रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

प्रकरण ३ : युगायुगांतून

रोमन संस्कृतीच्या र्‍हासाप्रमाणे, नाटकातल्या प्रसंगात शोभण्यासारखा एकाएकी भारतीय संस्कृतीचा र्‍हास झाला नाही.  जो र्‍हास झाला तो हिशेबात घेतला तरीसुध्दा आपले स्वत्व टिकवून राखण्याची अजब चिकाटी या संस्कृतीने दाखविली आहे.  परंतु हळूहळू र्‍हास होत चालला असे दिसते.  ख्रिस्त शकाची पहिली हजार वर्षे संपली त्या सुमारास हिंदुस्थानातील सामाजिक स्थिती कशी होती याचे सविस्तर वर्णन देणे कठीण आहे.  परंतु हिंदुस्थानची आर्थिक स्थिती सुधारून संपत्ती वाढत जाण्याचे बंद होऊन आर्थिक व्यवस्थेचा संकोच या सुमारास दिसू लागला हे बव्हंशी निश्चित आहे.  जीवनाचे ठराविक साच्याचे प्रकार पाडण्यात आले,  प्रत्येकाचे त्या त्या धंद्यातील काम कायमचे ठरले.  त्यामुळे त्याला दुसर्‍या कामाकडे लक्ष देण्याचे कारण उरले नाही.  देशाच्या रक्षणासाठी फक्त क्षत्रियांनी लढावे, मरावे, इतरांचे त्यात लक्ष नसे, त्यांना तसे करण्याला बंदी होती.  म्हणून कोणाला उत्साहही वाटत नसे की देशासाठी जावे, मरावे.  ब्राह्मण आणि क्षत्रिय व्यापारधंदा करणे कमीपणा मानीत.  शिक्षण आणि पुढे येण्याच्या सोयी-सवलती खोलच्या वर्गास नाकारण्यात आल्या होत्या.  वरिष्ठ वर्णाशी नम्रतेने वागावे अशी त्यांना शिकवण असे.  लहानमोठ्या शहरांतून उद्योगधंदे होते; तरीही राजकीय सांगाडा एक प्रकारे सरंजामशाहीवृत्तीचाच होता.  युध्दतंत्रातही हिंदुस्थान जरा मागेच पडला.  अशा परिस्थितीत नवीन प्रगतीची शक्यता नव्हती.  ती समाजरचना बदलल्याशिवाय, बुध्दी व शक्तीचे नवीन झरे मोकळे केल्याशिवाय नवप्रगतीला वाव नव्हता.  परंतु असा फरक करायचा झाला तर चातुरर्वर्ण्य आडवे येई.  चातुरर्वर्ण्याने एके काळी या राष्ट्राला जरी स्थैर्य दिले, त्याच्यात काही गुण जरी असले, तरी विनाशाची बीजेही त्यात होती.

