शुक्रवार, जुलै 19, 2019
   
Text Size

प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२)

जी. डी. एच. कोल या अर्थशास्त्रज्ञ विद्वानाने म्हटले आहे, ''खादीच्या धंद्याचे संवर्धन करावे अशी जी चळवळ गांधींनी चालविली आहे ती म्हणजे भूतकालाचे पुनरुज्जीवन करावे अशा रम्य मानसचित्रात गुंगून त्यात रंग भरण्याकरता उतावीळ झालेल्या वेड्या पिराचे खूळ नाही, खेड्यातील लोकांचे दारिद्र्य कमी करावे, खेड्यांचा दर्जा वाढवावा म्हणून त्या हिशेबाने केलेला तो एक प्रत्यक्षातला व्यवहारी प्रयत्न आहे.''  तो प्रयत्न तर तसा होताच पण आणखी कितीतरी अर्थ त्या प्रयत्नात भरलेला होता.  या प्रयत्नामुळे देशातल्या सार्‍या लोकांना शेतकर्‍यांचा विचार तो गरीब झाला तरी एक आपल्यासारखा माणूसच आहे ह्या दृष्टीने करणे भाग पडले; चमचम चकमकणार्‍या चार-दोन शहरांपलीकडे जागच्या बाजूला हा खेड्यातील शेतकर्‍यांच्या दारिद्र्याचा, दैन्याचा खड्डा आवासून उभा आहे हे उमजू लागले; देशाची स्थिती सुधारली, देशाला स्वातंत्र्य आले, याची खरी खूण म्हणजे चारदोन नवकोट नारायण झाले.  काही वकिलांचे किंवा चार पांढरेपेशांचे चांगले चालले, चारदोन कनिष्ठ वरिष्ठ कायदेमंडळे निघाली ही नसून, ह्या शेतकर्‍याला समाजात किती मान मिळतो, त्याचासंसार किती सुधारला हीच खरी खूण आहे हे महतत्वाचे तत्त्व या प्रयत्नामुळे समजले.  आंग्लविद्याविभूषित ही एक नवीन जात, हा वेगळाच वर्ग, ब्रिटिशांनी आमच्या समाजात काढला होता, तो बाकीच्या जनतेपासून अलग पडून आपल्या एका वेगळ्या जगात वावरत होता, व त्याने ब्रिटिशांविरुध्द काहीही निषेधाची मोहीम चालविली असली तरीसुध्दा, तेव्हासुध्दा त्याला त्याच ब्रिटिशांच्या तोंडाकडे पाहून चालावे लागे.  सामान्य जनता व सुशिक्षित वर्ग यांच्यात आडवा पडलेला हा खंदक गांधींनी थोडाफार भरून काढला व ह्या सुशिक्षितांना तोंडे फिरवून आपल्या देशबांधवांकडे पाहणे भाग पडले.

यंत्रांचा उपयोग करण्याबाबत गांधींच्या मतात हळूहळू पालट होत असलेला दिसत होता.  ''यंत्रे वापरायला हरकत नाही, पण कोणी यंत्राचाच हव्यास धरला तर त्याला माझा विरोध आहे'', असे ते म्हणतात.  ''खेडोपाड्यांतून घरोघरी जर आपल्याला वीज खेळवता आली तर खेडुतांनी आपल्या धंद्याची उपकरणे विजेवर चालवायला माझी हरकत नाही.''  निदान आजच्या परिस्थितीत तरी प्रचंड यंत्रसामग्रीवर धंदा म्हटला की त्याच्या मागोमाग सत्ता व संपत्ती काही विविक्षित लोकांच्या हातात गोळा व्हावयाचीच असे गांधींचे मत होते.  ''काही थोड्या लोकांच्या हातांत सत्ता व संपत्ती साठावी या उद्देशाने यंत्रांचा उपयोग करणे मला पाप वाटते, अन्याय वाटतो.  हल्लीच्या काळात यंत्राचा उपयोग असाच होतो आहे.''  प्रचंड यंत्राच्या साहाय्याने चालणारे मोठमोठे नाना प्रकारचे कारखाने, अनेक धंद्यांना लागणारी सामग्री तयार करणार्‍या मोक्याच्या उद्योगधंद्यांचे कारखाने व सार्वजनिक उपयुक्ततेची कामे सांभाळणारे कारखाने, यांची आवश्यकता आहे असेसुध्दा त्यांना अलीकडे पटू लागले होते, पण त्यांची अट अशी होती की, हे सारे कारखाने सरकारी मालकीचे असले पाहिजेत व त्यांच्या मते महत्त्वाचे असे काही जे हस्तव्यवसायाचे छोटे धंदे होते, त्या धंद्यांवर या मोठ्या धंद्यांचे आक्रमण होऊ नये.  त्यांच्या स्वत:च्या कार्यक्रमाबद्दल ते म्हणत, ''आर्थिक समतेच्या भरभक्कम पायावर जर हे बांधकाम उभारले नाही तर ते म्हणजे एक वाळूवर बांधलेले घर ठरेल.''

