शुक्रवार, जुलै 19, 2019
   
Text Size

प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२)

खरे आहे, सरकार म्हणजे नफा-तोटा पाहात बसणारे दुकान नव्हे हे खेरे, पण काय असेल ते असो, सरकारला असल्या दुकानांचा, व्यापारी कंपन्यांचा मोठा उमाळा येई, आणि असली एक कंपनी म्हणजे 'इंपिरीयल केमिकल्स', औषधी द्रव्ये तयार करणार्‍या विलायती कारखान्यांचा एक संघ.  या प्रचंड संघाला हिंदुस्थानात अनेक सवलती मिळत होत्या.  अशा सवलती नसत्या तरीसुध्दा त्यांच्याजवळ असे अजस्त्र भांडवल होते की, टाटाखेरीज दुसर्‍या कोणत्याही हिंदी कंपनीला त्यांची बरोबरी करू पाहणे शक्यच नव्हते, व टाटा कंपनीलासुध्दा ते फारसे जमले नसते.  हिंदुस्थानात तर या सवली 'इंपिरीयल केमिकल्स' ला मिळतच, पण त्याखेरीज हिंदुस्थानातील व इंग्लंडमधील मोठमोठ्या सत्ताधार्‍यांचेही तिला पाठबळ होते.  हिंदुस्थानचे व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड लिनलिथगो यांचा जो अवतार होता तो समाप्त झाल्यावर, त्यांचा नव्याने अवतार या इंपिरीयल केमिकल्सचे डायरेक्टर या रूपाने झाला.  इंग्लंडमधील करोडोपती श्रेष्ठी व हिंदुस्थान सरकार यांचे संबंध किती घनिष्ठ होते हे ह्या उदाहरणावरून स्पष्ट होते व असे घनिष्ठ संबंध असले म्हणजे त्यांचा सरकाकरी धोरणावर नक्की परिणाम व्हायचाच हेही उघड दिसते.  हिंदुस्थानचे व्हाईसरॉय असतानाच लॉर्ड लिनलिथगो यांच्या मालकीचे शेअर या कंपनीत खूप असावेत.  ते काहीही असो वा नसो, हिंदुस्थानात पडलेले आपले वळण व व्हाईसरायचे काम करीत असताना आपल्याला मिळालेली खास माहिती यांचा फायदा घेण्याची मोकळीक लॉर्ड लिनलिथगो यांनी आता तरी त्या कंपनीला करून दिली आहे.

व्हाईसरॉय या नात्याने १९४२ साली लॉर्ड लिनलिथगो म्हणाले, ''युध्दाच्या कामी सामग्री पुरविण्यात आम्ही मोठी प्रचंड कामगिरी करून दाखविली आहे.  हिंदुस्थानने युध्दाच्या कामाचा उचललेला वाटा मोठा महत्त्वाचा, बहुमोल आहे.  युध्दाला सुरूवात झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत जवळजवळ एकोणतीस लक्ष रुपयांची मालाची कंत्राटे आम्ही दिली.  एप्रिल ते ऑक्टोबर १९४२ या महिन्यांच्या अवधीत दिलेली कंत्राटे १३७ कोटींची होती.  ऑक्टोबर १९४२ अखेरपावेतोची सबंध मुदत हिशेबात घेतली तर ही रक्कम ४२८ कोटींपेक्षा कमी भरणार नाही, आणि याशिवाय युध्देपयोगी सामानाच्या सरकारी कारखान्यातून जे खूप काम झालो ते वेगळेच.''*  ही सर्व विधाने खरी, अगदी बराबर आहेत व ती त्यांनी केल्यानंतरच्या काळात या युध्दाच्याकामी हिंदुस्थानने उचललेला कामाचा भाग अतोनात वाढला आहे.  तेव्हा कोणाचीही अशी समजूत होईल की, हिंदुस्थानातले उद्योगधंद्यांचे कारखाने अगदी भरपूर काम करण्यात गढून जाऊन त्यांचे काम भलतेच वाढले आहे, उत्पादनाचा आकडा खूप फुगला आहे.  पण नवल असे की, युध्दापूर्व काळात व युध्दाच्या या काळात काही मोठासा फरक पडलेला नाही.  १९३५ सालातील उद्योगधंद्यांचा चिन्हांक १०० धरला तर १९३८-३९ साली तो १११.१ झाला होता.  १९३९-४० साली तो ११४.० होता; १९४०-४१ साली तो ११२.१ ते १२७.० ह्या दरम्यान फिरत होता; मार्च १९४२ मध्ये तो ११८.९ तो एप्रिल १९४२ मध्ये १०९.२ पर्यंत खाली आला व नंतर हळूहळू जुलै १९४२ पावेतो वाटत जाऊन त्या जुलैमध्ये ११६.२ झाला.  हे जे आकडे दिले आहेत त्यांत युध्देपयोगी सामान व रासायनिक द्रव्यांचे कारखाने यांचे आकडे आलेले नाहीत त्यामुळे ते पुरे आकडे नाहीत.  पण तरीसुध्दा ते महत्त्वाचे व सूचक आहेत.

