रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१)

अशा रीतीने स्वतंत्र मतदारसंघामुळे जे वर्ग किंवा ज्या जातिजमाती आधीच मागासलेल्या व शक्तिहीन होत्या, त्या अधिकच शक्तिहीन झाल्या.  अलगपणाची वृत्ती वाढली.  राष्ट्रीय ऐक्य कठीण होऊ लागले.  स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे लोकशाही नाकारण्याचाच प्रकार होता.  अत्यंत प्रतिगामी स्वरूपाचे नवीन मिरासदार वर्ग त्यामुळे निर्माण झाले.  पात्रता कमी झाली; आणि सर्वांना समान अशा आर्थिक प्रश्नाकडून दुसर्‍याच गोष्टीकडे लोकांचे लक्ष जाऊ लागले.  प्रथम मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.  पुढे दुष्ट प्रथा वाढतच चालली.  इतर अल्पसंख्य जाती आणि वर्ग यांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आणि हिंदुस्थान हा अलग अलग विभागांचे एक शतखंड राष्ट्र झाले.  क्षणभर या अलग मतदारसंघांमुळे काही भले झाले असेल, मला तर ते अर्थात कोठे दिसत नाही; परंतु हिंदी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या स्वतंत्र मतदारसंघामुळे प्रचंड हानी झालेली आहे ही गोष्ट मात्र खरी.  एकांडे शिलेदारीचे सारे प्रकार, अलगपणाच्या सर्व प्रकारच्या कल्पना यातून वाढल्या आहेत आणि हिंदुस्थानचे तुकडे करण्याच्या मागणीपर्यंत मजल आली आहे.

स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आले तेव्हा लॉर्ड मोर्ले हे भारतमंत्री होते.  त्यांनी विरोध केला.  परंतु हिंदुस्थानच्या बड्या लाटांच्या पुढे त्यांनी शेवटी मान तुकविली.  या पध्दतीतील धोके त्यांनी आपल्या रोजनिशीत दाखविले आहेत, आणि हिंदुस्थानात प्रातिनिधिक संस्थांच्या वाढीला त्यामुळे कसा विलंब होईल तेही त्यांनी सांगितले आहे.  परंतु व्हाईसरॉय आणि त्यांचे सहकारी यांना बहुधा हेच नेमके हवे होते.  हिंदी घटनात्मक सुधारणांच्या अहवालात (१९१८ मधील माँटेग्यु-चेम्सफर्ड अहवाल) पुन्हा एकदा जातीय मतदारसंघातील धोके स्पष्टपणे जोर देऊन सांगण्यात आले आहेत.  ''नाना धार्मिक पंथ किंवा वर्ग यांच्या आधारावर विभागणी करणे म्हणजे परस्परविरोधी राजकीय दले निर्माण करणे होय; अशाने नागरिक वृत्ती शिकवली जाण्याऐवजी जातीय आणि पाक्षिक भावनाच अधिक शिकवली जाते.  स्वयंशासनाच्या तत्त्वाच्या वाढीला जातीय मतदारसंघाची पध्दत अत्यंत विघातक आहे असे आमचे मत आहे.''

 

या क्रांतिकारक विचारांचा मुस्लिम तरुणांवरही परिणाम हात होता.  अलीगढ कॉलेजने या वृत्तिप्रवृत्ती दडपून टाकण्याची खूप खटपट केली.  राष्ट्रीय सभेपासून मुसलमानांस अलग ठेवण्यासाठी आणि त्यांना स्वतंत्रपणे राजकीय प्रचारकार्य करता यावे म्हणून आगाखान व इतर मंडळींनी मुस्लिम लीग स्थापिली.  परंतु अती महत्त्वाची आणि हिंदुस्थानच्या भविष्यकालीन घडामोडींवर अपार परिणामकारक गोष्ट म्हणजे मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आले.  अत:पर मुसलमानांच्या स्वतंत्र मतदारसंघामार्फतच मुसलमानांचे प्रतिनिधी निवडले जाणार आणि मुसलमानांसाठी मुसलमान उमेदवारच असायला हवेत असे ठरविण्यात आले.  मुसलमानांभोवती एक प्रकारचे राजकीय कुंपण घालण्यात आले.  इतर हिंदुस्थानापासून त्यांना अलग करण्यात आले.  शतकानुशतके एकीकरणाची जी गोष्ट घडत येत होती, नवीन यांत्रिक कारखानदारीमुळे जे एकीकरण व्हायला झपाट्याने मदत झाली होती, ते एकीकरण आता कसे होणार ?  ती सारी क्रिया आता विरुध्द दिशेने होऊ लागली.  प्रथम हे राजकीय कुंपण लहान होते, कारण मतदारसंघ लहान होता.  परंतु वाढत्या मतदानसंघाबरोबर हे राजकीय कुंपणही वाढत गेले.  आणि नागरिक आणि सामाजिक जीवनाच्या सर्व रचनेवरच त्याचे परिणाम होऊ लागले.

