रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन

याच्या आधी काही दिवस रोममधील एका मित्राने मला लिहिले होते की, तुम्हाला भेटायला मुसोलिनीला आवडेल.  परंतु त्या वेळेस रोमला जाण्याचा माझ्यासमोर प्रश्नच नव्हता.  आणि त्या मित्रास त्याप्रमाणे मी कळविले.  नंतर विमानाने हिंदुस्थानात परत जाण्याचा मी विचार करीत असताना तोच निरोप थोडा अगत्याने, आग्रहपूर्वक आला.  परंतु ही मुलाखत मी टाळू इच्छित होतो.  तरी असभ्य नि अशिष्ट दिसायचीही मला इच्छा नव्हती.  एक प्रकारचा तिटकाराच होता.  परंतु सामान्य काळ असता, काही विलक्षण घडामोडी होत नसत्या तर तो तिटकाराही बाजूस ठेवून मुसोलिनी ही काय चीज आहे ते पाहायला मी गेलो असतो.  कारण ती जिज्ञासा मलाही होती.  परंतु त्याच वेळेस तिकडे अबिसीनियावर इटलीची स्वारी सुरू होती, आणि माझ्या भेटीपासून नानाप्रकारचे तर्क जगात काढण्यात आले असते यात शंका नाही.  फॅसिस्टांच्या प्रचारतंत्रात त्या गोष्टीचा खूप उपयोग केला गेला असता.  मी जरी मागून त्या गोष्टी नाकारल्या असत्या, असे काही झाले नाही असे म्हटले असते तरी त्याचा फारसा उपयोग मग नसतो.  इटली पाहायला गेलेल्या काही हिंदी विद्यार्थ्यांचा नि इतरही पाहुण्यांचा अशा रीतीने प्रचारासाठी उपयोग केला गेल्याचे मला माहीत होते.  त्यांच्या इच्छेविरुध्द नव्हे तर त्यांना न कळवता फॅसिस्ट प्रचारार्थ त्यांचा उपयोग केला गेला होता आणि १९३१ मध्ये इटॅलियन जर्नलमध्ये एक गांधीजींची मुलाखत खोटी प्रसिध्द झालेलीही माझ्या डोळ्यांसमोर होती.

मी माझ्या मित्राला, ''वाईट वाटते. येऊ शकत नाही.'' असे कळविले.  नंतर पुन्हा पत्र लिहिले.  टेलिफोनवरूनही सांगितले की, ''कृपा करून गैरसमज होऊ देऊ नका.''  हे सारे कमलाच्या निधनापूर्वी घडले होते.  तिच्या मृत्यूनंतर मी पुन्हा निरोप धाडला की, ''इतर काही कारणे असोत; परंतु कोणतीही मुलाखत घेण्याच्या मन:स्थितीत मी सध्या नाही.''

मी पुन:पुन्हा नकार पाठवीत होतो, कारण माझा विमानमार्ग रोमवरून होता.  एक संध्याकाळ नि एक रात्र रोममध्ये मला काढावी लागत होती.  जाताना वाटेवर रोम लागत होते व थोडा वेळ तेथे काढणे भाग होते म्हणून मी निक्षून नकार देत होतो.

माँट्रो येथे काही दिवस राहून मी जिनेव्हाला आलो नि तेथून मार्सेलिसला गेलो.  तेथे मी पूर्वेकडे जाणार्‍या विमानात चढलो व रोममध्ये तिसर्‍या प्रहरी उतरलो.  लगेच एक बडा अधिकारी खास लिफाफा घेऊन आला.  ते मुसोलिनीच्या मंत्रिमंडळाच्या प्रमुखाचे पत्र होते की, ''तुम्हाला भेटायला मुसोलिनींना फार आनंद होईल.  सायंकाळी सहाची वेळ भेटीसाठी ठरविली आहे.''  मी चकितच झालो.  मी पाठविलेल्या निरोपाची आलेल्या अधिकार्‍यास आठवण करून दिली.  परंतु त्याने आग्रह धरला की, सारे नक्की केले आहे, आता ते मोडून टाकता येणार नाही.  जर मुलाखत झाली नाही तर कदाचित आलेल्या त्या अधिकार्‍याला नालायक म्हणून काढूनही टाकण्यात आले असते.  ''वर्तमानपत्रात काही येणार नाही.  खात्री बाळगा.  तुम्ही चला.''  असा त्याने मला निर्वाळा दिला.  तो सांगे, ''मुसोलिनीला खुद्द स्वत: तुम्हाला भेटून तुमच्यावर आलेल्या दु:खद प्रसंगाबद्दल, त्याला स्वत:ला फार खेद वाटला आहे एवढेच बोलायचे आहे.''  असा त्या अधिकार्‍याचा व माझा अगदी सर्व शिष्टाचार संभाळीत एक तासभर वाद चालू होता.  आम्हा दोघांनाही त्या वादाचा होत असलेला त्रास क्षणोक्षणी वाढत होता.  त्या एका तासात मी तर अगदी थकून गेलोच, पण मला वाटते तो अधिकारी जास्तच थकला.  हे होता होता, नक्की ठरलेली भेटीची वेळ येऊन ठेपली, व माझ्या मनासारखे अखेर घडले.  मुसोलिनीकडे टेलिफोनवरून संदेश धाडण्यात आला की मी येऊ शकत नाही.

