गुरुवार, जुन 20, 2019
   
Text Size

प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३)

हिंदुस्थानचे हे स्वातंत्र्य म्हणजे आशिया खंडातील सार्‍या राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक त्यांच्या कल्याणाची नांदी ठरली पाहिजे.  त्यानंतर त्याच ठरावात पुढे सार्‍या स्वतंत्र राष्ट्रांचा मिळून एक जागतिक राष्ट्रसंघ असावा, व त्याचा आरंभ हल्ली असलेल्या 'संयुक्त राष्ट्रे' या नावाने ओळखल्या जाणार्‍या संघापासून करावा असे सुचविले होते.

अखिल भारतीय काँग्रेस समितीपुढे असे म्हटले होते की, ''चीन व रशिया यांचे स्वातंत्र्य बहुमोल आहे, ते अबाधित टिकले पाहिजे.  त्यांच्या स्वातंत्र्यसंरक्षणात कोणत्याही प्रकारे व्यत्यय येईल असे काहीही कृत्य आपल्याकडून घडू नये अशी या समितीची मनापासून इच्छा आहे व तशीच काळजी त्यांना संयुक्त राष्ट्राच्या संरक्षणशक्तीबद्दल असून त्या सामर्थ्यालाही आपल्या कृत्याने धोका उत्पन्न होऊ नये अशीही समितीची इच्छा आहे.''  (या वेळी चीन व रशियावर आलेले युध्दसंकट अत्यंत बिकट होते.)  ''परंतु त्या देशावरील संकटाप्रमाणेच हिंदुस्थानावरचे संकटही वाढते आहे अशा वेळी परकीय सत्तेचा राज्यकारभार देशावर मुकाट्याने चालू देणे व प्रजेने स्वस्थ व निष्क्रिय राहणे हे हिंदुस्थानला लाजिरवाणे आहे, स्वसंरक्षण व आक्रमक शत्रूंचा प्रतिकार करण्याची देशाची शक्ती त्यामुळे कमी होते.  एवढेच नव्हे तर हिंदुस्थानातील प्रजेची अशी वृत्ती असणे हा ह्या वाढत्या संकटावरचा उपाय नव्हे, आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रजेला या हिंदी प्रजेच्या वृत्तीचा काही उपयोगही हात नाही.

समितीने पुन्हा एकवार जागतिक स्वातंत्र्याच्या हितार्थ ''आपले म्हणणे ऐका अशी विनंती केली होती.''  परंतु ''-आणि ह्यातच ह्या ठरावाअखेर त्यातला डंख आला.  आपल्यावर अधिसत्ता चालविणार्‍या व स्वराष्ट्राच्याच नव्हे तर अखिल मानवतेच्या कल्याणाकरिता आपली शक्ती सेवेला लावण्यात त्या राष्ट्राला व्यत्यय आणणार्‍या एका साम्राज्यवादी अरेरावी सरकारविरुध्द आमच्या राष्ट्राने आपला निर्धार त्या सरकारचा प्रतिकार करून प्रस्थापित करण्याचा काही उपक्रम आरंभला तर या समितीने आपल्या राष्ट्राला थोपवून धरणे यापुढे न्यायाचे होणार नाही म्हणून या ठरावाने ही समिती अशी अनुज्ञा देते की, परदास्याच्या शृंखला तोडण्याचा व स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा जो निरंतरचा अदेय हक्क हिंदुस्थानला आहे तो बजावून प्रत्यक्षात खरा करून दाखविण्याकरिता देशातील जनतेने सरकारशी अहिंसामय मार्गाने सामुदायिक विरोधाचा विशाल लढा चालविण्याचा उपक्रम अर्थातच गांधीजींच्या नेतृत्वाखाली करावा.''  गांधीजींनी लढा सुरू करा असे सांगितल्याखेरीज ही अनुज्ञा अमलात यावयाची नव्हती.  आरंभ केव्हा करावा ते गांधीजींनी ठरवाचे होते.  शेवटी समितीने असेही म्हटले होते की समितीचा ''उद्देश केवळ काँग्रेसला सत्ता मिळावी असा मुळीच नाही.  सत्ता हाती आली म्हणजे ती हिंदुस्थानातील सर्व जनतेची सत्ता म्हणून सर्व जनतेकडे राहील.''