हे आकडे सालवार लक्षात घेतले तर त्यांतून एक आश्चर्य बाहेर येते ते हे की, हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांच्या कारखानदारीचा व्याप, सन १९४२ जुलैमध्ये, दारूगोळा वगैरे सामान सोडले तर, युध्दापूर्व काळापेक्षा फारच थोडा वाढला होता.  १९४१ या डिसेंबरमध्ये चिन्हांक १२७.० झाला तेव्हा थोडीफार तात्पुरती तेजी दिसते व नंतर लगेच मंदी दिसू लागते; आणि इकडे पाहावे तर सरकारने मक्तेदारांना दिलेल्या कंत्राटांनी रक्कम सारखी वाढतच गेलेली दिसते.  खुद्द लॉर्ड लिनलिथगो यांच्या म्हणण्याप्रमाणे पाहिले तर १९३९ ऑक्टोबर ते १९४० मार्च पर्यंतच्या सहामाहीत या कंत्राटांची रक्कम ३९ कोट रूपये झाली तर १९४२ च्या एप्रिल ते ऑक्टोबरच्या सहामाहीत ती १३७ कोट रुपये झाली.
------------------------
*  हे सर्व आकडे रुपयांचे आहेत.

 

हिंदुस्थानात युध्दकाळात कोठल्याही प्रकारची वाहतूक ही एक मोठी अडचणीची बाब होऊन बसली.  वाहतुकीच्या मोठमोठ्या मोटारी, पेट्रोल, रेल्वेची इंजिने व आगगाड्यांचे डबे सगळ्यांचाच तुटवडा पडत होता, दगडी कोळसासुध्दा मिळत नव्हता.  युध्द सुरू होण्यापूर्वीच हिंदुस्थानतर्फे या बाबतीत ज्या योजना सुचविण्यात आल्या होत्या त्या जर अशा नापसंत झाल्या नसत्या तर ह्यातल्या बहुतेक सार्‍या अडचणी अधिक सुलभतेने सोडविता आल्या असत्या.  रेल्वेची इंजिने, डबे, मोठ्या मोटारी, इतकेच नव्हे तर चिलखती वाहनेसुध्दा हिंदुस्थानात तयार करता आली असती.  पेट्रोलच्या दुर्भिक्ष्यामुळे आलेली अडचण, वाईट गुळाच्या राबेपासून काढता येणारा व हरतर्‍हेच्या यंत्रांना चालणारा मद्यार्क जळण म्हणून वारपूर ते दुर्भिक्ष्य थोडेफार हटविता आले असते.  दगडी कोळशाची बाब घेतली तर त्याचा वाटेल तेवढा साठा हिंदुस्थानातील भूमीत पडला होता, हा कोळसा वाटेल तेवढा भूमिगर्भात शिलकी पडून होता.  पण त्याला वापरण्याकरता असा फारच थोडा खणून काढण्यात आला.  दगडी कोळशाची मागणी सारखी वाढत असूनही प्रत्यक्षात कोळशाचे उत्पादन युध्दकाळात उलटे फारच कमी झाले.  कोळशाच्या खाणीतून काम करणारांच्या भोवतालची परिस्थिती इतकी वाईट होती व पगार इतका थोडा होता की, मजुरांना ते काम करायला काही ओढ नव्हती.  स्त्रियांनी खाणीतून काम करू नये असा जो निर्बंध तोपर्यंत होता तो सुध्दा सरकारने काढून टाकला, कारण त्या अपुर्‍या मजुरीत काम करायला स्त्रियाच मिळण्यासारख्या होत्या.  कोळशाच्या धंद्यात लक्ष घालून जरूर ती उलथापालथ, कामाच्या तर्‍हेत आवश्यक ती सुधारणा करून व मजुरी वाढवून हे खाणीतले काम करायला मजुरांचे मन घेईल अशा तर्‍हेचा काहीही प्रयत्न करण्यात आला नाही.  कोळशाच्या तुटवड्यामुळे यांत्रिक कारखान्यांची वाढ भलतीच खुंटली.  इतकेच नव्हे तर चालू कारखाने सुध्दा बंद ठेवावे लागले.