याप्रमाणे, खेडेगावातून हस्तव्यवसायाचा उद्योग व लहान प्रमाणावरचे धंदे करावे असा पुरस्कार मनापासून करणारेसुध्दा, मोठ्या प्रमाणावर यांत्रिक उत्पादन चालविणे अशक्य आहे,  अपरिहार्य आहे हे ओळखून चालले आहेत, त्यांची इच्छा एवढीच की तसल्या यांत्रिक उत्पादनाचे क्षेत्र होता होईतो मर्यादित ठेवावे.  या मतांचा गोळाबेरीज अर्थ हा की, उत्पादन व अर्थव्यवस्थेच्या ह्या दोन प्रकारांपैकी भर कोणत्या प्रकारावर द्यावा, त्यांचा एकमेकांशी जम कसा बसवावा एवढाच काय तो वादाचा प्रश्न राहतो.  आजच्या जगाची जी परिस्थिती आहे तिच्या संदर्भाने अर्थ लावू म्हटले तर, राष्ट्रांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते हे तत्त्व मान्य करूनही एखाद्या राष्ट्राला त्यातल्या त्यातच राजकीय वा आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र राहावयाचे असेल तर त्या देशाने यांत्रिक उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर चालविले पाहिजे, शक्ती निर्माण करण्याच्या आपल्याजवळच्या सर्व साधनांचा अधिकात अधिक उपयोग करून घेतला पाहिजे, हे कोणीही मान्य करील.  तसेच राहणीचे मान जर खूप वरच्या दर्जाचे करावयाचे असेल व ते तसे टिकवून ठेवावयाचे असेल व जनतेचे दारिद्र्य नाहीसे करावयाचे असेल तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या राष्ट्राला आधुनिक यंत्रविज्ञानाचा उपयोग केल्याखेरीज गत्यंतर नाही.  यंत्राच्या साहाय्याने संपत्ती व सुबत्ता मिळविण्याच्या कामात एखादा देश मागे पडला तर त्यामुळे जगातील राष्ट्रांच्या शक्तीत जो एक समतोलपणा संभाळला गेला पाहिजे तो वारंवार बिघडत राहील, अधिक शक्तिमान राष्ट्रांच्या आक्रमक वृत्तींना उत्तेजन मिळेल.  अशा मागासलेल्या राष्ट्राला आपले राजकीय स्वातंत्र्य सांभाळता आले तरी ते नावापुरतेच राहणार, त्या राष्ट्रावरची आर्थिक सत्ता हळूहळू दुसर्‍या राष्ट्राकडे जाऊ लागणार.  ह्या मागासलेल्या राष्ट्राला ठरलेला आपला स्वत:चा जीवनादर्श सांभाळण्याकरता आपला अर्थव्यवहार लहान प्रमाणावर ठेवण्याची खटपट करावी लागेल, परंतु आर्थिक सत्ता परकीयांच्या हाती गेल्यामुळे ती खटपट फुकट जाईल.  सारांश हा की ग्रामोद्योग व लहान छोटे धंदे यांच्यावरच मुख्यत: देशाची अर्थव्यवस्था बसवू पाहिले तर त्या प्रयत्नात अपयश नक्की येणार.  अशा प्रयत्नांनी देशातल्या अडचणी दूर होणार नाहीत, देशाचे स्वातंत्र्य टिकणार नाही व जगातल्या राष्ट्रांच्या पंक्तीत देशाला जागा न मिळता फारतर एखादा आश्रित म्हणून त्याची कोठेतरी कोपर्‍यात सोय लागेल.