शरीराला कॅन्सर व्हावा त्याप्रमाणे सार्‍या समाजदेहाचे झाले.  स्थानिक-स्वराज्य खात्यात, म्युनिसिपालिट्यांतून हे विष सर्वत्र भिनले आणि शेवटी तर हास्यास्पद असे भेद दिसून येऊ लागले.  पुढे पुढे स्वतंत्र मुस्लिम ट्रेड युनियन, मुस्लिम विद्यार्थी संघटना होऊ लागल्या.  या सर्व चळवळींत मुसलमान मागासलेले होते.  खालपासून होत आलेल्या या प्राणमय संघटना नव्हत्या, परंतु वरच्या आज्ञेनुसार या अशा सवत्या सुभ्यांच्या संघटना निर्माण करण्यात आल्या आणि जुनाट अर्धवट सरंजामशाही प्रवृत्तीच्या माणसांच्या नेतृत्वाखालीच हे सारे चालू होते.  अशा रीतीने मुस्लिम मध्यमवर्गाला, मुस्लिम बहुजनसमाजासही इतर हिंदुस्थानवर परिणाम करणार्‍या विकासाच्या नवप्रवाहापासून मुद्दाम दूर ठेवण्यात आले.  ब्रिटिश सरकारने भरपूर वतनदारवर्ग निर्माण केला होता, किंवा होता त्याला रक्षिले होते, आता स्वतंत्र मतदारसंघामुळे आणखी एक जबरदस्त वतनदार वर्ग निर्माण करण्यात आला.

हा क्षणिक शाप नव्हता.  वाढत्या राजकीय जाणिवेबरोबर स्वतंत्र मतदारसंघांचे हे भूत जमीनदोस्त होईल ही आशा नव्हती.  सरकारी धोरणाने हा राक्षस वाढतच होता.  त्याने सर्वत्र पाय पसरले, आपले विष सर्वत्र नेले, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कोणताही प्रश्न देशासमोर असो, तेथे तेथे विभागणीचे, स्वतंत्र मतदारसंघाचे हे पिशाच्च येऊन उभे राही.  पूर्वी जेथे द्वेषमत्सर नव्हते तेथे आता द्वेषमत्सर सळसळू लागले आणि सरकारच्या तोंडाकडे पाहण्याची सवय लागल्यामुळे, कृत्रिम आधारावर विसंबून राहण्याची वृत्ती वाढल्यामुळे सरकारच्या कृपेतील या पक्षाची खरी शक्ती वास्तविक कमीच झाली.

शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या जे वर्ग किंवा ज्या अल्पसंख्य जमाती मागे होत्या, त्यांच्या त्या उणिवा दूर करणे, अधिक उदार आणि पुरोगामी असे त्यांच्या बाबतीत शैक्षणिक धोरण अवलंबिणे हा खरा त्यांना पुढे आणण्याचा मार्ग होता.  परंतु मुसलमान किंवा अन्य मागासलेले वर्ग यांच्या बाबतीत असे काही एक करण्यात आले नाही.  ज्यांना अत्यंत जरूर होती त्या दलित वर्गासाठीही सरकारने काही केले नाही.  सर्व बाजूंनी सुधारणा करण्याऐवजी चार दुय्यम नोकर्‍या मिळवण्याभोवतीच सारे विचार फिरू लागले आणि योग्यायोग्यतेचा विचारही करण्यात येत नसे.