समितीच्या या बैठकीचा समारोप करताना काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना अबुल कलम आझाद व गांधीजी यांनी आपल्या भाषणात आपण यापुढे प्रथम काय काय करणार आहोत ते स्पष्ट सांगितले.  ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधित्व व्हॉइसरॉय यांच्याकडे आहे असे समजून त्यांच्याशी त्या नात्यांने प्रथम बोलणी सुरू करायची व संयुक्त राष्ट्रांपैकी प्रमुख राष्ट्रांच्या नेत्यांना ब्रिटन व हिंदुस्थान यांच्या दरम्यान उभयतांचा मान सांभाळून होणारी तडजोड घडवून आणा अशी विनंत करावयाची, असा आपला विचार आहे असे त्यांनी सांगितले.  ह्या तडजोडीचे स्वरूप असे की, त्यामुळे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य मान्य तर होईलच, परंतु संयुक्त राष्ट्रांनी आक्रमक अक्षराष्ट्रांशी जे युध्द चालविले होते त्यातही संयुक्त राष्ट्रांना ह्या तडजोडीमुळे साहाय्य मिळेल.

तारीख ८ ऑगस्ट १९४२ या दिवशी रात्र पडण्याच्या सुमारास अखेरीस ह्या ठरावाला समितीने मान्यता दिली.  त्यानंतर काही तासांच्या आत, तारीख ९ ऑगस्ट १९४२ च्या पहाटेच्या प्रहरी मुंबई येथे व देशात सगळीकडे ठिकठिकाणी सरकारनी मोठ्या प्रमाणावर धरपकड करून अनेक लोकांना अटकेत टाकले, आणि त्यानंतर आमची रवानगी अहमदनगरच्या किल्ल्यात.

 

वाटाघाटी फिसकटल्यामुळे तडजोड होण्याची काहीच शक्यता उरली नव्हती.  परंतु त्यातूनही काही मार्ग आपण शोधून काढू अशी जी आशा गांधीजींना वाटत होती तशी इतर कोणालाच फारशी नव्हती.  आतापर्यंत या बाबतीत जे काही घडत गेले, व त्यावरून त्याला जे काही फाटे फुटलेले दिसले त्यावरून सरकार व हिंदुस्थानातील राष्ट्रीय पक्ष यांच्या दरम्यान झुंज लागणार हे निश्चित, अटळ, दिसत होते.  गोष्टी या थराला येऊन पोचल्यानंतर या दोन्ही पक्षांच्या दरम्यान काही मधला एक पक्ष कोणी घेऊ म्हटले तर याला काही महत्त्व राहात नाही, व्यक्तिश: प्रत्येकाला या दोन्ही पक्षांपैकी कोणत्या बाजूला आपण उभे राहणार एवढेच काय ते ठरवायचे शिलक राहते.  खुद्द काँग्रेसमधील लोकांना, व या बाबतीत ज्यांची भावना काँग्रेससारखीच होती अशा बाहेरच्या लोकांना, यापुढे कोणता पक्ष स्वीकारावा असा प्रश्नच पडत नव्हता; एवढ्या मोठ्या बलिष्ठ राज्याने आपले सारे सामर्थ्य उपयोगात आणून आमच्या देशबांधवांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न चालविलेला असताना व हिंदुस्थानचे स्वातंत्र्य पणाला लागलेले असताना आमच्यापैकी कोणीही तटस्थपणे नुसता दुरून प्रेक्षकासारखा पाहात बसेल हे स्वप्नात सुध्दा शक्य नव्हते.  अर्थात असे पुष्कळसे लोक निघतात की, ज्यांना राष्ट्रकार्य प्रिय असले तरी ते नुसते स्वस्थ उभे राहतात, पण आपण जे आजवर कार्य केले त्याचा परिणाम चुकवून सरकारशी लढा करणे टाळण्याचा व आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न कोणी काँग्रेसश्रेष्ठी करता तर ते अत्यंत लाजिरवाणे व विश्वासघाताचे झाले असते.  पण तो विचार बाजूला ठेवला तरीसुध्दा काँग्रेसच्या नेत्यांना सरकारशी असा काही लढा दिल्यावाचून गत्यंतर उरले नव्हते.  हिंदुस्थानात आजपर्यंत जे जे काही घडत गेले त्याचा सारा इतिहास, आजच्या घटकेला जे काही घडत होते त्याच्या यातना, व जे भाविकालात घडावे असे मनाला वाटे त्याची आशा, ही सारी एकवटून त्यांची निकड काँग्रेसनेत्यांच्या मागे लागली होती, त्यांनी चालविलेल्या ह्या निकडीच्या पाठलागाच्या अनुरोधानेच जे काही करावयाचे ते काँग्रेसनेत्यांना करणे भाग होते.  बर्गसन या तत्त्वज्ञानी ग्रंथकाराने आपल्या ''क्रिएटिव्ह एव्होल्युशन'' (निर्मितीकारक उत्क्रांती) या ग्रंथात म्हटले आहे - ''जे काही पूर्वी घडून गेले त्याच्या थरावर जे नुकतेच घडले त्याचा थर चढतो व ही थरावर थर चढण्याची क्रिया सतत चाललेली असते, त्यात खंड कधीच पडत नाही.  वस्तुस्थिती अशी आहे की, भूतकाल आपोआप स्वत:च जसाच्या तसा अबाधित राखतो.  आपल्या पाठीशी प्रत्येक क्षणाला हा बहुतेक सारा भूतकाल चिकटून चाललेला असतो.  या भूताकालापैकी फारच थोडा भाग आपण विचार करताना वापरतो हे खरे, पण थरावर थर साचून एकजीव बनलेल्या व आपल्या व्यक्तिमत्त्वाशी एकरूप पावलेल्या या भूतकालाच्या व आपल्या स्वत:च्या मूळ आत्मप्रवृत्तीच्या ओघातच आपल्या सार्‍या भावना उगम पावतात, आपले सारे संकल्प निश्चित होतात व प्रत्यक्ष कृती आपल्या हातून घडते.''