 

माझे मत ट्रॅक्टरसारखी यांत्रिक शेतीची अवजारे, मोठी यंत्रसामग्री वापरावी असे आहे, आणि माझी अशी खात्री झाली आहे की, शेतीच्या धंद्यात झालेली गर्दी कमी करण्याकरिता दारिद्र्य कमी करून लोकांचे राहणीचे मान वाढविण्याकरिता, देशाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अवश्य ती सामग्री तयार करण्याकरिता व अशा इतर अनेक उद्देशांनी देशात यंत्राच्या साहाय्याने झपाट्याने उद्योगधंद्यांची वाढ करणे अवश्य आहे.  पण त्याचप्रमाणे माझी अशीही खात्री झाली आहे की, या यांत्रिकीकरणापासून होणारा लाभ पुरा आपल्या पदरात जाडून घ्यावयाचा असला व त्यात असलेले अनेक धोके टाळावयाचे असले तर अगदी जपूर योजना केली पाहिजे, त्याकरिता अवश्य ते फेरफार करून नीट जम बसविला पाहिजे, तसे झाले तरच उपयोग.  चीन व हिंदुस्थानसारखे स्वतंत्र जुनी परंपरा उद्याप भरभक्कम कायम असलेले परंतु देशाची सर्वांगीण वाढ काही ऐतिहासिक कारणामुळे खुंटलेले जे देश आहेत, त्यांतून आजच्या स्थितीला या असल्या योजनांची फारच गरज आहे.

चीनमध्ये चालू असलेल्या 'उद्यांगधंद्यांच्या सहकारी संस्था' मला विशेष आवडल्या व मला असे वाटते की, अशा तर्‍हेच्या संस्था हिंदुस्थानला फार विशेष सोयीच्या आहेत.  हा प्रकार हिंदुस्थानातील पार्श्वभूमीशी जमेल, त्यामुळे लहान लहान धंद्यांतून लोकशाहीच्या पायावर प्रगती करता येईल, व लोकांना सहकार्याची सवय लागेल.  मोठमोठ्या कारखान्यांना जोड म्हणून ह्या प्रकाराचा उपयोग होईल.  हिंदुस्थानात प्रचंड कारखान्यांची वाढ कितीही झपाट्याने झाली तरी लहानसहान खेडोपाड्यांतून करता येण्याजोग्या हस्तव्यवसायाच्या धंद्यांना वाटेल तेवढे भरपूर क्षेत्र मोकळे राहणारच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.  खुद्द रशियात मालक तोच कारागीर या प्रकारे चालविलेल्या अनेक धंदेदुकानांच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांच्या कार्यामुळे त्यांना देशाच्या उद्योगधंद्यांच्या वाढीत महत्त्वाचा भाग घेता आला आहे.

यांत्रिक शक्तीसाठी विजेचा उपयोग वाढत चालला आहे, त्यामुळे लहान प्रमाणावर चालविलेल्या धंद्यांची वाढ सुलभ होते व अशा छोट्या धंद्यांना, आर्थिक दृष्ट्या, मोठ्या धंद्यांशी चढाओढ करणे शक्य होते.  शिवाय मोठे कारखाने एकाच ठिकाणी वाढवीत बसण्यापेक्षा ते अनेक ठिकाणी पांगून असावेत असे पुष्कळांचे मत होत चालले आहे.  प्रत्यक्ष हेन्री फोर्ड याचेही असेच मत आहे.  प्रचंड यांत्रिक कारखान्यांनी गजबजलेल्या मोठ्या शहरातून राहावे लागल्यामुळे खेडेगावाची शेतीची मोकळी माती माणसाच्या अंगाला लागेनाशी होते व ह्या हानीमुळे मानसशास्त्रदृष्ट्या व प्राणिजीवनशास्त्रदृष्ट्या मनुष्याला अशा राहणीत जे अनेक धोके आहेत ते हल्ली विज्ञानशास्त्रज्ञ दाखवून देऊ लागले आहेत.  काही शास्त्रज्ञांचे तर असे मत आहे की, खेडेगावातून राहून काळीची मोकळी माती माणसाच्या अंगाला लागत राहिली तरच मानववंश टिकणार, म्हणून मानववंश जगण्याकरता खेडेगावात राहून धरणीमातेच्या मांडीवर लोळणे अवश्य आहे.  लोकवस्ती विरळ पांगून राहून जमिनीशी दाट संबंध राखूनही आधुनिक सुधारणा व संस्कृती यात असलेल्या सुखसोयींचा उपभोग घेणे आजकालच्या शास्त्रीय शोधांमुळे उपलब्ध झालेल्या साधनांमुळे शक्य झालो आहे हे एक सुदैवच म्हणायचे.