शेकडो इंजिने व हजारो डबे हिंदुस्थानातून मध्य पूर्वप्रदेशात पाठविण्यात आल्यामुळे हिंदुस्थानातली वाहतुकीची अडचण अधिकच वाढली.  काही काही ठिकाणचे रेल्वेच्या कायम लोहमार्गाचे रूळसुध्दा दुसरीकडे नेण्याकरता उपटून काढण्यात आले.  मागचापुढचा काहीही विचार न पाहता सहजासहजी हे सारे प्रकार असे काही चालले होते की, तो निष्काळजीपणा पाहून कोणीही आश्चर्याने तोंडात बोट घालावे.  पुढचा काही विचार, काही योजना यांचा मागमूससुध्दा दिसत नव्हता आणि त्याचा परिणाम असा झाला की, आलेला प्रसंग जेमतेम अपुरा निभावता निभावता त्यामुळे ताबडतोब तिसरेच काही अरिष्ट उभे राही.

सन १९३९ च्या शेवटी किंवा १९४० च्या आरंभी, हिंदुस्थानात विमाने तयार करणार्‍या कारखान्यांचा धंदा काढण्याचा एक प्रयत्न करण्यात आला.  पुन्हा एकदा एका अमेरिकन कंपनीशी सगळेच करारमदार नक्की करून इकडच्या कंपनीच्या चालकांनी हिंदुस्थान सरकार व हिंदुस्थानातील सैन्याचे सर्वश्रेष्ठ कार्यालय यांच्याकडे त्यांची संमती मिळविण्याकरता अगदी निकडीच्या तारा पाठविल्या.  पण त्या तारांचे एका शब्दानेही उत्तर आले नाही.  त्यानंतर वेळोवेळी उत्तराकरता आठवण म्हणून तगादा लावल्यावर अखेरचे एकदा उत्तर आले.  ते हे की, ही योजना त्या सरकारला व त्या कार्यालयाला नापसंत आहे.  इंग्लंड किंवा अमेरिकेकडून विमाने विकत घेता येण्यासारखी आहेत, तेव्हा येथे हिंदुस्थानात विमाने तयार कशाला करावयाची ?