 

प्रचंड कारखानदारीचा आरंभ : टिळक आणि गोखले : स्वतंत्र मतदारसंघ

हिंदु-मुस्लिम समस्येची जी पार्श्वभूमी ती शोधीत जाताजाता आणि पाकिस्तान व हिंदुस्थानची फाळणी ही जी मागणी तिच्यापाठीमागील सारे समजावे म्हणून लिहीत असता मी जवळजवळ ५० वर्षांच्या कालखंडावर झेप घेतली.  या अर्धशतकात अनेक फेरबदल होत होते.  सरकारच्या बाह्य यंत्रात काही फरक झाला नाही, परंतु लोकांच्या स्वभावात फरक पडत होता.  काही सामान्य घटनात्मक सुधारणा देण्यात आल्या आणि त्यांचेच पुन:पुन्हा स्तोम माजविण्यात येत असे.  त्या क्षुद्र सुधारणांनी ब्रिटिश सत्तेचे हुकुमशाही सार्वभौम स्वरूप तिळभरही कमी झाले नव्हते, किंवा दारिद्र्य आणि बेकारी या प्रश्नांनाही त्या सुधारणांनी स्पर्श झाला नव्हता.  १९११ मध्ये ज्याला पुढे जमशेटपूर नाव मिळाले त्या ठिकाणी जमशेटजी टाटा यांनी लोखंडी आणि पोलादी कामाचा प्रचंड कारखाना सुरू केला.  या व अशाच दुसर्‍या उद्योगांकडे सरकार नाराजीने बघे आणि कोणत्याही प्रकारे उत्तेजन देण्यात येत नसे.  मुख्यत: अमेरिकन तज्ज्ञांच्या साहाय्याने पोलादाचा धंदा सुरू करण्यात आला.  या कारखान्याचे बाल्य मोठ्या अडीअडचणींतून गेले.  पंरतु १९१४ ते १९१८ चे महायुध्द आले आणि या बाळाला बाळसे चढले.  परंतु युध्दोत्तर पुन्हा या बाळाला दुबळेपणा आला.  कारखाना ब्रिटिश भांडवलदारांच्या हातात जाण्याची वेळ आली होती.  परंतु राष्ट्रीय दडपणामुळे आणीबाणीची वेळ निभावली.

हिंदुस्थानात कारखान्यातील नवीन कामगारवर्ग वाढत होता.  तो असंघटित आणि दुबळा होता.  हा कामगारवर्ग अत्यंत दरिद्री आणि ज्यांचे राहणीचे मान कमालीचे खालच्या दर्जाचे असे, अंशातून आलेला असे.  त्यामुळे पगारवाढ होत नसे, सुधारणा होत नसे.  अ-कुशल कामगार कोट्यवधी होते ते बेकार होते.  वाटेल तितका आणि वाटेल तेव्हा त्यांचा पुरवठा होऊ शकत असे आणि त्यामुळे संप यशस्वी होणे अशक्य असे.  पहिली ट्रेड युनियन काँग्रेस १९२० च्या सुमारास संघटित करण्यात आली.  हिंदी राजकीय क्षेत्रात दृश्य स्वरूपात फेरबदल घडवून आणण्याइतकी या नवीन कामगारांची संख्या नव्हती.  शेतीवर काम करणार्‍या शेतकरी कामकरी लोकांच्या सिंधूसमोर हे कारखान्यातील कामगार केवळ बिंदुवत होते.  १९२० नंतर कामगारांचा आवाज जरा बुलंद होऊ लागला, ऐकला जाऊ लागला.  त्या आजावाकडेही दुर्लक्ष करण्यात आले असते.  परंतु रशियन क्रांतीमुळे कारखान्यातील या नवकामगारांकडे लक्ष देणे प्राप्त झाले होते.  काही मोठे आणि चांगले व्यवस्थित असे संपही झाले.  त्यामुळेही लक्ष देणे भाग पडले.

