सोमवार, आँगस्ट 19, 2019
   
Text Size

समाजधर्म

सारांश, हिंदुधर्म हाही विकासवादी व उत्क्रांतिवादी आहे. तो केवळ रूढींची गाठोडी सांभाळणारा हमाल नसून शील व चारित्र्य यांना बनविणारा वीर विश्वकर्मा आहे ही दृष्टी एकदा स्वीकारा आपण निर्माण करणारे आहोत, नवीन नवीन प्रयोग करणारे आहोत, पुढे पुढे जाणारे आहोत, हा विचार मनात खेळवा व मग वृत्तीत काय फरक पडतो ते पहा. हा विचार अंत:करणात असला म्हणजे जुन्या चालीरीती, जुने आचारविचार ह्यांच्यावर हल्ले चढवताना शरमायला नको, नरमायला नको, निर्भीड व निर्भय होऊन आपण जे योग्य नसेल ते बेलाशक पाडू व नवीन जोडू. आपण बाळाने फरक घडवून आणू आता स्वच्छता सांभाळीत बसणे, स्वत:ला केवळ कोपर्‍यात कुरवाळीत बसणे, हे आमचे कार्य नसून दुसर्‍यांना आमच्या बाजूस जिंकून ओढून आणणे हे आमचे काम आहे. आम्ही जे जुने भले आहे तेही राखू व जे नवीन चांगले आहे तेही चाखू. जग आमच्याबद्दल काय म्हणते हे नाही अत:पर आम्ही पाहाणार. तर जगाबद्दलचे आमचे मत जाहीर करणार. आम्ही किती राखून ठेवले हा आता महत्त्वाचा प्रश्न नसून आम्ही नवीन किती जोडले हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आमची दृष्टी नवदिग्विजयाची आहे. आम्ही मुमुर्षू किंवा केवल जिजीविषू नसून आम्ही विजिगीषू आहोत. आता गमावण्याचे नावच सोडा; आता अटकेपार झेंडे नेऊन दूरवरच्या प्रांतात स्वार्‍या-शिकार्‍या करून लढाया देण्याचे निश्चित केले आहे. आता शरणागतीचा विचार स्वप्नातही मनाला शिवता कामा  नये. कारण झगडा सुरू झाला आहे, ठाण मांडले गेले आहे, धनुष्याची प्रत्यंचा चढविली गेली आहे, आता तो दूर दिसणारा जो विजय त्याला गाठल्याशिवाय विश्रांती नाही.

हिंदुधर्मात प्रचंड बदल करून घेण्याची शक्ती आहे. हिंदुधर्म स्थाणू नाही. तो अत्यंत विकासक्षम आहे. नागार्जुन व बुध्दघोष यांना नानात्मता सत्य वाटे, एकात्मता असत्य वाटे. शंकराचार्यांना एकात्मता सत्य वाटे व नानात्मता भासमान वाटे. श्रीरामकृष्ण व विवेकानंद यांना नाना व एक दोन्ही सत्यरूपच वाटतात. समाज व व्यक्ती दोघांना सत्यत्व आहे. समाजाची काळजी न करता मी एकटयाचा मोक्ष पहाणे हेही चूक; परंतु स्वत:ला शुध्द न करता समाजाची सेवा करू पहाणे म्हणजेही चूकच. मी स्वत: शुध्द झाले पाहिजे व समाजाची सेवा केली पाहिजे. नागार्जुन व शंकराचार्य यांचा समन्वय श्रीरामकृष्ण व विवेकानंद यांनी केला. हिंदुधर्मातील तत्त्वांचा आणखी विकास केला. जे तत्त्व कधी एक म्हणून भासले तेच आज एक व अनेक दोन्ही रूपांनी प्रतीत होत आहे. श्रीरामकृष्ण परमहंसांना एक व अनेक दोन्ही सत्य आहेत याचा अर्थ काय? यातील अर्थ एवढाच की, स्वत:चे चारित्र्य व पावित्र्य म्हणजेच आध्यात्मिकता. याच अर्थ हा की, आलस्य व पराजय, कर्मशून्यता व दैन्य म्हणजे संन्यास नव्हे. याचा अर्थ हा की स्वत: एकटे मुक्त होण्यापेक्षा दुसर्‍यांचा सांभाळ व दुसर्‍याची सेवा करणे हे अनंतपटीने थोर आहे. याचा अर्थ हा की मुक्तिचा ध्यास सोडणे म्हणजेच मुक्त होणे. याचा अर्थ हा की विजयशाली होणे म्हणजेच उच्च संन्यास होय. याचा अर्थ हा की हिंदुधर्म विजयासाठी, सेवेसाठी, कर्मासाठी आज उठून उभा राहिला आहे. कलंकी अवताराची चिन्हे दिसत आहेत. नौबती झडत आहेत. ताशे वाजत आहेत. कर्मवीरांनो! अरे कर्म म्हणजेच धर्म, सेवा म्हणजेच संन्यास! अरे, कर्म म्हणजेच यज्ञ, विजय म्हणजेच संन्यास! तुमच्यामध्ये जे जे सुंदर आहे व उदार आहे जे जे उदात्त व परमोच्च आहे, जे जे प्रेमाचे व पावित्र्याचे आहे, शौर्याचे व धैर्याचे आहे, त्यागाचे व सत्याचे आहे, ते सारे बाहेर येऊ दे; ते कर्मद्वारा, सेवाद्वारा प्रकट होऊ दे. तुमच्या हृदयातील त्या दिव्यतेला आज आव्हान आहे. आज आमंत्रण आहे. अशा युध्दाला चल की जेथे माघार हा शब्दच माहीत नाही.

