रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२)

उद्योगधंद्यांच्या वाढीत राज्यकर्त्यांनी आणलेल्या अडचणी

युध्देप्रयोगी सामग्रीचे उत्पादन म्हणजे नेहमीच्या साध्य उत्पादनाचा वळवून नेलेला प्रवाह.


प्रचंड यंत्रे वापरून प्रचंड प्रमाणावर माल काढणार्‍या कारखान्यांचा हिंदुस्थानातील नमुना म्हणजे टाटांचा जमशेदपूर येथील पोलाद व लोखंडाचा कारखाना.  त्याच्यासारखा दुसरा कारखाना संबंधा देशात नाही.  यंत्रे तयार व दुरूस्त करणारे बाकीचे या देशातील कारखाने म्हणजे या कारखान्यापुढे फुटकळ काम करणारी किरकोळ दुकाने वाटतात.  टाटांच्या या कारखान्याची वाढदेखील सरकारी धोरणामुळे फार हळूहळू झाली.  पहिले महायुध्द चालू होते तेव्हा रेल्वेची इंजिने व माणसांचे आणि मालाचे डवे यांचा तुटवडा पडला होता व म्हणून टाटा कारखान्याचे इकडे इंजिने तयार करण्याचे काम करण्याचे ठरविले व त्यांची त्याकरता लागणारी यंत्रसामग्रीही आणली होती, अशी माझी समजूत आहे.  पण ते महायुध्द संपल्याबरोबर हिंदुस्थान सरकार व त्यांचेच एक खाते असलेले रेल्वेबोर्ड यांनी पूर्वीप्रमाणे ब्रिटिश इंजिनांच्या कारखान्यांना आश्रय चालू ठेवण्याचे ठरविले.  देशात जितक्या काही रेल्वे कंपन्या आहेत त्या सरकारी नियंत्रणाखाली किंवा ब्रिटिश कंपन्यांच्या मालकीच्या होत्या, तेव्हा कोणा खाजगी कंपनीला इंजिने विकली जाण्याचा संभव नव्हता हे उघड आहे.  तेव्हा अखेर टाटा कंपनीला ह्या देशात इंजिने तयार करण्याचा बेत सोडून द्यावा लागला.