भारतीय चातुरर्वर्ण्याने भारतीय समाजाला आश्चर्यकारक स्थैर्य दिले हे नाकबूल करता येणार नाही.  (त्याचा अधिक ऊहापोह मी पुढे करीन.)  परंतु लहानलहान घटकांना व समूहांना जरी स्थैर्य व सामर्थ्य यांचा लाभ झाला, तरी विशाल एकीकरणाच्या मार्गात, प्रगतीच्या, प्रसरणाच्या मार्गात त्यामुळे अडथळेच येत.  चातुरर्वर्ण्य आणि धंदेवाईक जाती यामुळे व्यापारधंदा, कलाकौशल्य वाढले तरी त्या त्या जातीतच वाढले.  अशा प्रकारे ते ते विशेष धंदे वंशपरंपरागत झाले; त्यामुळे नवीन नवीन उद्योगधंदे, नवीन नवीन व्याप यांच्याकडे लक्ष राहिले नाही.  तो जो आपल्या चाकोरीत फिरत राही. संशोधनवृत्ती, नावीन्याची आवड, नवीन आरंभ यांचे कोठेच दर्शन होईना.  मर्यादित क्षेत्रात एक प्रकारचे स्वातंत्र्य होते, परंतु त्यासाठी व्यापक व विस्तृत स्वातंत्र्याची किंमत द्यावी लागली; समाजातील खालच्या पातळीवर कोट्यवधी लोकांना कायमचे ठेवावे लागले.  विकासाची, वाढ करून घेण्याची कोणतीही संधी वा सोय त्यांना राहिली नाही.  जोपर्यंत वर्णव्यवस्थेने विकासाला, वाढीला, प्रगतीला वाव दिला, क्षेत्र दिले तोपर्यंत वर्णव्यवस्थेचा उपयोग होता, तोपर्यंत त्यांच्यातील प्रगतिपरत्व कायम होते.  परंतु त्या मर्यादेतील विकासाच्या व वाढीच्या परम सीमा गाठताच, त्या व्यवस्थेला अर्थ राहिला नाही, त्या अवस्थेत प्रगतिपरत्व राहिले नाही, एक प्रकारची स्थाणुता आली.  शेवटी तर प्रगती दूर होऊन परागती मात्र होऊ लागली.

यापुढे जिकडे पाहाल तिकडे र्‍हासच दिसेल, अवनतीच दिसेल.  बौध्दिक, तत्त्वज्ञानात्मक, राजकीय, युध्दाच्या तंत्रात व पध्दतीत बाह्य जगाचे ज्ञान आणि त्यांच्याशी संबंध ठेवणे यात, सर्वच बाबतीत अवकळा आली.  आखिल भारतीय अशी दृष्टीच राहिली नाही, आर्थिक पसारा थांबला.  स्थानिक, प्रादेशिक भावना, सरंजामशाही आणि आपल्या लहान जातीकुळीपुरते पाहण्याच्या भावना मात्र वाढल्या.  परंतु इतकेही झाले तरी पुढील काळात असे पुन्हा दिसून आले की, या प्राचीन व्यवस्थेत अद्यापही जिवंतपणा होता; आश्चर्यकारक चिकाटी होती; तसेच काही लवचिकपणा व परिस्थितीशी, नव्या जमान्याशी जुळवून घेण्याची वृत्तीही शाबूत होती.  यामुळे पुन्हा तिला जीवन मिळाले.  नवीन संबंधामुळे पुन्हा काही दिवस स्फूर्तीची लाट उसळली; काही बाबतींत प्रगतीही झाली; विचारांतही नवीनता आली.  परंतु भूतकाळातील शेकडो प्रकारची बंधने प्रगतीच्या प्रवाहाला पदोपदी अडथळे आणित होती, प्रगती खुंटवीत होती.

**********

 

