रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

प्रकरण १:  अहमद नगरचा किल्ला

आपल्या स्वत:च्या देशाच्या बाबतीत तर आपले कितीतरी व्यक्तिगत संबंध आलेले असतात, आणि या संबंधांमुळे अनेक चित्रे डोळ्यांसमोर उभी राहतात; किंवा या सर्व संबंधांतून आपल्या देशबांधवांसंबंधीचे संयुक्त असे एक चित्र मनात तयार होते.  मी माझ्या मनाची चित्रशाळा अशा चित्रांनी भरून टाकिली आहे.  या चित्रशाळेत काही अगदी जिवंत प्राणमय अशी संपूर्ण चित्रे आहेत.  ती चित्रे माझ्याकडे बघत आहेत असे वाटते.  जीवनातील काही परमोच्च शिखरांची स्मृती ती चित्रे मला करून देतात. असे असूनही जणू ही स्मृती फार पूर्वीची असे वाटते.  दुसरीही काही लहानमोठी चित्रे आहेत. त्यांच्याही भोवती अनेक स्मृती गुंफलेल्या आहेत.  जीवनाला माधुरी आणणार्‍या स्नेहाच्या व खांद्याला खांदा लावून एका पक्षातर्फे लढताना झालेल्या ओळखीच्या स्मृती तेथे विणलेल्या आहेत, आणि या चित्रशाळेत बहुजनसमाजाची, हिंदी जनतेची, स्त्री-पुरुषांची, मुलांची हजारो चित्रे गर्दी करून उभी आहेत.  ही सारी अफाट जनता एकत्र येऊन माझ्याकडे बघते आहे, आणि त्यांच्या त्या सहस्त्रावधी नेत्रांच्या पाठीमागे गहन गूढ काय आहे हे सारे माझ्या मनाच्या चित्रशाळेत आहे.

मी जी ही भारतीय कथा लिहिणार आहे, तिचा आरंभ एका वैयक्तिक प्रकरणाने मी करणार आहे.  माझ्या आत्मचरित्राचा शेवटचा भाग लिहिल्यानंतर जो महिना गेला त्या काळात माझ्या मनाची काय स्थिती होती ते या प्रकारणाने कळून येईल.  परंतु मी ही दुसरी आत्मकथा लिहितो आहे असे नाही.  अर्थात माझ्या लिहिण्यात पुष्कळदा व्यक्तिगत स्वत:संबंधी असे येणार, त्याला माझा निरूपाय आहे.

दुसरे महायुध्द चालूच आहे.  सारे जग भयंकर उद्योगात या भीषण खाईत जळत असता मी या अहमदनगरच्या किल्ल्यात निरूपायाने पडून आहे.  बळजबरीने, सक्तीने मला निष्क्रिय बनविण्यात आले आहे.  कधी कधी मी चिडतो, चरफडतो, आदळआपट करतो. गेली कितीतरी वर्षे कितीतरी मोठमोठी स्वप्ने, मोठमोठ्या गोष्टी, साहसांचे शूर विचार माझ्या मनात मी खेळवीत आलो.  त्या सर्वांचा विचार मनात येतो नि या कोंडीचा संताप येतो.  आपण पंचमहाभूतांच्या एखाद्या भयंकर उत्पाताकडे ज्याप्रमाणे तटस्थपणे बघतो, त्याप्रमाणे मी या युध्दाकडे त्रयस्थाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करितो.  निसर्गाचा कोप व्हावा, प्रचंड भूकंप व्हावा, मोठे पूर यावेत, त्या वेळेस जशी तटस्थ दृष्टी असते तशी या युध्दाच्या बाबतीत मी घेऊ इच्छितो; परंतु मला यश येत नाही.  तथापी द्वेष, प्रक्षोभ, अत्यंत मन:संताप यांपासून जर मला स्वत:ला वाचवायचे असेल तर ही दृष्टी घेण्याचा प्रयत्न करण्यावाचून गत्यंतर नाही.  मनुष्याच्या रानटी नि संहारक स्वरूपाच्या या प्रचंड आक्राळविक्राळ आविष्कारासमोर माझे स्वत:चे मनस्ताप, माझा हा जीव कोठल्या कोठे पार विरून जातात.