खरे म्हणजे देशभर शतकरी पसरलेले.  त्यांचा प्रश्न खरा प्रश्न होता.  परंतु राजकीय पुढार्‍यांचे किंवा सरकारचे, कोणाचेच लक्ष त्यांच्याकडे नव्हते.  राजकीय चळवळीच्या आरंभी आरंभीच्या काळात वरिष्ठ मध्यम वर्गाच्याच विचारांना महत्त्व होते.  हे लोक धंदेवाईक होते.  राज्यकारभाराच्या यंत्रातील जागांकडेच लक्ष देणारे बरेचसे यात असत.  १८८५ मध्ये राष्ट्रसभा जन्मली.  जसजशी राष्ट्रसभा वयात येऊ लागली, तसतसे नवीन नेतृत्व पुढे येऊ लागले.  हे नवे नेतृत्व चढाई करणारे निर्भय होते.  खालचा मध्यमवर्ग, विद्यार्थी, तरुण लोक यांचे प्रतिनिधत्व करणारे हे नेतृत्व होते.  वंगभंगाच्या चळवळीमुळे बंगालमध्ये समर्थ आणि चढाऊ वृत्तीचे नवनवे पुढारी पुढे आले होते.  परंतु या नवीन काळाचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रातील बाळ गंगाधर टिळक यांच्याकडेच बोट दाखवावे लागेल.  राष्ट्रीय सभेतील जुन्या नेतृत्वाचे प्रतिनिधी एक महाराष्ट्रीयच होते.  गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे नाव.  टिळकांच्याहून ते वयाने लहान. परंतु अती कर्तृत्ववान असे ते होते.  देशातील वातावरण क्रांतिकारक घोषणांनी दुमदुमले होते.  लोक चवताळले होते.  संघर्ष अटळ होता.  राष्ट्रीय सभेत दुफळी होऊ नये म्हणून त्या राजकीय पितामहांना-दादाभाई नौरोजींना राजकीय संन्यासातून पुन्हा राजकीय संसारात मुद्दाम आणण्यात आले.  दादाभाईंविषयी सर्वांनाच आदर आणि पूज्यभाव.  देशाचे ते जणू तात होते.  परंतु थोडा वेळ शांती मिळाली आणि १९०७ मध्ये अपरिहार्य असा अंतर्गत संघर्ष झाला.  नेमस्तांचा तात्पुरता विजय दिसून आला.  कारण त्या वेळेस राष्ट्रीय सभेचा मतदारसंघ फार लहान होता आणि संस्थेचा घटनात्मक ताबा नेमस्त पक्षाकडे होता.  टिळक आणि त्यांच्या पक्षाचे लोक यांच्याकडेच हिंदुस्थानातील राजकीय दृष्ट्या जागृत झालेल्या बहुसंख्य लोकांचा ओढा होता, यात संशय नव्हता.  राष्ट्रीय सभेचे महत्त्व फार कमी झाले आणि दुसर्‍याच चळवळीवर लक्ष केंद्रीभूत होऊ लागले.  बंगालमध्ये दहशतवादी चळवळ सुरू झाली.  रशियन आणि आयरिश क्रांतिकारकांच्या धोरणाचे, उदाहरणाचे अनुकरण सुरू झाले.

   

हिंदुस्थानच्या फाळणीचा जो घोष अलीकडे सुरू झाला आहे त्याची ही अशी पूर्वीची पार्श्वभूमी आहे असे मला वाटते.  याला अनेक दुसरी कारणे असतील; दोन्ही बाजूंनी चुका झाल्या असतील; ब्रिटिश सरकारचेही सवता सुभा करण्याचे हेतुपुरस्सर धोरण कारणीभूत आहे. परंतु या सर्व लहानमोठ्या कारणांच्या पाठीमागे वरील मानसिक पार्श्वभूमी होती, आणि ही मनोरचना निर्माण व्हायला इतर काही ऐतिहासिक कारणे जरी असली तरी मुसलमानांतून नवीन मध्यम वर्ग बाहेर पडायला उशीर झाला हे एक मुख्य कारण आहे. परकी सत्तेविरुध्द आपला राष्ट्रीय लढा जरी सुरू असला तरी हिंदुस्थानातील अंतर्गत लढा हा मुख्यत: सरंजामशाहीचे अवशेष आणि अर्वाचीन विचार आणि समाजरचना यांच्यातील आहे. हा लढा राष्ट्रीय पातळीवरून चालला आहे. त्याचप्रमाणे त्या त्या समाजातही हिंदू, मुसलमान आणि इतर समाज यांच्यातूनही सुरू आहे.  राष्ट्रीय सभा ही राष्ट्रीय चळवळीची मुख्यत: प्रतिनिधी आहे. या नवीन विचारांकडे आणि नवीन समाजरचनेच्या ध्येयाकडे ऐतिहासिक वाढीच्या नियमानुसार ती जात आहे. अर्थात असे करीत असताना जुन्या रचनेच्या पायाशी जितके जुळवून घेऊन पुढे जाता येईल तितके ती करीत असते. या धोरणामुळे एकमेकांशी खूप मतभेद असलेले सर्व प्रकारचे लोक राष्ट्रीय सभेने स्वत:त ओढून घेतले आहेत. हिंदूमध्येही एक अ-संग्राहक अशी चकटबंद समाजव्यवस्था आहे, आणि ती विकासाच्या आड येत आहे एवढेच नव्हे, तर इतर संघांना आणि गटांना तिने भिवविलेही आहे. परंतु ह्या समाजव्यवस्थेच्या खाली सुरुंग लागले आहेत.  तिच्यातील गतिहीनता नष्ट होत आहे, आणि काही झाले तरी राष्ट्रीय चळवळीच्या वाढीला ही जुनीपुराणी रचना आता विरोध करू शकणार नाही, थोपवू शकणार नाही. अडचणी आणि अडथळे यांना न जुमानता पुढे जाण्याची शक्ती राष्ट्रीय चळवळीत आता आली आहे. मुसलमान समाजात मात्र अद्यापि सरंजामशाही प्रवृत्तीच्या लोकांचेच प्राबल्य आहे, आणि बहुजन मुसिलम समाजावर त्यांनी आपले नेतृत्व लादले आहे; त्यात त्यांना यशही आले आहे.  हिंदू मध्यमवर्ग आणि मुसलमान मध्यमवर्ग यांच्या वाढीत आणि विकासात एकदोन पिढ्यांचे अंतर आहे.  आणि हे अंतर राजकीय, आर्थिक आणि इतर शतमार्गांनी दिसून येत असते. मुसलमानांत भीतीची मनोरचना जी निर्माण झाली आहे ती या मागे राहण्यामुळे होय.