हिंदुस्थान देशाची वाढ उद्योगधंद्यांच्या कारखान्याच्या बाबतीत व इतर बाबतींत करावयाची असेल तर त्याकरता तीन मूलभूत गोष्टी अवश्य आहेत.  प्रचंड यंत्रे तयार करण्याकरता व त्यांची मोडतोड झाली तर ती नीट करण्याकरता विशाल प्रमाणावर चालणारे मोठमोठे यंत्रांचे कारखाने, विज्ञान-शास्त्रात प्रयोग करून नवेनवे शोध लावणार्‍या प्रयोगशाळा, व विद्युत् शक्ती.  देशाकतर कोणतीही योजना आखावयाची म्हणजे तर या त्रयीच्या आधारावरच ती योजना बसविली पाहिजे व राष्ट्रीय योजना समितीने या त्रयीवरच फार भर दिला होता.  आमच्या देशात ह्या तिन्ही गोष्टींची उणीव भासत होती व यांत्रिक कारखान्यांच्या वाढीला कोठलीतरी मधली महत्त्वाची एखादी वस्तू अगदी कमी पडली की त्यामुळे उत्पादनाच्या ओघात त्या वस्तूच्या जागी चिंचोळेपणा आल्यामुळे तेथे तुंबारा बसून पुढचा ओघ खुंटावा असे प्रकार वारंवार घडत.  प्रगती व्हावी अशा धोरणाने सारा व्यवहार चालला असता तर अशा चिंचोळ्या जागा राहिल्या नसत्या, पण राज्यकर्त्यांचे धोरण अगदी नेमके उलटे होते.  त्यांना हिंदुस्थानात प्रचंड यांत्रिक कारखान्यांची वाढ होऊ द्यावयाची नव्हती हे स्पष्टच होते.  दुसरे महायुध्द सुरू झाल्यावरसुध्दा प्रथम अवश्य ती यंत्रसामग्री या देशात आणावयाला सरकारने परवानगी नाकारली, व पुढे ही यंत्रसामग्री आणावयाला पुरेशी जहाजे नाहीत अशी सबब सरकाने काढली.  हिंदुस्थानात भांडवलाचा किंवा यंत्रे चालविण्याकरता लागणार्‍या कुशल कारागिरांचा तोटा नव्हता, यंत्रेच काय ती पाहिजे होती, व त्याकरता कारखानदारांनी हाकाटी चालविली होती.  यंत्रसामग्री बाहेर देशांतून या देशात आणण्याची संधी सरकाने दिली असती तर हिंदुस्थानची आर्थिक स्थिती कितीतरी पटीने चांगली झाली असती, एवढेच नव्हे तर अतिपूर्वेकडील प्रदेशांत चाललेल्या लढाईचा सारा रागरंग त्यामुळे पार बदलून गेला असता.  मोठा खर्च व अनेक अडचणी सोसून विमानमार्गाने ज्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू पुढे सरकारने इकडे आणल्या त्यातल्या कितीतरी वस्तू अगोदरपासून हिंदुस्थानात अवश्य ती यंत्रसामग्री येऊ दिली असती, तर येथल्या येथे तयार करता आल्या असत्या.  हिंदुस्थान देश हा चीन व पूर्वप्रदेशात चाललेल्या युध्दाच्या कामी खरोखरीचे शस्त्रागार बनला असता व येथील यांत्रिक उद्योगधंद्यांतील प्रगती कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियाच्या तोडीची झाली असती.  पण महायुध्दातल्या परिस्थितीच्या दृष्टीने असे होणे कितीही नकडीचे असले तरी राज्यकर्त्यांनी ब्रिटिश कारखानदारांचे भावी काळात हित कशाने होईल इकडेच सारखी नजर ठेवली  व लढाई संपल्यावर ब्रिटिशांच्या उद्योगधंद्याशी स्पर्धा करु शकेल असा कोणताही उद्योगधंदा हिंदुस्थानात वाढू देणे इष्ट नाही असेच सरकारचे धोरण राहिले.  हे धोरण काही गुप्त नव्हते, त्या धोरणाचा उघड उच्चार ब्रिटिश मासिकातून येत होता व हिंदुस्थानात सर्वत्र या धोरणाचा उल्लेख करून वारंवार निषेध चालला होता.

 

मुलांच्या शिक्षण क्रमात कोठल्यातरी कलाकौशल्याचा, हस्तव्यवसायाचा संबंध आणणे इष्ट आहे हे तत्त्व आता सर्वमान्य झाले आहे.  असा काही संबंध आला म्हणजे बुध्दीला चालना मिळून डोक्यातले विचार व हातातले काम यांची नीट सांगड घातली जाते.  हाच प्रकार यंत्रांच्या बाबतीतही होऊन, वाढत्या वयाच्या मुलामुलींची जिज्ञासा यंत्रामुळे जागी होते.  त्यांच्या बुध्दीला चेतना मिळते.  पोटाकरता निरुपायाने एखाद्या कारखान्यात काम करीत असताना त्या प्रतिकूल वातावरणात नव्हे, तर योग्य त्या प्रसन्न वातावरणात मुलामुलींची बुध्दी त्यांचा यंत्राशी संबंध आला म्हणजे वाढत राहते व त्यांच्या दृष्टीसमोर नवीनवी क्षितिजे येऊ लागतात.  विज्ञानशास्त्रातले साधे प्रयोग, सूक्ष्मदर्शक यंत्रातून अधूनमधून निरीक्षण, निसर्गातील सामान्य दृश्ये व घटना कशा रीतीने घडतात ते समजावून सांगणे, असे चाललेले असले म्हणजे त्याबरोबर मनाची उत्कंठा वाढत जाते, सृष्टीत ज्या काही घडामोडींचा अर्थ कळू लागतो व ठराविक शब्दांच्या धड्यावर, ठराविक रीतीवर विसंबून न बसता आपण स्वत: काही प्रयोग करून काही नवे करून पाहावे अशी इच्छा विद्यार्थ्याला होत होते.  विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत जातो व एकमेकांचे साहाय्य घेऊन काही कार्य करण्याची वृत्ती बळावते व भूतकालाच्या कुन्द रोगट वातावरणामुळे आलेली अगतिकता कमी होते.  नवनवे प्रकार निघून सारखी सुधारणा होत असलेल्या यंत्राच्या तंत्रविद्येवर आधारलेली संस्कृती प्रचारात असली म्हणजे त्यामुळे आपोआप हे सारे घडू लागले.  अशी संस्कृती म्हणजे एक फार मोठा फरक होतो, जुन्यातून नव्यात हळूहळू चालत न जाता एकदम उडी मारून नव्या जमान्यात गेल्यासारखे होते, व या नव्या संस्कृतीचा नव्या यांत्रिक युगाशी फार निकट संबंध आहे.  त्यामुळे नव्या अडचणी, नवे प्रश्न निघतात, पण त्याबरोबर या अडचणीतून वाटा व या प्रश्नांची उत्तरेही सापडतात.