तारीख ७ व ८ ऑगस्ट सन १९४२ या दोन दिवशी मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या जाहीर रीतीने जमलेल्या प्रेक्षकांसमोर, 'छोडो भारत' असे ज्या ठरावाचे नाव पुढे रूढ झाले, त्या ठरावावर साधकबाधक चर्चा चालवून त्या ठरावाचा विचार केला.  तो ठराव खूप मोठा व सांगोपांग असून त्यात हिंदुस्थानचे स्वातंत्र्य ताबडतोब मान्य का झाले पाहिजे याबद्दल तर्कशुध्द कोटिक्रम केलेला होता.  ब्रिटिशांची हिंदुस्थानवरची सत्ता 'केवळ हिंदुस्थानकरताच नव्हे, तर संयुक्त राष्ट्राच्या पक्षाचा युध्दात जय व्हावा म्हणूनही' संपुष्टात आणली पाहिजे.  ती सत्ता यापुढे चालत राहणे हा हिंदुस्थानचा अपमान आहे.  त्यामुळे हिंदुस्थान नि:सत्त्व होत चालला आहे, स्वत:चे संरक्षण करणे व जगातील सार्‍या राष्ट्रांच्या स्वातंत्र्याला साहाय्य करणे याकरिता लागणारी शक्ती त्या देशात उत्तरोत्तर कमी होत जाते आहे.'  'साम्राज्यावर सत्ता चालवता येते म्हणून अधिराज्याचे सामर्थ्य वाढावे, पण त्याऐवजी हे साम्राज्य म्हणजे इंग्लंडला एक ओझे, एक शाप होऊन बसले आहे.  आधुनिक साम्राज्यवादाचे सर्वमान्य उदाहरण म्हणून गणला जाणारा हा हिंदुस्थान देश, जगापुढे असलेल्या आजच्या प्रश्नातले मर्म ठरला आहे,  कारण ब्रिटन व संयुक्त राष्ट्रे यांची खरी परिक्षा हिंदुस्थानाला स्वातंत्र्य देण्यातच होणार आहे, आशिया व आफ्रिका खंडातील सार्‍या देशांतील जनतेला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे स्वत:बद्दल काही आशा वाटू लागेल, त्यांना उत्साह येईल.' ठरावात पुढे असे सुचविले होते की, हिंदुस्थानातील सार्‍या प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी असलेले, संमिश्र स्वरूपाचे एक तात्पुरते राष्ट्रीय सरकार स्थापन करावे.  त्या सरकारचे 'मुख्य कर्तव्य हिंदुस्थानचे संरक्षण करणे आणि आपल्या आज्ञेत असलेल्या सर्व सशस्त्र सैन्यबलाचा व त्याव्यतिरिक्त असलेल्या अहिंसक बलाचाही उपयोग, परचक्राचा प्रतिकार व मित्रराष्ट्रांशी सहकाय करणे, हे असावे.' ह्या तात्पुरत्या सरकारने देशाची राज्यघटना काय असावी हे ठरविण्याकरिता एक घटना परिषद भरविण्याची योजना तयार करावी व त्या घटना परिषदेने हिंदुस्थानातील सर्व वर्गांच्या लोकांना पटेल अशा तर्‍हेची हिंदुस्थानची राज्यघटना तयार करावी.  ही राज्यघटना वेगवेगळ्या घटक राज्यांचे मिळून सर्व हिंदुस्थानचे एक संयुक्त राष्ट्र होईल अशी असावी.  या घटकराज्यांना स्वयंशासनाचे शक्य तितके अधिकात अधिक अधिकार ठेवावेत व शेष राहिलेले अधिकारही ह्या घटक राज्यांकडेच ठेवावे. ''स्वातंत्र्य आले म्हणजे जनतेच्या सर्वसंमत संयकल्पाच्या व सामर्थ्याच्या बळावर विसंबून परचक्राचा प्रतिकार करण्याची शक्ती हिंदुस्थानच्या अंगी संचरेल.''