परंतु या मागासलेपणावर पाकिस्तान हा काही तोडगा नव्हे. पाकिस्तानचे हिंदुस्थानची फाळणी करण्याचे ध्येय कितीही रुचले तरी तो उपाय नाही. पाकिस्तानमुळे सरंजामशाही वृत्तिप्रवृत्ती अधिकच बलवान होतील, आणि मुसलमानांची आर्थिक प्रगती अडवतील. पाकिस्तानच्या पहिल्या पुरस्कर्त्यांपैकी इक्बाल एक होते. परंतु त्यातील अंतर्भूत धोका आणि बाष्कळपणा त्यांना दिसून आला होता. एडवर्ड थॉम्प्सनचे एकदा इक्बालांजवळ संभाषण झाले होते. त्या संभाषणात ते म्हणाले, ''मुस्लिम लीगचा मी अध्यक्ष होतो आणि पाकिस्तानचे ध्येय मी उद्धोषिले. परंतु हिंदुस्थानचे विशेषत: मुसलमानांचे त्यात नुकसान आहे असे मला आता वाटते.''  एडवर्ड थॉम्प्सनने हा संवाद दिला आहे. शक्य आहे की इक्बालांचे मतपरिवर्तन झाले असेल.  पूर्वी पाकिस्तानविषयी तितका खोल विचार त्यांनी केलेलाही नसेल. कारण त्या प्रश्नाने तेवढे मोठे स्वरूप त्या वेळेस घेतलेलेही नव्हते.  त्यांची जीवनाकडे पाहण्याची जी सर्वांगीण दृष्टी होती ती पाकिस्तानच्या नंतरच्या वाढलेल्या कल्पनेशी हिंदुस्थानच्या फाळणीशी मुळीच जमत नाही.