 

आता युरोपमध्ये कसे आहे ते पाहू चला. ज्या युरोपमधील ध्येये व विचार कृतीत आणण्यासाठी निर्भयपणे सदैव धडपड चाललेली असते तेथे जाऊ या. व्यक्तीने सभ्य, स्वच्छ व सुसंस्कृत असण्यासाठी अमुक अमुक त-हेने वागलेच पाहिजे अशी हिंदुस्थानातल्याप्रमाणे युरोपातही बंधने आहेत. तेथे सामाजिक मताला फार महत्त्व आहे. असल्या गोष्टीची तिकडे चर्चा होत नाही. समाज त्या त्या गोष्टीची उचलबांगडी करून फेकून  देतो. युरोपात आचारपध्दती लहानपणी घरात स्त्रियांकडून शिकविली जाते. लहानपणी हे मुलाला शिकविल्यावर मोठेपणी तो आपल्या या वर्तनापासून, या आचारपध्दतीपासून च्युत होणार नाही अशी अपेक्षा केली जाते. परंतु मोठेपणी त्याने मर्यादाभंग जर केलाच तर त्या बंडखोराला कसे शासन करावे हे तेथील बलवान व प्राणवान समाजाला माहीत असते. समाज त्या व्यक्तीला स्थानच देत नाही, त्याची कोणी विचारपूस करीत नाही. त्याने केलेल्या बदलाला महत्त्व देऊन त्याची कोणी चर्चा करीत बसत नाही, चर्चा केल्याने वस्तू मरत नाही; तर तिची बीजे फोफावतात; मरण्याऐवजी ती वस्तू फोफावते. वस्तूची उपेक्षा केल्याने ती मरून जाते. तिचा गाजावाजा करण्याइतके महत्त्वच तिला देऊ नये म्हणजे ती वस्तू मागे पडते, तिची वाढ होणे बंद होते. या बारीकशा गोष्टीत सारे बळ एकवटावयास समाजाला सवडही नसते. ज्याला ज्यात स्वाभिमान वाटेल ते त्याला करू दे परंतु समाज योग्य वस्तूचीच वाढ करील.