 

खडतर दैवाने पुढे काय वाटून ठेवले आहे ते दिसत असताना येणार्‍या भेसूर प्रसंगाला निमूटपणे बळी जाण्यापेक्षा साहसाच्या अज्ञात महासागरात उडी घेऊन थोडीफार धडपड करणे अधिक श्रेयस्कर आहे.  अशा प्रकारचे विचार जनमनात वावरत होते.  पुढे आलेल्या प्रश्नाला उत्तर शोधण्याची ही मुत्सद्दयाची रीत नव्हती, परिस्थितीने वैतागलेल्या व परिणाम काय होईल याची चिंता सोडून भडकलेल्या जनतेचे हे स्वैर विचार होते.  पण या विचारांतही तर्कशुध्द बुध्दीला पटेल असे काहीतरी नेहमीच येई, विरुध्द भावनांचा काही मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आढळे, मनुष्याच्या स्वभावातल्या मूळच्या विसंगतीत काही सुसंगती लावण्याची खटपट केलेली दिसे.  हे महायुध्द खूप लांबणार, आणखी कैक वर्षे चालणार असे दिसत होते; त्यात अनेकदा अनर्थ घडले व ते तसे पुढेही घडणारच.  पण काहीही अनर्थ घडले तरी ज्या प्रबल मनोविकाराच्या पायी हे महायुध्द ओढवले व जे या युध्दाने अधिकच चेतवले गेले त्या विकारांची रग जिरून ते सौम्य होईपर्यंत हे युध्द चालत राहणार हे नक्की.  निदार या युध्दाची अखेर तरी अर्धवट विजय मिळण्याने होऊ नये, कारण पुष्कळ वेळा असले अर्धवट विजय हे पराभवापेक्षा अधिक दु:खदायक असतात.  या लष्करी डावपेचांच्या दृष्टीनेच नव्हे तर त्याहूनही अधिक महत्त्वाच्या अशा ज्या उद्दिष्टांच्या हेतूने हे युध्द लढले जाते आहे असा समज होता, त्या उद्दिष्टांच्या दृष्टीनेच ह्या युध्दाला भलतेच वळण लागले होते.  आम्ही हिंदुस्थानात काही चळवळ सुरू केलीच, तर कदाचित असेही घडण्याचा संभव होता की, युध्दाच्या उद्देशाबाबत आपली भलतीच चूक होते आहे असे या युध्यमान राष्ट्रांच्या डोळ्यांसमोर त्यांची इच्छा नसूनही प्रकट दिसले असते व त्यामुळे या उद्देशांना तरी काही नवे व आशाजनक वळण लागले असते.  आणि तेही जरी तूर्त साधले नसते तरी बर्‍याच अवधीनंतर का होईना. त्याचा परिणाम होण्याचा संभव होता व तसे जरी झाले म्हणजे पुढे तरी त्यामुळे प्रत्यक्ष लढाईतही खूप मदत मिळाली असती.

