गुरुवार, आँगस्ट 22, 2019
   
Text Size

गोड निबंध - २

(४)  संयुक्त प्रांतात म्हणे मुसलमानांना सवलती किती?  तुमचे लोकशाही पक्षाचे श्री जमनादास मुंबइर्त मंत्री असतां सोन्यामारुति प्रकरण झालें.  जमनादासांनी कां मुसलमान झोपडले? हिंदु सत्याग्रही त्यांच्या कारकीर्दीत तुरुंगांतच घातले ना? मग संयुक्त प्रांतांत तर अधिकच परिस्थिति कठीण आहे.  तेथे केवळ लोकसंख्येची हिशेबी वृत्ति ठेवून भागत नाहीं.  तुम्ही मंत्री असता तर काय केलें असतेंत हें तुमच्या जमनादासी सोन्या मारुति प्रकरणांतील इतिहासानें कळून येत आहे.

(५) काँग्रेस मुसलमानधार्जिणी आहे असें तुम्ही म्हणतां.  मुस्लीम लीगवाले काँग्रेस हिंदुधार्जिणी आहे असें म्हणतात.  तेव्हां हे दोन्ही आरोप परस्पर खंडिले जाऊन काँग्रेस सर्वांचा सांभाळ करणारीं ठरते.  काँग्रेसला शिव्या देण्यांत का होईना हिंदुमहासभा व मुस्लीम लीग यांची एकी आहे ही त्यांतल्या त्यांत आनंदाची गोष्ट.

(६)  मुसलमान अत्याचार करतात.  आधीं हिंदुमहासभावाल्यांनी हरिजनांवरील अत्याचार दूर करावे.  स्वत:तील श्रेष्ठ-कनिष्ठपणा दूर करावा.  यजुर्वेदी, ऋग्वेदी प्रकार बंद करावे.  मग मुसलमानी अत्याचारंकडे वळूं.  अमळनेरच्या मिलमधील स्त्रियांची अब्रू कशी विकली जाते याची चौकशी जर तेथील तत्त्वज्ञानांतील कांही तत्त्वज्ञानी, मिलमधील हिंदु अभिमानी करंदीकर, दलाल वगैरे, तसेच गांवातील स्त्रियांच्या अब्रूची चाड असणारे, इतर करतील व ती पै किंमतीची होऊं नये म्हणून हे कारखाने सारे राष्ट्राच्या मालकीचे व्हावेत म्हणून क्रांति करावयास उठतील तर यांना नीतीची व धर्माची चाड आहे असे म्हणता येईल.

गरिबीमुळें हिंदुस्थानांत सर्वच स्त्रियांची विटंबना आहे.  मिलमधून स्त्रियांना नरकासारख्या स्थितींत रहावे लागतें.  पोटासाठी, पोटच्या पोरासाठीं इतरत्रहि स्त्रियांना अब्रूचें मोल द्यावें लागतें. अब्रूचा हा वध हिंदुमहासभावाल्यांस दिसेल तर ते सामाजिक क्रांति करावयास ऊठतील.

