सोमवार, आँगस्ट 19, 2019
   
Text Size

क्रांती

''मोहन, कसं वाटतं?'' मुकुंदरावांनी विचारले.

''छान वाटतं. उद्या अगदी छान उजाडणार आहे. बरा झालो आता मी. तुम्ही जा. कामगारांना धीर द्या. सभा असेल, मिरवणूक असेल, जा. त्यांना शांत राखा. म्हणावं, मोहननं शांत राहायला सांगितलं आहे.'' तो थांबत, खोल आवाजात बोलला.

मुकुंदराव निघून गेले. शांता जवळ बसली होती. पाळण्यात क्रांती रडू लागली. आंदळून राहिना. शांतेनं प्यायला घेतले तरी राहिना. ''त्रास देते चांडाळीण !'' शांता रागाने बोलली व तिने पाळण्यात त्या लहान लेकरास टाकले. मोहन डोळे उघडून पाहात होता.

''शांता, क्रांती जरा रडली तर तू अशांत होतेस. कामगारांनी कशी ग शांती धरावी? क्रांतीला प्रेमानं व शांतीनं वाढव. तरच ती वाढेल. तिला शिव्या द्यायच्या होत्या तर पोटात वाढवलंस कशाला?'' तो म्हणाला.

पुन्हा काही वेळ गेला व म्हणाला, ''जगेन तर पोरांचं लेंढार लागेल शांतीच्या मागं. नको ती भानगड. एका क्रांतीला नाही सांभाळता येत. आणखी चार झाली तर पाहायलाच नको. म्हणून मी आपला जातो. देवाकडे जातो हो शांते. गरिबांना फार मुलं नकोत. ती बघ कामगारांची मुलं मरतायेत. कोठून देतील खायला? कोठून देतील प्यायला? कोठला दवा? कोठली हवा? कोठली कला? काही नाही.''

''माझी शपथ आहे मोहन तुला. शांत राहा पडून.'' शांता म्हणाली.

''मला प्रेमानं 'तू' म्हटलंस. आता ऐकतो हं. शांत राहतो. शांतेचा मोहन शांत राहिला. शांते, माझ्या हातात दे ग पाळण्याची दोरी. मरता मरता क्रांतीला गाणं गाऊ दे. क्रांतीला आंदळू दे. दे दोरी हातात. मी तुझं ऐकतो. तू का नाही माझं ऐकत? माझ्यावर प्रेम नाही तुझं?'' त्याने हात पुढे केले.

शांतेने पाळण्याची दोरी पतीच्या हाती दिली.

''मुकं आंदुळणं मला नाही आवडत !'' तो म्हणाला.
''मग गाणं म्हणा.'' ती म्हणाली.

''म्हणू गाणं? जुनी गाणी नकोत. नवीन म्हणतो. माझ्या प्राणांचं गाणं म्हणतो. हळूहळू एकेक कडवं म्हणेन. मी थांबत थांबत म्हणेन हो.'' मोहन हसून म्हणाला.

शांता पतीच्या अंगावर हात ठेवून बसली होती. गीता जवळच पायाशी होती. मोहन गाणे म्हणू लागला, क्रांतीचा पाळणा म्हणू लागला,

जो जो जो जो रे । जो जो जो जो रे
हे बाळा, पुंजिपतीच्या काळा ॥ जो.॥

क्रांती तू लहान, किति सान, होशिल परि तू महान.
विश्व व्यापशील हे सारे, सुटतिल सुखमय वारे ॥ जो.॥

संप किसानांचे, मजुरांचे, खेळ तुझे हे साचे
खेळत जा बाळ, हे खेळ, वाढव नीट स्वबळ ॥ जो.॥

खेळ स्वच्छंदे, आनंदे, लाल तिरंगी झेंडे
घेऊन बिज हाती, तू ऊठ, थांबव निजजनलूट ॥ जो.॥

बलिदानामधुन वाढशिल, लाठी गोळी खाशील
मरशिल तू न परि, जगशील, विश्वविजयी होशील. ॥जो.॥