इकडे लोकांची वृत्ती बिथरली होती तर तिकडे सरकारही बिथरले होते.  सरकार बिथरायला भावनेची किंवा इतर कसली ऊर्मी अगोदर यायलाच पाहिजे असे नव्हते, कारण सरकारचा नेहमीचाच तो देहस्वभाव बनलेला होता.  त्यांचा नेहमीचा राज्यकारभार देखील असाच रागारागात चाले.  एखाद्या देशावर परकीयांनी आक्रमण केले व आपल्या राज्याचा अंमल त्या देशावर दंडुकेशाहीच्या जोरावर चालविला की त्या परकीयांच्या राज्यकारभारनाची रीत ही अशीच असते.  आपल्या मनाला येईल तसे वाटेल ते करण्याच्या आड येण्याचे धैर्य देशातील ज्या कोणाला होईल त्या सर्वांना एकदाचे (म्हणजे सरकारच्या मते कायमचे) ठेचून काढण्याची ही आता संधी येणार याचा सरकारला मनातून आनंद वाटतो आहे असे दिसू लागले आणि तशी सरकारीच तयारीही होऊ लागली.

जिकडे तिकडे अकल्पित गोष्टी झपाट्याने घडत चालल्या होत्या, पण आपल्या देशाचा स्वाभिमान अबाधित राखण्याकरिता, व प्रथम स्वातंत्र्य मिळवून नंतर आक्रमणाविरुध्द चाललेल्या या युध्दात स्वतंत्र देश म्हणून मनापासून सहकार्य करण्याचा आपल्या देशाचा हक्क प्रस्थापित करण्याकरिता, काहीतरी चळवळ देशात सुरू केलीच पाहिजे असे वारंवार इतके बोलत असलेले गांधीजी त्या चळवळीच्या प्रत्यक्ष स्वरूपाबद्दल अवाक्षर काढीत नाहीत, हे थोडे चमत्कारिक वाटे.  ही चळवळ अर्थातच शांततामय मार्गाची असणार, पण पुढे काय ?  ब्रिटिश सरकारशी काही तडजोड निघणे शक्य आहे, पुन्हा एकवार त्यांच्याबरोबर बोलणी करण्याचा प्रक्रम आपण करावा असे माझ्या मनात आहे, काही मार्ग सापडतो एवढ्याकरिता मी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे, असे प्रतिपादन करण्यावर गांधीजींचा विशेष भर दिसू लागला अखिल भारतीय काँग्रेससमितीची सभा भरली होती त्यात शेवटी भाषण करताना गांधीजींनी मोठ्या तळमळीने सांगितले की, काही तडजोड करावी हेच उत्तम; तेवढ्याकरिता स्वत: मी व्हॉईसरॉय यांच्याशी बोलणे सुरू करावे असा माझा निश्चय ठरला आहे.  सार्वजनिक रीतीने जाहीरपणे किंवा काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत खाजगी चर्चेतसुध्दा अखेर चळवळ करावी लागलीच तर तिला प्रकार कोणता असावा असे त्यांच्या मनात आहे, तिचा काही एक सुगावा लागू दिला नाही.  मात्र चळवळीपैकी एक छोटासा भाग त्यांनी खाजगी रीतीने बोलता बोलता सुचविला होता तो असा की वाटाघाटी पुन्हा करून पाहून त्यातून अखेर काही तडजोड निघत नाही असे नक्की झाले तर, त्याचा सबंध राष्ट्राचा निषेध केला आहे याची खूण म्हणून, देशभर सर्व लोकांनी एक प्रकारची असहकारिता करावी व एक दिवसापुरता हरताळ पाडावा.  एक प्रकारे एका दिवसाचा सार्वत्रिक संप करावा, अशी हाक आपण स्वत: सबंध देशाला देणार आहोत.  ही सूचनासुध्दा त्यांनी अगदी मोघम, सहज बोलता बोलता केली, तिचे नक्की असे काहीच नव्हते, कारण ते स्वत: जो एक तडजोडीचा प्रयत्न करून पाहणार होते तो होईपर्यंत पुढचे काही बेत ठरवावे असे त्यांच्या मनात नव्हते.  म्हणूनच स्वत: गांधीजींनी किंवा काँग्रेस कार्यकारी समितीने खाजगी किंवा जाहीर रीतीने लोकांना कोणत्याही प्रकारचा आदेश दिला नव्हता, फक्त एवढीच सूचना केली होती की, अखेर काय घडेल याचा नेम नाही, परंतु लोकांनी प्रसंगाला तयार राहावे, मात्र काहीही झाले तरी आपल्याकडून लोकांनी शांततेचे व अहिंसेचे धोरण सोडू नये.