सायंकाळी मुसोलिनीस मी एक पत्र लिहिले की, ''आपण एवढा अगत्याने निरोप पाठवला पण माझा योग नव्हता याबद्दल फार खेद वाटतो.  आपण दाखविलेल्या सहानुभूतीबद्दल फार आभारी आहे.''

माझा प्रवास पुन्हा सुरू झाला.  कैरो येथे काही जुने स्नेही भेटायला आले होते.  नंतर पुन्हा पूर्वेकडे चाललो.  अनेक प्रसंगांत, प्रवासासंबंधी कराव्या लागणार्‍या अनेक कामांत आतापर्यंत माझे मन गुंतलेले होते.  परंतु कैरो सोडल्यावर तासचे तास त्या ओसाड वाळवंटावरून जात असता माझ्या मनाला आता कमला नाही, यापुढे आपण एकटेच, या भयंकर विचाराची एकदम मगरमिठी बसली व सारे शून्य, उदास वाटू लागले.  मी घरी एकटा परत जात होतो.  पण आता मला घर कसचे ?  पूर्वीचे का आता घर होते ?  माझ्या शेजारच्या करंडीत रक्षाकुंभ होता तेवढेच काय ते कमलाचे शिल्लक राहिले, आणि आमची दोघांची आशा-स्वप्ने मरून त्यांची ही राखच राहिली.  'यापुढे कमला नाही' 'यापुढे कमला नाही' हेच शब्द मन पुन्हा पुन्हा म्हणत होते.

मला माझे आत्मचरित्र, तो माझ्या जीवनाचा इतिहास आठवला.  भोवाली येथील आरोग्यधामात कमला होती तेव्हा तिच्या बरोबर या पुस्तकाविषयी मी चर्चा केली होती.  त्या वेळेस ती आत्मकथा मी लिहीत होतो.  एखादे प्रकरण काढून मी तिला वाचून दाखवीत असे.  ते सारे चरित्र तिने पाहिले नव्हते, सगळे ऐकलेही नव्हते व बाकी राहिलेले तिला कधी दिसायचे नव्हते.  जीवनाच्या ग्रंथात दोघांनी मिळून आणखी एखादे प्रकरण लिहिणे माझ्या भाग्यात उरलेलेच नाही.

बगदादला पोचल्यावर लंडनमधील माझ्या प्रकाशकांना मी तार दिली-पुस्तकाची अर्पणपत्रिका कोणाच्या नावावर ? ''कमला जी आज नाही''—

कराची आणि लोकांच्या झुंडी, ओळखीचे चेहरे आले.  शेवटी अलाहाबाद पोचून आम्ही तो अमोल करंडक घेऊन गंगेच्या धावत्या प्रवाहात शिरलो आणि रक्षा त्या पवित्र गंगामाईच्या स्वाधीन केली.

आमच्या कितीतरी पूर्वजांचे अवशेष तिने आतापर्यंत सागराकडे नेले असतील; आणि कितीतरीजणांची अखेरची यात्रा तिच्या प्रवाहाच्या कडेखांद्यावरून होईल.