शिक्षणातील वाङ्मयाचा भाग मला विशेष प्रिय आहे व मला प्राचीन भाषांचे विशेष कौतुक आहे. परंतु मुलामुलींच्या शिक्षणात पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र व विशेषत: जीवशास्त्र या सार्‍या शास्त्रांचा थोडाफार तरी प्राथमिक अभ्यास अवश्य असला पाहिजे असे माझे निश्चित मत आहे.  तसा अभ्यास झाला तरच त्यांना आधुनिक जगाचे काही ज्ञान होऊन त्यात त्यांचा जम बसेल व निदान काही अंशाने तरी त्यांच्यात शास्त्रीय वृत्तीची वाढ होईल.  विज्ञानशास्त्राच्या व आधुनिक यंत्रविद्येच्या बळावर मनुष्यजातीचा ज्या मोठमोठ्या गोष्टी साधता आल्या आहेत आणि (त्याहीपेक्षा अधिक गोष्टी लवकरच साधता येतील हे नक्की) शास्त्रीय उपकरणे, यंत्रे यातून जे काही अप्रतिम चातुर्य दिसून आले आहे, शक्ती पाहिजे असेल तर वाटेल तेवढी प्रचंड शक्ती पुरविणारी परंतु अणुरेणूंचेही मान दाखविणारी यंत्रे निघाली आहेत.  साहसाने चालवलेले प्रयोग व त्यातून निघालेल्या सिध्दान्तांचा उपयोग यामुळे हल्लीच्या काळातले अनंत प्रकार साध्य झाले आहेत.  भोवतालच्या निसर्गसृष्टीत चाललेल्या घडामोडी व क्रियाप्रक्रिया यांतील काही ओझरती दृश्ये पाहता येत आहेत, विविध शास्त्रांतून असंख्य कार्यकर्त्यांच्या हातून कल्पना, व प्रत्यक्ष कृती यांचा भव्य मांडलेला आहे, हे सारे पाहून आणि हे सर्व काही मानवी बृध्दीने साध्य केले आहे हे विशेषत: लक्षात आले म्हणजे काही वेगळेच आश्चर्य वाटू लागते.

 