 

२७. हिंसा-अहिंसा

दवाखान्यात मोहन मरणशय्येवर होता. शांतेची मुलगी लहान.  परंतु मुलीला घरी ठेवून ती दवाखान्यात येत असे. शांतेने आपल्या आईला बोलाविले; परंतु रामराम पत्नीला पाठवण्यास तयार नव्हते. शांतेच्या लग्नाला जरी ते गेले होते तरी तिच्या झोपडीत तिचा संसार पाहावयास ते कधीही आले नाहीत. शांतेने गीतेला बोलाविले. गीता आली. गीता लहानग्या क्रांतीला पाळण्यात आंदुळी. गीता तिला मांडीवर घेई, पायांवर ठेवी. गीतेच्या अंगावर, गीतेच्या आधाराने वाढणारी क्रांती, तीच खरोखर क्रांती. ती क्रांती मरणार नाही. गीतेच्या पायांवर वाढणारी क्रांती त्रिभुवनव्यापी होईल.

मोहन पडून असे. ''संपाचं काय झालं?'' मध्येच विचारी. एखादे वेळेस शांता जवळ बसलेली पाहून म्हणे, ''मी म्हटलंच होतं, की तिकडे कामगार मरतील; परंतु तू माझा हात हातात घेऊन बसशील. ऊठ, जा. तिकडे. मोहन मरू दे, मजूर जगू दे.'' शांतेचे डोळे भरून येत व मोहनच्या हातावर ती अश्रूंचे अर्घ्य देई. स्वतःच्या प्राणांचे पाणी देई.

मोहनची आशा नव्हती. श्रमाने मोहन थकलेला होता. शांतेचे लग्न झाल्यावर जरी तो बरा झाला होता, वजन जरी वाढले होते तरी तो खरा बरेपणा नव्हता. या  संपात फारच दगदग झाली. संपाच्या आधीही खूप काम. त्याला ते अतिश्रम झेपले नाहीत. अशा पोखरलेल्या शरीराला ते जिन्यावरून पडणे म्हणजे मोठाच आघात होता. तेव्हाच तो राम म्हणावयाचा. परंतु मरण तयार नव्हते. वरचे वॉरंट लिहिलेले नव्हते.

मुकुंदराव मोहनची प्रकृती पाहावयास आले होते. शांता तेथे बसली होती. ती मुकुंदरावांस म्हणाली, ''आज काही बरं लक्षण दिसत नाही. यांना घरी घेऊन जावं, स्वतःच्या झोपडीत न्यावं, येथे नको.'' मुकुंदराव बरं म्हणाले. मोहनने विचारले, ''संपाचं काय?'' मुकुंदराव म्हणाले, ''सुरू आहे.'' तो क्षीण स्वरात म्हणाला, ''किती दिवस उपाशी राहणार? माझ्या डोळयांसमोर त्यांचे उपाशी चेहरे सारखे दिसत असतात. मी आता देवाकडे जातो फिर्याद घेऊन.'' शांतीने मोहनच्या मुखकमलावरून हात फिरविला, त्याच्या डोक्यावरून हात फिरविला.

''मोहन, तुला घरी नेणार आहोत.'' मुकुंदराव म्हणाले.

''होय. घरी न्या. मी आता घरी जायला उत्सुक आहे. देवाच्या घरी. झोपडीतून देवाकडे लवकर जाता येईल. शांतेची गरीब पवित्र झोपडी. न्या, मला घरी न्या.'' तो म्हणाला.

एका मोटारीत मोहनला अलगद उचलून ठेवण्यात आले. शांता मांडीवर डोके घेऊन बसली होती.

''मोटार कशाला आणलीत? गरिबांच्या अंगावरून जाणार्‍या मोटारी; मोटारीतून माझ्या घरी का लवकर जाईन? त्या वरच्या माहेरी का लवकर पोचेन?'' त्याने विचारले.

''तुम्ही बोलू नका.'' शांता दीनवाणी होऊन म्हणाली.