 

मृत्यू
स्वित्झर्लंडमध्ये आल्याच्या फरकाने कमलाला नि मलाही बरे वाटले.  ती अधिक आनंदी दिसू लागली; व स्वित्झर्लंडमधील या भागात मी पूर्वी फिरलो होतो म्हणून हा भाग माझ्या चांगलाच परिचयाचा असल्यामुळे मलाही घरच्यासारखे सरावातले वाटले.  कमलाच्या प्रकृतीत तशी म्हणण्यासारखी सुधारणा नव्हती,  परंतु तत्काळ धोकाही नव्हता.  पुष्कळ दिवस ज्या स्थितीत ती होती त्या स्थितीतच तिचे आणखी काही दिवस जातील असे वाटे.  हळूहळू कदाचित प्रगती झाली असती.

परंतु दरम्यान मनाला हिंदुस्थानची सारखी टोचणी सुरू होती.  परत या म्हणून मित्रांचा आग्रह सुरू झाला.  माझे मन अस्वस्थ, बेचैन झाले, व देशाखेरीज दुसरे काही सुचेना.  तुरुंगवासामुळे गेली काही वर्षे राष्ट्रीय प्रश्नांपासून माझी फारकत झाली होती; सार्वजनिक कारभारात प्रत्यक्ष भाग मला घेता आला नव्हता.  आणि मी बंधने तोडायला अधीर झालो होतो.  लंडनला, पॅरिसला मी दिलेल्या भेटी, हिंदुस्थानातून आलेली बातमी, या सर्व गोष्टींमुळे मी माझे कवच फोडून पुन्हा बाहेर आलो.  आता पुन्हा कवचात जाणे शक्य नव्हते.

याबद्दल कमलाशी मी चर्चा केली व डॉक्टरांचा सल्ला घेतला.  ते म्हणाले, जायला हरकत नाही.  तेव्हा डच विमानाचे हिंदुस्थानात जायचे तिकीट मी काढून ठेवले.  फेब्रुवारी २८ ला मी लॉसेन सोडणार होतो.  असे हे सारे ठरले खरे, परंतु शेवटी मला दिसून आले की, मी कमलाला सोडून जाणे तिला मुळीच पसंत नव्हते.  तो विचार तिला सहन होत नव्हता.  तरीसुध्दा बेत बदला, रद्द करा असेही ती मला सांगू इच्छित नव्हती.  मी तिला म्हटले, ''मी लौकर येईन.  हिंदुस्थानात फार वेळ थांबणार नाही.  जास्तीत जास्त दोन-तीन महिने.  तुला जरूर वाटली तर मी त्याच्याहूनही लौकर येईन.  तार येताच एका आठवड्याचे आत विमानाने मी तुझ्याजवळ येईन.''

ठरलेल्या तारखेला आता चारपाचच दिवस होते.  जवळ बेक्स गावी इंदिरा शिकत होती.  ते शेवटचे दिवस एकत्र राहण्यासाठी म्हणून ती येणार होती.  डॉक्टर माझ्याकडे आले व त्यांनी सुचविले की तुमची निघण्याची तारीख ८-१० दिवस पुढे लोटा.  अधिक काही ते सांगत ना.  मी बरे म्हटले आणि नंतरच्या विमानात जागा ठेवली.

असे हे शेवटचे दिवस एकामागून एक सरत होते आणि कमला हळूहळू पार बदलून चालली होती.  प्रकृती होती तशीच होती.  निदान आम्हाला तरी तीत काही फरक दिसला नाही.  पण असे वाटे की ही अंतर्मुख होते आहे.  भोवती काय चालले आहे इकडे लक्ष फार कमी.  ती मला म्हणे, ''कोणी तरी मला बोलावते आहे, ते पहा कोणीतरी खोलीत येत आहे.''  परंतु मला तर कोणी दिसत नसे.  तिला मात्र आकार दिसत, आकृती दिसत.

फेब्रुवारीची २८ तारीख.  त्या दिवशी उजाडत कमला गेली.  इंदिरा व गेले काही महिने आमचे भरवशाचे मित्र व नित्याचे सोबती बनलेले डॉ. एम. आताल त्या वेळी तिच्याजवळ होते.  स्वित्झर्लंडमधील जवळच्या गावाहून काही दुसरे स्नेही आले.  लॉसेनमधील स्मशानभूमीत तिला आम्ही नेले.  एका क्षणात त्या सुंदर शरीराची, त्या सदैव प्रसन्न हसर्‍या चेहर्‍याची चिमूटभर राख बनली.  इतके चैतन्य, इतका उत्साह, इतके तेज सारे निघून गेले व राहिलेल्या नश्वराचा अवशेष एका लहानशा कुंभात मावला.