मोठेमोठी यंत्रे व त्यांच्यावर चालणारे उद्योगधंदे ह्यांच्या हिशेबाने एक प्रकारची अर्थव्यवस्था व केवळ ग्रामोद्योगापुरती दुसर्‍या प्रकारची अर्थव्यवस्था ह्या अगदी दोन भिन्न व्यवस्था एकाच वेळी एकाच देशात चालविता येतील काय ?  ते काही शक्य कोटीतले दिसत नाही, कारण त्यांपैकी कोणती तरी एक व्यवस्था अखेर दुसरीला मारक होऊन एकटीच शिल्लक राहणार आणि ती म्हणजे मोठ्या यंत्रावर आधारलेली यात शंका नाही.  अर्थात, कायद्याच्या जोरावर ती दडपून टाकली, साधी चढाओढ होऊ दिली नाही तरच ती दडपली जाईल.  सारांश असा की उत्पादन व अर्थव्यवस्था यांचे हे जे दोन प्रकार आहेत हे दोन्ही प्रकार एकाच वेळी चालू ठेवून त्यांचा मेळ कसा घालावयाचा इतक्यापुरताच साधा असा हा प्रश्न नाही.  ह्यातला एक जोरात-वरचढ राहणार व दुसरा म्हणजे काही उरलेसुरले असेल तेवढे काम करण्यापुरता कशीबशी मिळेल तेवढी जागा धरून राहणार.  यंत्रविद्योत जे अगदी अद्ययावत शोध लागले असतील ते उपयोगात आणून त्यावर आधारलेली जी अर्थव्यवस्था असेल तीच अर्थात प्रभावी ठरणार.  यंत्रांचा उपयोग करून घेताना मोठमोठी यंत्रे वापरण्यात अधिक लाभ आहे म्हणून तीच वापरणे अवश्य आहे असे शास्त्राच्या दृष्टीने ठरले तर तसलीच यंत्रे वापरणे व त्यांच्यामुळे होणारे सारे परिणाम व परिस्थिती पत्करणे भाग आहे.  हल्ली शास्त्रीय दृष्ट्या मोठी यंत्रे वापरणेच योग्य ठरले आहे.  तेव्हा त्याबरोबरचे सारे आलेच.  यंत्रांचा वापर करण्यात हिशेबाने कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी चालवावे असे ठरले तर ते तसे करणे चांगले, पण काहीही ठरवावयाचे असले तरी शास्त्रीय दृष्ट्या जो प्रकार अद्ययावत असेल तोच घेतला पाहिजे, काहीही झाले तरी, उत्पादनाच्या बाबतीत निरुपयोगी झालेले जुनाट प्रकार वापरणे म्हणजे उत्पादनात सुधारणा व वाढ थांबविणे होय.  फार तर तात्पुरता, वेळ मारून नेण्यापुरता उपाय म्हणून जुन्या पध्दतीच्या यंत्रविद्या व अर्थव्यवस्था काही काळ वापरलेली चालेल.

आजकालचे जग व त्या जगाला ज्या परिस्थितीला तोंड द्यावयाचे आहे त्या परिस्थितीत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यावरून उद्योगधंद्यात वापरावयाची यंत्रे विशालच असणे अवश्य आहे हे निश्चित दिसत असताना लहानसहान यंत्रे सोईची की विशाल यंत्रे सोईची हा वाद घालीत बसणे म्हणजे तर्‍हेवाईकपणा वाटतो.  परिस्थितीतील महत्त्वाच्या गोष्टींमुळेच हिंदुस्थानातसुध्दा हल्ली विशाल यांत्रिक कारखान्यांची आवश्यकता सिध्द झालेली आहे आणि तेथे अगदी जवळच्या भविष्यकाळात यांत्रिक उद्योगधंद्यांचे युग येणार याबद्दल कोणालाच शंका उरली नाही.  त्या मार्गाने हिंदुस्थान देशाची प्रगती पुष्कळच झालेली आहे.  यांत्रिक उद्योगधंदे जे विशाल प्रमाणावर व्हायचे ते काही योजना न करता वाटेल तसे स्वैरपणे होऊ दिले तर त्याचे काय दुष्परिणाम होतात ते हल्ली स्पष्ट ओळखता येऊ लागले आहे.  हे वाईट परिणाम मोठ्या प्रमाणावर कारखाने चालविल्यामुळे होतात का त्या कारखान्यांच्या पाठीमागे त्यांचा आधार म्हणून जी सामाजिक व आर्थिक व्यवस्था असते त्यातून उद्‍भवतात हा प्रश्न वेगळा.  आर्थिक व्यवस्थेमुळे जर हे वाईट परिणाम होत असतील तर खरोखर म्हणजे ती अर्थव्यवस्था बदलण्याची तजवीज करायला लागले पाहिजे, उद्योगधंद्यांत तंत्राच्या दृष्टीने जी अवश्य व इष्ट सुधारणा होत जाते तिला दोष देत बसण्यात अर्थ नाही.