युध्दापूर्वकालात हिंदुस्थानात नाना प्रकारची औषधे व रोगप्रतिबंधक लस मोठ्या प्रमाणावर जर्मनीतून येत असे, ते या युध्दामुळे बंद झाले तेव्हा लागलीच काही लोकांनी अशी सूचना केली की, यांपैकी अगदी अवश्य अशा जिनसा हिंदुस्थानात तयार होण्याजोग्या आहेत, हे काम काही सरकारी संस्थांमधून सहज करता येण्यासारखे आहे.  पण हिंदुस्थान सरकारला ही सूचना मान्य नव्हती.  त्यांचे म्हणणे जी लागतील ती औषधी द्रव्ये इंपिरीयल केमिकल इंडस्ट्रीज या विलायती कंपनीकडून मिळण्याजोगी आहेतच.  याला मूळ सूचना करणारांचे असे उत्तर होते की, ही द्रव्ये पुष्कळ कमी खर्चाने तयार होऊन त्यांचा उपयोग सैन्यालाच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला ही होईल व त्यात खाजगी वैयक्तिक नफेबाजीही टाळता येईल.  तेव्हा या उत्तरात राज्याच्या धोरणासारख्या उच्च विषयात नफेबाजीसारख्या क्षुद्र विचारांचा शिरकाव होऊ देणे म्हणजे घोर पाप आहे असा आव 'सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सत्ताधारी' यांनी आणला व असल्या भिकार चाळ्यांचा आपल्याला मोठा उद्वेग वाटत असल्याचे नाटक केले.  त्यांचे उद्‍गार असे की, ''सरकार म्हणजे वाण्यासारखे नफातोटा पाहात बसणारे दुकार थोडेच असे !''

 

टाटा स्टील या कारखान्याची दूरदृष्टीने स्थापना करणारे जमशेटजी टाटा यांना भविष्य सृष्टीचे काही विशेष ज्ञान होते म्हणून त्यांनी बंगलोरला हिंदी शास्त्रीय संशोधन संस्था 'दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' सुरू केली.  अशा प्रकारच्या संशोधन संस्था हिंदुस्थानात फारच थोड्या होत्या, व बाकीच्या ज्या काही होत्या त्या काही विविक्षित कामगिरी पार पाडण्यापुरत्या सरकारने चालविल्या होत्या.  युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका या सोव्हिएट युनियन या देशांत संशोधनकार्याकरिता लागणारी सर्व प्रकारची माहिती मिळवून तिची व्यवस्थित नोंद करून ठेवण्याकरिता लागणारी सर्व प्रकारची उपकरणे, तज्ज्ञ वगैरे साधनसामग्री मुद्दाम ठेवून ठिकठिकाणी योजनापूर्वक चालविलेले कार्याश्रम, विद्यालये, संस्था यांच्या द्वारा विज्ञान व उद्वम या विषयांत संशोधनकार्याचे जे प्रचंड क्षेत्र पसरलेले आहे, तसल्या कार्याची हिंदुस्थानात अगदी उपेक्षा झाली होती. या उपेक्षेला अपवार म्हणजे ही बंगलोरची संशोधन संस्था व काही विश्वविद्यालयांतून चाललेले तुरळक संशोधन एवढाच होता.  दुसरे महायुध्द सुरू झाल्यावर काही काळानंतर संशोधनकार्याला उत्तेजन मिळावे या दुष्टीने प्रयत्न करण्यात आला व तो जरी संकुचित क्षेत्रापुरता झाला तरीसुध्दा त्याचे परिणाम चांगले झाले आहेत.