परंतु अशी सामाजिक क्रांति करावयाची भाषा ऐकतांच ते अधर्म अधर्म म्हणून शंख करतात.  कोण एक महान् हिंदूमहासभावाले पुण्याच्या सभेंत एकदां बोलले, ' साम्यवाद राष्ट्रांतील धनदौलत समाईक करणार.  आमच्या स्त्रियांचीहि वाटणी करणार का?'  या हिंदुमहासभावाल्यांची स्त्रियांकडे आपली एक मालमत्तेची वस्तुं असें पाहण्याची अशी ही दृष्टि आहे.  स्त्रिया म्हणजे जणु एक मालकीची भोग्य वस्तु आहे!  साम्यवादी लोकांची ती दृष्टि नाहीं.  तें स्त्रियांची वाटणी नाहीं करणार.  स्त्रियांना आत्मा आहे, स्वातंत्र्य आहे असें ते मानतात.  स्त्रियांना ते जड समजत नाहींत.  स्त्रियांना जड समजणा-या, घरींदारीं त्यांना केवळ सुखीदु:खी गुलामाप्रमाणें वागविणा-या अशा या हिंदुमहासभावाल्यांस स्त्रियांची अब्रु ही वस्तु काय हें कळावयांस अद्याप शेंकडों जन्म घ्यावे लागतील. स्त्रियांची अब्रु मग एकटा मुसलमान गुंडच दवडीत नसून सर्वत्रच दवडली जात आहे, हे सत्य त्यांना समजून येईल.  मग जळगांव, धुळें, अमळनेर वगैरे कारखान्यांतील स्त्रियांची विटंबना त्यांना दिसेल.  त्या कारखानदारांविरुध्द बंडाचा झेंडा घेऊन ते उभे रहातील.  परंतु मग शेटजींकडून लाखें रुपये मिळणे बंद होईल. ज्याला ज्याला लाखों मायबहिंणींची अब्रु वांचवायची असेल तो साम्यवादाची दिव्य स्थापना करण्यासाठीं सारें जीवन देईल.  स्त्रियांची विटंबना हिंदुमहासभावाले वा अन्यवाले यांना थांबविता येणार नाहीं.  ती एक दिवस साम्यवादच थांबवील.  साम्यवादच खरा माणुसकीचा, न्याय-नीतीचा, सर्वांगीण विकासाचा, ख-या संस्कृतीचा धर्म आणील.  बाकीच्यांचे बडबडणें म्हणजे केवळ दंभ आहे.  नवाबांचे, श्रीमंतांचे संसार ते अधिक सुंदर करतील, परन्तु कोट्यवधि कुटुंबातील हायहाय त्यांना ऐकूंहि येत नसते व तिचें त्यांना कांही वाटतहिं नसतें.

-- वर्ष २, अंक १५.

 

शिवाजी महाराजांच्या वेळेस शस्त्रास्त्रें होतीं.  राष्ट्र नि:शस्त्र नव्हतें.  शिवाय महाराष्ट्रापुरता प्रथम प्रश्न होता.  आज शस्त्रास्त्रें नाहींत.  सर्व हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.  जगांतील बलाढ्य साम्राज्याशीं सामना द्यावयाचा आहे.  शस्त्रास्त्रांचा मार्ग मोकळा नाहीं हें पाहून नि:शस्त्राचा लढा महात्माजींनी सुरूं केला.  राष्ट्राला प्रचंड त्याग शिकविला.  भिक्षांदेहि दूर केली.  स्वावलंबनाचा मंत्र दिला.  स्त्री-पुरुष, मुलें- वृध्द यांचा आत्मा जागा केला.  गिरिकंदरांतून वंदे मातरम् चे निनाद होऊं लागले.  ही क्रांति एका लुंगीवाल्यानें केली.  स्वराज्य जवळ आणलें.  कोंडी फोडली.  संघटणा प्रांतांप्रांतात ऊभी केली.  एका भाषेनें बोलायला शिकविलें.  खादीची ऊब दिली.  त्यायोंगें खेड्यांतील जनतेंत कार्यकर्ते जाऊं लागले.  राष्ट्र एक होऊं लागले.  ब्रि. साम्राज्यसत्तेला महात्माजींनी हलविलें असें जग म्हणूं लागलें.  महात्माजी आमचा खरा शत्रू असें ब्रिटिश साम्राज्यवालें म्हणूं लागले.  महात्माजींनी सांगितलेल्या गोष्टी सर्वजण निश्चयानें, श्रध्देनें अंमलात आणते तर आज स्वतंत्र झालोंहि असतों.  तुरुंगात असतांना एक आयरिश सुपरिटेंडेंट म्हणाला, ' तुम्हांला २० सालींच महात्माजींनी स्वराज्य दिलें असतें, परन्तु तुमची श्रध्दा नव्हती. '  महात्माजींना बोल न लावतां स्वत:स लावा.