शास्त्रीय व आर्थिक दृष्ट्या हे सारे जे काय असेल ते असो, पण अलीकडच्या काळात गेली काही दशक वर्षे हिंदुस्थानात आमच्यापुढे प्रश्न आहे तो असा की, आहे त्या परिस्थितीत, परकीय सत्तेचे व त्याबरोबरच त्या सत्तेच्या हितसंबंधी गोतावळ्यांचे जोखड मानगुटी बसलेले असताना, देशातल्या सर्वसामान्य जनतेत पसरलेले दारिद्र्य हटवावे कसे, स्वावलंबनाची स्वत:च्या बळावर काही उद्योग करण्याची वृत्ती या जनतेत आणावी कशी?  कोणताही काळ घेतला तरी, हस्तव्यवसायाचे छोटे धंदे खेडोपाडी चालविण्याच्या बाजूने पुष्कळ समर्थन करता येण्याजोगे आहेच, पण त्यातल्या त्यात आमची जी देशातली परिस्थिती होती ती पाहता निव्वळ व्यवहार दृष्टीने आम्हाला करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे हे छोटे धंदेच होते.  आम्ही हा उपक्रम चालविताना ज्या रीतीने चालविला ती रीत सर्वोत्तम किंवा सगळ्यांत सोईची नसेलही.  तो सारा प्रश्न फार मोठा, कठीण व गुंतागुंतीचा होता, व आम्हाला वेळोवेळी सरकारच्या दडपशाहीला तोंड द्यावे लागत होते.  आम्हाला वेगवेगळे प्रयोग करीत राहून त्यात ज्या चुका होतील त्यांचा अनुभव घेतघोत हळूहळू शहाणे होण्याचा मार्ग काय तो मोकळा होता.  आरंभापासूनच सहकारी संस्थांवर आम्ही भर देऊन त्यांना उत्तेजन दिले असते व घरोधरी खेड्यापाड्यातून वापरता येण्याजोग्या छोट्याछोट्या यंत्रांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने यंत्रविद्या व विज्ञानशास्त्र यांतील तज्ज्ञांचे साहाय्य जास्त घेतले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.  आता ह्या ग्रामोद्योग संस्थांमधून सहकारी तत्त्व अमलात आणले जात आहे.

 

ही अशी गांधींची विचारसरणी होती खरी, पण प्रत्यक्ष जीवनात संसारातल्या अडचणी हिशेबात न घेता आपल्या कल्पनेने काढलेल्या अद्‍भुत सृष्टीत रंगून जाऊन व त्या स्वप्नातच दंग होऊन बसणे त्यांच्या प्रकृतीतच नव्हते.  केवळ टक्क्यांचा हिशेब पाहणार्‍या व्यवहारदक्ष गुजराथ प्रांतात त्यांचा जनम; तेथील खेड्यातील, त्यातील ग्रामीण जीवनाची माहिती त्यांच्याइतकी कोणालाच नव्हती.  त्यांच्या स्वत:च्या त्या अनुभवामुळेच त्यांनी आपला सूतकताई व ग्रामोद्योगाचा कार्यक्रम काढला.  उद्योगधंदा मिळत नसल्यामुळे सर्वस्वी किंवा अंशत: बेकार पडलेल्या लाखो लोकांना काही आधार द्यावयाचा असेल, नुसते बसून राहाून जागच्या जागी कुजण्याची जी साथ सार्‍या देशभर पसरून सर्वसामान्य जनता बधीर होत चालली होती, ती साथ बंद पाडावयाची असेल, ग्रामीण जनतेपुढे ठेवल्या जाणार्‍या आदर्श स्थितीची उंची थोडी का होईना पण सर्वांना साधेल अशी वाढवावयाची असेल, नुसते वार्‍यावर सोडून दिलेल्या भणंग भिकार्‍यासारखे मदतीकरता ज्याच्या त्याच्या तोंडाकडे पाहात न बसता स्वत:च्या बळावर काही उद्योग करावा अशी शिकवण त्यांना द्यायची असेल, आणि हा सारा खटाटोप, सारा उद्योग फारसे भांडवल न लागता करावयाचा असेल, तर गांधींनी काढलेल्या मार्गावाचून दुसरा काही उपाय दिसत नव्हता.  परकीय सत्ता व परिस्थितीचा फायदा घेऊन अन्यायाने चाललेले शोषण यांतून आपोआप उद्‍भवणारी संकटे व परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याकरता एखादी विशाल योजना अमलात आणून ती शेवटपर्यंत पार पाडण्याकरता अवश्यक त्या स्वातंत्र्याचा अभाव ह्या अडचणी तर देशापुढे उभ्याच होत्या, पण ह्याखेरीज आणखी एक प्रश्न देशापुढे असा होता की, आमच्याजवळ आमच्या देशातले असे भांडवल फार थोडे होते व मनुष्यबळ मात्र वाटेल तितके होते.  तेव्हा काही कामधंदा नाही म्हणून काहीही उत्पादन न होता फुकट चाललेले हे मनुष्यबळ काही उपयुक्त कार्यात कसे गुंतवावे हा मोठा प्रश्न पडला होता.  एखादे मात्र यंत्रावाचून नुसते माणसाकरवी केले व तेच काम यंत्रांच्या साहाय्याने केले तर या प्रत्येक प्रकारात शक्ती किती लागते ह्याचा हिशेब काढून त्यांची तुलना करण्याचा मुर्खपणा काही लोक करतात.  मोठे यंत्र घेतले तर ते एकच काय पण दहा हजार माणसांचे काम एकटे यंत्र करू शकेल, पण एका यंत्राकडून काम करवून त्यापायी जर ही दहा हजार माणसे काम नाही म्हणून स्वस्थ बसण्याचा प्रसंग आला तर एकंदर समाजाच्या नफातोट्याच्या हिशेबाने अशा यंत्राचा उपयोग म्हणजे एकंदर समाजाचा तोटाच ठरतो; समाजात हल्ली चालू असलेली कामाची व्यवस्था बदलण्याचा लांबवरचा विचार करून तशी काही योजना असली तर गोष्ट वेगळी.  पण आपल्याजवळ मुळात असले यंत्रच नसले तर मनुष्यबळ व यंत्रबळ यांची ही तुलना करण्याचे कारणच नाही.  उत्पादन करण्याच्या कामी आपल्याजवळ आहे ते मनुष्यबळ वापरण्यात राष्ट्राला व व्यक्तीला दोघांनाही निव्वळ फायदाच पदरात पडणार.  यंत्रशक्ती वापरात आणावयाची ती त्या यंत्रामुळे किती माणसांच्या उद्योगधंद्याची सोय होते ते प्रथम पाहून मग यंत्रे आणली व त्या यंत्रांमुळे लोकांचे काम सुटून बेकारीत भर पडत नाही याची खबरदारी ठेवली तर अशा यंत्राकरवी शक्य तितके अधिक प्रमाणावर काम घेण्याचा उपक्रम करावा,  त्याला अवश्य विरोधच केला पाहिजे असे नाही.