आणखी नीट बघू या. हिंदुस्थानातील गोष्टींपेक्षा आता निराळ्याच गोष्टी आपणास दिसतील. संगोपनगृहातून बाळ एकदा बाहेर पडला, आईच्या किंवा दायीच्या खोलीतून बाहेर पडला, म्हणजे 'देवासारखा बैस, मुकाटयाने बैस, गडबड करू नको, बाहेर जाऊ नको, तेथे चढू नको, पडशील, ऐकतोस की नाही. ' असले आत्मनाशाचे विकासघातक शिक्षण त्यांना देण्यात येत नाही. पंगूपणाचे व परावलंबानाचे निष्क्रियत्वाचे व पराक्रमशून्यतेचे शिक्षण त्याला देण्यात येत नाही. मुलाने धीट व्हावे, त्याने आपण होऊन निरनिराळे आरंभ करावे, त्याने पुढाकार घ्यावा, त्याने आपले मत सांगावे, अंगावर जबाबदारी घ्यावी, त्याने बंड करावे, त्याने पडावे व पुन्हा उठावे अशाच गोष्टी त्याच्या मनावर गुरू व त्याचे मार्गदर्शक ठसवीत असतात. गुळाचा गणपती, ऐदीनारायण, अडणीवरचा शंखोबा, दगडोबा, नंदीबैल असा मुलगा न होता 'उड्या मारणारा, समुद्र ओलांडणारा, सूर्याला भेटावयास जाणारा बलवंत तू हनुमंत तू हो' असे त्याला शिकविण्यात येते. 'शेळीमेंढीसारखा न होता, अजागळाप्रमाणे न होता, सक्रिय व सामर्थ्यवान निर्भय सिंह हो' असे त्याला सांगण्यात येते. इच्छाशक्ति, नैसर्गिक स्वभाव या गोष्टी युरोपीय शिक्षणात फार महत्त्वाच्या मानल्या जातात. या वृत्तीचा तेथे खून करण्यात येत नाही; शिक्षणाच्या साळसूद नावाखाली या वृत्ती दडपल्या जात नाहीत. या वृत्तीचे तेथे संवर्धन केले जाते, त्याला नीट वळण लावण्यात येते. युरोपात जेव्हा एखादी गोष्ट सामुदायिक हिताची असते, सर्व राष्ट्राचा हिताचा प्रश्न असतो, तेव्हाच फक्त वैयक्तिक इच्छा मनुष्य बाजूला ठेवील, एरवी त्या तो बाजूला ठेवणार नाही, दाबून टाकणार नाही व दाबून टाकू देणार नाही. मनुष्याच्या वृत्ती व स्वभाव यांना शिस्त व वळण लावून थोर ध्येये, महनीय कल्पना, यांची साधने त्यांना बनविण्यात येते. याच कारणास्तव क्रीडांगणावर मारामारी मरू देतील, झोंबाझोंबी होऊ देतील. त्यात हेतू एवढाच असतो की, कोणालाही आपणास दाबून टाकले असे टाकावयास नको; दोघे लढा व प्रत्येकाला न्याय मिळू दे. असे केल्याने न्यायासाठी, हक्कासाठी सर्वांना झगडण्याचा हक्क आहे ते तत्त्व अंगी बाणते. मुलाला आपली शक्ति अजमावू देणे हे योग्य आहे. तसे त्याला करू न देणे म्हणजे त्याचे धैर्य खच्ची करणे होय. त्याला न्यायासाठी झगडू न देणे म्हणजे त्याच्या मनातील तळमळ व सत्यता यांना पुरून टाकणे होय. झगडा होऊ दे. झगड्यामध्ये स्वत:पेक्षा जो अशक्त आहे, त्याला जर तो मारील तर त्याच्याबरोबरीचे त्याची टर उडवतील व म्हणतील, 'तू केवढा व तो केवढा! त्याला मारावयास लाज नाही रे वाटली तुला? आमच्याजवळ करावयाचे होते बच्चंजी दोन हात-मग दाखविले असते पाणी! परंतु आम्हाला सोडून त्याच्यावर धावलास! दिसला आपला अशक्त, दिलीस ठेवून तोंडात! हाच का पराक्रम! अशी टीका आपल्यावर होईल ही भीती असतेच.