खरोखर महत्त्वाचा प्रश्न आहे तो देशात मालाचे उत्पादन करण्याच्या कामी परस्परविरोधी अशा वेगवेगळ्या साधनांपैकी व पध्दतींपैकी प्रत्येक प्रकार किती प्रमाणात घेऊन योग्य मेळ बसवावा कसा हा नसून देशात जी साधने, ज्या पध्दती उत्पादनाकरता वापरीत यांच्याहून अंगच्या गुणाने अगदी वेगळ्या, नव्या साधनांचा व पध्दतींचा उपक्रम सुरू करावा की काय असा प्रश्न आहे.  हे अगदी नवे वेगळे प्रकार आले की त्याबरोबर समाजरचनेवर होणारे त्यांचे परिणाम आलेच.  नव्या प्रकारांत जे भिन्न गुण येतात ते राजकीय व आर्थिक दृष्ट्या तर महत्त्वाचे आहेतच पण शिवाय सामाजिक व मानसिक दृष्ट्याही ते तितकेच महत्त्वाचे आहेत.  विशेषत: हिंदुस्थानापुरते पाहिले तर इतका काळ लोटून गेला तरी अद्याप आम्ही विचार व आचारांच्या बाबतीत जुन्या प्राचीन वळणाला इतके जखडून बांधलेले राहिलो आहोत की नव्या कल्पना आम्हांला सुचण्याकरता, नवी क्षितिजे डोळ्यांसमोर येण्याकरता काही नवे अनुभव, नवी विचारसरणी आम्हांला अवश्य आहे.  आमच्या जीवनात जी निष्क्रियतेची वृत्ती आली आहे ती या नव्या अनुभवांनी, नव्या विचारसरणींनी पालटेल व त्या वृत्तीत चैतन्य सक्रियता येऊन आमची बुध्दी कार्यप्रवण व साहसी बनेल.  परिस्थितीत जसजसे नवे प्रसंग उद्‍भवतील तसतसे आपल्या बुध्दीला या नव्या प्रसंगांना तोंड देणे भाग झाल्यामुळे आपल्याला या नव्याशी जुळवून घ्यावे लागेल व नवे अनुभव येत जातील.

   

जी. डी. एच. कोल या अर्थशास्त्रज्ञ विद्वानाने म्हटले आहे, ''खादीच्या धंद्याचे संवर्धन करावे अशी जी चळवळ गांधींनी चालविली आहे ती म्हणजे भूतकालाचे पुनरुज्जीवन करावे अशा रम्य मानसचित्रात गुंगून त्यात रंग भरण्याकरता उतावीळ झालेल्या वेड्या पिराचे खूळ नाही, खेड्यातील लोकांचे दारिद्र्य कमी करावे, खेड्यांचा दर्जा वाढवावा म्हणून त्या हिशेबाने केलेला तो एक प्रत्यक्षातला व्यवहारी प्रयत्न आहे.''  तो प्रयत्न तर तसा होताच पण आणखी कितीतरी अर्थ त्या प्रयत्नात भरलेला होता.  या प्रयत्नामुळे देशातल्या सार्‍या लोकांना शेतकर्‍यांचा विचार तो गरीब झाला तरी एक आपल्यासारखा माणूसच आहे ह्या दृष्टीने करणे भाग पडले; चमचम चकमकणार्‍या चार-दोन शहरांपलीकडे जागच्या बाजूला हा खेड्यातील शेतकर्‍यांच्या दारिद्र्याचा, दैन्याचा खड्डा आवासून उभा आहे हे उमजू लागले; देशाची स्थिती सुधारली, देशाला स्वातंत्र्य आले, याची खरी खूण म्हणजे चारदोन नवकोट नारायण झाले.  काही वकिलांचे किंवा चार पांढरेपेशांचे चांगले चालले, चारदोन कनिष्ठ वरिष्ठ कायदेमंडळे निघाली ही नसून, ह्या शेतकर्‍याला समाजात किती मान मिळतो, त्याचासंसार किती सुधारला हीच खरी खूण आहे हे महतत्वाचे तत्त्व या प्रयत्नामुळे समजले.  आंग्लविद्याविभूषित ही एक नवीन जात, हा वेगळाच वर्ग, ब्रिटिशांनी आमच्या समाजात काढला होता, तो बाकीच्या जनतेपासून अलग पडून आपल्या एका वेगळ्या जगात वावरत होता, व त्याने ब्रिटिशांविरुध्द काहीही निषेधाची मोहीम चालविली असली तरीसुध्दा, तेव्हासुध्दा त्याला त्याच ब्रिटिशांच्या तोंडाकडे पाहून चालावे लागे.  सामान्य जनता व सुशिक्षित वर्ग यांच्यात आडवा पडलेला हा खंदक गांधींनी थोडाफार भरून काढला व ह्या सुशिक्षितांना तोंडे फिरवून आपल्या देशबांधवांकडे पाहणे भाग पडले.