मुसोलिनी
लॉसेनमध्ये नि युरोपात ज्या बंधनामुळे मी होतो ते बंधन तुटले.  तेथे अधिक राहण्याची जरुरी नव्हती.  माझ्यामधील आणखीही अंत:स्थ काहीतरी खरोखर तुटले, त्याची जाणीव मला हळूहळू झाली.  कारण ते दिवस मला दु:खाचे गेले.  जणू अंधारमय होते.  माझे मन नीट काम करु शकत नसे.  काही दिवस एकमेकांच्या सोबत घालविण्यासाठी इंदिरा व मी माँट्रो येथे गेलो.

माँट्रो येथे असताना लॉसेन येथे असणारा इटॅलियन कॉन्सल माझ्या भेटीला आला.  तो मुसोलिनीचा सहानुभूतीचा खास संदेश घेऊन आला होता.  मला जरा आश्चर्य वाटले.  कारण मुसोलिनीची नि माझी कधी भेटगाठही झाली नव्हती, किंवा त्याच्याशी दुसर्‍या कोणत्याही प्रकारचा माझा संबंध नव्हता.  मी कॉन्सलला म्हटले, 'मी फार आभारी आहे असे परत कळवा.'

 

मनुष्याचे परस्पर-संबंध कसे असावेत हा प्रश्न किती महत्त्वाचा !  किती मूलगामी !  परंतु राजकारण नि अर्थकारण यांतच चर्चा व खडाजंगी करताकरता आपली सारी शक्ती खर्च होत जाते, आणि तो प्रश्न उपेक्षिलाच जातो.  भारताच्या नि चीनच्या प्राचीन संस्कृतीत या प्रश्नाकडे नीट लक्ष दिले जात असे.  या दोन्ही संस्कृती किती जुन्या, परंतु किती शहाण्या.  समाजात सर्वांनी कसे वागावे याचे आदर्श त्यांनी घालून दिले होते.  सामाजिक वर्तनाच्या विशिष्ट साच्याचा-नमुन्याचा-त्यांनी विकास केला होता.  त्यांच्या त्या आदर्शात चुका असतील, परंतु व्यक्तीला त्यांनी एक प्रकारचे स्थैर्य दिले होते, एक प्रकारची दृढता दिली होती, तोल ठेवला होता.  हिंदुस्थानात आज तो तोल सारा सुटला आहे, आणि इतर बाबतींत प्रगती करणार्‍या पाश्चिमात्य देशांत तरी तो कोठे आहे ?  जीवनात तोल असणे म्हणजे स्थाणू होणे तर नव्हे ?  प्रगतिपर फरक करायला समतोलपणा का विरोध करतो ?  प्रगती पाहिजे असेल तर का बेतालपणाच हवा ?  आणि समतोलपणा हवा असेल वर का प्रगती दूरच ठेवायला हवी ?  एका गोष्टीसाठी का दुसरीचा त्याग करायला हवा ?  समतोलपणा आणि अंतर्बाह्य प्रगती यांचा समन्वय आपणास करता आला पाहिजे.  प्राचीनांचे शहाणपण आणि अर्वाचीनांचे विज्ञान आणि सामर्थ्य यांचा मेळ आपण घातला पाहिजे.  जागतिक इतिहासाच्या अशा एका विशिष्ट टप्प्यावर आपण आज आलो आहोत की, असा मेळ जर आपण घालू शकलो नाही तर दोन्ही गोष्टी नष्ट होऊन सर्वनाश होईल.

१८३५ चा नाताळ
कमलाची प्रकृती सुधारू लागली होती.  तसा फार मोठा फरक पडला होता असे नव्हे.  परंतु काही दिवस फार चिंतेचे गेले तसे आता नव्हते.  मनाला थोडा धीर आला होता.  ताण थोडा कमी झाला होता.  आलेल्या धोक्यातून ती पार पडली.  प्रकृतीतील चढउतार जरा कमी झाले; आणि हीही एक प्रकारे प्रगतीच असे वाटले.  आणखी एक महिना अशाच स्थितीत तिने काढला.  तेवढ्यात इंदिरेसह मी इंग्लंडला उडत भेट देण्याची संधी साधली.  आठ वर्षांत मी तेथे गेलो नव्हतो.  आणि भेटून जा असा पुष्कळ मित्रांचा आग्रह सुरू होता, म्हणून गेलो.