ज्या गोष्टीची उत्क्रांती व्हावयास अशियात अनेक शतके लागतात, त्या गोष्टी युरोपामध्ये दहा वर्षातच-बाळंतपणतच-शिकविण्यात येतात व तो मुलगा जगात वीर होण्यासाठी बाहेर पडतो. विष्णूच्या दशावतारात जर अनेक जन्मांची उत्क्रांती दाखविली असेल तर शौर्य, धैर्य, धीरोदात्तता येण्यास हजारो वर्षे लागणार हे नाही का दाखविले? परंतु या दशावतारांच्या कल्पनेत एकाच जन्माचा विकास जर दाखविला असेल तर हे युरोपचेच ध्येय हिंदुस्थानात शिकविले गेले असे म्हणता येईल. मत्स्य, कूर्म, वराहआदी याच जन्मातील आपल्या भूमिका होत. त्यातून गेले की मूल बटू वामन होते-लहानसा मनुष्य होते. परंतु बुध्द होण्यापूर्वी त्याला दोनदा क्षत्रिय व्हावे लागेल. स्वाभिमान व सत्य यांच्यासाठी प्रथम शारीरिक शक्तिनेच तो झगडावयास शिकतो. त्यानंतर प्रेताची शक्ति उत्पन्न होते. निर्भयतेने राम व कृष्ण अवतार समाप्त केल्यावर प्रेमसिंधू बुध्दाचा अवतार मिळेल. व्यक्ती आपल्या विकासात वंशानुसारी असते या अर्वाचीन सिध्दान्ताचेच हे स्पष्टीकरण नाही का? पुढे जो कलंकी अवतार अजून व्हावयाचा आहे त्यात आणखी उत्क्रांती व्हावयाची असेल. दया व प्रेम ही ध्येये सर्व व्यक्तिंच्या जीवनात यावीत म्हणून भगवान बुध्द कलंकीच्या रूपाने येऊन धडपणार नाहीत कशावरून? ध्यान सोडून पुन्हा कार्यक्षेत्रात ठाण घेणार नाहीत कशावरून?

 

परंतु हे पहिले पाऊल टाकण्यापूर्वीही महत्त्वाचे काय व बिनमहत्त्वाचे काय, मुख्य काय व अमुख्य काय याची शहानिशा झाली पाहिजे. परकी संस्कृतीतील चांगले घ्यायचे, जे साररूप व प्राणमय आहे ते घ्यावयाचे व जे निस्सार आहे ते टाकावयाचे. परंतु या गोष्टीविषयी नीट स्वच्छ विचार झाला पाहिजे. अनावश्यक व आवश्यक उभय संस्कृतीत काय ते ठरले पाहिजे. नाहीतर सुक्याबरोबर ओलेही जळावयाचे, वाईटाबरोबर चांगले मारले जावयाचे. आपण नीट विचार न केला तर भलत्याच गोष्टींना महत्त्व दिले जाईल व महत्त्वाच्या गोष्टी कोपर्‍यातच राहातील, धोतर महत्त्वाचे वाटता विजारच महत्त्वाची वाटावयाची. एकदा बाह्य गोष्टी महत्त्वाचे नाहीत असे ठरले म्हणजे मग विजारही महत्त्वाची वाटावयास नको परंतु जसे पूर्वी खाणेपिणे व पेहराव यांना महत्त्व होते तेच पुन्हा आपण पाश्चिमात्य खाणेपिणे व पेहराव यांना दिले एवढेच होईल. म्हणजे पुन्हा आत्मा हा बाह्य गोष्टीतच रंगविला. जुन्या माणसास धोतर-पागोटे जेवढे प्रिय वा तेवढेच आपणास हॅट-बुट-कीट हे जर प्रिय वाटत असले तर विकास कोठे झाला? पुन्हा बाह्य गोष्टीतच जीव रंगविला. विवेकानंद कॉलेजमध्ये असताना एक दिवस बाराबंदी घालून जात, तर एके दिवसी सूटबूट करून जात एके दिवशी गुळगुळीत हजामत करीत, तर एके दिवशी भांग पाडून जात. त्यांना हेच दाखवावयाचे असे की, ह्या गोष्टींचा मी गुलाम नाही. डोक्यावरच केस-त्यांचा मी गुलाम नाही. त्यांना छाटीन वा वाढवीन मी धोतराचा गुलाम नाही वा विजारीचा नाही. म्हणून महत्त्वाचे काय ते आपण पाहिले पाहिजे. पाश्चिमात्यांचे कंगवे व सिगरेट यांना सिंहासन मिळावयाचे असेल तर  साराच ग्रंथ आटोपला.