प्रत्येक सुधारणासंपन्न जीवनपध्दतीच्या इतिहासात र्‍हासाचे, विनाशाचे काळ येतात आणि हिंदी इतिहासातही यापूर्वी असे काळ येऊन गेले होते, परंतु भारत त्यांना पुरून उरला, त्याला पुन्हा नवयौवन लाभले...केव्हा केव्हा त्याला अंग चोरून कवच घालावे लागे.  परंतु काही काळाने त्याला नवा दम येऊन तो कवच सोडून मोकळा वावरू लागे.  अंत:स्फूर्तीचा गाभा जसाच्या तसा कायम राहून त्याच्या जोरावर तो नवे संबंध जोडून नव्याने वाढू लागे व त्याच्या पूर्वीच्या रूपात फरक पडत असला तरी मूळ गाभ्याचा संबंध पक्का राही.  नवीनाला आत्मसात करणे, त्याच्याशी जुळवून घेणे ही मनाची लवचिक ठेवणे, विकासक्षमवृत्ती, भारतात उरली नव्हती काय ? ज्या या विशेष वृत्तीमुळे अनेक आपत्तींतून आतापर्यंत भारत वाचला होता, ती शक्ती आता नष्ट झाली होती काय ?  सामाजिक वर्णभेद उत्तरोत्तर कडक होत गेल्यामुळे, वेगवेगळी धर्ममते, हटवादी झाल्यामुळे भारतीयांची मनोवृत्तीही निर्जीव, कडक झाली काय ?  कारण जीवनाची उत्क्रांती, वाढ खुंटताच विचाराची वाढही खुंटते.  तोपर्यंत हिंदुस्थान म्हणजे आचाराने सनातनी परंतु विचाराने प्रक्षोभक आणि क्रांतिकारक असे मोठे विचित्र मिश्रण होते.  अर्थात त्या नवविचाराचा शेवटी आचारावर परिणाम होईच; परंतु हे भारतीय पध्दतीने होई.  भूतकालाविषयी अनादर न दाखविता जुन्यात नवीन दाखल होई.  ''डोळे जरी प्राचीन वाक्याकडे, शब्दाकडे असले तरी बुध्दी त्यात नवीन अर्थ पाही; आणि यामुळे हिंदुस्थानचे स्वरूप सदैव बदलत आले आहे.''  असे फ्रेंच पंडित म्हणतात.  परंतु विचारातील प्रक्षोभशक्ती नष्ट होताच, सर्जनशक्ती मावळताच केवळ जुनाट अर्थहीन आचाराला, रूढीलाच महत्त्व येऊन, बुध्दी त्या आचाराची गुलाम झाली, जरा काही नवीन दिसले, तर त्याला बाऊ वाटू लागला.  जुनी वचने पोपटाप्रमाणे बडबडणे एवढेच उरले.  असे होऊ लागून जीवनाचे साचीव डबके बनले व स्वत:च निर्माण केलेल्या तुरुंगात जीवन कैदी होऊन पडले.

सुधारणासंपन्न जीवनपध्दती एकाएकी कोलमडून पडल्याची अनेक उदाहरणे जगाच्या इतिहासात आहेत.  सर्वांत प्रमुख उदाहरण म्हणजे रोमच्या पाडावानंतर कोलमडून पडलेल्या प्राचीन रोम संस्कृतीचे देता येईल.  उत्तरेकडून हल्ले येऊन पडण्यापूर्वीच रोम स्वत:च्या दौर्बल्यामुळे पडण्याच्या बेतातच आले होते.  ते आतून पोखरलेले होते.  एके काळी विकासोन्मुख असणारी त्याची अर्थव्यवस्था गडगडली होती.  वाढता पसारा संपुष्टात येत होता, आणि त्याच्या पाठोपाठ मग अनेक अपरिहार्य आपत्ती आल्या.  शहरातील उद्योगधंदे बसले; भरभराटलेली मोठमोठी शहरे दरिद्री आणि छोटीछोटी झाली. सुपीकपणाही कमी झाला.  वाढत्या अडचणींना पायबंद घालण्यासाठी सम्राटांनी हरप्रयत्न करून पाहिले.  व्यापारी, कारागीर, कामगार यांना सक्तीने ती ती कामे, ते ते उद्योग करायला भाग पाडण्यात आले.  पुष्कळ कामगारांना आपल्या विशिष्ट धंद्याबाहेरच्या लोकांशी लग्न करण्याची बंदी करण्यात आली.  अशा रीतीने काही काही धंद्यांचे जातीत परिवर्तन करून बघण्यात आले.  शेतकरी गुलाम झाले; त्यांना केवळ राबणारे करण्यात आले.  परंतु र्‍हास थांबविण्यासाठी योजलेले हे सारे उपाय फोल ठरले, एवढेच नव्हे तर, परिस्थिती अधिकच बिघडली, आणि शेवटी रोमन साम्राज्य रसातळाला गेले.