मी बेडेनवेलरला परत आलो आणि पूर्ववत नित्याचा क्रम पुन्हा सुरू झाला.  हिवाळा सुरू होऊन जिकडेतिकडे बर्फाने पांढरेशुभ्र दिसे आणि कमलाची प्रकृती पुन्हा ढासळली.  पुन्हा आणीबाणीची-धोक्याची वेळ आली.  तिचे प्राण जणू एखाद्या तंतूवर टांगले होते.  जीव घुटमळत होता.  १९३५ सालचे ते अखेरचे दिवस.  बर्फातून, चिखलातून मी तिच्याकडे रोज जात होतो.  वाटे किती दिवस, किती घटका आणखी कमला राहणार ?  कोण सांगणार, कोणाला कळणार ?  सर्वत्र हिवाळ्यातील शुभ्र शांती होती.  बर्फाचा पांढरा कपडा पसरून झाकलेल्या वर्षाच्या शेवटच्या त्या शांत सृष्टीकडे पाहिले की मला मृत्यूच्या निश्चल शांततेचा भास होई व मला पूर्वी वाटत असलेली आशा लोपून मन खिन्न होई.

परंतु या आणीबाणीच्या प्रसंगालाही कमलाने तोंड दिले आणि तिचा जीव असा चिवट की ती त्यातूनही तगली.  पुन्हा ती बरी दिसू लागली; अधिकच उत्साही दिसू लागली.  मला येथून दुसरीकडे न्या असाही तिचा सारखा आग्रह होता.  त्या जागेचा तिला कंटाळा आला होता.  त्याला दुसरेही एक कारण होते.  त्या सॅनिटोरियममधला एक आजारी मनुष्य मरण पावला.  तो एक आयरिश मुलगा होता.  तो कधी कधी कमलाला फुले पाठवी, एकदोन वेळा तिला भेटायलाही आला होता.  कमलापेक्षा त्याची स्थिती पुष्कळच बरी होती.  त्याला फिरायची परवानगी होती.  परंतु तो अकस्मात गेला.  त्याच्या मरणाची बातमी कमलापासून लपवून ठेवण्याची आम्ही कोशीस केली.  परंतु आम्हाला यश आले नाही.  जे आजारी असतात, आणि विशेषेकरून ज्यांना दुर्दैवाने अशा 'धामात' राहणे भाग असते त्यांना जणू सहावे ज्ञानेंद्रिय येते व त्यांच्यापासून आपण जे लपवू पाहतो ते नेमके त्यांना या नव्या इंद्रियाकडून कळते.

जानेवारीत थोडे दिवस मी पॅरिसला गेलो होतो व तेथून लंडनलाही गेलो.  जीवन मला कर्मक्षेत्रात पुन्हा जोराने खेचू पाहात होते.  लंडनमध्ये मला बातमी कळली की, एप्रिलमध्ये भरणार्‍या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासाठी फिरून दुसर्‍यांदा माझी निवड करण्यात आली आहे.  मित्रांनी आधी सूचना दिलीच होती.  त्यामुळे ही गोष्ट मी अपेक्षितच होतो.  कमलाबरोबर मी ह्या गोष्टीची चर्चा केली होती.  माझ्यासमोर प्रश्न होता, की कमलाला तशा स्थितीत सोडून जावे का अध्यक्षपद नाकारावे.  ती मला राजीनामा देऊ देईना.  तिला थोडे बरे वाटत होते व आम्हा दोघांनाही वाटे की अधिवेशन संपल्यावर मला पुन्हा परत तिच्याकडे येता येईल.

१९३६ च्या जानेवारीच्या शेवटी कमलाला बेडेनवेलर येथून हलवून स्वित्झर्लंडमधील लॉसेन येथील आरोग्यधामात नेऊन ठेवले.

   

ज्या वेळेस आम्हाला एकमेकांची अत्यंत आवश्यकता होती, ज्या वेळेस आम्ही एकमेकांच्या इतकी जवळ आलो होतो, त्याच वेळेस नेमक्या दोन-दोन वर्षांच्या या दोन दीर्घ शिक्षा आड आल्या.  तुरुंगातील ते जाता न जाणारे दिवसच्या दिवस मी विचार करीत बसे.  आशा वाटे की खात्रीने एकत्र येण्याचा योग येईल.  आणि ही वर्षे तिने कशी दवडली ?  तिची काय स्थिती होती ?  मी कल्पना करू शकेन, परंतु नक्की सांगता येणार नाही.  कारण तुरुंगात ज्या भेटीगाठी होत किंवा बाहेर जो थोडा वेळ मिळाला, त्या वेळेस आम्ही नेहमीप्रमाणे नसू.  स्वत:ची वेदना, स्वत:चे दु:ख दुसर्‍याला कळू नये म्हणून आम्ही दोघे वरपांगी हसत असू, आनंदी रहात असू.  जणू काही नाही असे दाखवून नित्याप्रमाणे वर्तत असू.  परंतु तिच्या मनाला शांती नव्हती ही गोष्ट खरी.  कितीतरी गोष्टी तिच्या मनात होत्या, त्या तिला त्रास देत होत्या, सतावीत होत्या.  मी तिला साहाय्य देऊ शकलो असतो, पण कारागृहातून ते कसे होणार, किती जमणार ?