सर्व आचार व विचार यांच्या ज्या पध्दती असतात त्यांच्या मुळाशी शीलसंवर्धन हा हेतू असतो. चारित्र्यग्रथन, शीलसंवर्धन हे ध्येय आहे. मनुष्याला सुंदर सवयी लावून त्याचे चारित्र्य बनवावयाचे. सुंदर सवयी हे साधन व शीलसंवर्धन हे ध्येय. चारित्र्य हा हेतू मुख्य आहे, सवय ही दुय्यम गोष्ट आहे. हिंदुधर्मातील बाह्य आचारापेक्षा हिंदुधर्माची ध्येये फार थोर व उदात्त आहेत, हे कोणालाही नाकबूल करता येणार नाही. हिंदुस्थान हा एकच असा देश पृथ्वीच्या पाठीवर आहे की, जेथे अकिंचन निष्कांचन भिकार्‍याला सम्राटापेक्षा, राजेमहाराजे यांच्यापेक्षा अधिक मान दिला जातो. परंतु राजाही असावा जनकासारखा व भिकारी शुकदेवासारखा हे ध्येय त्याहूनही थोर आहे. भिकार्‍यालाही थोर होऊ दे. दोघांचे पोषाख निराळे परंतु दोघांचे ध्येय एकच-की नराचे नारायण होणे. देवो भूत्वा देव यजेत् पवित्र राजा पवित्र भिकार्‍याची पूजा करतो. तुम्ही कोणीही असा, शीलाचा शीतल व शांत चंद्र तुमच्या शिरावर शोभणारे तुम्ही चंद्रमोळी व्हा. शीलाचा जो विकास होत असतो त्यात सवयीला किती महत्व आहे. आचारांना किती महत्त्व आहे, ते तौलनिक पध्दतीने पाहू या. आपल्याही सवयी पाहू, पाश्चमात्त्यांच्याही पाहू. हिंदुस्थानात मनुष्य खाते काय, पितो काय, स्नानसंध्या करतो की नाही, तो कसे कसे राखतो, पोषाख कसा करतो तो प्रवास पायी करतो की कसा, प्रवासात कसा वागतो ह्या अशाच प्रकारच्या गोष्टीकडे समाजाचे डोळे असतात व ह्यांच्यावर समाजाची टीका सारखी चाललेली असते. तसेच विवाहाच्या किंवा शिक्षणाच्या इत्यादी महत्त्वाच्या बाबतीत जरा फेरफार करावयाचे म्हटले, नवीन प्रथा पाडावयाचे कोणी सुचविले, तर ते एकच हल्ला करून उठतील. ते संतापतील, घाबरतील. ''हे सारे अधार्मिक आहे, अपवित्र आहे, तुमचा काही तरी त्यात स्वार्थी हेतू आहे, कावा आहे'' असे म्हणतील. खेडयातील लोक शहरात जाऊ लागल्यापासून तर व्यक्तीवर या असल्या बाबतीत टीकेचा फारच ताशेरा उडतो व मोठा गहजब होतो. शहरात गेलेल्या मनुष्याला याची फार भीती वाटते. लहानशा समाजात वावरत असताना मनुष्याला धैर्याने बदल करता येतो; परंतु मोठ्या समाजात तो मिसळला म्हणजे '' आपणच कशाला नवीन प्रथा पाडा? आपण कोण?'' असे प्रत्येकाला वाटत असते. अशा वृत्तीच्या माणसाचे जमाव एकत्र वाढतात, परंतु त्यांचा दुबळेपणा तोही वाढीस लागतो. कोणालाच धैर्य नसल्यामुळे जे अर्धवट व दुबळे असेल त्यालाच सारे मान देतात. नवीन दृष्टी व नवीन विचार येण्यासाठी धैर्याने कोण उठणार? कोण बोलणार? '' आपण कशाला उठा? सारे काव काव करतील; जाऊ द्या, जे व्हावयाचे ते होईल'' अशी वृत्ती उराशी बाळगून सारे मढ्यांना कवटाळून बसतात.