(२) महात्माजींची लुंगी म्हणजे सोवळेपणा नव्हे ;  तो धगधगीत त्याग आहे.  कोटयवधि लोक उघडे असतां मला कपडयाचे ढीग कशाला? त्यांनी राऊंड टेबलला जात असतां एडनहून महादेवभाई वगैरेंनी बरोबर घेतलेले अधिक कपडे परत पाठविलें व ते म्हणाले, 'दरिद्री नारायणाचा प्रतिनिधी म्हणून मी जात आहें.  मला हा संसार शोभत नाहीं. '  समर्थांच्या कफनीला नांवे ठेवाल कां?  एक भगवी छोटी शिवाजी महाराजांचे निशाणासाठीं समर्थांनी दिली.  तो का सोंवळेपणा होता?  भगवी लुंगी महाराष्ट्रांतील स्वराज्याचें चिन्ह होतें.  राज्य गरिबांसाठी आहे, राजाने संन्याशाप्रमाणे रहावें, याची ती जळजळीत खूण होती.  परंतु आम्हीं भगव्या लुंगीचा जरिपटका केला आणि महाराष्ट्राचें स्वराज्य गेलें.  कारण शिवाजी महाराजांचे गरिबांचे राज्य जाऊन, सरदार दरकदार, जहागीरदार यांचे राज्य सुरू झालें.  शेतकरी पुन्हां लुटला जाऊं लागला.  सरंजामी सरदार जरीपटक्यानें शोभूं लागले.  लुंगीत असा हा महान् अर्थ असतो.  कोट्यवधि जनतेच्या भाकरीसाठीं तळमळणा-या लुंगीत ब्रि. साम्राज्याला वांकविण्याची शक्ति असते.  परंतु दृष्टि असेल त्याला हें दिसेल.

(३)  पंडित जवाहरलालांनी आपल्या विश्वेतिहासांत श्री शिवाजी महाराजांविषयीं कांही गैर लिहिलें त्याची त्यांनी क्षमाहि मागितली.  दुस-या आवृत्तीत बदलीन असें तें म्हणाले.  शर्ट वरील जाकीटांत असा दिलदारपणा आहे ; परंतु आपल्या पगडींत मात्र तो दिसत नाहीं.  आणि आपण आज पूर्वीच्या इतिहासाकडे नवीन दृष्टीनें बघतों.  आपण नवीन ध्येयें, नवीन कल्पना यांनी बघतों.  आपण पूर्वजांच्या खांद्यावर ऊभे राहून आणखी दूरचें बघतों.  आपणांस आणखीं दूरचें दिसलें तर त्यांत पूर्वजांचा अपमान नाहीं.  प्राचीन कालापासून अनेक थोरामोठया व्यक्तींनी इतिहास बनवीत आणला.  त्याचें मूल्यमापन आज आपण करतों.  त्यांत अपमानाचा हेतु नसतो.  किंवा त्या थोर ऐतिहासिक विभूतींपेक्षां आपण मोठे झालों असाहि अर्थ नसतो.  तें शुध्द ऐतिहासिक विवेचन असतें.  शुध्द मनुष्य चूक दिसली तर कबूल करतो.  असें हें इतिहास शास्त्र असतें.  तेथें त्यागमूर्ति जवाहिरलालांचे जाकीट काढणें सदभिरुचीस शोभत नाहीं.  कृपण व अनुदार बुध्दीचें हें लक्षण आहे.  नेहरूंना शिवाजी महाराजांवर टीका करण्याचा अधिकार नाहीं, आणि नेहरूंवर या कोर्टातील किडयांना टीका करण्याचा अधिकार पोंचतो का?