 

वाङ्मयातील भवभूती हा शेवटचा तेजस्वी तारा आठव्या शतकात झाला.  नंतरही ग्रंथलेखनाचे कार्य सुरू दिसते.  परंतु त्यातील भाषाशैली कृत्रिम व अवघड झालेली आहे, सहजता कोठेही नाही; विचारांचा ताजेपणा नाही, शैलीत अभिनवता नाही.  गणितात दुसरे भास्कराचार्य हे शेवटचे मोठे नाव.  ते बाराव्या शतकात झाले.  कलेच्या बाबतीत हॅव्हेलच्या मते चौदाव्या शतकापर्यंत जिवंतपणा टिकला होता.  तो म्हणतो सातव्या-आठव्या शतकापर्यंत कलेच्या आविष्कारणाचे स्वरूप पूर्णपणे परिणत झालेले नव्हते.  याच काळात मोठमोठी लेणी, चित्रकामे निर्माण झाली.  सातव्या-आठव्या शतकापासून तो चौदाव्या शतकापर्यंत भारतीय कलेचा विकासकाल होय, याच काळात युरोपात गॉथिक कला कळसाचा पोचली.  सोळाव्या शतकात प्राचीन भारतीय कलेतील सर्जनशक्ती संपुष्टात येत चालल्याचे स्पष्टपणे दिसून येऊ लागले.  हॅव्हेलचे म्हणणे कितपत यथार्थ आहे ते मला माहीत नाही.  परंतु कलेच्याही बाबतीत जर कोणी प्राचीन परंपरा पुढे चालविली असेल तर ती उत्तरेपेक्षा दक्षिण हिंदुस्थानानेच जास्त काळ चालविली.

वसाहतींसाठी शेवटचा मोठा हिंदी प्रयत्न नवव्या शतकात झाला, तो दक्षिणेकडूनच झाला.  नंतरही चोल राजे अकराव्या शतकापर्यंत प्रभावी समुद्रसत्ताधारी होते.  श्रीविजयाचा त्यांनी पराजय करून त्याला जिंकून घेतले होते.

ह्याप्रमाणे हा भारतदेव वाळत चालला, काही नवे निर्माण करण्याला त्याला बुध्दी किंवा शक्ती उरली नाही.  हा वाळत जाण्याचा रोग हळूहळू कैक शतकांपर्यंत चालला होता.  तो प्रथम उत्तरेकडे लागला व शेवटी दक्षिणेपर्यंत पसरला.  हा राजकीय र्‍हास होण्याची, संस्कृतिप्रवाह थांबून डबके होण्याची कारणे कोणती असतील ?  व्यक्तीप्रमाणेच संस्कृतीलाही घेरणारा काळाचा प्रभाव हे एकच कारण असेल काय, का भरती-ओहोटीत एखादी लाट येते व जाते तसे झाले असेल ?  का देशाबाहेर घडलेल्या काही घटना किंवा प्रत्यक्ष या देशावर झालेल्या आक्रमणामुळे हा प्रसंग आला ?  राधाकृष्णन म्हणतात की, राजकीय स्वातंत्र्य लोपल्यामुळे हिंदी तत्त्वज्ञानातील तेज गेले.  सिल्व्हा लेव्हीही म्हणतात, ''हिंदी स्वातंत्र्याबरोबरच आर्यसंस्कृतीही संपली; नवीन वाङ्मये आली, त्यांनी हल्ले चढवून गीर्वाण संस्कृतीची हकालपट्टी केली, आता ती महाविद्यालयांचा आधार घेऊन राहिली आहे.  एक प्रकारच्या पंडिती वातावरणात ती वावरत आहे, जनतेशी संबंध उरला नाही.''