   

हिंदूंच्या किंवा मुसलमानांच्या राजवटीत प्रत्येक गोष्टीतील सामाजिक व धार्मिक हेतू विभिन्न दिसत नसत. सामाजिक व धार्मिक हेतू एकात एक मिसळून गेले होते. जे सामाजिक ते धार्मिक वाटे व जे धार्मिक ते सामाजिक वाटे. विचारांच्या दृष्टिने त्यांना पृथक करता येत असे, परंतु आचारास सामाजिक व धार्मिक यात भेदच उरला नव्हता. अमुक का खावे, अमुक का निषिध्द, असाच पोषाख का करावा, असा का करू नये या गोष्टीतही धार्मिक हेतू दाखविले जात. ह्या साध्या गोष्टी तात्कालिक गोष्टी धर्म वाटत, आणि म्हणूनच अनुल्लंघनीय वाटत. त्यात फेरबदल करणे म्हणजे अब्रह्मण्यं वाटे. परंतु आता एकदम सारा रंग पालटला आहे. मनू बदलला आहे. नवी विटी नवे राज्य. पाश्चिमात्य संस्कृती येथे आली. नवीन आचारविचारांशी आपल्या आचारविचारांची तुलना होऊ लागली. प्रत्येक गोष्टीत उपयुक्तता पाहण्याची, हेतू व कारण शोधण्याची बौध्दिक डोळस दृष्टी बळावत चालली. आपणास दिसून येऊ लागले की, अमुक खाल्याने किंवा अमुक पेहरल्याने स्वर्ग किंवा परमेश्वर इतके स्वस्त नाहीत. खाण्याच्या मुळाशी आरोग्य, स्वच्छता इत्यादी गोष्टी दुसर्‍याही मार्गाने होतील. जुन्याच गोष्टींनी होतील असे नाही. कदाचित आरोग्याची नवीन आहारपध्दतीही शोधून काढता येईल. आरोग्य जर चांगले रहाणार असेल तर मी टोमॅटो खाईन. त्याने माझा धर्म बिघडणार नाही. देव दूर पळणार नाही. कोठेही जगात जा, सुसंस्कृत मानवी जीवनाला स्वच्छता व आरोग्य ही आवश्यकच आहेत; परंतु ती एकाच मार्गाने मिळतील असे नाही. दुसरेही अधिक उपयुक्त व अधिक परिणामकारक मार्ग त्या वस्तू मिळवून घेण्याचे असतील, असू शकतील. निरनिराळ्या देशात निरनिराळ्या आहारपध्दती, पोषाखपध्दती असतील. ह्यांच्यावर धर्माची मुख्य गोष्ट अवलंबून ठेवू नये. चहाच्या पेल्यात धर्म बुडत नाही, बिस्किट खाल्ल्याने मरत नाही. उपरणे पांघरल्याने जगतो असे नाही. शर्ट घातल्याने मरतो असे नाही. हॅट व पागोटे-दोघांचा धर्माच्या प्राणशी संबंध नाही.