   

गांधीजी वयस्क होत चालले होते, त्यांची सत्तरी उलटलेली, आणि शरीराने व मनाने सारखा अव्याहत उद्योग, सतत काबाडकष्ट करता करता त्यांचा देह थकून क्षीण झाला होता.  पण त्यांचा मानसिक उत्साह अद्यापही चांगलाच होता, आणि त्यांना वाटे की, आलेल्या परिस्थितीला आपण शरण गेलो, आपण इतकी वर्षे जे सारसर्वस्व म्हणून सर्वांत अधिक मोलाचे मानले ते सार्थ करून दाखविण्याकरिता बोटसुध्दा उचलले नाही तर आपले आजवरचे जन्माचे कार्य फुकट जाईल.  हिंदुस्थान व हिंदुस्थानासारखेय अन्यायाने नागवले गेलेले जे जे देश, जी जी राष्ट्रे असतील त्या सर्वांना स्वातंत्र्य मिळावे हे गांधीजींना इतके प्रिय होते की, ह्या त्यांच्या स्वातंत्र्यप्रीतीने त्यांच्या अहिंसाव्रतावर मात केली.  देशाच्या संरक्षणाकरिता किंवा तसा प्रसंगच आला तर राज्यकारभार सुरळीत चालविण्याच्या कार्यात अहिंसेचे व्रत तात्पुरते बाजूला पडले तरी चालेल या विचाराला त्यांनी पूर्वी संमती दिली होती ती कुरकुरत व आढेवेढे घेता घेता दिलेली होती, पण अहिंसेला बाध येईल अशा कोणत्याही उपक्रमापासून ते व्यक्तिश: अलिप्त राहिले होते.  हिंदुस्थान व ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रे यांच्या दरम्यान काही तडजोड निघण्यास ह्या आपल्या स्वत:च्या गुळमुळीत धोरणामुळे आडकाठी येण्याचाही संभव आहे असे त्यांना वाटू लागले.  तेव्हा त्यांनी तटस्थपणा सोडून स्वत:च काँग्रेसच्या एका ठरावाचा पुरस्कार केला.  तो ठराव असा की, 'स्वतंत्र हिंदुस्थानचे राज्य चालविण्याकरिता म्हणून एक तात्पुरते सरकार जर निर्माण करण्यात आले तर त्या हिंदुस्थान सरकारचे मुख्य काम, आक्रमणाचा प्रतिकार करण्याकरिता व स्वातंत्र्याकरिताच या युध्दात आपल्या देशाची सारी विशाल साधनसामग्री उपयोगी आणणे व हिंदुस्थान सरकारच्या सशस्त्र सैन्याचा आणि शिवाय असतील त्या सर्व साधनांचा उपयोग करून त्यांच्याद्वारे संयुक्त राष्ट्रसंघाशी सहकार्य करून हिंदुस्थानचे संरक्षण करणे, हेच राहील.'  अशा तर्‍हेने स्पष्ट शब्दात स्वत:ला बांधून घेण त्यांना सोपे नव्हते, पण त्यांच्या अहिंसाव्रताच्या दृष्टीने काही वेगळाच वास येणारी ही कडू गोळी त्यांनी कशी तरी गिळली.  चालून येणार्‍या परचक्राला, कोणाला दास म्हणून नव्हे तर स्वतंत्र राष्ट्र म्हणून, हिंदुस्थानने प्रतिकार करावा असे शक्य होईल अशी काही तडजोड निघावी ही त्यांची इच्छा इतकी अनावर झाली होती की, त्यापायी त्यांनी ते देखील केले.

आमच्यापैकी काहीजणांचे गांधीजींशी तात्विक व इतर मतभेद अनेक वेळा येत गेले होते ते बहुतेक सारे मतभेद या वेळी नाहीसे झाले, परंतु मुख्य अडचण आम्हाला पडली होती ती अशी की, आम्ही काही उपक्रम करायला गेलो तर त्यामुळे युध्दकार्यात व्यत्यय येईल व ती तशीच कायम राहात होती.  ब्रिटिश सरकारशी काही तडजोड काढणे शक्य आहे अशी अद्यापही गांधीजींची समजूत थोडीफार होतीच व त्या आशेवर त्यांनी स्वत: या बाबतीत शक्य ते करून पाहतो असे आम्हाला सांगितले तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले.  आणि ह्या आशातंतूला गांधीजी चिकटून राहिले म्हणूनच त्यांनी देशात सरकारविरुध्द काही तरी चळवळ सुरू करण्याविषय खूप ऊहापोह आपल्या भाषणातून चालविला होता तरी तो अगदी मोघम होता, चळवळीचे नक्की स्वरूप त्यांनी सांगितले नव्हते किंवा आपल्या मनात काय करावयाचे आपण ठरविले आहे त्याचा पत्ता लागू दिला नव्हता.

