गुरुवार, आँगस्ट 22, 2019
   
Text Size

सोन्यामारुति

दुसरा : धीर धर. आल्या प्रसंगाला तोंड दे, चल.

वसंता : चल, वेदपुरुषा, चल. आपणहि त्यांच्याबरोबर जाऊं. हळूच चल.

वेदपुरुष : अदृश्य रुप घे म्हणजे बरें.

पहिला : रडण्याचा कारे आवाज आहे ?

दुसरा : नाहीं. दार लकटूं ? आंतून कडी असेल.

पहिला : मी हांक मारतों. '' आई, ए आई. ''

दुसरा : पावलें वाजलीं.

आई : हळूच या आंत. घ्या दार लावून.

पहिला : आई !

आई : मीं फडक्यांत गुंडाळून ठेवलें आहे. रामाच्या मंदिरांत नेऊन ठेव,

पहिला : आई! काय हें सांगतेस ?

आई : कुळासाठीं केलें पाहिजे.

पहिला : हें कूळ नसून खूळ आहे. तें पाप आणि हें पाप! एका पापासाठीं दुसरें पाप! तुझ्यामुळें हें सारें झालें.

आई : बोलायची ही वेळ नाहीं. तें घे.

ताई : भाऊ !

पहिला
: ताई! मी काय करुं ? घेऊन जातों. देवाच्या स्वाधीन करतों. आईची आई म्हणजे तो! थंडींतहि देव त्याला ऊब पाठवील व वारे त्याला पोटाशीं धरतील. ताई !

 

पहिला : अरे, सहासहा महिने ढेंकूण रक्त न पितां जगतात, संधि सांपडतांच पुढें येतात. मनांतील वासनाबीजें जरा दृष्टि मिळतांच, जरा स्मित दिसतांच जरा सहानुभूतीची चंचल हालचाल होतांच अंकुरित होतात. पुजारी एकीकडे कपाळाला भस्म लावीत होता, आणि आंत वासना त्याचें भस्म करीत होती! एकीकडे तो देवाची पूजा करीत होता, आणि एकीकडे ताईचें चिंतन करीत होता. भोगापुरतें चिंतन !

दुसरा : परंतु आपलीच चूक. ताईला आपण असें नसतें ठेवलें तर अशी पाळी येती का ?

पहिला : आतां काय उपाय ? माझ्यानें घरीं बसवेना. डॉक्टरांना मागे सांगितलें कीं, कांहीं औषध द्या ताईला. त्यांनीं देण्याचें नाकारलें. ते म्हणाले, '' हा गुन्हा आहे. असें औषध मीं दिलें तर मी फांशी जायचा! '' ताई! गरीब बिचारी ताई . एक दिवस मला म्हणाली, ''भाऊ! मला अफू आणून दे. मला मरुं दे.'' तिनें मला मिठी मारली होती. ती रडली. मी रडलों. आईच्या हट्टानें ताईची धुळधाण झाली! हा धर्म गांजतो आहे. भोगी लोकांचा लादालादी धर्म! विचारहीन, भावनाहीन, अनुकंपाहीन धर्म! आग लावा असल्या खोट्या धर्मांना !

दुसरा : चल घरीं जाऊं. ताई मोकळी झालीं असेल. पुढें काय करावयाचें ?

पहिला : आईनें कांहीं केलेंहि असेल. ह्या बायका फार धीट असतात! धरलें असेल नाक, दाबला असेल गळा, दाबलें असेल तोंड! अशा ह्या स्त्रिया साहसी असतात! धर्मरक्षणासाठीं हें साहस त्या करतात !

दुसरा : चल घरीं.

पहिला
: परंतु काय करायचें ? बाळ जर जिवंत असेल तर काय करायचें ?

दुसरा : रामापुढें नेऊन ठेवूं. रामाला काळजी.

पहिला : रामाच्या पायांजवळ ठेवूं तें बाळ. अनाथांचा नाथ तो पतितपावन तो. समाज ज्याला ज्याला दूर लकटील, तो तो देवाच्या घरीं जाऊन पोंचेंल.

दुसरा : दीन को दयालु दानी दूसरा न कोई ॥

पहिला : मग चलायचें घरीं ? हिंमत होत नाहीं. या डोहांत जीव द्यावा असें वाटत आहे.

दुसरा : डोह तुला बुडविणार नाहीं.

पहिला : खरेंच, मी उत्कृष्ट पोहणारा आहें. इच्छा नसतांहि तरंगत राहीन.

 

पहिला : त्या माझ्या मित्रानें पुनर्विवाह केला तेव्हां माझी आई त्याला बोलली. म्हणाली, ''येऊं नकोस आमच्या घरीं'', आतां आमच्याच घरीं हा प्रकार! ताईचा काय अपराध ?