पाश्चिमात्त्य संस्कृतीच्या सन्निकर्षाने, आगमनाने बाह्य महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या व आंतरिक महत्त्वाच्या कोणत्या हे आपण पाहू लागलो. मोती व शिंपले, साली व रस निरनिराळे करून पाहू लागलो. सामाजिक आचार व रूढी आणि थोर सात्त्विक विचार यांच्यात फरक करू लागलो. 'शिवू नको' धर्माला रजा देऊ लागलो, हिंदूधर्म म्हणजे टिळमाळा, भस्मे-जानवी, मुकुटे-पितांबर, शेण्डी-दाढी यात नाही हे दिसून येऊ लागले. स्वच्छता व पवित्रता हे ध्येय-मग ते कशानेही गाठा. याप्रमाणे ध्येय व हेतू सापडल्यावर निरनिराळ्या पध्दती व मार्ग यांची तुलना आपण करू लागतो व जी अधिक परिणामकारक दिसेल ती उचलतो. दुसर्‍याच्या संस्कृतीमधीलही संदेश आपण घेतो व स्वयंसंस्कृतीतील जे चांगले आहे ते घेतो. असा ''सतां सद्भि: संग: कथमपि हि पुण्येन भवति।'' त्यांच्यातील चांगले व आपल्यातील चांगले यांचे लग्न लावून देतो व शुभमंगल होईल अशी सदिच्छा धरतो. उभय संस्कृतीला जे असत् आहे त्याचा त्याग करतो. याप्रमाणे धर्म व सामाजिक गोष्टी यांच्यात फरक करावयास आपण शिकलो. बदलणारा धर्म व शाश्वत धर्म यातील फरक पहावयास शिकलो. सामाजिक रूढी-आहार, पेहराव वगैरे बदलणारा धर्म आहे. त्याचे स्तोम माजवणे बरे नव्हे ही गोष्ट लक्षात आली. आता भिन्न पोषाखाच्या माणसापासून आपण पळून जाणार नाही, भिन्न आहाराच्या माणसास पाहून अब्रह्मण्यं म्हणणार नाही. आपण आता कोपर्‍यात राहण्यात धर्म आहे असे म्हणणार नाही. यामुळे आता हिंदुधर्म बाहेर अंगणात येणार व जगस्पर्धेत भाग घेणार. तो साता समुद्रापलीकडे जाईल, परकी भाषेतही बोलेल, परकी आचार-विचारांच्या लोकांशी हस्तांदोलन करील, विचार-विनिमय करील. हिंदुधर्म आता झुंजार होणार. नवतेजाने नटणार, सार्‍या जगाला भेटणार.

आज शाळांमधून बसलेला, निरनिराळ्या वर्गातून बसलेला जो नवभारत आहे त्याला झुंजार व्हावयाचे आहे. झुंजाचे विचार व झुंजाचे ध्येय ह्या कल्पनेने त्यांचे हृदये भरून गेली पाहिजेत. हाच विचार त्यांच्या डोक्यात घोळत राहिला पाहिजे. निष्क्रियत्वाऐवजी क्रिया, हल्ले सहन करीत कोपर्‍यात जाण्यापेक्षा हल्ले करीत व हल्ले चढवीत उठावणी करणे, दुबलेपणाच्या ध्येयाऐवजी बळाचे ध्येय चित्ती धरणे, उत्साहाची गर्जना करीत शत्रूवर तुटून पडणे, ह्या गोष्टी तरुणांच्या मनात भरून राहिल्या पाहिजेत. नुसती मनाची वृत्ती बदलली की क्रांती झाली. सारे मनावर आहे. मनात नवविचारांची, नवीन ध्येयाची दारू भरा की ठो ठो बार उडू लागतील, धुडुम् धुडुम् आवाज होऊ लागतील. मुलांना हे शिक्षण मिळू दे म्हणजे-दहा-बारा वर्षातच स्पष्ट फरक दिसून येईल. जागतिक स्पर्धेत, जागतिक संस्कृतीच्या झगडयात आपणास विजयी व्हावयाचे आहे, या विचाराचे बीजारोपण बालमनात, तरुण मनात झाले पाहिजे.

 

१६: चारित्र्य म्हणजे आध्यात्मिकता

खाण तशी माती, बीज तसा अंकुर, कूळ तसे मूल, हा जो मंत्र फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस उच्चारला गेला तोच अर्वाचीन काळातील अतिमहत्वाचा असा सर्वसामान्य सिध्दांत होऊन बसला आहे. व्यक्ती आपल्या वंशाप्रमाणे वागते. व्यक्तीचा विकास कुळधर्माप्रमाणे, आपल्या वंशधर्माप्रमाणे, जातिधर्माप्रमाणे होतो. ज्या वेळेस व्यक्तीचे शिक्षण पुरे होते. मग ती व्यक्ती स्त्री असो की पुरुष असो; त्या वेळेस त्या व्यक्तीमध्ये सारा गत इतिहास जणू अवतीर्ण होतो. मानवजातीची सारी गत ध्येये, मानवजातीच्या सार्‍या गत आकांक्षा त्या व्यक्तीत उभ्या राहतात. विसाव्या शतकातील युरोपियन गुरूंचा साधूसमान पेस्टालाझी याने जी नवी शिक्षणपध्दती शोधून काढली ती याच महान तत्त्वाने प्रेरित होऊन याच तत्त्वाचा विकास त्याच्या पध्दतीत केलेला आहे. चांगले शिक्षण मिळाल्याशिवाय मुळीच आशा नाही हे त्या थोर आचार्याने पाहिले. नवीन विचारांचेच अर्वाचीन शिक्षण परंतु मानसशास्त्राच्या सिध्दांतावर उभारलेले मानवजातीच्या विकासेतिहासावर रचलेले असे द्यावयास हवे, ही गोष्ट पेस्टालाझीने जाहीर केली.