१९४२ च्या ऑगस्टच्या आठ तारखेस सायंकाळी गांधीजींनी जे गंभीर शब्द उच्चारले त्यांचे मला स्मरण होते. ''जगाच्या डोळ्यात आज घटकेला खून चढला असला तरी आपण शान्त व निर्मळ दृष्टीने जगाच्या डोळ्याला डोळा भिडविला पाहिजे.''

 

माझा वारसा कोणता आहे ?  कशाचा मी वारसदार ?  गेल्या सहस्त्रावधी लक्षावधी वर्षांत मानवजातीने जे जे मिळविले त्याचा मी वारसदार आहे; मानवजातीचे सारे विचार, सर्व भावना, तिची सुखदु:खे, तिच्या वेदना, यातना, आनंद, सर्वांचा मी वारसदार आहे; तिच्या विजयोन्मादाच्या गर्जना नि तिच्या पराभवसमयीच्या केविलवाण्या किंकाळ्या यांचा मी वारसदार आहे; हजारो लाखे वर्षांपासून सुरू झालेले ते आश्चर्यकारक साहस जे आजही पुढे चालले आहे, आपणांस खुणा करून बोलावीत आहे, त्या साहसाचा मी वारसदार आहे.  हे सारे आणि इतर पुष्कळसे या सर्वांचा मी इतर मानवांसह वारसदार आहे.  परंतु आपणा भारतवासीयांचा आणखी एक विशिष्ट वारसा आहे, अगदी केवळ आपलाच असे त्याला म्हणता येणार नाही, तरीही तो वारसा आपणालाच अधिक अंशाने मिळालेला आहे; ती देणगी आपल्या रक्तात आहे, आपल्या सर्व जीवनात आहे, आपल्या अणुरेणूंत आहे, रोमारोमात भरलेली आहे. आपण आज जे काही आहो आणि उद्या जे काही होणार आहो त्या सर्वांना आकार त्या विशिष्ट वारशाने दिलेला आहे.

या विशिष्ट वारशाचा, आजच्या काळात त्या वारशाचा कसा उपयोग करायचा हा विचार कितीतरी दिवसांपासून माझ्या मनात घोळत आहे, आणि यासंबंधीच काही लिहावे असे माझ्या मनात आहे.  अर्थात हा विषय अति गहन आहे, गुंतागुंतीचा आहे.  माझी छाती दडपूनही जाते.  परंतु मी फार खोल न जाता या विषयाला निदान वरवर स्पर्श तरी करीत जाणार आहे.  या विषयाचा समग्र प्रपंच, संपूर्ण ऊहापोह मी करू शकणार नाही.  परंतु अशा प्रयत्नामुळे माझ्या मनाचे मी काही देणे दिले असे होईल; माझे स्वत:चे मन मला अधिक स्पष्ट दिसेल; विचाराच्या नि कृतीच्या पुढच्या पायर्‍यांसाठी त्याची मला तयारी करता येईल.

हे सारे लिहीत असताना माझी दृष्टी वैयक्तिक राहणार हे उघडच आहे.  माझ्या मनात हा एकंदर विचार कसा आला, कसा वाढला, कसा साकार झाला, त्याने माझ्यावर काय परिणाम केला, माझ्या कृत्यांवर त्याची काय प्रतिक्रिया झाली हे सारे येथे येईल. कधी कधी तर अगदी व्यक्तिगत असे अनुभवही येथे येतील.  विषयाच्या एकंदर व्यापक स्वरूपाशी त्यांचा संबंधही नसेल.  परंतु त्या अनुभवांनी माझ्या मनोबुध्दीला विशेष रंग दिला असल्यामुळे एकंदर प्रश्नाकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीवरही त्यामुळे परिणाम झालेला असणारच.  आपण निरनिराळे देश व त्यांतील जनता यांच्याविषयी जी मते बनवितो ती अनेक गोष्टींवर आधारलेली असतात.  ती बनविताना वैयक्तिक संबंध जर काही आले असतील तर त्यांचा फार परिणाम होतो.  एखाद्या देशाच्या लोकांशी आपला जर व्यक्तिगत संबंध आला तर त्यांच्याविषयी आपण चुकीची मते बनवण्याचा बराचसा संभव असतो, त्यांना आपण सर्वस्वी परकी व विभिन्न असे मानतो.