लहानमोठी जहाजे बांधणे व इंजिने बांधणे यांचे कारखाने हिंदुस्थानात होऊ नयेत म्हणून तसा विचार असलेल्या लोकांना शक्य तोवर उत्साहभंग करून बंदी घालण्याचा जसा राज्यकर्त्यांनी उपक्रम चालविला तसाच, या देशात मोटारगाड्या तयार करण्याचा एक प्रयत्न त्यांनी मुळातच खोडून टाकला.  दुसरे महायुध्द सुरू झाले त्याच अगोदर काही वर्षांपूर्वी मोटारगाड्यांच्या कारखान्यांची खटपट हिंदुस्थानात सुरू झाली होती, व त्याकरिता त्या धंद्यातल्या एका नामांकित अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने संपूर्ण तपशीलवार आखणी करून सर्व काही तयारीही झाली होती.  मोटारचे तयार भाग सुटे आणून त्यांची जुळवाजुळव हिंदुस्थानात करणारे काही कारखाने त्याच्यापूर्वीही इकडे चालले होतेच, तेव्हा त्याच्या पुढचा विचार म्हणून बेत असे चालले होते की, हे सुटे भागही हिंदुस्थानातच हिंदी भांडवल व कारभार, आणि हिंदी कारागीर यांच्या साहाय्याने तयार करावे.  मोटारी तयार करण्याच्या धंद्यातल्या 'अमेरिकन कॉर्पोरेशन' या कंपनीलाच काही विशिष्ट वस्तू विशिष्ट रीतीने तयार करण्याचा हक्क होता, दुसर्‍या कोणाला त्या वस्तू तशा रीतीने करण्याची परवानगी नव्हती, तेव्हा आरंभी काही काळ त्या कंपनीचा हा खास हक्क व त्या कंपनीचे हुषार कारागीर व देखरेखीकरिता त्यांचे कारभारी वापरण्याचे, कंपनीशी करारमदार करून शक्य झाले असते.  मुंबई प्रांताचा सरकारी कारभार त्या वेळी काँग्रेस मंत्रिमंडळाने चालविला होता, त्यांनी या उपक्रमाला अनेक रीतींनी साहाय्य करण्याचे मान्य केले होते.  काँग्रेसच्या राष्ट्रीय योजना समितीचे ह्या बेताकडे विशेष लक्ष लागले होते.  तेव्हा वस्तुस्थिती अशी हाती की, याबाबत सर्व काही व्यवस्थित ठरून गेले होते, त्या यंत्रसामग्रीची हिंदुस्थानात आयात करावयाचे काय ते बाकी राहिले होते.  परंतु विलायतेतले हिंदुस्थानचे (स्टेट सेक्रेटरी) राजमंत्री यांना ही योजना मान्य नव्हती व त्यांनी ही यंत्रसामग्री आयात होऊ देऊ नये असे फर्मान काढले.  त्यांचे म्हणणे हे की, ''ह्या प्रसंगी हा धंदा हिंदुस्थानात सुरू करू दिला तर हल्ली युध्दाकरिता अत्यंत अवश्य असलेली पुष्कळशी यंत्रसामग्री व मनुष्यबळ ह्या धंद्याकडे वळून जाईल.''  हा फर्मामाना प्रकार युध्दाच्या अगदी आरंभीच्या काही महिन्यांत जेव्हा युध्दात उभयपक्षी नुसती 'तोंडातोंडी' लढाई म्हणतात ती चाले असलेल्या काळात घडला.  हे जे कारण विलायतच्या राज्यमंत्र्यांनी दिले त्याबाबत उलटपक्षी असेही स्पष्टपणे दाखवून देण्यात आले की, काम करण्याकरिता वाटेल तितकी माणसे, अगदी कुशल कारागीरसुध्दा मिळण्यासारखे आहेत, एवढेच नव्हे तर असे अनेक कामगार, कारागीर काम मिळत नाही म्हणून रिकामे बसले आहेत.  वर दिलेले सरकारी कारण म्हणजे 'युध्दाकरता अवश्य' ही सबबही मोठी विचित्र वाटते, कारण मोटारने मालाची व माणसांची ने-आण करणे ही 'युध्दाकरता अवश्य' अशीच बाब होती.  पण हिंदुस्थानचे राजमंत्री विलायतेत लंडनला बसलेले, त्यांच्या हाती सर्वाधिकार, त्यांना हा युक्तिवाद मुळीच पटला नाही.  दुसरी एक अशीही वदंता होती की ज्या कंपनीशी हिंदुस्थानातील धंद्याबाबत बोलणे झाले होते त्या कंपनीची खुद्द अमेरिकेतच प्रतिस्पधी असलेली एक मातबर कंपनी होती, तिला दुसर्‍या कोणाच्या आश्रयाखाली, परक्याच्या वशिल्याने हिंदुस्थानात मोटारीचा धंदा निघणे पसंत नव्हते.

