानं न्हाले आहेत. आसुरी भांडवलशाही, रक्ताला चटावलेली भांडवलशाही, तिला साथ देणार का लाथ देणार? टाका उडया खाली ! या यज्ञमूर्तींचं हे बलदान पाहा, उतरा खाली.''

मोटार लॉर्‍यांतील कामगार खाली उतरले. त्यांनी खाली माना घातल्या. एकच इन्किलाबची रणगर्जना झाली. परंतु मुकुंदराव व आनंदमूर्ती ! त्यांचे अद्याप प्राण होते. त्यांना दवाखान्यात नेण्याचे ठरले. तिकडे कामगार मैदानावर प्रचंड सभा सुरू झाली. दयाराम, अहमद, नथू तिकडे गेले. रामदास व पार्थ हुतात्म्यांना घेऊन दवाखान्यात आले. ''हिंसा-अहिंसेचा लढा'' मुकुंदराव म्हणाले. 'दिव्य लढा' आनंदमूर्ती म्हणाले.

   

पुढे जाण्यासाठी .......