 

परंतु आता मी कुदळ बाजूला ठेवून हातात लेखणी घेतली आहे.  डेहराडूनमधील अर्धवट राहिलेल्या हस्तलिखिताची जी दशा झाली तीच कदाचित याही वेळच्या लिखाणाची होईल.  वर्तमानकाळाचा, प्रत्यक्ष कार्यात भाग घेऊन जोपर्यंत मी अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी मला लिहिता येणार नाही.  वर्तमानकाळात प्रत्यक्ष काही कार्य करावयाचे असले म्हणजे तो काळ स्वच्छपणे स्पष्ट डोळ्यांसमोर उभा राहतो आणि मग त्यासंबंधी सहज मोकळ्या वृत्तीने मी लिहू शकतो.  तुरुंगात सारे अस्पष्ट, छायामय; प्रत्यक्ष अनुभवात जी निश्चिती असते, काळाशी जी झटापट असते ती तेथे नाही.  खरे म्हणजे वर्तमानकाळाचे सद्य:स्वरूप माझ्यासमोर उरतच नाही; परंतु भूतकाळाचे अविचल मूर्तीचे स्थाणुवत असे स्वरूपही त्याला आलेले नसते.

किंवा एखाद्या भविष्यवाणी बोलणार्‍या द्रष्ट्याची भूमिकाही मी घेऊ शकत नाही; आणि भविष्यासंबंधी लिहिणे करू शकत नाही.  माझे मन भविष्याचे चित्र स्वत:शी रंगवीत असते ही गोष्ट खरी.  पुष्कळ वेळा मी भविष्याचा विचार करीत असतो, त्याच्या तोंडावरचा पडदा फाडून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो; माझ्या आवडीच्या वस्त्रांनी त्याला नटवतो.  परंतु हे कल्पनातरंग शेवटी फोल आहेत.  भविष्याचे स्वरूप अनिश्चित, अज्ञात असेच राहते; आपल्या आशा फोल ठरणार नाहीत, मानवजातीची स्वप्ने वाया जाणार नाहीत, याची ग्वाही कोण देणार ?  खातरजमा कोण करणार ?

शेवटी भूतकाळ उरतो.  परंतु एखाद्या पंडिताप्रमाणे, इतिहासकाराप्रमाणे वस्तुस्थितिनिरपेक्ष असे मी लिहू शकत नाही;  माझ्याजवळ तेवढे ज्ञानही नाही.  तसेच अशा लेखनासाठी लागणारी तयारी, ते विवक्षित शिक्षण, याही गोष्टी माझ्याजवळ नाहीत.  तशा प्रकारचे लिखाण करण्याची या वेळची माझी मन:स्थितीही नाही.  भूतकाळाचे पुष्कळदा माझ्यावर असह्य दडपण पडते.  कधी कधी जेव्हा भूतकाळ वर्तमानकाळाला स्पर्श करतो, त्या वेळेस माझे हृदय उचंबळते, थोडी जिवंतपणाची ऊब येते.  कारण त्या भूतकाळाला एक प्रकारचे वर्तमानकालीन स्वरूप त्या क्षणी येत असते.  परंतु असे ज्या वेळेस नसते त्या वेळेस भूतकाळ मला थंड गोळ्यासारखा निर्जीव, नीरस, उजाड असा भासतो.  कसलीच ऊब तेथे मिळत नाही.  मी मागे ज्याप्रमाणे लिहिले त्याचप्रमाणे गतकालीन इतिहासाला माझ्या आजकालच्या विचारांशी, कृतीशी, कोणत्यातरी संबंधाने जोडून मगच मला भूतकाळाविषयी लिहिणे शक्य होईल.  अशा प्रकारचा इतिहास लिहिल्याने गटे म्हणे त्याप्रमाणे भूतकाळाचा मग बोजा वाटत नाही; तो बोजा उचलतानाही एक प्रकारचा आधार वाटत असतो, विसावा मिळत असतो.  मनोविश्लेषणपध्दतीप्रमाणेच हीही पध्दती आहे असे मला वाटते.  फरक इतकाच की, येथे ही पध्दती एखाद्या व्यक्तीला लावण्याऐवजी एखाद्या मानववंशाला किंवा सर्व मानवजातीलाच लावण्यात येत असते.