''नको बोलू? तुझी आज्ञा. आता बोलणं बंदच होईल. देवाचीही तीच आज्ञा होणार आहे. बोलणे नाही, आता देवावीण काही' असा दयाराम एक अभंग म्हणत असतो.'' मोहन म्हणाला.

झोपडीजवळ मोटार आली. मोहनला अंथरुणावर ठेवण्यात आले. स्वच्छ साधे अभ्यास, तेथेच सारे.

 

''हुंडयाचे बंड नको, पैसे फार असतील तर आमच्या आश्रमाला द्या.'' माया हसून म्हणाली.

''महाराष्ट्रातील व्यवहार एवढयात शिकलीस वाटतं?'' प्रद्योतनं विचारले.

''मग कोणती अट?'' आनंदमोहन पुन्हा म्हणाले.

''सांगू? रागावणार नाही ना?'' मायेने विचारले.

''मी घरच्यांवर रागावतो; दारच्यांवर रागावत नाही.'' ते म्हणाले.

''मी तुम्हांला क्रांतिकारक बनायला सांगणार आहे.'' माया म्हणाली.

''माझी नोकरी टिकेल?''

''हो. टिकेल.''

''अशी कोणती बुवा क्रांति?''

''स्वतःच्या जीवनातील. आनंदबाबू, मृणालिनी मजजवळ मोकळेपणानं बोलायची. तुम्ही घरी कसे वागता ते सांगायची. तुम्ही पत्नीला मारता, वाटेल तसं बोलता. जणू पत्नी म्हणजे मोलकरीण. मो लकरणीलाही स्वाभिमान असतो. तुम्ही स्वतःच्या मुलांनाही फार मारता, हे सारं बदला. घरी पोलीस नका बनू.'' 'तडाखे पाहिजेत, फटके पाहिजेत' हे नेहमी तुमच्या तोंडी शब्द. तुम्ही आलेत घरात की सारे चूपचाप, जणू वाघच घरात आला ! तुम्हाला वाघ मानावं यात का तुमचा मोठेपणा आहे? तुमची मुलं तुमच्याजवळ प्रेमानं बोलू शकत नाहीत, बसू शकत नाहीत, हसू शकत नाहीत. तुमची पत्नी तुमच्यासमोर थरथरत उभी राहते. यात का मोठेपणा आहे? मृणालिनी या गोष्टी सांगताना रडे. मलाही वाईट वाटे. हा क्रांतीचा काळ आहे. सर्व प्रकारची गुलामगिरी नष्ट करावयाची आहे. परकीय सत्तेचे तुरुंग व घरचे तुरुंग सारे फोडून टाकावयाचे आहेत. माणुसकीचा प्रेमळ प्रकाश सर्वत्र पसरावयाचा आहे. आनंदबाबू, रागावू नका. मी तुमच्या मुलीसारखी, तुमच्या मुलांच्या वतीने, तुमच्या पत्नीच्या वतीने, बहिणीच्या वतीने अशा या क्रांतीची भिक्षा तुमच्याजवळ मी मागत आहे. ती भिक्षा घाला म्हणजे प्रद्योतची भिक्षा मी तुम्हाला घालते.'' माया कळकळीन बोलली.

सारे वातावरण गंभीर होते.

''माये, तू माझी गुरू आहेस. मी सुशिक्षित असून पशू होतो. दारच्याजवळ गोड, घरच्याजवळ कडू. बाहेरच्यांना हसवीत असे, घरच्यांना रडवीत असे. साहेबाजवळ कुत्रा व घरच्याजवळ वाघ. माये अतःपर मी निराळा होईन. प्रद्योतमध्ये तू क्रांती केलीस, या आनंदमोहनातही केलीस. तुझ्यासारखी मैत्रीण मृणालिनीला मिळाली. तिचं भाग्य. आता प्रद्योतही तिला मिळणार हे आणखी भाग्य.'' आनंदमोहन सद्गदित होऊन म्हणाले.