यंत्रांचा उपयोग करण्याबाबत गांधींच्या मतात हळूहळू पालट होत असलेला दिसत होता.  ''यंत्रे वापरायला हरकत नाही, पण कोणी यंत्राचाच हव्यास धरला तर त्याला माझा विरोध आहे'', असे ते म्हणतात.  ''खेडोपाड्यांतून घरोघरी जर आपल्याला वीज खेळवता आली तर खेडुतांनी आपल्या धंद्याची उपकरणे विजेवर चालवायला माझी हरकत नाही.''  निदान आजच्या परिस्थितीत तरी प्रचंड यंत्रसामग्रीवर धंदा म्हटला की त्याच्या मागोमाग सत्ता व संपत्ती काही विविक्षित लोकांच्या हातात गोळा व्हावयाचीच असे गांधींचे मत होते.  ''काही थोड्या लोकांच्या हातांत सत्ता व संपत्ती साठावी या उद्देशाने यंत्रांचा उपयोग करणे मला पाप वाटते, अन्याय वाटतो.  हल्लीच्या काळात यंत्राचा उपयोग असाच होतो आहे.''  प्रचंड यंत्राच्या साहाय्याने चालणारे मोठमोठे नाना प्रकारचे कारखाने, अनेक धंद्यांना लागणारी सामग्री तयार करणार्‍या मोक्याच्या उद्योगधंद्यांचे कारखाने व सार्वजनिक उपयुक्ततेची कामे सांभाळणारे कारखाने, यांची आवश्यकता आहे असेसुध्दा त्यांना अलीकडे पटू लागले होते, पण त्यांची अट अशी होती की, हे सारे कारखाने सरकारी मालकीचे असले पाहिजेत व त्यांच्या मते महत्त्वाचे असे काही जे हस्तव्यवसायाचे छोटे धंदे होते, त्या धंद्यांवर या मोठ्या धंद्यांचे आक्रमण होऊ नये.  त्यांच्या स्वत:च्या कार्यक्रमाबद्दल ते म्हणत, ''आर्थिक समतेच्या भरभक्कम पायावर जर हे बांधकाम उभारले नाही तर ते म्हणजे एक वाळूवर बांधलेले घर ठरेल.''

याप्रमाणे, खेडेगावातून हस्तव्यवसायाचा उद्योग व लहान प्रमाणावरचे धंदे करावे असा पुरस्कार मनापासून करणारेसुध्दा, मोठ्या प्रमाणावर यांत्रिक उत्पादन चालविणे अशक्य आहे,  अपरिहार्य आहे हे ओळखून चालले आहेत, त्यांची इच्छा एवढीच की तसल्या यांत्रिक उत्पादनाचे क्षेत्र होता होईतो मर्यादित ठेवावे.  या मतांचा गोळाबेरीज अर्थ हा की, उत्पादन व अर्थव्यवस्थेच्या ह्या दोन प्रकारांपैकी भर कोणत्या प्रकारावर द्यावा, त्यांचा एकमेकांशी जम कसा बसवावा एवढाच काय तो वादाचा प्रश्न राहतो.  आजच्या जगाची जी परिस्थिती आहे तिच्या संदर्भाने अर्थ लावू म्हटले तर, राष्ट्रांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते हे तत्त्व मान्य करूनही एखाद्या राष्ट्राला त्यातल्या त्यातच राजकीय वा आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र राहावयाचे असेल तर त्या देशाने यांत्रिक उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर चालविले पाहिजे, शक्ती निर्माण करण्याच्या आपल्याजवळच्या सर्व साधनांचा अधिकात अधिक उपयोग करून घेतला पाहिजे, हे कोणीही मान्य करील.  तसेच राहणीचे मान जर खूप वरच्या दर्जाचे करावयाचे असेल व ते तसे टिकवून ठेवावयाचे असेल व जनतेचे दारिद्र्य नाहीसे करावयाचे असेल तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या राष्ट्राला आधुनिक यंत्रविज्ञानाचा उपयोग केल्याखेरीज गत्यंतर नाही.  यंत्राच्या साहाय्याने संपत्ती व सुबत्ता मिळविण्याच्या कामात एखादा देश मागे पडला तर त्यामुळे जगातील राष्ट्रांच्या शक्तीत जो एक समतोलपणा संभाळला गेला पाहिजे तो वारंवार बिघडत राहील, अधिक शक्तिमान राष्ट्रांच्या आक्रमक वृत्तींना उत्तेजन मिळेल.  अशा मागासलेल्या राष्ट्राला आपले राजकीय स्वातंत्र्य सांभाळता आले तरी ते नावापुरतेच राहणार, त्या राष्ट्रावरची आर्थिक सत्ता हळूहळू दुसर्‍या राष्ट्राकडे जाऊ लागणार.  ह्या मागासलेल्या राष्ट्राला ठरलेला आपला स्वत:चा जीवनादर्श सांभाळण्याकरता आपला अर्थव्यवहार लहान प्रमाणावर ठेवण्याची खटपट करावी लागेल, परंतु आर्थिक सत्ता परकीयांच्या हाती गेल्यामुळे ती खटपट फुकट जाईल.  सारांश हा की ग्रामोद्योग व लहान छोटे धंदे यांच्यावरच मुख्यत: देशाची अर्थव्यवस्था बसवू पाहिले तर त्या प्रयत्नात अपयश नक्की येणार.  अशा प्रयत्नांनी देशातल्या अडचणी दूर होणार नाहीत, देशाचे स्वातंत्र्य टिकणार नाही व जगातल्या राष्ट्रांच्या पंक्तीत देशाला जागा न मिळता फारतर एखादा आश्रित म्हणून त्याची कोठेतरी कोपर्‍यात सोय लागेल.