दुसरा : त्या पुजार्‍याला जर पत्नीशिवाय दोन महिने राहतां येत नाहीं, तर तुझी ताई वर्षांनुवर्षें कशी बरें राहील ?

पहिला : तो पुजारी असें करील हें कोणाला माहीत होतें ? आमच्याकडे पूर्वीपासून तो आहे.

दुसरा : त्याची बायको माहेरीं झाली का बाळंत ?

पहिला : कोणाला ठाऊक ? आमच्या गळ्याला फांस लावला आहेन खरा.

दुसरा
: आणि आतां म्हणे सोन्यामारुतीच्या सत्याग्रहाला गेले आहेत !

पहिला : आतां चार महिने तोंड कशाला दाखवील !

दुसरा : तुझ्या ताईचें तूं पुन्हा लग्न लावून दे. सुखाचा संसार करील.

पहिला : परंतु आई आहे ना ?

दुसरा : तुझी आईहि आतां तयार होईल.

पहिला : नाहीं रे. त्यांना या काळोखातील गोष्टी एक वेळ खपतात, परंतु उघड मोकळेपणानें विवाह खपत नाहीं.

दुसरा : इतर पुष्कळशा जातींत म्होतूर आहे. परंतु ज्यांना ज्यांना श्रेष्ठ समजून घेण्याची इच्छा आहे, ते या गोष्टी टाळतात.

पहिला : खोटी श्रेष्ठता काय कामाची ?

दुसरा : आमच्या जातींत पुनर्विवाह नाहीं म्हणून आमची जात श्रेष्ठ असें हे लोक मिरवीत असतात! स्त्रियांच्या जीवनाच्या होळ्या पेटवून फुकाचा मोठेपणा हे संस्कृतिरक्षक घेत असतात !

पहिला : कारण त्यांना मरेपावेतों पुन:पुन्हां लग्न करण्याची सदर परवानगी असते! समाजांतील विषमतेची ही परम सीमा आहे !

दुसरा : पति मेल्यावर किंवा पत्नी मेल्यावर दोघांनी तसेंच व्रतस्थ राहणें हा सर्वोच्च आदर्श होय यांत शंका नाहीं. परंतु ज्यांना हे झेंपत नाहींत, त्यांच्यावर का ते लादावयाचे असतात ? ही लादालादीची संस्कृति कुचकामाची आहे. केशवपन करुन, भूषणें दूर करुन, साधीं लुगडीं देऊन, अंधारात ठेवून, मंगल समारंभांत न आणून, हृदयांतील विकारांचे बीज का मरणार आहे ? बाहेरचें हें कुत्रिम वातावरण कितीसें उपयोगी पडणार ? कच्च्या कैरीला उबवून उबवून पिकविण्याप्रमाणें पिवळी करण्याप्रमाणें हें आहे. यांत रस नाहीं, गोडी नाही, गंध नाहीं, स्वाद नाहीं! कांहीं नाहीं !

   

वसंता : ती पहा सावध होत आहे. अरे तिनें डॉक्टरांनाच मिठी मारली! ''डॉक्टर, डॉक्टर, तुम्ही कां नाहीं हो त्यांना वाचवलेंत, कां नाहीं थोडा वेळ माझ्यासाठीं राखलेंत ? मला उठवायला आलांत, त्यांना कां नाहीं उठवलेंत ? डॉक्टर '' अरेरे-कसा विलाप करीत आहे! जाऊं आपण, मला नाहीं हें पाहवत.

वेदपुरुष : चल. दुसरी दर्शनें घे. दु:खाची दर्शंने म्हणजे पवित्र दर्शनें. अंधार अधिक पवित्र आहे. कारण अंधार्‍या  रात्रीं कोट्यवधि तार्‍यांचे दर्शन होतें. दिवसाच्या सूर्यापेक्षां मोठ्या अशा अनंत तेजोगोलाचें दर्शन होतें. जीवनाची गंभीरता व खोली दु:खांतच कळून येते. चल.

वसंता : या रामाच्या पवित्र शहरांत किती दु:ख असेल, किती घाण असेल !

वेदपुरुष
: नाक म्हणजे शरीराचें भूषण, परंतु तें शेंबडाचेंहि घर आहे. या शहराचें नांवच नाशिक! दिसायला पवित्र, सुंदर, आंत घाण.

वसंता : ती घाटावर नारोशंकराची घंटा वाजत आहे !

वेदपुरुष : ह्या घंटा सारे वाजवतील. परंतु अन्यायायची घंटा कोण वाजवील ? सामाजिक अन्याय सर्वत्र होत आहेत, त्यांविरुध्द हांक कोण फोडील ?

वसंता : ते नदीकांठीं दोन जीव काय बोलत आहेत ? काय करीत आहेत ?

वेदपुरुष
: फार गंभीर आहे तें बोलणे.

वसंता : आपण ऐकलें तर पाप होईल का ?