''माये, परंतु माझ्या लग्नाला तू आली पाहिजेस. तू तुझ्या लग्नाला कोणाला बोलावलं नाहीस. मी सर्वांना बोलावणार. रामदास, तुम्हीही या. माझे बाबा सर्वांना बोलावतील.'' प्रद्योत म्हणाला.

''मायेला आताच बरोबर नेलं म्हणून काय झालं? प्रदयेतचं येत्या मार्गशीर्षात लग्न कर. मायेला दिवसही गेले आहेत., पहिलं बाळंतपण घरी माहेरी होईल. बाळबाळंतीण मग परत येतील.'' रमेशबाबू म्हणाले.

''काय माये, तुझी इच्छा प्रमाण.'' रामदास म्हणाला.

"तुमची इच्छा प्रमाण.'' ती म्हणाली.

''वडिलांची इच्छा प्रमाण.'' प्रद्योत म्हणाला.

मायेने जावे असे ठरले. भावाला घेऊन बहीण बंगालमध्ये गेली. सर्वांना आनंद झाला. परंतु कामगारांच्या संपाचे काय? त्यांची उपासमारीतून सुटका झाली का?

   

''पुढे आमचा विवाह झाला. प्रद्योतची फार निराशा होऊ नये म्हणून त्याच्या डोळयांआड इकडे सोनखेडीला येऊन मी विवाहबध्द झाले. परंतु प्रद्योतला ही गोष्ट कळल्यावर तो अदृश्य झाला. त्याला पकडलं, त्याच्या आधी अर्धा तास तो मला अकस्मता भेटला, तो मला 'बंगालमध्ये चल' म्हणत होता. 'या महाराष्ट्रीयाशी कशाला लग्न, बंगाल का ओस पडला होता? हा बंगाली तरुणांचा तू अपमान केलास', वगैरे बोलला. मीही त्याला खूप बोलले व त्याला डोळयांत पाणी आणून म्हटलं, ''प्रद्योत, तू माझा भाऊ हो. मला भाऊ नाही. तुला बहीण नाही. आपण बहिण-भाऊ होऊ.' प्रद्योतला शेवटी पश्चात्ताप झाला. त्यानंच माझ्या पतीवर निराशेमुळे हे संकट आणलं. त्यानं ते कबूल केलं व म्हणाला, ''तुझ्या पतीला मुक्त करीन तेव्हाच तोंड दाखवीन.'' प्रद्योत माझा भाऊ झाला आहे. कट, कारस्थान काही नाही. प्रद्योत वेडा झाला होता. निराश झाला होता. वेडयासारखं काहीतरी त्यानं केलं. त्यानं स्वतःच्या अश्रूंनी स्वतःचं वेड व पाप धुऊन टाकलं आहे. देवाच्या न्यायासनासमोर ती निर्दोष ठरेल. मानवी न्यायासनासमोरही ठरो. कोर्टाला माझी दया येवो. माझी पती व माझा भाऊ मला परत मिळोत.''

प्रद्योतने आपली जबानी दिली. तो म्हणाला, ''मायेनं सांगितलं त्यातील अक्षर न् अक्षर खरं आहे. ही मीच लिहिलेली पत्रं. मी इकडे येऊन पत्रं लिहित असे. बंगालीमधून लिहित असे. परंतु हस्ताक्षर जवळ जवळ एक आहे ही गोष्ट सरकारच्या हुषार डोक्यात आली पाहिजे होती. परंतु कट वगैरे शब्द दिसले की सरकारचा मेंदू वेडा होतो. साध्या गोष्टीही त्यांना मग दिसत नाहीत. सारं अशक्य त्याला शक्य वाटतं. मीच पोलिसांना निनावी पत्रं लिहिली होती की, 'महाराष्ट्रातील रामदास बंगालमधील दहशतवाद्यांशी पत्रव्यवहार करतो. ता पत्रव्यवहार पोस्टात पकडा. रामदासवर संकट यावं, मायेला दुःख व्हावं, त्यांच्या संसाराची धूळधाण व्हावी हाच माझा दुष्ट हेतू. वर्तमानपत्रात रामदासला अटक झाल्याचं वाचलं व मला आनंद झाला. माया घरी रडत असेल, तिचं पुन्हा मन वळवावं, तिला शिव्या द्याव्यात, म्हणून इकडे आलो. परंतु मायेच्या पुण्याईनं व पावित्र्यानं मी शुध्द झालो. या पवित्र भागीरथीनं या पतिताचा उध्दार केला. माझ्या जीवनात क्रांती झाली. पती होऊ पाहणारा प्रेमळ भाऊ झालो.''