हे सारे खरे आहे, कारण राजकीय स्वातंत्र्य नष्ट झाले तर सांस्कृतिक र्‍हासाला अपरिहार्यपणे आरंभ होतोच.  परंतु राजकीय स्वातंत्र्य तरी का गेले ?  काहीतरी रोजबीज कोठे तरी शिरले होते म्हणूनच की नाही ?  कोठेतरी अवकळा सुरू झालीच होती.  एखाद्या लहान देशावर बलाढ्य शत्रूने आक्रमण केले तर तो देश गुलाम होणे अपरिहार्य असते.  परंतु हिंदुस्थान म्हणजे केवढा देश, किती पुढारलेला, सुधारलेला, त्याची थोर संस्कृती असे असूनही परकीय आक्रमणासमोर तो टिकाव धरू शकला नाही याचा अर्थ हाच नाही का की कोठेतरी अंतर्गत विनाशबीजे होती ?  किंवा आक्रमकाजवळ तरी अधिक प्रभावी युध्दतंत्र असले पाहिजे.  परंतु ख्रिस्त शकाच्या पहिल्या हजार वर्षांनंतर अंतर्गत नाशाची चिन्हे स्पष्ट दिसू लागलीच होती.

   

परंतु उत्तरेचे आता जरी तितके प्रभुत्व राहिले नसले, पूर्वीचे स्थान उरले नसले, नाना छोट्या राज्यांत सारी उत्तर जरी विभागली गेली असली, तरीही उत्तरेकडचे जीवन अद्याप समृध्द व सुसंस्कृत राहिले होते.  सांस्कृतिक आणि तत्त्वज्ञानात्मक चळवळींची कितीतरी केंद्रे उत्तर हिंदुस्थानात होती.  पूर्वीप्रमाणे अजूनही काशी हे धार्मिक व तत्त्वज्ञानात्मक विचारांचे केंद्र होते व जो कोणी नवीन सिध्दान्त मांडी, एखादा नवीन विचार सांगे, त्याला प्रथम काशीत जाऊन ते सिध्द करावे लागे.  तसेच बौध्दधर्मीय आणि ब्राह्मणधर्मीय ज्ञानाचे काश्मीरही पुष्कळ वर्षे माहेरघर होते.  उत्तर हिंदुस्थान मोठमोठी विद्यापीठे भरभराईत होती, त्यांपैकी नालंदा विद्यापीठाची कीर्ती देशभर होती.  तेथील अध्ययन-अध्यापनाची मोठी ख्याती होती.  नालंदाला अध्ययन झालेला म्हणजे मोठा विद्वान व सुसंस्कृत मानला जाई.  त्या विद्यापीठात प्रवेश मिळणे सोपे नसे, कारण काही एका विशिष्ट दर्जाचे ज्ञान ज्याच्याजवळ असेल त्यालाच तेथे प्रवेश मिळे.  निरनिराळ्या विषयांत पारंगत होण्याची तेथे सोय होती.  चीन, जपान, तिबेट येवढेच नव्हे, तर असे सांगतात की कोरिया, मंगोलिया, बुखारा येथूनही विद्यार्थी नालंदा येथे येत.  बौध्दधर्म आणि ब्राह्मणधर्म या दोहोंचे धार्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक शिक्षण तेथे मिळेच, परंतु इतरही अनेक भोतिक विषयांचे, व्यावहारिक विद्यांचे शिक्षण तेथे देण्यात येई.  तेथे कला मंदिर होते, शिल्पकलेचे खाते होते, आयुर्वेदाची शाखा होती; शेतकी शिक्षण होते, दुग्धालय होते, पशुसंवर्धन शाळा होती.  विद्यापीठात सारे बौध्दिक वातावरण असे.  मोठमोठ्या चर्चा चालत, खंडन-मंडणाच्या खडाजंगी होत.  भारतीय संस्कृतीच्या बाहेरच्या जगात जो प्रसार झाला त्याचे श्रेय नालंदातून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना बरेचसे आहे.

दुसरी महत्त्वाची विद्यापीठाची जागा म्हणजे विक्रमशीला.  हे विद्यापीठ बिहारमधील हल्लीच्या भागलपूरजवळ होते.  काठेवाडात वल्लभी येथेही एक मोठे विद्यापीठ होते.  गुप्तकाळात उज्जयिनीचे विद्यापीठ चांगलेच भरभराटले होते.  दक्षिणेकडे अमरावतीचे विद्यापीठ विख्यात होते.