आम्ही अशा प्रकारे शंकाकुशंका काढून इकडे वाद चालविला होता, तर तिकडे हिंदुस्थानभर देशातल्या लोकांची वृत्ती पालटून गेली होती, मनातला राग मनात ठेवून लोक आजवर घुमेपणाने स्तब्ध राहिले होते, पण आता त्यांचा क्षोभ व आतुरता अनावर झाली होती.  काँगेस काही निर्णय व ठराव करो वा न करो, तेवढ्याकरिता जे व्हायचे ते काही थांबून अडून बसले नव्हते.  गांधीजींच्या वक्तव्यांनी जनमनाला चालना मिळून जनता जागेवरून हालली होती, ती आता त्यामुळे आपल्याच वेगाने पुढे चालली.  गांधीजींच्या वक्तव्यातला आशय बरोबर होता की नाही ही गोष्ट वेगळी, पण त्या वेळी लोकांच्या जे मनात होते तेच गांधीजींनी व्यवस्थित शब्दात बोलून दाखविले हे मात्र नक्की.  जनता बिथरून गेली होती, जे होईल ते होईल पण आपण काहीतरी साहस करणे भाग आहे अशी जनतेची वृत्ती झाली होती, भावनेच्या भरापुढे विवेक, शुध्द युक्तिवाद, परिणामाचा शांत विचार हे सारे बाजूला पडले होते.  चळवळ केली तर परिणाम काय होईल याची काही कल्पना येत नव्हती असे नाही, आपण जे करायला जाऊ ते साधी किंवा न साधो, त्यापायी भूर्दंड म्हणून खूप यातना व हानी सोसावी लागेल याची जाणीव होती.  पण पुढच्या अनिश्चितीने आज ज्या मानसिक यातना दररोज भोगाव्या लागत होत्या त्यांचेही माप काही थोडेथोडके भरत नव्हते आणि त्या यातनांतून पुढे सुटण्याचे काहीही लक्षण दिसत नव्हते.

 

''युध्द करताना सैन्याच्या शारीरिक शक्तीच्या तिप्पट नैतिक आत्मविश्वासाचे बळ आहे'' असे नेपोलियननेच म्हटले आहे ना ?  ह्या जगातल्या नागावलेल्या व परदास्यात सापडलेल्या कोट्यवधी लोकांची, हे युध्द आपल्या स्वातंत्र्याकरिता चालले आहे अशी भावना होऊन तशी त्यांना खात्री पटली तर, नुसतेच ह्या युध्दापुरते संकुचित दृष्टीने पाहिले तरी, ह्या कोट्यवधी लोकांकडून मिळणारे नैतिक पाठबळ अत्यंत महत्त्वाचे आहे, व युध्दानंतरच्या काळात सर्वत्र शांतता नांदविण्याच्या कामात तर त्याचे महत्त्व त्याहूनही अधिक आहे.  नुसते हल्लीच्या पुरतेच पाहावयाचे असले तरी, या युध्दात जयापजयाची निश्चिती नाही असा प्रसंग आला आहे म्हणूनच साम्राज्यशाही राष्ट्रांचे धोरण व त्यांची मते बदलणे अवश्य आहे.  मनातला राग मनातच ठेवून निरुपाय म्हणून स्वस्थ बसलेल्या व आपल्या भवितव्याबद्दल साशंक असलेल्या या कोट्यवधी लोकांचे मन पालटवून त्यांचे रूपांतर सक्रिय सहानुभूती उत्साहाने दाखविणार्‍या मित्रांत करणे अवश्य आहे.  हा चमत्कार घडून आला तर त्यापुढे जर्मनी, जपान या अक्षराष्ट्रांच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या सेनांचा काही पाड लागणार नाही, व त्यांचा सपशेल पराभव निश्चित होईल.  सार्‍या जगभर उसळून उठलेल्या ह्या विराट भावनेचा परिणाम स्वत: अक्षराष्ट्रांच्याच राज्यातील अनेक मांडलिक देशांवर झाल्यावाचून राहणार नाही.