''रामदास निर्दोष आहे. अपराधी फक्त मी. गुन्हेगार मी. मी क्षमा नाही मागत. मला चांगली शिक्षा करा. या लहरी व विकारी तरुणाला कारागृहात कोंडा.''

रमेशबाबूंची छोटी जबानी झाली. अक्षयकुमारांचीही झाली. अक्षयकुमार म्हणाले, ''प्रद्योत, माझा मुलगा. मायेवर त्याचं फार प्रेम. तिच्यासाठी तो झुरे. मायेचं लग्न झाल्यावर तो खोलीत तासन्तास बसून राही. कधी बोलत नसे. कधी हसत नसे. एके दिवशी तो निघून गेला. आम्हाला पत्ता नाही. आमची स्थिती काय झाली असेल तुम्ही कल्पना करू शकता. माझ्या मुलानं सारा अपराध कबूल केला आहे. त्याला पूर्ण पश्चात्ताप झाला आहे. सरकारनं शिक्षा करून त्याच्या जीवनात पुन्हा निराशा निर्मू नये. या दुःखीकष्टी पित्याचे अश्रू पाहून मुलाला क्षमा करावी, पित्याचा कोर्टाने दुवा घ्यावा.''

गुप्त पोलीस अधिकारी आनंदमोहन यांनीही प्रद्योतचं परिवर्तन समक्ष पाहिल्याचं सांगितलं. इतरही गोष्टींचं त्यांनी स्पष्टीकरण केलं. प्रद्योतच्या वडिलांनी हे अक्षर माझ्या मुलाचं, असं प्रामाणिकपणे एकदम सांगितलं वगैरे सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. सरकारतर्फे सांगण्यात आलं, की आम्ही खटला मागे घेतो. न्यायाधीश म्हणाले, ''रामदास निर्दोष आहे. प्रद्योतनं हेकारस्थान रचलं. परंतु एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन व त्याचं परिवर्तन लक्षात घेऊन त्यालाही सोडून देणं योग्य. त्यानं मानसिक शिक्षा आजपर्यंत भोगली ती पुष्कळ आहे. मायेचं मी कौतुक करतो. अक्षयकुमारांनी हे अक्षर माझ्या मुलाचं म्हणून एकदम सांगितलं या त्यांच्या सरळ स्वभावाचं मला कौतुक वाटतं. खटलाच काढून घेण्यात येत आहे. तेव्हा उगीच अधिक कशाला बोलू?''

कोर्टात टाळयांचा गजर झाला. 'दीनबंधू रामदास झिंदाबाद' अशी गर्जना नभाला भिडली. प्रद्योत व रामदास राम-लक्ष्मणाप्रमाणे परस्परांस भेटले. त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले होते. रामदासच्या गळयात अगणित हार पडले. किसानबंधू कामगारबंधू, विद्यार्थीसंघ, काँग्रेसकमिटया, ठिकठिकाणचे आश्रम, भगिनीमंडळं, व्यापारी संघ सर्वांनी हार घातले. रामदासची मिरवणूक काढयाचा कामगारांनी व शेतकर्‍यांनी हट्ट धरला. एका मोटारीत रामदास बसला. त्याच्या एका बाजूला माया होती, दुसर्‍या बाजूस प्रद्योत होता. मायेचे व प्रद्योतचे वडील होते. पाठीमागे दुसरी एक मोटार होती. तीत आनंदमोहन, मुकुंदराव, दयाराम, आनंदमूर्ती, शांता रामदासचे आई-बाप वगैरे बसले होते. प्रचंड मिरवणूक निघाली. मिरवणूक संपल्यावर रामदास म्हणाला, ''हजारो कामगार संप लढवीत आहेत; ते उपाशी आहेत. तरीही आपली भूक विसरून ते माझं स्वागत करण्यासाठी धावून आले. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांचा संप यशस्वी व्हावा अशीच मी तुरुंगात प्रार्थना करीत होतो. तुमच्या संपात भाग घेता यावा म्हणून सुटण्याची उत्कंठा होती. तुमच्या खांद्याशी खादा लावून मी उभा राहीन. परंतु शांतीनं काम करू या. तुम्ही इतके दिवस शांत राहिलात. धन्य तुमची. आम्हांला दोन दिवस उपवास पडले तर कोण अस्वस्थता येते ! किती किती आदळआपट आम्ही करतो ! तुमच्या सहनशीलतेला माझा प्रणाम आहे.''