यंत्रशक्तीच्या साहाय्याने उद्योगधंद्यांची खूप वाढ केलेले परंतु आकाराने अगदी छोटे असे पश्चिमेकडचे देश व रशिया किंवा अमेरिका यांच्यासराखे विरळ वस्तीचे मोठे देश यांच्याशी हिंदुस्थानची तुलना करण्यात दिशाभूल होते.  पश्चिम युरोपमध्ये उद्योगधंदे यंत्रसाहाय्याने चालविण्याचे काम गेली १०० वर्षे वाढत वाढत आलेली आहे व एवढ्या अवधीत लोकसंख्येचा या यंत्रयुगव्यवस्थेशी जम हळूहळू बसत आला आहे.  प्रथम आरंभी लोकसंख्या झपाट्याने वाढली, नंतर तेवढीच स्थिर झाली व आता लोकसंख्या कमी होते आहे.  रशिया किंवा अमेरिकन संयुक्त संस्थाने यांतील लोकसंख्या वाढत असली तर मुळातच थोडी व त्यांच्या देशातून पडीत जमिनीची वाटेल तेवढी विशाल क्षेत्रे मोकळी आहेत.  तेथे जमीन वहितीस आणावयाची म्हटले तर मोठाले यांत्रिक नांगर वगैरे यांत्रिक अवराजावाचून चालणे अशक्य.  गंगा नदीच्या खोर्‍यातल्या दाट वस्तीच्या प्रदेशात जेथे लाखे लोकांचे पोटाचे साधन शेतीवरचा कामधंदा हेच अद्याप आहे, तेथे ही असली यंत्रे कशी काय अवश्य आहेत ते कळत नाही.  याशिवाय आणखीही पुष्कळ भानगडी या यंत्रापायी निघत असतात, त्या अमेरिकेतसुध्दा निघाल्या आहेत.  हिंदुस्थानात आज हजारो वर्षे शेती चालता चालता जमिनीचा कस पार संपल्यासारखा आहे.  इकडची जमीन यांत्रिक नांगर लावून खूप खोलीपर्यंत उलथली गेली तर जमिनीचा कस आणखी कमी होत जाईल की काय, जमीन धुपून जाईल की काय?  हिंदुस्थानात रेल्वेचे-रस्ते तयार केले व त्याकरता ठिकठिकाणी भराव घालून मोठमोठे बांध घातले तेव्हा त्या प्रदेशातून आपोआप पाणी वाहून जाण्याची काय निसर्गत:च सोय होती, काय करावी याचा काही विचारच झाला नाही.  पावसाचे पाणी आपोआप वाहून जाण्याची निसर्गत:च जी काय सोय होती तिच्यात या बांधांमुळे घोटाळा झाला व त्याचा परिणाम असा झाला की, वारंवार पुरांचा त्रास वाढत्या प्रमाणावर होऊ लागला, शेतजमिनी धुपून जाऊ लागल्या व जिकडे तिकडे हिंवताप पसरू लागला.