भूतकाळाचे ओझे, त्यातील वाइटाचे नि चांगल्याचे ओझे आपल्या शक्तीला झेपण्यासारखे नसते.  कधी कधी तर त्या ओझ्याखाली आपण जवळजवळ गुदमरतो.  हिंदुस्थान आणि चीन यांच्यासारख्या इतिहासाच्या बाबतीत तर विशेषेकरून हा अनुभव येतो.  या दोन्ही देशांच्या संस्कृती अति प्राचीन अशा आहेत.  निट्शेने म्हटल्याप्रमाणे ''शतकानुशतकांचा शहाणपणाच नव्हे, तर वेडेपणाही आपणातून प्रकट होऊ लागतो.  वारसदार होणे धोक्याचे आहे.''

   

जे हाती घेतले होते ते मी पुरे करू शकलो नाही हे एका अर्थी बरेच झाले.  कारण पुरे झाले असते तर प्रकाशकाकडे ताबडतोब पाठवण्याचा मोह झाला असता.  त्या माझ्या लिखाणाकडे आता मी पाहिले की त्याची फारशी किंमत नव्हती हे मला दिसून येते.  त्यातील कितीतरी भाग निरस व शिळा, कंटाळवाणा वाटतो.  ज्या घटनांचे घडामोडींचे तेथे मी वर्णन केले आहे त्यांचे महत्व आज लुप्तप्राय झाले आहे.  अर्धवट विस्मृत अशा भूतकाळात त्यांना जवळजवळ मूठमाती मिळाली आहे.  नंतरच्या ज्वालामुखीच्या स्फोटांनी त्यांच्यावर लाव्हा पसरला आहे; धूळ, राख जमली आहे.  त्यांचे नावही उरले नाही.  त्या प्रश्नांची मलाही आता गोडी नाही.  ज्या व्यक्तिगत अनुभवांचे माझ्यावर अमर ठसे उमटलेले आहेत ते अनुभव तेवढे डोळ्यांसमोर उभे आहेत; काही व्यक्तींशी आलेले संबंध, काही विशिष्ट घटनांशी आलेले संबंध, जनसंमर्दाशी हिंदी जनतेशी आलेला संबंध, किती विविधता या हिंदी जनतेत, परंतु या विविधतेतही दिसून येणारी ती आश्चर्यकारक एकता- मनाची काही साहसे, दु:खशोकांच्या लाटा, आणि त्यांतून पुन्हा डोके वर काढल्यामुळे वाटणारा आनंद, सोडलेला सुटकेचा नि:श्वास, कामाची वेळ आली की भरलेल्या उत्साहाची धुंदी हे सारे मला आठवते.  यातील बर्‍याचशा गोष्टींबद्दल मनुष्य लिहिणारही नाही.  आपल्या काही भावना, काही विचार आपल्या जीवनाशी इतकी एकरूप झालेली असतात, आपले आंतरिक जीवन हे आपले स्वत:चे इतके खाजगी झालेले असते की, दुसर्‍याला त्याची आपण कल्पना देणार नाही, देऊ शकणारही नाही. असे असले तरी ते प्रत्यक्ष व्यक्तिगत किंवा अप्रत्यक्ष दुरूनचे असे जे संबंध, त्यांच्यात फार अर्थ असतो.  व्यक्तीवर त्यांचा मोठा परिणाम होत असतो.  जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीत, स्वत:च्या राष्ट्राकडे पाहण्याच्या, इतर देशांकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीत त्यामुळे फरक घडून येत असतात.  त्याच्या स्वत:च्या जीवनाला विशिष्ट आकार, वळण त्यामुळे मिळते.