अखेर अखेर इक्बाल अधिकाधिक समाजवादाकडे वळले होते. सोव्हिएट रशियाने केलेल्या अवाढव्य प्रगतीमुळे ते आकृष्ट झाले होते. त्याच्या काव्याने सुध्दा निराळे वळण घेतले. मरणशय्येवर पडले असताना मरणापूर्वी थोडे दिवस त्यांनी मला बोलावणे पाठवले.  मी ताबडतोब धावून गेलो.  मी त्यांच्याजवळ कितीतरी गोष्टींविषयी बोललो. आमचे मतभेद होते, तरी दोघांच्या विचारांत इतके साम्य होते की त्यांच्याबरोबर काम करणे कितीतरी सोपे गेले असते. स्मरन्मनोवृत्तीत ते होते.  नाना गोष्टी त्यांना आठवत.  मध्येच या विषयावर मध्येच त्या, याप्रमाणे ते बोलत होते.  मी ऐकत होतो. मी स्वत: फार थोडे बोललो.  इक्बालांविषयी आणि त्यांच्या काव्याविषयी मला फार आदर वाटे, प्रेम वाटे; आणि माझ्याविषयी त्यांचे चांगले मत आहे हे पाहून, त्यांना मी आवडतो हे पाहून, मला कितीतरी आनंद झाला. त्यांचा निरोप घेण्याच्या जरा आधी ते मला म्हणाले, ''जिना आणि तुम्ही, तुम्हांत समान असे काय आहे ? जिना राजकारणी आहेत, मुत्सद्दी आहेत; तुम्ही देशभक्त आहात.''  परंतु जिनांत आणि माझ्यात अजूनही पुष्कळ समान आहे अशी मी आशा राखून आहे. आणि मी देशभक्त आहे यात मोठे ते काय ? या आजच्या काळात-त्या शब्दातील मर्यादित अर्थाने-ते काही मोठे प्रशस्तिपत्र नव्हे. हिंदुस्थानविषयी, भारतभुमीसंबंधी मला कितीही प्रेम वाटत असले तरी पुष्कळ दिवसांपासून मला वाटते आहे की, आपल्या देशातील त्याचप्रमाणे जगातीलही समस्या सोडवायला राष्ट्रीय आसक्तीपेक्षा, केवळ राष्ट्रप्रीतीपेक्षा आणखी अधिक कशाची तरी आवश्यकता आहे.  परंतु राजकारणाने जरी मला खेचले असले, मी त्याला बळी पडलो असलो तरी इक्बालांच्या म्हणण्यात सत्य आहे, त्यांचे म्हणणे खरोखर बरोबर आहे की मी फारसा राजकारणी मनुष्य नाही.

 

केमाल पाशा : आशियातील राष्ट्रवाद : इक्बाल

केमाल पाशा हिंदुस्थानातील हिंदु-मुसलमान दोघांचाही आवडता होता.  परकी सत्ता आणि विच्छेद यांपासूनच त्याने केवळ तुर्कस्थानाचे रक्षण केले असे नाही, तर युरोपातील साम्राज्यवादी सत्तांची कुटिल कारस्थाने- विशेषत: इंग्लंडची- त्याने हाणून पाडली होती.  परंतु आता तुर्कांचे धोरण जसजसे संपूर्णपणे प्रकट होऊ लागले तसतसे त्यांच्याविषयी सनातनी मुसलमानांना वाटणारे प्रेम कमी होऊ लागले.  केमाल धर्मांध नव्हता.  धर्मांकडे त्याचे लक्ष नव्हते.  सल्तनत आणि खिलाफत त्याने नष्ट केली.  धर्मापासून फारकत असलेले सरकार त्याने स्थापिले.  धार्मिक संप्रदाय नष्ट केले म्हणून त्याच्या ह्या अर्वाचीनतम धोरणामुळे एक प्रकारचा मूक संताप येथील मुसलमानांत वाढत होता.  परंतु नेमक्या त्याच्या याच धोरणामुळे तरुण हिंदु-मुसलमानांच्या गळ्यातील तो ताईत होता.  १८५७ च्या काळापासून हिंदी मुसलमानांनी जे एक स्वप्न मनात खेळविले होते, ते आता तुर्कांच्या या धोरणामुळे समूळ भंगले.  पुनश्च एक प्रकारची शून्यता त्यांना वाटू लागली.  राष्ट्रीय चळवळीत सामील होऊन अनेक मुसलमानांनी ही पोकळी भरून काढली.  पुष्कळांनी तर पूर्वीच प्रवेश केलेला होता.  सरंजामशाही स्वरूपाचे विचार आणि अर्वाचीन वृत्तीप्रवृत्ती यांच्यामध्ये खरा झगडा होता.  खिलाफतीच्या प्रचंड चळवळीमुळे सरंजामशाही नेतृत्व पार नष्ट झाले होते.  परंतु ही चळवळ सामाजिक किंवा आर्थिक पायावर उभारलेली नव्हती.  बहुजनसमाजाच्या गरजांचा तिच्यात विचार नव्हता.  तिचा मध्यबिंदू अन्यत्र होता.  परंतु आता तुर्कांच्या धोरणामुळे तो प्राणमय मध्यबिंदूच नष्ट झाला आणि खिलाफत चळवळ कोलमडून पडली.  बहुजन मुस्लिम समाज गोंधळला आणि राजकीय चळवळीचाच त्यांना वीट आला.  ते जुने सनातनी पुढारी पुन्हा हळूहळू पुढे सरकले.  ब्रिटिशांच्या धोरणाचीही त्यांना यथापूर्व मदत झाली.  परंतु पूर्वीच्या स्पर्धातीत नेतृत्वाप्रत ते पुन्हा जाऊ शकले नाहीत.  कारण परिस्थितीच बदलली होती.  उशीराने का होईना मुसलमानांतूनही एक मध्यमवर्ग पुढे येत होता आणि राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखालच्या प्रचंड राष्ट्रव्यापक चळवळीच्या अनुभवामुळे महत्त्वाचे बदल झाले होते.