 

माझे मत ट्रॅक्टरसारखी यांत्रिक शेतीची अवजारे, मोठी यंत्रसामग्री वापरावी असे आहे, आणि माझी अशी खात्री झाली आहे की, शेतीच्या धंद्यात झालेली गर्दी कमी करण्याकरिता दारिद्र्य कमी करून लोकांचे राहणीचे मान वाढविण्याकरिता, देशाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अवश्य ती सामग्री तयार करण्याकरिता व अशा इतर अनेक उद्देशांनी देशात यंत्राच्या साहाय्याने झपाट्याने उद्योगधंद्यांची वाढ करणे अवश्य आहे.  पण त्याचप्रमाणे माझी अशीही खात्री झाली आहे की, या यांत्रिकीकरणापासून होणारा लाभ पुरा आपल्या पदरात जाडून घ्यावयाचा असला व त्यात असलेले अनेक धोके टाळावयाचे असले तर अगदी जपूर योजना केली पाहिजे, त्याकरिता अवश्य ते फेरफार करून नीट जम बसविला पाहिजे, तसे झाले तरच उपयोग.  चीन व हिंदुस्थानसारखे स्वतंत्र जुनी परंपरा उद्याप भरभक्कम कायम असलेले परंतु देशाची सर्वांगीण वाढ काही ऐतिहासिक कारणामुळे खुंटलेले जे देश आहेत, त्यांतून आजच्या स्थितीला या असल्या योजनांची फारच गरज आहे.

चीनमध्ये चालू असलेल्या 'उद्यांगधंद्यांच्या सहकारी संस्था' मला विशेष आवडल्या व मला असे वाटते की, अशा तर्‍हेच्या संस्था हिंदुस्थानला फार विशेष सोयीच्या आहेत.  हा प्रकार हिंदुस्थानातील पार्श्वभूमीशी जमेल, त्यामुळे लहान लहान धंद्यांतून लोकशाहीच्या पायावर प्रगती करता येईल, व लोकांना सहकार्याची सवय लागेल.  मोठमोठ्या कारखान्यांना जोड म्हणून ह्या प्रकाराचा उपयोग होईल.  हिंदुस्थानात प्रचंड कारखान्यांची वाढ कितीही झपाट्याने झाली तरी लहानसहान खेडोपाड्यांतून करता येण्याजोग्या हस्तव्यवसायाच्या धंद्यांना वाटेल तेवढे भरपूर क्षेत्र मोकळे राहणारच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.  खुद्द रशियात मालक तोच कारागीर या प्रकारे चालविलेल्या अनेक धंदेदुकानांच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांच्या कार्यामुळे त्यांना देशाच्या उद्योगधंद्यांच्या वाढीत महत्त्वाचा भाग घेता आला आहे.