   

उद्योगधंद्यांच्या वाढीत राज्यकर्त्यांनी आणलेल्या अडचणी

युध्देप्रयोगी सामग्रीचे उत्पादन म्हणजे नेहमीच्या साध्य उत्पादनाचा वळवून नेलेला प्रवाह.


प्रचंड यंत्रे वापरून प्रचंड प्रमाणावर माल काढणार्‍या कारखान्यांचा हिंदुस्थानातील नमुना म्हणजे टाटांचा जमशेदपूर येथील पोलाद व लोखंडाचा कारखाना.  त्याच्यासारखा दुसरा कारखाना संबंधा देशात नाही.  यंत्रे तयार व दुरूस्त करणारे बाकीचे या देशातील कारखाने म्हणजे या कारखान्यापुढे फुटकळ काम करणारी किरकोळ दुकाने वाटतात.  टाटांच्या या कारखान्याची वाढदेखील सरकारी धोरणामुळे फार हळूहळू झाली.  पहिले महायुध्द चालू होते तेव्हा रेल्वेची इंजिने व माणसांचे आणि मालाचे डवे यांचा तुटवडा पडला होता व म्हणून टाटा कारखान्याचे इकडे इंजिने तयार करण्याचे काम करण्याचे ठरविले व त्यांची त्याकरता लागणारी यंत्रसामग्रीही आणली होती, अशी माझी समजूत आहे.  पण ते महायुध्द संपल्याबरोबर हिंदुस्थान सरकार व त्यांचेच एक खाते असलेले रेल्वेबोर्ड यांनी पूर्वीप्रमाणे ब्रिटिश इंजिनांच्या कारखान्यांना आश्रय चालू ठेवण्याचे ठरविले.  देशात जितक्या काही रेल्वे कंपन्या आहेत त्या सरकारी नियंत्रणाखाली किंवा ब्रिटिश कंपन्यांच्या मालकीच्या होत्या, तेव्हा कोणा खाजगी कंपनीला इंजिने विकली जाण्याचा संभव नव्हता हे उघड आहे.  तेव्हा अखेर टाटा कंपनीला ह्या देशात इंजिने तयार करण्याचा बेत सोडून द्यावा लागला.