हिंदुस्थानात लोकांची वृत्ती राग आला तरी तो गिळून मुकाट्याने निष्क्रिय राहण्याची आहे, ती बदलून अन्याय झाला तर तो मुकाट्याने सहन न करता त्याचा प्रतिकार करण्याची तेजस्वी वृत्ती त्यांच्यात आणणे अधिक श्रेयस्कर आहे.  ब्रिटिश अधिकार्‍यांनी काढलेल्या अन्यायी हुकूमापुरतीच ही वृत्ती आरंभाला आली तरी तीच वृत्ती वाढवून तिचा उपयोग परचक्राचा प्रतिकार करण्याकडे करता येण्यासारखा होता.  अन्याची हुकूमापुढे मान तुकवून लाचारीने ते पाळण्याची वृत्ती एकदा अंगी बाणली की, पुढे मग कोणीही काहीही हुकूम सोडले तरी त्यांच्या बाबतही तीच वृत्ती राहणार, अधिकार्‍यांच्या बाबतीत जे झालो ते परचक्राच्या बाबतीतही होणार व त्यामुळे पुढे मानहानी व शेवटी अध:पात होणार.

गांधीजींचे हे सारे युक्तिवाद आम्हाला चांगलेच माहीत होते, आम्हाला ते कधीपासूनचे पटलेले होते व आम्ही स्वत:ही चर्चेत ते उपयोगात कितीदातरी आणले होते. परंतु खेदाची गोष्ट अशी की, कोट्यवधी परतंत्र प्रजेच्या वृत्तीत हा जो चमत्कार घडवून आणता येण्यासारखा होता तो ब्रिटिश सरकारने आडवे पडून घडू दिला नाही, हा हिंदुस्थानचा प्रश्न निदान युध्दापुरता तरी तात्पुरता सुटावा म्हणून आम्ही जे प्रयत्न चालविले होते ते निष्फळ ठरले, या युध्दाचा अंतिम उद्देश काय आहे ते तरी स्पष्टपणे बोला, तशी घोषणा करा अशी आम्ही वारंवार विनंती करून पाहिली पण त्यालाही नकारच मिळाला.  पुन्हा असला काहीही प्रयत्न आम्ही केला तर तोही निष्फळ ठरणार हे निश्चित दिसत होते.  आता पुढे काय करावे ? सरकारशी भांडण्याकरिता आम्ही आंदोलन सुरू केले तर न्यायाच्या व इतर दृष्टीने ते कितीही समर्थनीय असले तरी हिंदुस्थानवर परकीयांची स्वारी होण्याचा धोका अगदी दारापर्यंत येऊन पोचला अशा वेळी हिंदुस्थानात जी युध्दाची तयारी चालली होती, तिच्यात त्या आंदोलनाने व्यत्यय येण्याचा फार संभव होता.  तो व्यत्यय विसरून चालता येण्याजोगे नव्हते. आणि त्यातल्या त्यात विशेष विचित्र ते असे की, ह्या परचक्राच्या धोक्यामुळेच आमच्या मनात हे उलटसुलट विचार येऊन आमचे मन व्दिधा व्हावे.  कारण या अशा धोक्यापुढे आम्ही नुसते तटस्था प्रेक्षक म्हणून उभे राहणे शक्य नव्हते.  ह्या धोक्याच्या प्रसंगी देशातील जनतेकडून शत्रूचा प्रतिकार करविण्याच्या जबाबदारीचे ओझे वाहण्याची कुवत नसलेल्या व आमच्या मते नालायक ठरलेल्या कारभारी लोकांच्या हातून आमच्या देशाच्या कारभाराचा विचका होऊन देशाचा सर्वनाश होण्याचा प्रसंग आलेला असताना आम्ही स्वस्थ बसणे शक्य नव्हते.  मनातल्या मनात कोंडून चाललेली आमची सारी तगमग, उचंबळून आलेली आमची सारी उत्साहशक्ती, आमच्या हातून काहीतरी प्रत्यक्ष कार्य करविण्याकरिता वाट शोधू लागली.

   

पुढे जाण्यासाठी .......