यांत्रिक शक्तीसाठी विजेचा उपयोग वाढत चालला आहे, त्यामुळे लहान प्रमाणावर चालविलेल्या धंद्यांची वाढ सुलभ होते व अशा छोट्या धंद्यांना, आर्थिक दृष्ट्या, मोठ्या धंद्यांशी चढाओढ करणे शक्य होते.  शिवाय मोठे कारखाने एकाच ठिकाणी वाढवीत बसण्यापेक्षा ते अनेक ठिकाणी पांगून असावेत असे पुष्कळांचे मत होत चालले आहे.  प्रत्यक्ष हेन्री फोर्ड याचेही असेच मत आहे.  प्रचंड यांत्रिक कारखान्यांनी गजबजलेल्या मोठ्या शहरातून राहावे लागल्यामुळे खेडेगावाची शेतीची मोकळी माती माणसाच्या अंगाला लागेनाशी होते व ह्या हानीमुळे मानसशास्त्रदृष्ट्या व प्राणिजीवनशास्त्रदृष्ट्या मनुष्याला अशा राहणीत जे अनेक धोके आहेत ते हल्ली विज्ञानशास्त्रज्ञ दाखवून देऊ लागले आहेत.  काही शास्त्रज्ञांचे तर असे मत आहे की, खेडेगावातून राहून काळीची मोकळी माती माणसाच्या अंगाला लागत राहिली तरच मानववंश टिकणार, म्हणून मानववंश जगण्याकरता खेडेगावात राहून धरणीमातेच्या मांडीवर लोळणे अवश्य आहे.  लोकवस्ती विरळ पांगून राहून जमिनीशी दाट संबंध राखूनही आधुनिक सुधारणा व संस्कृती यात असलेल्या सुखसोयींचा उपभोग घेणे आजकालच्या शास्त्रीय शोधांमुळे उपलब्ध झालेल्या साधनांमुळे शक्य झालो आहे हे एक सुदैवच म्हणायचे.

शास्त्रीय व आर्थिक दृष्ट्या हे सारे जे काय असेल ते असो, पण अलीकडच्या काळात गेली काही दशक वर्षे हिंदुस्थानात आमच्यापुढे प्रश्न आहे तो असा की, आहे त्या परिस्थितीत, परकीय सत्तेचे व त्याबरोबरच त्या सत्तेच्या हितसंबंधी गोतावळ्यांचे जोखड मानगुटी बसलेले असताना, देशातल्या सर्वसामान्य जनतेत पसरलेले दारिद्र्य हटवावे कसे, स्वावलंबनाची स्वत:च्या बळावर काही उद्योग करण्याची वृत्ती या जनतेत आणावी कशी?  कोणताही काळ घेतला तरी, हस्तव्यवसायाचे छोटे धंदे खेडोपाडी चालविण्याच्या बाजूने पुष्कळ समर्थन करता येण्याजोगे आहेच, पण त्यातल्या त्यात आमची जी देशातली परिस्थिती होती ती पाहता निव्वळ व्यवहार दृष्टीने आम्हाला करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे हे छोटे धंदेच होते.  आम्ही हा उपक्रम चालविताना ज्या रीतीने चालविला ती रीत सर्वोत्तम किंवा सगळ्यांत सोईची नसेलही.  तो सारा प्रश्न फार मोठा, कठीण व गुंतागुंतीचा होता, व आम्हाला वेळोवेळी सरकारच्या दडपशाहीला तोंड द्यावे लागत होते.  आम्हाला वेगवेगळे प्रयोग करीत राहून त्यात ज्या चुका होतील त्यांचा अनुभव घेतघोत हळूहळू शहाणे होण्याचा मार्ग काय तो मोकळा होता.  आरंभापासूनच सहकारी संस्थांवर आम्ही भर देऊन त्यांना उत्तेजन दिले असते व घरोधरी खेड्यापाड्यातून वापरता येण्याजोग्या छोट्याछोट्या यंत्रांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने यंत्रविद्या व विज्ञानशास्त्र यांतील तज्ज्ञांचे साहाय्य जास्त घेतले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.  आता ह्या ग्रामोद्योग संस्थांमधून सहकारी तत्त्व अमलात आणले जात आहे.

   

पुढे जाण्यासाठी .......