मानवी संबंधांचा प्रश्न

बेडेनवेलर येथे तासच्या तास जेव्हा मी एकटा असे तेव्हा हे व अशाच प्रकारचे अनेक विचार माझ्या मनात येत.  तुरुंगातील वातावरणाचा परिणाम अद्याप माझ्यावर होता.  मला तो झडझडून पटकन दूर टाकता आला नाही.  तुरुंगाची आता मला संवय झाली होती, आणि बाहेरही फार मोठा फरक नव्हता.  मी नाझी राज्यात होतो.  नाझी राजवटीचे अनेक प्रकार माझ्या सभोवती घडत होते.  मला त्या सर्व गोष्टींची चीड असे.  अर्थात माझ्या बाबतीत नाझी राजवट काही ढवळाढवळ करीत नव्हती.  काळ्या जंगलातील कोपर्‍यात त्या लहानशा खेड्यात नाझी राजवटीच्या फारशा खाणाखुणा नव्हत्या.

किंवा असेही असेल की माझे मन दुसर्‍याच गोष्टींना भरून गेले होते.  माझे सारे गतजीवन—भूतकालीन जीवनाचा सारा चित्रपट—माझ्यासमोर फिरत होता, आणि तेथे नेहमी कमला माझ्याजवळ सदैव उभी असलेली दिसे.  हिंदी स्त्रियांचे ती मला प्रतीक वाटे; हिंदी स्त्रियांचेच काय, स्त्री-जातीचेच ती प्रतीक वाटे.  कधी कधी हिंदुस्थानासंबंधीच्या माझ्या कल्पनांत आश्चर्यकारक रीतीने ती मिळून जाई, एकरूप होई.  हिंदुस्थान, प्रिय भारत देश !  आमचा दोघांचा आवडता देश !  तो कसाही असो.  त्याच्यात दोष असोत, दुबळेपणा असो, तरी तो आम्हाला प्रिय आहे.  हिंदुस्थान म्हटले म्हणजे काही तरी गूढ, काही तरी हाती न सापडणारे, हातून निसटणारे असे वाटे.  कमला मला अशीच नव्हती का ?  समजले होते का तिचे खरे स्वरूप मला ?  जाणले होते का मी तिला ?  आणि तिनेही मला ओळखले होते का ?  समजून घेतले होते का ?  मी एक विक्षिप्तच आहे.  माझ्यातही गूढता आहे, माझ्यामध्येही खोल असे काहीतरी आहे की, ज्याचा अंत मलाही अद्याप लागलेला नाही.  मी तरी माझ्यात खोल बुडी मारून कोठे संपूर्ण तलास लावला आहे ?  माझ्या या स्वरूपामुळे कमलाला माझी भीती वाटत असावी असे माझ्या मनात कधी कधी येत असे.  मूळचा माझा स्वभाव व लग्नाच्या वेळचाही स्वभाव असा काही होता की, नवरा म्हणून समाधानाने मला कोणी पत्करू नये.  काही बाबतीत कमला नि मी अगदी एकमेकांपासून निराळी होतो, परंतु असे असूनही काही गोष्टींत आमचे संपूर्ण साम्य होते.  परंतु एकमेकांना आम्ही पूरक नव्हतो.  एकाची जी उणीव ती दुसरा भरून काढू शकत नव्हता.  आमची प्रत्येकाची वेगवेगळी शक्तीच आमच्या परस्परसंबंधांच्या बाबतीत आमचा दुबळेपणा ठरे.  कधी कधी दोघांच्या मनांचे संपूर्ण ऐक्य होई, संपूर्णपणे दोघांचे जमे.  तर कधी केवळ अडचणीच असत.  आणि वस्तुस्थिती असेल तशी निमूटपणे घेऊन चालण्याचे सामान्य सांसारिकाचे जीवन, आम्हा दोघांनाही शक्य नव्हते.