इतर तुरुंगातल्याप्रमाणे या नगरच्या किल्ल्यातही मी बगिचाच्या कामात रंगलो.  कितीतरी तास मी या कामात घालवीत असे.  प्रखर ऊन पडलेले, सूर्य बराच वर आलेला, तरी माझे खणणे, फुलांसाठी वाफे करण्याचे काम चालू असे.  जमीन वाईट होती, मधून दगड लागे, पूर्वीच्या बांधकामांच्या वेळचे अवशेष-चुना, दगड, विटा लागत.  प्राचीन स्मारकांचे पडके अवशेषही तेथे होते.  कारण ही ऐतिहासिक जागा आहे.  गतकाळात येथे कितीतरी लढाया झाल्या, राजवाड्यातील खलबते झाली.  हा इतिहास काही हिंदुस्थानातसुध्दा फारसा जुना नाही, किंवा व्यपक दृष्टीने पाहिले तर त्या इतिहासाला फारसे महत्त्वही नाही.  परंतु तेथील एक प्रसंग डोळ्यांसमोर स्पष्ट उभा राहतो, तो कोण विसरेल ? त्या शूर सुंदर चांदबिबीच्या धैर्याचा विसर कसा पडणार ?  किल्ला लढवताना फौजेच्या आघाडीवर खुद्द हाती तलवार घेऊन तिने अकबराच्या बादशाही सैन्याशी मुकाबला केला आणि अखेर स्वत:च्याच एका माणसाकडून पुढे तिचा खून झाला.

अशा या अपेशी जागेत खणताना एकदा प्राचीन भिंतीचे अवशेष सापडले; खाली खोल गाडलेल्या इमारतींच्या घुमटांची शिखरे सापडली.  आम्ही फार खोल खणत गेलो नाही.  कारण हे आमचे पुराणवस्तुसंशोधन, हे खोल खणणे अधिकार्‍यांना पसंत नव्हते.  आणि ते संशोधन करण्याची साधनेही आमच्याजवळ नव्हती.  एकदा तर एका भिंतीवर दगडात खोदलेले सुंदर कमल आढळले.  कदाचित एखाद्या दारावरचे ते असेल.

मला डेहराडूनच्या तुरुंगातील एक आठवण आली.  तेथेही असाच शोध लागला होता.  परंतु तो काही इतका शुभ नव्हता.  तीन वर्षांपूर्वी त्या तुरुंगातील माझ्या अंगणात मी खणित असताना गतकाळातील एक चमत्कारिक अवशेष मला आढळला.  जमीनीच्या खाली खोलात दोन जुनाट खांब सापडले.  ते पाहून मनाला हुरहुर लागली की काय बरे होते हे ?  तीस चाळीस वर्षांपूर्वी फाशी देण्याची ती जागा होती.  पुढे या तुरुंगात फाशी देणे बंद करण्यात आले आणि फाशी देण्याच्या जागेवरील सर्व दृश्य खाणाखुणा नष्ट करण्यात आल्या होत्या.  परंतु त्या जागेच्या पायाचा आम्ही शोध लावला.  ते सारे दगड आम्ही उपटून फेकून दिले.  मला नि माझ्याबरोबरच्या कैद्यांना— ज्यांनी या उत्खननात भाग घेतला होता, त्या सर्वांना एक प्रकारचा आनंद होत होता.  त्या दुर्दैवी वस्तूंच्या खाणाखुणा आपण पार नष्ट केल्या असे वाटून एक प्रकारचे समाधान होत होते.

 

भूतकाळाचे ओझे

तुरुंगातील २१ वा महिना जवळ जवळ संपत आला.  चंद्राची क्षयवृध्दी चालली आहे.  लौकरच दोन वर्षे पुरी होतील.  माझा पुन्हा तुरुंगातील वाढदिवस येईल आणि मी वृध्द होत चाललो आहे याची मला आठवण देईल.  गेले चार वाढदिवस तुरुंगातच गेले, येथे व डेहराडूनच्या तुरुंगात.  मागील अनेक तुरुंगयात्रांत असे अनेक वाढदिवस गेले.  त्यांची आठवणही आता मला नाही; त्यांची संख्या मी विसरून गेलो.

हे जे गेले एकवीस महिने गेले, त्या काळात सारखे मनात येई की काहीतरी लिहावे.  आतून प्रेरणाही होई, परंतु त्याच वेळेस आतून नाखुषीही असे.  माझ्या पूर्वीच्या तुरुंगवासातून मी ज्याप्रमाणे एखादे नवीन पुस्तक घेऊन बाहेर आलो त्याचप्रमाणे याही वेळेस एखादे नवे पुस्तक लिहून बाहेर आणीन ही गोष्ट माझे मित्र धरून चालले आहेत.  ती एक सवयीची गोष्ट होऊन बसली आहे.