हिंदुस्थान देशाची वाढ उद्योगधंद्यांच्या कारखान्याच्या बाबतीत व इतर बाबतींत करावयाची असेल तर त्याकरता तीन मूलभूत गोष्टी अवश्य आहेत.  प्रचंड यंत्रे तयार करण्याकरता व त्यांची मोडतोड झाली तर ती नीट करण्याकरता विशाल प्रमाणावर चालणारे मोठमोठे यंत्रांचे कारखाने, विज्ञान-शास्त्रात प्रयोग करून नवेनवे शोध लावणार्‍या प्रयोगशाळा, व विद्युत् शक्ती.  देशाकतर कोणतीही योजना आखावयाची म्हणजे तर या त्रयीच्या आधारावरच ती योजना बसविली पाहिजे व राष्ट्रीय योजना समितीने या त्रयीवरच फार भर दिला होता.  आमच्या देशात ह्या तिन्ही गोष्टींची उणीव भासत होती व यांत्रिक कारखान्यांच्या वाढीला कोठलीतरी मधली महत्त्वाची एखादी वस्तू अगदी कमी पडली की त्यामुळे उत्पादनाच्या ओघात त्या वस्तूच्या जागी चिंचोळेपणा आल्यामुळे तेथे तुंबारा बसून पुढचा ओघ खुंटावा असे प्रकार वारंवार घडत.  प्रगती व्हावी अशा धोरणाने सारा व्यवहार चालला असता तर अशा चिंचोळ्या जागा राहिल्या नसत्या, पण राज्यकर्त्यांचे धोरण अगदी नेमके उलटे होते.  त्यांना हिंदुस्थानात प्रचंड यांत्रिक कारखान्यांची वाढ होऊ द्यावयाची नव्हती हे स्पष्टच होते.  दुसरे महायुध्द सुरू झाल्यावरसुध्दा प्रथम अवश्य ती यंत्रसामग्री या देशात आणावयाला सरकारने परवानगी नाकारली, व पुढे ही यंत्रसामग्री आणावयाला पुरेशी जहाजे नाहीत अशी सबब सरकाने काढली.  हिंदुस्थानात भांडवलाचा किंवा यंत्रे चालविण्याकरता लागणार्‍या कुशल कारागिरांचा तोटा नव्हता, यंत्रेच काय ती पाहिजे होती, व त्याकरता कारखानदारांनी हाकाटी चालविली होती.  यंत्रसामग्री बाहेर देशांतून या देशात आणण्याची संधी सरकाने दिली असती तर हिंदुस्थानची आर्थिक स्थिती कितीतरी पटीने चांगली झाली असती, एवढेच नव्हे तर अतिपूर्वेकडील प्रदेशांत चाललेल्या लढाईचा सारा रागरंग त्यामुळे पार बदलून गेला असता.  मोठा खर्च व अनेक अडचणी सोसून विमानमार्गाने ज्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू पुढे सरकारने इकडे आणल्या त्यातल्या कितीतरी वस्तू अगोदरपासून हिंदुस्थानात अवश्य ती यंत्रसामग्री येऊ दिली असती, तर येथल्या येथे तयार करता आल्या असत्या.  हिंदुस्थान देश हा चीन व पूर्वप्रदेशात चाललेल्या युध्दाच्या कामी खरोखरीचे शस्त्रागार बनला असता व येथील यांत्रिक उद्योगधंद्यांतील प्रगती कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियाच्या तोडीची झाली असती.  पण महायुध्दातल्या परिस्थितीच्या दृष्टीने असे होणे कितीही नकडीचे असले तरी राज्यकर्त्यांनी ब्रिटिश कारखानदारांचे भावी काळात हित कशाने होईल इकडेच सारखी नजर ठेवली  व लढाई संपल्यावर ब्रिटिशांच्या उद्योगधंद्याशी स्पर्धा करु शकेल असा कोणताही उद्योगधंदा हिंदुस्थानात वाढू देणे इष्ट नाही असेच सरकारचे धोरण राहिले.  हे धोरण काही गुप्त नव्हते, त्या धोरणाचा उघड उच्चार ब्रिटिश मासिकातून येत होता व हिंदुस्थानात सर्वत्र या धोरणाचा उल्लेख करून वारंवार निषेध चालला होता.

 