स्वित्झर्लंडमधील स्वजनांवर प्रेम करणारा पेस्टालाझी याला जो प्रश्न सोडवावयाचा होता त्यापेक्षा भारतीय लोकांना जो प्रश्न सोडवावयाचा आहे तो शतपटीने गंभीर व अधिक महत्त्वाचा आहे. ह्या प्रश्नापुढे पेस्टालाझीचा प्रश्न म्हणजे काहीच नाही. तरीही दोन्ही प्रश्न मुळात एकरूपच आहेत. हिंदुस्थानातील लोकांच्याही मनात आज नवीन विचारांचे बीजारोपण करावयाचे आहे. जी नवसंस्कृती त्यांना द्यावयाची आहे ती वरवर उथळपणे दिली जाऊ नये, जीवनावर खोल व गंभीर ठसा उमटविणारी ती व्हावी ही गोष्ट पाहणे फार जरूर आहे. भारतीय जनतेला हे नवशिक्षण देताना प्राचीन भारतीय विकास, प्राचीन ध्येये हे सारे लक्षात ठेवावे लागेल. भारतीय जनतेने नवसंस्कृती घेऊन शेवाळाशी खेळत न बसता कमळांवरदृष्टी ठेवावी. तीरावरच्या शिंपल्यांशी खेळत न बसता सागरात मोत्यांसाठी बुड्या माराव्या या गोष्टीकडे फार लक्ष दिले पाहिजे. ज्या भूमीने तालतमाल व बकुल; आम्र अशा वृक्षांना वाढविले त्या भूमिने क्षुद्र सरपटणारे व लगेच मरणारे, दोडकी व कारली यांचेच वेल लावीत बसू नये. त्यातच धन्यता मानू नये; हे पाहिले पाहिजे. वेदांची जी जननी, ज्ञानयोगाला प्रसवणारी जी माता, अद्वैताला जन्म देणारी अंबा-तिने पाश्चिमात्य कला व विद्या यांचे अनुकरण करीत किंवा त्यांचे गुण-दोष बघत बसू नये, तर स्वत:नवीन दृष्टी घेऊन काहीतरी भव्य दिव्य असे निर्माण करावे.

जोपर्यंत भारतीय मन ऐतिहासिक दृष्टीचा अंगीकार करीत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृती केवळ अनुकरणशील व मधून मधून टीका करणारी अशीच राहील; तोपर्यंत हे क्षुद्र कामच तिला करावे लागणार. नवीन ऐतिहासिक दृष्टी येण्यासाठी नवीन मोजमाप पाहिजे. नवीन आखणी केली पाहिजे, नवीन आकार घेतला पाहिजे. तेव्हाच एकमेकांत मिसळून गेलेल्या गोष्टी निरनिराळ्या व स्पष्ट दिसू लागतील. मग सार्‍या गोष्टींची खिचडी आपण करणार नाही, मग जे आजपर्यंत कसेतरी होत होते ते ध्येय म्हणून बुध्दिपूर्वक व विचारपूर्वक अनुसरले जाईल, आंधळेपणाने होणार्‍या त्याच क्रिया परंतु डोळसपणाने होऊ लागतील; प्रत्येक गोष्टीला रहस्य, हेतु प्रयोजन वगैरे पाहिले जाईल, दृष्टी रसग्राही व सारग्राही होईल; ध्येयाची निश्चितता ठरेल.

   

पुढे जाण्यासाठी .......