हिंदुस्थानातील बाजारात आमची अनेक चित्रे विकायला मांडलेली असतात.  एका चित्रात आम्ही दोघे होतो.  शेजारी शेजारी उभी होतो. आमच्या चित्रांच्या खाली 'आदर्श जोडी' असे शब्द छापलेले होते.  आम्ही परस्परांस अनुरूप होतो.  आम्ही आदर्श दांपत्य होतो अशी पुष्कळांची कल्पना असे.  परंतु तो आदर्श सापडणे व सापडला म्हणजे पक्का धरून ठेवणे फार कठीण.  असे होते तरी मला आठवते की सिलोनमध्ये विश्रांतीसाठी गेलो असता मी कमलाला म्हटले, ''अनेक अडचणी आल्या, मतभेद झाले, तरी एकंदरीत आपण किती सुखी !  या जीवनाने आपणांस नानापरीने फसवले, आपल्या अनेक खोड्या केल्या; तरीही आपण एकंदरीत किती भाग्यवान !''  लग्न म्हणजे एक गुंतागुंतीची गोष्ट आहे; ही साधी गोष्ट नाही.  हजारो वर्षांच्या अनुभवानंतरही अद्याप लग्न म्हणजे एक कोडेच आहे.  कितीतरी मंगल विवाहांचे विध्वंस झालेले आम्ही सभोवती पाहात होतो.  जे आरंभी सोने वाटत होते त्याची माती झालेली अनेकांच्या संसारात आम्ही पाहिली होती.  त्या मानाने आम्ही खरेच किती सुखी !  किती दैवाचे !  मी हे सारे तिला सांगत होतो आणि तिलाही ते पटले.  कारण जरी आम्ही कधी कधी भांडत असू, एकमेकावर रागावत असू तरी प्रेमाची स्वयंभू ज्योत आम्ही कधी विझू दिली नाही.  जीवनात दोघांच्याही समोर नवीन नवीन साहसाचे प्रसंग येत, आणि एकमेकांचे नवीनच एखादे स्वरूप पाहण्याची संधी मिळून एकमेकांस समजून घेण्याची नवीनच अंतर्दृष्टी लाभे.

 

वडील बर्‍याच उशीरा आमच्यामध्ये नैनी तुरुंगात आले.  आम्हाला न कळलेल्या कितीतरी गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या.  कायदेभंगाच्या चळवळीचे ते मुख्य सूत्रधार होते.  देशभर स्त्रियांनी हा जो पुढाकार घेतला होता, ही जी नि:शस्त्र लढाई सुरू केली होती, त्या गोष्टीला वडिलांनी कोणत्याही प्रकारे मुद्दाम उत्तेजन असे दिले नव्हते.  त्यांना त्या गोष्टी तितक्याशा आवडतही नसत.  त्यांचे पितृहृदय होते आणि या बाबतीत जरा ते जुन्या वळणाचेच होते.  तरुण नि वृध्द स्त्रिया भर उन्हात रस्त्यारस्त्यांतून गोंधळ माजवीत आहेत, पोलिसांशी त्यांच्या झटापटी होत आहेत, ही गोष्ट त्यांच्या मनाला फारशी रुचत नव्हती.  परंतु जनतेची मनोवृत्ती, भावना त्यांनी ओळखली होती, आणि त्यांनी कुणालाही निरुत्साही केले नाही.  स्वत:ची पत्नी, स्वत:च्या मुली, स्वत:ची सून यांच्याही आड ते आले नाहीत.  देशभर स्त्रियांनी जो उत्साह, जे धैर्य, जी कार्यक्षमता दाखविली त्यामुळे आपण आश्चर्यचकित झालो, बरेही वाटले असे ते म्हणाले.  स्वत:च्या घरातील, कुटुंबातील मुलांविषयी तर ते अधिकच प्रेमाने नि अभिमानाने बोलले.

२६ जानेवारीला स्वातंत्र्यदिन येतो.  वडिलांनी सांगितल्याप्रमाणे १९३१ च्या २६ जानेवारीला देशभर हजारो सभा झाल्या.  त्या त्या प्रांतीय भाषांतून ठराव वाचला व स्वीकारला गेला.  हा ठराव हजारो सभांतून मंजूर झाल्यावर दहाच दिवसांनी वडील वारले.