   

येणेप्रमाणे हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणावर उद्योग-धंद्यांच्या कारखान्यांचा प्रसार व्हावा असा पुरस्कार काँग्रेस सतत करीत आली आहे व त्याच्या बरोबरीने छोट्या धंद्यांची खेडेगावांतून वाढ व्हावी ह्यावरही काँग्रेसचा भर असून त्याकरता काँग्रेसने प्रत्यक्ष कार्यही चालविले आहे.  ह्या दोन धोरणांत विरोधच येतो काय ?  मला असे वाटते की, जास्त भर कशावर, एवढाच काय तो मनभेद या धोरणात आहे.  या दोन्ही प्रकारच्या उद्योगधंद्यांतून माणसांचा व अर्थव्यवस्थेचा जो संबंध येतो त्यातील अनेक कारणांची, अनेक प्रश्नांची पूर्वी जी जाणीव आलेली नव्हती ती आता आलेली आहे.  मोठ्या प्रमाणावर कारखान्यांचा धंदा चाविणारे या देशातले कारखानदार व त्यांचा पक्ष उचलून धरणारे राजकीय पुढारी यांचे विचार एकोणिसाव्या शतकात युरोप खंडात भांडवलशाही पध्दतीच्या कारखानदारीची जी वाढ झाली त्या हिशोबाने, त्या दृष्टिकोणातून चालत.  त्यानंतर विसाव्या शतकात त्या पध्दतीचे जे दुष्परिणाम उघड दिसू लागले तिकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.  हिंदुस्थानात परिस्थिती अशी होती की, या कारखानदारीची साहजिक यथाप्रमाण वाढ व्हावयाची तिला शंभर वर्षे प्रतिबंध पडलेला होता व त्यामुळे या पध्दतीचे दुष्परिणाम अधिकच विस्तृत होण्याचा संभव होता.  हिंदुस्थानात त्या वेळी प्रचलित असलेल्या आर्थिक पध्दतीच्या अनुरोधाने जो मध्यम दर्जाचे कारखाने काढण्याचा उपक्रम झाला त्यामुळे लोकांना जास्त काम मिळायच्या ऐवजी बेकारी मात्र जास्त वाढली.  एका टोकाला भांडवल अधिकाधिक जमू लागले, तर दुसर्‍या टोकाला दारिद्र्य व बेकारी वाढत चालली- पध्दत वेगळी असती आणि प्रचंड प्रमाणावर कारखाने काढून त्यांत अधिकाधिक लोकांची कामाची सोय लावण्यावर भर दिला गेला असता, आणि हे सारे वाढवताना योजना ठरवून वाढवत गेले असते, तर हा प्रकार टाळणे कठीण गेले नसते.