रामदास सर्व पाहुण्यांसह सोनखेडीच्या घरी गेला. सर्वांनी आश्रम पाहिला. सर्वांना समाधान झाले.

''माये, मग काय? माझ्या प्रश्नाचं काय?'' आनंदमोहन म्हणाले.

''मी प्रद्योतशी बोलले. तो म्हणाला, ''ताई, तू करशील ते प्रमाण. मृणालिनी सुंदर आहे मुलगी, परंतु माझी एक अट आहे.'' माया म्हणाली.

''हुंडा पाहिजे का? किती हजार रुपये देऊ?'' त्यांनी विचारले. 

''बरं, पुढे पाहू.'' माया हसून आत गेली.

आनंदमोहनांनी विचारविनिमय केला. अक्षयकुमार व रमेशबाबू यांच्या जबान्या  होणार होत्या. त्या कशा द्यावयाच्या ते ठरले. मायेचीही जबानी होणार होती. प्रद्योत स्वतःची जबानी देणार होता. रामदासालाही आनंदमोहन भेटून आले होते.

खटल्याची सुनावणीची तारीख आली. आज हजारो किसान व कामगार कोर्टाभोवती जमले होते. दीनबंधू रामदसाला किती तरी दिवसांन त्यांनी पाहिले नव्हते. माया, अक्षयकुमार, रमेशबाबू कोर्टात येऊन बसली. आनंदमोहन आल. पोलिसांच्या पहा-यात पाहा तो रामदास आला. 'दीनबंधू रामदास की जय, दीनबंधू निर्दोष आहे. दीनबंधूची सुटका करा.' अशा आरोळया हजारो कृतज्ञ कंठांतून एकदम बाहेर पडल्या. प्रद्योतही पाठीमागे पहार्‍यात येत होता. रामदासबद्दलचे जनतेचे हे प्रेम पाहून त्याला काय बरे वाटले? रामदास माकड नसून महान आत्मा आहे असे त्याचे हृदय त्याच्याजवळ आत म्हणाले असेल.

कोर्ट भरून गेले होते. रामदासाने त्या बंगाली तरुणाला पाहिले. हाच का तो प्रद्योत? त्याला माहीत नव्हते. त्याने प्रद्योतला कधी पाहिले नव्हते. प्रद्योतने मात्र रामदासाने फोटो, रामदासाची मायेने काढलेली चित्रे  पाहिली होती. न्यायाधीश आले. सर्वत्र सामसूम झाले. सरकारतर्फे रामदासावरचे आरोप मांडण्यात आले. ती सर्व पत्रे पुढे मांडण्यात आली. त्यानंतर रामदासाने आपले म्हणणे मांडले तो म्हणाला, ''मला वकील वगैरे देण्याची जरूरी नाही. हे जे कारस्थान करण्यात आलं आहे त्याची मला माहिती नाही. ही पत्रं माझी नाहीत. असली पत्रं मी कधी कोणाला लिहिली नाहीत; मला कधी कोणाची आली नाहीत. माझ्या हस्ताक्षराचा नमुना या माझ्या वह्यांतून मिळेल. ज्या बंगाली तरुणांना मी पत्रं पाठविली असं सांगण्यात येत आहे, ते बंगाली तरुण कोठे आहेत? ते सापडले का कोठे? ते सत्यसृष्टीत आहेत की कल्पनासृष्टीतील? ते तरुण येथे आणलेले दिसत नाहीत. एक तरुण मला दिसतो आहे. त्याला का मी पत्रं लिहिली? आणि म्हणून त्यालाही अटक?''