वेदपुरुष
: ऐकलें नाहींस तर ज्ञान होणार नाहीं. समाजांतील काळोखांतील अन्याय समजणार नाहींत.

पहिला : तें लहान मूल कोठें ठेवायचें ? कोठें दडवायचे ?

दुसरा : नदीला मूल अर्पण करावें.

गंगे गोदे यमुने माझा नव्हे तुझाचि हा बाळ ।
जतन करी गे यातें; स्वाधिन केला न कापितां नाळ ॥
असें म्हणावें.

 

वेदपुरुष : परंतु अद्याप मारवाडी समाजांत ती बरीच रूढ आहे. त्याची एक गोष्ट तुला सांगतों. एका गांवीं एका मारवाड्याचा मुलगा आजारी पडला. बराच आजारी होता. पलंगावर विव्हळत असे. त्याच्याजवळ त्याचे वडील, चुलते, मोठा भाऊ, आई, आजी-कोणीना कोणी सारखें चोवीस तास असे. श्रीमंत होतें घराणें. त्यामुळें आप्तेष्टहि लांब दूरचे समाचारास येत होते, जात होते, रहात होते. परंतु त्या तरुणाच्या पत्नीस पतीजवळ जातां येत नसें. पतीच्या तोंडांत औषध ओततां येत नसे. पतीची गादी स्वच्छ करतां येत नसे. त्याचे पाय चेपतां येत नसत. त्याच्याजवळ दोन शब्द बोलतां येत नसत. प्रेमानें पहातां येत नसे. कांहींहि प्रेमसेवा ती करुं शकत नव्हती. घरांत औषध तयार करणें तिचें काम. परंतु आजार्‍याच्या खोलींत पाऊल टाकणें शक्य नव्हतें. एके दिवशीं दुपारीं सारी मंडळी जेवावयास गेली. एक लहान दीर आजार्‍याजवळ होता. पत्नीनें ती संधि पाहिली. असा एखादा क्षण यावा म्हणून ती शत नवस करीत होती. मोलाचा क्षण आला. पतीला पाहण्याचा, डोळे भरुन पाहण्याचा, हात हातात घेण्याचा, तो क्षण आला. ती ओथंबलेली मुलगी आंत शिरणार इतक्यांत निषेधाची सूचना खोकण्यानें देत सासरे आले. ती मुलगी चटकन् माघारी गेली. पतीचें दर्शन तिला झालें नाहीं. तिच्या जिवाची व त्याच्या जिवाची केवढी तगमग सारखी होत असेल! एकमेकांना पहावयास, शेवटचें पहावयास तीं दोन हृदयें किती अधीर होत असतील! परंतु घरांतील इतरांना त्याची काय कल्पना ? रूढीखालीं भावना चिरडल्या जात आहेत. रूढींच्या दगडाखालीं जीवनें चिरडलीं जात आहेत !

वसंता : वेदपुरुषा! एकेक गोष्ट सांगतोस व माझ्या जिवाचें पाणी पाणी करतोस.

वेदपुरुष : ह्या सार्‍या सत्यकथा आहेत. सत्यासाठीं प्रसिध्द असलेल्या भरतभूमींतील ह्या सत्यकथा आहेत.

वसंता : ती पहा स्टेशनची मोटार आली. मृताची पत्नी आली.

वेदपुरुष : ती गाय हंबरंडा फोडील !

वसंता : शेवटचें दर्शन घेईन या आशेनें ती आली असेल! या क्षणींच्या तिच्या हृदयांत कोण डोकावूं शकेल ? कोण पाहूं शकेल ? अति पवित्र, गंभीर, गूढ असें तेथें कांहीं तरी असेल.

वेदपुरुष : मोटार गेली.

वसंता : दारांतील सांडलेलें पाणी पाहिलें तिनें. अरेरे! धाडकन् पडली!

वेदपुरुष : ह्या पडण्यांत किती अगतिकता, किती अशरणता, किती दु:ख, किती वेदना असतील ?

वसंता : ह्या पडण्यांत प्रेम आहे कीं अगतिकता आहे ?

वेदपुरुष : अनेक भावनांचें संमिश्रण आहे. प्रेम तर आहेच, परंतु त्यांतहि निराधारपणाची भावना अधिक प्रबळ असेल. पति गेला कीं पत्नीला किंमत नाहीं! माझ्यासाठीं आतां कोण ? माझ्या भावनांना कोण मानील ? माझ्या सुखदु:खची कोण विवंचना करील ? आतां मी म्हणजे माती, मी सुकलेला पाला. जगांतील शिव्याशापांची मी आतां मालकीण. किती तरी भावना व विचार या एक महान् क्षणांत ओतलेले असतील.

वसंता : हे डॉक्टर आले.

वेदपुरुष : डॉक्टर सावध करील, परंतु पुढें काय ? अनंत भविष्य अंधारमयच राहणार !

   

पुढे जाण्यासाठी .......