परंतु पहिल्या हजार वर्षांचा हा काळ संपत आला तेव्हा त्या सुधारणासंपन्न जीवनपध्दतीचा सायंकाळ जवळ आला असे वाटू लागले.  प्रभातकाळची प्रभा लोपून दूर गेली.  मध्यान्हही उलटून गेला होता.  तिसरा प्रहर सुरू होता.  दक्षिणेकडे अजूनही चैतन्य होते,  उत्साहशक्ती होती, ती काही शतके राहिली.  हिंदी वसाहतींतून ख्रिस्त शकाच्या दुसर्‍या हजार वर्षांच्या थेट मध्यापर्यंत समाजाचे जीवन जोरात चालले होते, वाढत होते, पण त्यांना ताजे रक्त पुरविणारे हृदय, भारत निर्जीव झालेला, नाडीचे ठोके मंद झालेले दिसतात.  आणि हळूहळू त्यामुळे सार्‍या अवयवांवरच अवकळा आणि प्रेतकळा आली.  आठव्या शतकातील शंकाराचार्यांनंतर तत्वज्ञानात थोर पुरुष कोणी दिसत नाही.  नंतरचे सारे भाष्यकार, टीकाकार व वादपंडित तसे पाहिले तर शंकराचार्यसुध्दा दक्षिणेकडचेच.  जिज्ञासूवृत्तीचा लोप होऊन, बुध्दीची संशोधनात्मक वृत्ती जाऊन, तेच तेच ठरवी घटापटाचे तर्कशास्त्र, वांझोटे वादविवाद काय ते सुरू राहिलेले दिसतात.  बौध्दधर्म आणि ब्राह्मणधर्म- या दोहोंचाही अध:पात झाला व शेकडो प्रकारचे क्षुद्र पूजाप्रकार रूढ झाले, विशेषत: शाक्तांचे बीभत्स प्रकार, तांत्रिकांचे वाममार्ग, योगशास्त्राची विकृत रूपे ठायी ठायी दिसू लागली.

 

परंतु या सुवर्णकालाची समाप्ती होण्याच्या आधीच भारतीय जीवनातील र्‍हासाची आणि दौर्बल्याची लक्षणे दिसू लागली होती.  वायव्येकडून श्वेत हूणांचे पुन:पुन्हा हल्ले येत होते; त्यांचा सारखा मोड करण्यात येत होता.  परंतु त्यांच्या लाटा थांबत नव्हत्या, हळूहळू उत्तर हिंदुस्थान कुरतडीत ते येतच होते.  जवळ जवळ पन्नास वर्षे उत्तरेचे ते अधिराजेही होते.  परंतु मध्यभारतातील राजा यशोवर्मा आणि गुप्त घराण्यातील शेवटचा मोठा राजा व इतरही राजे यांनी एक होऊन हूणांवर निकराचा सामुदायिक हल्ला केला आणि हूणांना हिंदुस्थानातून हाकलून लावले.

परंतु या दीर्घकालीन झगड्यामुळे हिंदुस्थान राजकीय व लष्करी दृष्ट्या दुबळा होतो.  हूणांचे अनेक जथे उत्तर हिंदुस्थानभर ठायी ठायी वस्ती करून राहिले, त्यांच्यामुळे भारतीय जीवनात एक अंतर्गत क्रांती झाली.  हे ठिकठिकाणचे हूण पूर्वीप्रमाणे आत्मसात केले गेले हे खरे, परंतु इंडो-आर्यन जनतेची जुनी ध्येये या हूणांच्या परिचक्रांमुळे दुबळी झाली.  हूणांच्या इतिहासावरून दिसते की हूण हे अती क्रूर आणि रानटी होते, व त्यांचे एकंदर वर्तन हिंदी रणनीती, राजकीय नीती यांच्या अगदी विरुध्द होते.