 

महात्माजींनीं सांगितले तें ऐकलेंत कां?  डॉक्टरने सांगितलेलें औषध घ्यावयाचें नाहीं व रोग हटत नाहीं म्हणावयाचें, याला चावटपणा म्हणतात.   स्वराज्याच्या तयारीच्या चार गोष्टी महात्माजींनीं सांगितल्या होत्या.  अस्पृश्यतानिवारण, हिंदु-मुस्लिम ऐक्य, दारूबंदी व खादी.  यांतील कोणती गोष्ट हिंदुमहासभावाल्यांनीं केली!  जर केली नसेल तर महात्माजींस दोषहि देतां येणार नाहीं.  हिंदुमहासभा हिंदूंचा तरी कैवार घेईल असें वाटत होतें.  परंतु अस्पृश्यांचे बाबतीत काय?  स्वातंत्र्यवीर सावरकर दूर ठेवा ; तुम्ही काय करीत आहांत?  हरिजनांना माणुसकी द्या.  अमळनेरच्या वाडींत त्यांना घेऊन जा.  त्यांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करा.  त्यांच्यासाठीं छात्रालयें काढा.  मुडी येथें एका हरिजनावर तेथील मंडळींनी अत्याचार केला.  तेथे मुसलमान नव्हते, हिंदूच होते.  जळगांवचे, धुळयाचे, एरंडोलचे, अमळनेरचे सारे हिंदुमहासभावाले वकील तेथें धांवून गेले नाहींत.  जे हिंदुमहासभावाले अस्पृश्यांस माणुसकी मिळावीं म्हणून झटत नाहींत, त्यांना दुस-यांस नांवे ठेवण्याचा अधिकारच नाहीं.

हिंदुमुस्लिम ऐक्य करा महात्माजी म्हणतात.  महात्माजी मुसलमानांस कोरा चेकहि देण्यांस तयार आहेत ; जर ते स्वातंत्र्यासाठी लढतील तर.  लोकमान्यहि असें म्हणत.  मुसलमान येथें राजें झाले तरी चालतील परंतु हा इंग्रज नको असें ते म्हणत.  हिंदुमुस्लिम ऐक्याची जरूर सर्वांना वाटते.  त्यासाठीं वाटेल ती किंमत द्या असें सेनापति बापट म्हणतात.  बंगालमध्यें  १९२४ मध्यें प्रांतिक कायदे कौन्सिलांत सरकारचा पराजय करतां यावा म्हणून देशबंधु दास यांनी हिंदुमुस्लिम करार केला.  ज्याला ज्याला हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा असें वाटतें त्याला या एकीची नितांत आवश्यकता पटते.  ९ कोटि मुसलमान व ६ कोटि अस्पृश्य असे १५ कोटि लोक जवळ न आले तर ब्रि. सरकार त्यांना जवळ करणार.  आपण दोन जागा देऊं म्हटलें तर इंग्रज ३ देतों म्हणणार.  हा हिशोब हास्यास्पद होणार.  म्हणून लो. टिळक, महात्मा गांधी कोरा चेकहि जरूर तर घ्या असें म्हणावयास सिध्द होतात.

अस्पृश्यतानिवारण व हिंदु-मुस्लिम ऐक्य या महात्माजींनी स्वराज्यासाठीं २ अटी सांगितल्या.  त्या जर पार पाडीत नसाल तर ते स्वराज्य कोठून देणार? हिंदुमहासभावाल्यांचे अस्पृश्यतेकडे लक्ष नाहीं, हिंदु मुस्लीम ऐक्याकडे लक्ष नाही, मग महात्माजींवर रागावून काय होणार!

दारुबंदी व खादी.  दारुबंदी आज काँग्रेसने हातीं घेतली आहे.  त्याला संपूर्ण पाठिंबा द्या.  आणि खादी? तिची तर टिंगल केली जाते.  कोणी म्हणतात कीं त्यामुळें मुसलमानांसहि धंदा मिळतो.  मिलमध्यें मुसलमान नाहींत का?  आतां केवळ सनातनी हिंदूंची गिरणी काढा म्हणावें.