सामान्य जनतेचे दारिद्र्य सरसकट मोठ्या प्रमाणावर पाहिले तर वाढते आहे या गोष्टीचा गांधींच्या मनावर फार परिणाम झाला.  मानवी जीवन कसे असावे याबद्दल सर्वसाधारण कल्पना घेतली तर गांधींची कल्पना व जिला आधुनिक कल्पना म्हणता येईल ती कल्पना यात मुळातच फार मोठा भेद आहे हे खरे, असे मला वाटते.  आध्यात्मिक व नैतिक मूल्ये खर्ची घालून, कमी करून त्यांच्या ऐवजी सतत वाढत जाणारे राहणीचे मान व फैलावत जाणारा ऐषाराम यांचे त्यांना कौतुक नाही.  त्यांच्या मते माणसाला कष्टाचे जीवन हीच सरळ वाट आहे, सुखाला अंग दिले, चैनीची चट लागली, की वाट वाकडी होते व नीतीचा मार्ग सुटतो, अंतरतो.  गांधींना सगळ्यात मोठा धक्का बसतो तो जीवनाचे मार्ग व किकासाची संधी याबाबतीत गरीब व श्रीमंत यांच्या दरम्यान पसरलेली प्रचंड दरी पाहून.  त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक व मानसिक समाधानाकरता त्यांनी ही दरी ओलांडून ते गरिबांच्याकडे गेले आहेत, त्यांनी त्या गरिबांना परवडते तसली, किंवा थोडीफार बरी बसली तरी त्या गरिबांना झेपेल तशी राहणी, त्यांच्या वेषाची वस्त्रे किंवा खरे म्हणजे वस्त्रांचा अभाव पत्करला आहे.  एका टोकाला संख्येने अगदी थोडे असे श्रीमंत व दुसर्‍या टोकाला असंख्य, दारिद्र्याने गांजलेली सामान्य जनता, यांच्यामध्ये हे जे अफार अंतर पडले त्याला गांधींच्या मते दोन मुख्य कारणे होती : परकीय सत्ता व तिची सहचरी असलेली, लोकांवर अन्याय करून स्वत:ची लयलूट करण्याची वृत्ती, हे एक कारण व दुसरे विशाल यंत्राच्या रूपाने प्रगट झालेली भांडवलशाहीवर व यांत्रिक धंद्यावर आरूढ झालेली पाश्चात्य संस्कृती.  या दोन्हींनाही त्यांनी विरोध चालविला.  जुन्या काळातल्या स्वायत्त व बहुतेक स्वयंपूर्ण अशा ग्रामसंस्थांची सृष्टी, जेथे जीननोपयोगी पदार्थ निर्माण करणे, ते मिळण्याची व्यवस्था करणे व ते खाऊन-पिऊन, वापरून संपविणे या सार्‍या गोष्टींचे ताळतंत्र आपोआप संभाळले जाई.  जेथे राजकीय व आर्थिक सत्ता आजच्यासरखी काही मूठभर लोकांच्या हातात एकवटली न जाता गावातल्या सार्‍या लोकांच्या हातात थोडीथोडी प्रत्येकाकडे पसरलेली होती, जेथे अगदी साधीसुधी लोकशाही प्रचारात होती, जेथे गरीब व श्रीमंत यांच्यातला भेद इतका डोळ्यावर येण्यासारखा नव्हता, जेथे मोठ्या शहरांतल्या भानगडींची कटकट नव्हती, व पोटापाण्याची सोय लावणार्‍या धरणीमातेला बिलगून नांदत असलेल्या तिच्या लेकरांना मोकळ्या मैदानावरून वाहणार्‍या शुध्द हवेत भरपूर श्वासोच्छ्वास करायला मिळत होता, त्या जुन्या सृष्टीची गांधींनी खंत घेतली होती.

जीवनातला खरा अर्थ कोणता याविषयी हा सारा मतभेद मुळातच गांधी व इतर अनेक लोकांमध्ये होता व या मतभेदाचाच रंग गांधींच्या उक्तीतून, त्यांच्या कृतीतून भरलेला होता.  बहुधा तेजस्वी व ओजस्वी असलेल्या त्यांच्या वाणीला स्फूर्ति, प्राचीन धार्मिक व नैतिक ज्ञानभांडारातून मिळत होती, व हे भांडार मुख्यत: भारतीय असले तरी इतर देशांचेही त्यांनी सोडले नाही.  नैतिक मूल्येच प्रमाण मानली पाहिजेत, साध्य चांगले म्हणून त्याकरिता साधने मात्र वाटेल ती अयोग्य वापरणे मुळीच समर्थनीय नाही, या तत्त्वांना अंतर दिले तर व्यक्ती व वंश दोन्ही नाश पावतील.

 

काँग्रेस व उद्योगधंदे : प्रचंड प्रमाणावरचे धंदे विरुध्द ग्रामोद्योग

ग्रामोद्योग व विशेषत: हातकताई व हातमाग पुन्हा सुरू करावेत अशी खटपट फार दिवसांपासून काँग्रेसने गांधीजींच्या नेतृत्वाखाली चालविली होती.  परंतु मोठ्या प्रमाणावरच्या कारखानदारीच्या धंद्याला काँग्रेसचा कधीही विरोध नव्हता, इतकेच नव्हे तर कायदेमंडळातून व अन्यत्र जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा काँग्रेसने त्या धंद्याला उत्तेजनच दिले होते.  प्रांतिक सरकारांची हे काम करायला मनापासून तयारी होती.  सन १९२० ते १९३० च्या दरम्यानच्या काळात टाटांचा पोलाद व लोखंडाचा कारखाना अडचणीला आला होता तेव्हा त्या आणीबाणीच्या प्रसंगातून निभावून जाण्याकरता जे सरकारी साहाय्य त्यांना देण्यात आले ते मध्यवर्ती कायदेमंडळात काँग्रेस पक्षाने तसा आग्रह धरल्यामुळेच बव्हंशी देण्यात आले.  नौकानिर्मिती व नौकानयनाला लागणारा अधिकारी वर्ग यांची वाढ हिंदुस्थानात करावी या मुद्दयावर देशाभिमानी राष्ट्रीय मताचा वर्ग व सरकार यांच्यामध्ये निकराचा वाद चालून उभय पक्षांनी चिडून जाण्याचे प्रसंग फार दिवसांपासून येत गेलेले होते.  हिंदुस्थानातील जहाजांच्या देशी धंद्याला सर्व प्रकारे साहाय्य मिळावे अशी काँग्रेसची व देशातील एकूणएक राष्ट्रीय मतांच्या पक्षांची इच्छा व खटपट होती, तर त्याच्या उलट त्या धंद्यातील विलायती मोठमोठ्या कंपन्यांची जी पूर्वापार मिरासदारी चालत आलेली होती तिला संरक्षण देण्याची सरकारचीही तितकीच तीव्र इच्छा व खटपट चालू होती.  हिंदी लोकांजवळ भांडवल, यंत्रातले वाकबगार, व इतर व्यवस्था पाहणारे अशी या धंद्याला लागणारी पुरेशी सामग्री असूनही सरकारच्या या आपपर भावामुळे हिंदी लोकांना या धंद्यात प्रगती करण्याची मनाई होत आली होती.  कारखानदारी, व्यापार, पैशाची देवघेव इत्यादी ठिकाणी कोठेही ब्रिटिशांचे हितसंबंध आले की ही सरकारची आप्पर भावाची कारवाई सगळीकडे सर्रास चालू होती.

इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीज या नावाचा रासायनिक द्रव्ये तयार करणार्‍या विलायती कारखान्यांचा एक प्रचंड संघ आहे.  तोच धंदा करणार्‍या हिंदुस्थानी कारखानदारांवर अन्याय करून वेळोवेळी या विलायती संघावर सरकारने कृपादृष्टी दाखविली आहे.  पंजाबातील खरिज व तत्सम द्रव्ये काढण्याचा लांब मुदतीचा मक्ता काही वर्षांपूर्वी या संघाला मिळाला.  माझ्या माहितीप्रमाणे असे की या मक्त्याच्या कराराच्या अटी काय ते बाहेरच्या कोणालाही सरकारने कळू दिले नाही, कारण बहुधा असे गौपय राखे 'सार्वजनिक हिताच्या दृष्टीने' सरकारला इष्ट वाटले असावे.

यंत्रे चालविण्याकरता लागणारी शक्तीशी उत्पन्न करण्याकरता 'पॉवर अल्कोहल' नावाचा एक ज्वालाग्रही मद्यार्क द्रव पदार्थ फार उपयुक्त आहे.  तो तयार करण्याचे कारखाने चालविण्याचा धंदा काढून वाढवीत जावा अशी काँग्रेस राजवटीच्या प्रांतिक सरकारांची फार इच्छा होती.  हा उपक्रम अनेक दृष्टींनी फार चांगला होता.  विशेषत: संयुक्त प्रांत व बिहार या प्रांतांमध्ये हा धंदा चालविण्याला एक विशेष कारण होते.  या प्रांतांतून पुष्कळसे सारखेचे कारखाने होते, त्यात साखर तयार करताना खूपशी मळी निघत असे, ती अगदी निरुपयोगी टाकावू माल ठरली होती, व तिची तशी विल्हेवाट होई.  सूचना अशी होती की, या मळीपासून 'पॉवर अल्कोहोल' या ज्वालाग्रही मद्यार्क द्रव तयार होण्यासारखा असल्यामुळे तिचा तो उपयोग करून घ्यावा.  ही कृती अगदी सोपी होती,- काहीही अडचण नव्हती पण-मोठ्ठी अडचण आली ती अशी की, शेल कुंपनी व बर्मा कंपनी या दोन तेल, पेट्रोल वगैरे खनिज पदार्थ काढणार्‍या कंपन्या होत्या त्यांच्या हिताला हा 'पॉवर अल्कोहोल' असा या देशात तयार होऊ लागला तर धक्का लागणार.  हिंदुस्थान सरकार या कंपन्यांचे पाठिराखे, तेव्हा त्यांनी हा 'मद्यार्क' काढण्याला परवानगी देण्याचे साफ नाकारले.  हे दुसरे महायुध्द तब्बल तीन वर्षे चालत राहिले, ब्रह्मदेश शत्रूच्या हाती पडला, तेथून मिळणारे रॉकेल तेल वगैरे खनिज तेले व पेट्रोल यांचा पुरवठा तुटला, इतके पुराण झाले तेव्हा कोठे सरकारला उमगले की, हा मद्यार्क म्हणजे आवश्यक पदार्थ आहे व तो हिंदुस्थानात तयार करणे भाग आहे.  अमेरिकन ग्रेडी कमिटीने तशी सूचना अत्याग्रहाने सन १९४२ साली केली.

   

पुढे जाण्यासाठी .......