मुलांच्या शिक्षण क्रमात कोठल्यातरी कलाकौशल्याचा, हस्तव्यवसायाचा संबंध आणणे इष्ट आहे हे तत्त्व आता सर्वमान्य झाले आहे.  असा काही संबंध आला म्हणजे बुध्दीला चालना मिळून डोक्यातले विचार व हातातले काम यांची नीट सांगड घातली जाते.  हाच प्रकार यंत्रांच्या बाबतीतही होऊन, वाढत्या वयाच्या मुलामुलींची जिज्ञासा यंत्रामुळे जागी होते.  त्यांच्या बुध्दीला चेतना मिळते.  पोटाकरता निरुपायाने एखाद्या कारखान्यात काम करीत असताना त्या प्रतिकूल वातावरणात नव्हे, तर योग्य त्या प्रसन्न वातावरणात मुलामुलींची बुध्दी त्यांचा यंत्राशी संबंध आला म्हणजे वाढत राहते व त्यांच्या दृष्टीसमोर नवीनवी क्षितिजे येऊ लागतात.  विज्ञानशास्त्रातले साधे प्रयोग, सूक्ष्मदर्शक यंत्रातून अधूनमधून निरीक्षण, निसर्गातील सामान्य दृश्ये व घटना कशा रीतीने घडतात ते समजावून सांगणे, असे चाललेले असले म्हणजे त्याबरोबर मनाची उत्कंठा वाढत जाते, सृष्टीत ज्या काही घडामोडींचा अर्थ कळू लागतो व ठराविक शब्दांच्या धड्यावर, ठराविक रीतीवर विसंबून न बसता आपण स्वत: काही प्रयोग करून काही नवे करून पाहावे अशी इच्छा विद्यार्थ्याला होत होते.  विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत जातो व एकमेकांचे साहाय्य घेऊन काही कार्य करण्याची वृत्ती बळावते व भूतकालाच्या कुन्द रोगट वातावरणामुळे आलेली अगतिकता कमी होते.  नवनवे प्रकार निघून सारखी सुधारणा होत असलेल्या यंत्राच्या तंत्रविद्येवर आधारलेली संस्कृती प्रचारात असली म्हणजे त्यामुळे आपोआप हे सारे घडू लागले.  अशी संस्कृती म्हणजे एक फार मोठा फरक होतो, जुन्यातून नव्यात हळूहळू चालत न जाता एकदम उडी मारून नव्या जमान्यात गेल्यासारखे होते, व या नव्या संस्कृतीचा नव्या यांत्रिक युगाशी फार निकट संबंध आहे.  त्यामुळे नव्या अडचणी, नवे प्रश्न निघतात, पण त्याबरोबर या अडचणीतून वाटा व या प्रश्नांची उत्तरेही सापडतात.

शिक्षणातील वाङ्मयाचा भाग मला विशेष प्रिय आहे व मला प्राचीन भाषांचे विशेष कौतुक आहे. परंतु मुलामुलींच्या शिक्षणात पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र व विशेषत: जीवशास्त्र या सार्‍या शास्त्रांचा थोडाफार तरी प्राथमिक अभ्यास अवश्य असला पाहिजे असे माझे निश्चित मत आहे.  तसा अभ्यास झाला तरच त्यांना आधुनिक जगाचे काही ज्ञान होऊन त्यात त्यांचा जम बसेल व निदान काही अंशाने तरी त्यांच्यात शास्त्रीय वृत्तीची वाढ होईल.  विज्ञानशास्त्राच्या व आधुनिक यंत्रविद्येच्या बळावर मनुष्यजातीचा ज्या मोठमोठ्या गोष्टी साधता आल्या आहेत आणि (त्याहीपेक्षा अधिक गोष्टी लवकरच साधता येतील हे नक्की) शास्त्रीय उपकरणे, यंत्रे यातून जे काही अप्रतिम चातुर्य दिसून आले आहे, शक्ती पाहिजे असेल तर वाटेल तेवढी प्रचंड शक्ती पुरविणारी परंतु अणुरेणूंचेही मान दाखविणारी यंत्रे निघाली आहेत.  साहसाने चालवलेले प्रयोग व त्यातून निघालेल्या सिध्दान्तांचा उपयोग यामुळे हल्लीच्या काळातले अनंत प्रकार साध्य झाले आहेत.  भोवतालच्या निसर्गसृष्टीत चाललेल्या घडामोडी व क्रियाप्रक्रिया यांतील काही ओझरती दृश्ये पाहता येत आहेत, विविध शास्त्रांतून असंख्य कार्यकर्त्यांच्या हातून कल्पना, व प्रत्यक्ष कृती यांचा भव्य मांडलेला आहे, हे सारे पाहून आणि हे सर्व काही मानवी बृध्दीने साध्य केले आहे हे विशेषत: लक्षात आले म्हणजे काही वेगळेच आश्चर्य वाटू लागते.

   

पुढे जाण्यासाठी .......