   

३४ हिंदुमहासभावाले

जळगांवचे कांहीं हिंदुमहासभावाले वकील अंमळनेरला येऊन काँग्रेसला शिव्या देऊन कृतार्थ होऊन परत गेले.  या वकिलांनी या सभेत जीं भाषणे केलीं ती ऐकून त्यांच्या पोरकटपणाची कींव येत होती.  त्यांच्या भाषणांतील मुद्दे पुढीलप्रमाणें होते.

(१)  शिवाजी महाराजांनी २० वर्षांत स्वराज्य मिळविंले.  महात्मा गांधींना अद्याप २० वर्षांत मिळवितां आले नाहीं.
(२)  सोवळीं नेसून दुस-या बाजीरावानें स्वराज्य घालविलें, मिळविलें नाहीं.  त्याप्रमाणें लुंग्या नेसून स्वराज्य मिळत नसतें.  महात्माजींची लुंगी म्हणजे सोवळयांचाच प्रकार.
(३)  पं.जवाहरलाल नेहरू मारे शर्टवरून जाकीट घालतात.  ते शिवाजी महाराजांस नांवे ठेवतात.  जाकीट घालून अधिकार येत नाहीं.
(४)  सं. प्रांतात पहा मुसलमानांना किती सवलतीं.  हिंदूंकडे कोणी पाहील तर शपथ!
(५) नेहमींप्रमाणें  मुसलमानधार्जिणी काँग्रेस वगैरे.
(६)  मुसलमानांचे अत्याचार वगैरे.

अशा अर्था चीं ती भाषणें होतीं.  त्या पोरकट भाषणांस उत्तर देणें म्हणजेहि कमीपणा.  परंतु मुलांची व वरवर विचार करणा-यांची दिशाभूल होते म्हणून थोडें लिहितो.

(१)  शिवाजी महाराजांनी २० वर्षांत स्वराज्य स्थापिलें.  त्यांना ही शक्ति कोणी दिली? कशी मिळाली?  त्यांनी जनतेचा कार्यक्रम हातीं घेतला.  जुने सरदार जहागिरदार त्यांना विरोध करावयास उभे राहिले.  शिवाजी महाराजांनी त्यांना दूर केलें.  जनतेच्या गवताच्या काडीसहि हात लावूं नये;  जनतेनें पोटच्या पोराप्रमाणें वाढविलेलीं झाडें, त्यांची फळें कोणी नेऊं नये असे हुकूम सोडले.  खायला न मिळणा-या शेतक-यांची बाजू शिवाजींनें घेतली.  कोणास जहागिरी दिली नाहीं;  गढीवाले दूर केले.  जनतेचें शेतक-यांचे राज्य स्थापिलें.  जनतेतूनच नवीन शूर सेनानी त्यांना मिळाले.  क्रान्ति तेव्हा करता येते, जेव्हा लुबाडणा-यांस दूर करून जनंतेची बाजू घेतली जाते.

आजहिं क्रांति करतां येईल.  परन्तु जनतेची, श्रमणा-या जनतेची बाजू घेतली पाहिजें.  परन्तु काँग्रेसने साधा कुळकायदा आणला, साधें कर्जनिवारण बिल आणलें, तरी तुम्ही हिंदुमहासभावालें ओरडतां.  तुमचीं पत्रें ओरडतात.  महात्माजी स्वराज्यासाठीं जनता उठावीं म्हणून तिचे प्रश्न सौम्यपणे व मर्यादेने  घेतात तरीहि तुम्ही त्यांच्याविरुध्द ऊठतां.  मग शिवाजी महाराजांप्रमाणें गरिबांच्या आड येणा-या सर्वांस सफा करावयाचें कोणीं ठरवलें तर काय म्हणाल?