सातव्या शतकात, राजा हर्षाच्या काळात पुन्हा राजकीय व सांस्कृतिक वैभवाची मोठी लाट आलेली दिसते.  पुनरुज्जीवन, नवयुग सर्वत्र दिसू लागले.  गुप्तकाळातील वैभवशाली राजधानी जी उज्जयिनी, ती पुन्हा कला, संस्कृतीचे माहेरघर बनली.  प्रबळ प्रतापी राज्याची राजधानी झाली.  परंतु हा उत्कर्ष, ही भरभराट फार वेळ राहात नाही.  पुढच्या शतकात पिछेहाट दिसते, व ते सारे हळूहळू क्षीण होऊन, अखेर लय पावते.  नवव्या शतकात गुजराथचा मिहिर भोज राजा पुढे येतो.  मध्य व उत्तर हिंदुस्थान तो पुन्हा एकसत्तेखाली आणून कनोज राजधानी करतो.  पुन्हा एक साहित्यिक पुनर्जन्म दिसतो.  त्यात राजशेखराची मध्यवर्ती मूर्ती उभी राहते.  पुन्हा अकराव्या शतकाच्या आरंभाला दुसरा एक प्रतापी, लक्षात घेण्यासारखा, भोजराजा उदयाला येतो, आणि उज्जयिनी पुन्हा मोठी राजधानी होते.  हा भोजराजा अभिनव होता.  अनेक क्षेत्रांत त्याने नाव मिळविले आहे.  तो व्याकरणकार आणि कोशकार होता, आयुर्वेद व ज्योतिर्विद्या यांतही त्याची गती होती.  त्याने पुष्कळ वास्तुनिर्मिती केली.  कला व साहित्य यांचा तो पुरस्कर्ता होता.  तो स्वत: कवी आणि लेखक होता.  अनेक ग्रंथ त्याच्या नावावर आहेत.  त्याचे नाव नाना दंतकथा व आख्यायिका यांत प्रचलित आहे.  राजा भोजाच्या कथा बहुजनसमाजात सर्वत्र आहेत.  विद्वत्ता, उदारता, मोठेपणा याचे, त्याचे नाव म्हणजे प्रतीक आहे.

आशेला जागा म्हणून इतिहासातल्या ह्या काळात मधूनमधून हे भाग दिसत असले तरी एकंदरीत कसल्यातरी अंतस्थ क्षयाने भारत पछाडला होता व त्याने आलेले दौर्बल्य राजकीय क्षेत्रापुरतेच नसून सर्व निर्माणशक्तींना ते मारू बघत होते.  अमूक एका काळापासून हा र्‍हास, ही अवनती सुरू झाली असे सांगता येणार नाही, कारण हा रोग हळूहळू सगळ्या देशभर पसरत होता.  उत्तर हिंदुस्थानला या रोगाने दक्षिण हिंदुस्थानच्या अगोदर ग्रासले.  दक्षिण हिंदुस्थान तर राजकीय व सांस्कृतिक दृष्ट्या या काळात अधिक सरसावून महत्त्वाचा बनला.  लढणार्‍या परकीय लोकांना पुन:पुन्हा तोंड देताना उत्तरेवर जो ताण पडला, तो दक्षिणेकडे पडला नव्हता हे याचे कारण असावे; तसेच उत्तरेकडून अनेक लेखक, कलावान, शिल्पी, कारागीर हे दक्षिणेकडे गेले असावेत, कारण उत्तरेपेक्षा दक्षिण अधिक सुरक्षित होती.  दक्षिणेकडे या वेळेस प्रतापी राज्ये होती.  त्यांच्या वैभवशाली दरबारांची वर्णने ऐकून हे गुणी लोक आधार मिळावा म्हणून दक्षिणेकडे आले असावेत, कारण त्यांच्या निर्माणशक्तीला तेथे वाव होता, संधी होती.

   

पुढे जाण्यासाठी .......