मुस्लिम बहुजनसमाजाची आणि नव्या वर्धमान मध्यम वर्गाची मनोरचना परिस्थितीमुळेच जरी बदलत होती तरी सर अहंमद इक्बाल यांनीही या बाबतीत खूप परिणाम केला आहे.  मध्यमवर्ग, विशेषत: नवतरुण मंडळी यांच्यावर इक्बालांच्या विचारांची प्रभावी छाप पडली.  बहुजनसमाजावर इक्बालांमुळे फारसा परिणाम झाला नाही.  उर्दूत तेजस्वी राष्ट्रीय काव्ये लिहून इक्बालांनी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली होती.  त्या कविता अती लोकप्रिय झाल्या.  बाल्कन युध्दाच्या वेळी ते इस्लामी विषयाकडे वळले. परिस्थितीचा आणि मुसलमानांत सर्वत्र पसरलेल्या भावनांचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला आणि त्यांनी स्वत:ही त्या भावनांना वळण दिले, त्या भावना अधिक प्रज्वलित केल्या.  परंतु ते बहुजन समाजाचे पुढारी असे नव्हते.  ते कवी होते, जुन्या सरंजामशाही व्यवस्थेशी संबंध असलेले एक बुध्दिप्रधान तत्त्वज्ञानी होते.  कश्मिरी ब्राह्मणकुळातून ते आलेले.  मुस्लिम नवसुशिक्षितांना, नवबुध्दिमंतांना पर्शियन आणि उर्दूमधील सुंदर काव्याने त्यांनी एक वैचारिक तत्त्वज्ञानात्मक पार्श्वभूमी दिली; त्यांचे मन या काव्यातील तत्त्वज्ञानाने सवता सुभा निर्माण करण्याकडे वळले.  त्यांच्या काव्यगुणामुळे त्यांना लोकप्रियता लाभली होती, यात शंका नाही; परंतु मुस्लिम मनोबुध्दीची त्यांनी एक भूक भागविली होती. चिकटून राहायला त्यांना काहीतरी एक ध्येय हवे होते, ते त्यांनी दिले म्हणून त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली.  ते जुने सर्वंकष इस्लामी ध्येय आता अर्थहीन झाले होते.  खिलाफतीची चळवळ खतम झाली होती.  प्रत्येक इस्लामी देश- तुर्कस्थान तर फारच- प्रखर राष्ट्रीय बनला होता.  इतर इस्लामी देशांविषयी कोणी विचार करीत नव्हते.  अन्यत्रानुसार आशियातही राष्ट्रवाद ही एक प्रभावी शक्ती होत होती, हिंदी राष्ट्रीय चळवळ सामर्थ्यसंपन्न होऊन पुन:पुन्हा ब्रिटिश सत्तेला आवाहन देत होती.  हिंदी राष्ट्रीय चळवळीने मुसलमानांची मते हलली होती, आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात पुष्कळ मुसलमानांनीही मोठा भाग उचलला होता.  तथापि हिंदी राष्ट्रीय चळवळीत हिंदूंचे वर्चस्व असे आणि या राष्ट्रीय चळवळीस थोडेफार हिंदुस्वरूप आले होते; आणि म्हणून मुस्लिम मनात संघर्ष सुरू झाला.  या राष्ट्रीय चळवळीस आपण आपल्या इच्छेनुरूप रंगरूप देऊ शकू, असा प्रयत्न करू शकू या भावनेने अनेकांनी राष्ट्रीय चळवळीचा स्वीकार केला.  पुष्कळांना या राष्ट्रीय चळवळीविषयी सहानुभूती वाटत असूनही ते अलिप्त राहिले; त्यांचा काही निश्चय होईना, आणि इक्बालांच्या काव्यात्मक तत्त्वज्ञानाने ज्या गोष्टींची भूमिका तयार करून ठेवली होती, त्या सवत्यासुभ्याच्या ध्येयाकडे दुसरे पुष्कळसे वळले.

   

पुढे जाण्यासाठी .......