 

ताठच रहावें, वाकूं नये, कारण ताठ रहाणें हेंच पौरुष आहे.  भलत्या ठिकाणी मोंडलें तरी हरकत नाहीं परंतु या जगात वाकूं नये असा अत्युत्तम ध्येयवाद ज्या कादंबरींत आहे, त्या कादंबरीनें संपत्ति, साम्राज्य, वैर, युध्द यांच्या पाठीमागें लागलेल्या युरोपचे लक्ष खेंचून घेतलें यांत नवल काय आहे?  आपल्याला निद्रेंतून जागें करण्याकरितां दिव्य संदेश घेऊन हा कोणी तरी अवतारी पुरुष आला आहे.  असें आधिभौतिक संस्कृतीच्या भाराखालीं दडपून गेलेल्या युरोपला वाटलें आणि त्यांनी या नवीन द्रष्ट्याचें मोठ्या आनंदाने स्वागत केलें! रोमन रोलंड यांचे इतर अनेक ग्रंथ आहेत.  परंतु वरील गंथाची सर दुस-याला येणार नाहीं.  याच ग्रंथाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालें आहे.  आणि 'विसाव्या शतकांतील पहिल्या नंबरचा ग्रंथ ' असें शिफारसपत्र अनेक ज्ञात्या लोकांनी त्या ग्रंथाला दिलें आहे.

रोमन रोलंड हे उत्कृष्ट लेखक आहेत तसेच द्रष्टेहि आहेत.  जगांत बंधुभाव नांदावा आणि राष्ट्राराष्ट्रांमधील वैर लयाला जावें हा दिव्य संदेश त्यांनी जगाला दिला आहे. भिन्न संस्कृतीच्या लोकांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून विचारैक्य घडवून आणावें असा उपदेश त्यांनी आपल्या ग्रंथातून केला आहे.  ते उच्चध्येयवादी आहेत.  हे सांगावयास नकोच,  परंतु आपलीं ध्येयें आणि कृति यांचा मेळ घातला पाहिजे असें त्यांचे निक्षून सांगणें आहे.  एके ठिकाणीं ते म्हणतात, 'अन्याय होत असतांना जो उघडया डोळयांनी तो पहातो आणि त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत नाहीं, त्याला माणूस ही पदवीसुध्दा धड शोभणार नाहीं. 'आपल्या आयुष्यांत त्यांनी अन्यायांशी अनेकदां झुंजी केल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या कोमल मनावर भयंकर आघात झाले आहेत.  तरी मानव जातीच्या भवितव्याविषयीं त्यांच्या मनांत केव्हाहिं संशय उत्पन्न झाला नाहीं.  जगांतील युध्दें नाहींशी झाली पाहिजेत आणि निरनिराळ्या राष्ट्रांत सलोखा आणि प्रेम हीं राहिली पाहिजेत.  याकरितां त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत.  १९२१ सालीं महात्मा गांधींनी सत्य अहिंसा यांच्या भरभक्कम पायावर उभारलेली असहकारितेची चळवळ पाहून त्यांचे लक्ष महात्मा गांधींकडे गेलें.  त्यांनी महात्मा गांधींच्या मतांचा अभ्यास करून १९२४ सालीं एक पुस्तक लिहिलें आणि गांधी हे खरोखरच महात्मा कसे आहेत, त्यांचा आत्मा विश्वव्यापी कसा आहे हें जगाच्या निदर्शनास आणून दिलें.  तेव्हांपासून दोघांनाहि एकमेकांस भेटण्याची इच्छा होती.  तो योग इतक्या वर्षांनी घडून आला हें मोठें सुचिन्हच म्हटलें पाहिजे.  या योगाने युध्दाचा आणि मनुष्यहानीचा संभव थोडासा कमी झाला तरी तें मोठेंच कार्य होणार आहे.  महात्मा गांधी, रोमन रोलंड, इन्स्टेन यांच्यासारख्या महापुरुषांनी एकी करून युध्दें अशक्य करून टाकलीं पाहिजेत.  युध्दें अशक्य होतील ; मात्र आपण या महात्म्यांचा संदेश ऐकून त्याप्रमाणें वागावयास तयार झाले पाहिजे.

   

पुढे जाण्यासाठी .......