''मी अहिंसा व सत्य मानतो. खादी माझा प्राण. त्याचबरोबर किसान कामगारांची संघटना व्हावी असंही मला वाटतं. परंतु हे प्रश्न अनत्याचारानं सुटावेत असं माझं मत आहे. खेडयापाडयांतून मी जे सांगतो, ते सरकारला माहीत आहे.''

''कोणताही गुन्हा मी केलेला नाही. वंगकन्येशी लग्न लावणं हा जर गुन्हा असेलतर तो मी केला आहे. बंगालमध्ये शिकायला जाणं हा गुन्हा असेल तर तो मी केला आहे. बंगालमध्ये क्रान्तिकारक फार झाले; त्या बंगालमधील मुलीशी जर मी लग्न लावलं तर महाराष्ट्रातही इकडे तसे क्रांतिकारक होतील अशी का सरकारला भीती वाटते? म्हणून का मला काळया पाण्यावर पाठविणार, फासावर चढवणार? सरकारनं लक्षात घ्यावं की, क्रान्तिकारक जन्मतात ते सरकारच्या जुलमातून जन्मतात. पिळल्या जाणार्‍या जनतेच्या अश्रूंतून त्यांच्या सांडल्या जाणार्‍या रक्तातून जन्मतात, क्रान्तिकारक नको असतील तर साम्राज्यवाद सोडा, सर्वांचा विकास होऊ दे. मी जास्त वेळ घेत नाही. ही पत्रं वगैरे सारं काल्पनिक आहे. केवळ असत्यावर उभारलेलं एक कारस्थान आहे. इतके दिवस मला का डांबून ठेवण्यात आलं, जामिनावरही का सोडलं नाही, याचं मला आश्चर्य वाटतं.'' नंतर मायेची अत्यंत महत्वाची जबानी झाली. ती म्हणाली, ''समोर उभा असलेला बंगाली तरुण प्रद्योत माझ्याच गावचा. माझे वडील व त्याचे वडीलपरम मित्र. मी प्रद्योतच्या घरी पुष्कळदा जायची. प्रद्योद खोडया करी व मला भंडावी. लहानपणी आम्ही लुटूपुटूचे खेळ खेळत असू. त्यात प्रद्योत होत असे नवरा व मी होत असे त्याची छोटी नवरी. परंतु मी गंमत असे. प्रद्योत मला फुलं आणून देई, जमती आणून देई. मला भाऊ नाही, प्रद्योत भाऊ असं मला वाटे. परंतु प्रद्योतच्या मनात निराळे विचार खेळत होते. मी त्याची पत्नी व्हावं असं त्याला वाटू लागलं. त्याची ही इच्छा मला दिसू लागली. मी प्रथम म्हणत असे की, 'मला लग्न करावयाचं नाही.' माझा खरोखरच तसा विचार होता. परंतु शांतिनिकेतनात हे रामदास आले. त्यांना मी पाहिलं व मला ते निराळे वाटू लागले. एकदम जीवनात नवीन, मंगल, मधुर, गंभीर असं सुंदर दालन उघडलं. माझ्या हृदयाचे ते सम्राट झाले. मी सुटीत घरी गेले की प्रद्योत माझ्याकडे यायचा. मी माझ्या हृदयदेवाची चित्रं दाखवली. प्रद्योत ती फाडण्यासाठी धावे. मी त्याला 'जा, नको सतावू' असं म्हटलं तर तो म्हणायाचा, 'मी तुला सुखात नांदू देणार नाही.'

   

पुढे जाण्यासाठी .......