तो ठराव बराच मोठा होता.  परंतु त्यातील काही भाग हिंदी स्त्रियांसंबंधी होता.  ''भारतीय स्त्रियांविषयी वाटणारा आदर नि कौतुक येथे आम्ही नमूद करून ठेवतो.  मातृभूमीच्या संकटकाळी घरे-दारे सोडून त्या बाहेर पडल्या; हिंदी राष्ट्रीय सैन्यातील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर त्याही उभ्या राहिल्या; त्यांचे धैर्य कधी खचले नाही, सहनशीलता संपली नाही; या लढ्यात, त्यागात नि विजयश्रीत भाग घ्यायला त्या पुरुषांच्या बरोबरीने आल्या ही केवढी धन्यतेची गोष्ट...''

या स्वातंत्र्ययुध्दात कमलाने केलेली कामगिरी बहाद्दुरीची, डोळ्यांत भरण्यासारखी होती.  अलाहाबाद शहरातील कामाची नीट आखणी करणे, संघटना करणे ही जबाबदारी अननुभवी अशा तिच्या खांद्यावर येऊन पडली होती.  जाणता असा, सर्वांना माहीत असा प्रत्येक कार्यकर्ता तुरुंगात होता.  परंतु कमला उभी राहिली.  अनुभवाची उणीव स्वत:च्या तेजाने, स्फूर्तीने नि उत्साहाने तिने भरून काढली.  थोड्याच अवधीत सार्‍या अलाहाबाद शहराच्या अभिमानाची ती मूर्ती बनली.  सार्‍या शहराला तिच्याविषयी अभिमान वाटू लागला.

माझ्या पित्याच्या आजारीपणाच्या नि मरणाच्या छायेत आम्ही पुन्हा एकमेकांस भेटलो.  एका नवीन भूमिकेवरून आम्ही एकमेकांस भेटत होतो.  एकाच कार्यात भाग घेतलेले, एकमेकांचे समजून घेतलेले आम्ही झालो होतो.  पुढे थोड्या दिवसांनी काही विश्रांती मिळावी म्हणून आम्ही सिलोनला गेलो.  बरोबर इंदिरा होती.  सुखविश्रांतीसाठी आम्ही एकत्र गेल्याची ती पहिलीच नि शेवटचीच वेळ !  सिलोनमध्ये असताना आपण एकमेकांस ओळखले असे आम्हाला वाटले, एकमेकांचे स्वरूप शोधले असे वाटले.  आता जो एक नवीन अती जवळचा असा संबंध निर्माण झाला होता त्याच्यासाठी इतकी वर्षे जणू आम्ही तयारी करीत होतो.

फार लौकर आम्ही परतलो.  मी कामात गुंतलो.  आणि नंतर पुन्हा तुरुंग.  आता पुन्हा एकत्र विश्रांतीसाठी जाणे नाही, किंवा एकत्र काम करणे नाही; एकत्र राहणेही नाही.  एकापाठोपाठ दोन दोन वर्षांच्या दोन शिक्षा आल्या.  त्या दोन शिक्षांच्या दरम्यान असा थोडासा वेळ जेमतेम मिळाला.  दुसरी सजा संपण्यापूर्वीच तिकडे कमला मरणशय्येवर पडली.

१९३४ च्या फेब्रुवारीत कलकत्ता येथील वॉरंटावरून जेव्हा मला अटक करण्यात आली त्या वेळेस कमला वरती आमच्या खोल्यांत गेली.  माझ्यासाठी कपडे गोळा करायला ती गेली होती.  तिचा निरोप घेण्यासाठी मीही तिच्या पाठोपाठ गेलो.  एकदम तिने मला मिठी मारली.  आणि तिला घेरी आली, ती पडली.  तिच्या बाबतीत पूर्वी असे कधी झाले नव्हते.  तुरुंगाच्या यात्रेकडे आनंदाने बघायला, एक रोजची गोष्ट अशा रीतीने बघायला आम्ही स्वत:ला शिकविले होते; त्याचा फारसा गाजावाजा आम्ही करीत नसू ; किंवा कसले प्रदर्शन करीत नसू.  परंतु आता असे का बरे झाले ?  आपली ही नित्याची, सर्वसाधारण अशी शेवटचीच भेट असे तिला भविष्य दिसले का काय ?

   

पुढे जाण्यासाठी .......