असे असूनही मी लिहिले नाही.  ज्या पुस्तकात विशेष काही अर्थ नाही असे एखादे पुस्तक भरकटून टाकायचे जिवावर येई.  लिहिणे फारसे कठीण नव्हते; परंतु लिहायला पाहिजे असे काहीतरी लिहिणे ही गोष्ट निराळी होती.  जग बदलत आहे; तुरुंगात मी माझे हस्तलिखित जवळ घेऊन बसलो आहे नि ते शिळे जुने होत आहे, ही गोष्ट मला नको होती.  चालू घडीला आज उद्या पुस्तक वाचले जावे, त्याऐवजी कधी काळी, कदाचित खूप वर्षांनी वाचकांना मिळायचे.  मी कोणासाठी लिहावे ? कोणत्या काळासाठी ? खरेच कोणासाठी बरे ?  कदाचित मी जे लिहीन ते प्रसिध्दही केले जाणार नाही.  कारण माझी जी वर्षे तुरुंगात चालली आहेत, जाणार आहेत, त्या काळात युध्दाची जी वर्षे गेली त्यात घडलेल्या घडामोडींपेक्षा उलथापालथींपेक्षा प्रचंड घडामोडी होण्याचा संभव आहे, मोठे संघर्ष होण्याची शक्यता आहे.  कदाचित हिंदुस्थानच रणक्षेत्र व्हायचे किंवा लोकक्षोभाचे येथे मोठे वादळ वाढायचे.

आणि समजा, असे काही न घडले, या सर्वांतून निभावलो, तरीही आता भविष्यकाळासाठी काही लिहिणे जरा धोक्याचेच आहे.  कारण आजचे प्रश्न त्या वेळेस उरलेलेही नसतील, त्यांना मूठमाती मिळाली असेल; आणि नवे प्रश्न उभे असतील.  आजच्या युध्दाकडे एक साधे महायुध्द, पूर्वीच्या महायुध्दांहून अधिक मोठे, अधिक भयंकर एवढ्याच दृष्टीने मी पाहू शकत नव्हतो.  हे युध्द सुरू झाल्यापासून, सुरू होण्याच्या पूर्वीपासूनच असे वाटे की, प्रचंड घडामोडी होतील, उत्पात होतील, क्रान्ती होईल.  एक भले वा बुरे नवे जग निर्माण होत आहे, वर येत आहे असे मनश्चक्षूंना दिसे; अशा परिस्थितीत मागे पडलेल्या पडद्याआड गेलेल्या काळासंबंधीचे माझे गरीब बापडे लिखाण त्याची कितीशी किंमत राहणार, त्याची काय मातब्बरी ?

असे हे विचार मनाला अस्वस्थ करीत आणि मला रोखीत.  शिवाय या विचारापाठीमागे मनाच्या खोल कपारी आत असे काही गंभीर विचार आले होते की, त्यांचे उत्तर मला सहजासहजी देण्यासारखे नव्हते.

माझ्या मागील तुरुंगवासात असेच विचार मनात येत, अशाच अडचणी समोर उभ्या राहात.  ऑक्टोबर १९४० ते डिसेंबर १९४१ पर्यंत डेहराडून जेलमधल्या त्या माझ्या जुन्या परिचित जागेत मी होतो.  त्यापूर्वी सहा वर्षे माझ्या आत्मचरित्राला आरंभ मी तेथेच केला होता.  परंतु या वेळेस लिहिणे जमेना.  जवळजवळ दहा महिने गेले.  मनाचा लय लागेना, लिहिण्याचे ठरेना.  वाचनात व खणण्यात मी माझा वेळ दवडी; मातीत खेळावे, फुलांशी खेळावे असे चाले.  परंतु अखेर मी लिहायला घेतले.  माझ्या आत्मचरित्रातील कथाच मी पुढे चालविली.  थोडेसेच आठवडे मी झपाट्याने सारखे लिहिले.  माझी सजा चार वर्षांची होती.  परंतु लिखाण पुरे होण्यापूर्वीच कितीतरी आधी मला सोडून देण्यात आले.

   

पुढे जाण्यासाठी .......