शुक्रवार, जुलै 19, 2019
   
Text Size

प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला

गेल्या तीन वर्षांत जे काही घडले त्याचे काही अस्पष्ट चित्र हळूहळू माझ्या मनश्चक्षूंपुढे उभे राहात चालले.  इतर काही मंडळींप्रमाणे मलाही असे आढळून आले की, या काळात जे काय घडून आले ते आमच्या कल्पनेबाहेर.  एकामागून एक येत गेलेल्या तीव्र यातना मुकाट्याने सोशीत राहून आमच्या लोकांना हा तीन वर्षांचा काळ कंठावा लागला होता, आणि भेटेल त्या माणसाच्या मुद्रेवर आम्हाला त्या यातनांचा ठसा उमटलेला आढळला.  हिंदुस्थानात स्थित्यंतर घडून आले होते, आणि देशात वरवर दिसायला जिकडे तिकडे शांतता पसरलेली दिसली, तरी अतंर्यामी लोकांच्या मनात अविश्वास, नाना शंका भरल्या होत्या, निराशेमुळे आलेली चीड व संताप त्यांनी कसातरी दाबून धरला होता. आमची सुटका झाल्यामुळे व परिस्थितीला वेगळेच वळण लागल्यामुळे हा वरवरचा देखावा पालटू लागला.  वरून सामसूम दिसत होती तेथे आता आतून चळवळ होऊ लागली, परिस्थितीला तडे पडलेले दिसू लागले.  प्रक्षोभाच्या लाटांमागून लाटा देशभर फिरू लागल्या आणि तीन वर्षे दडपून ठेवलेली जनता या वरवर दिसणार्‍या स्तब्धतेचे कवच फोडून बाहेर पडली.  जावे तिकडे लोकांची एवढी गर्दी, इतका प्रक्षोभ, सामान्य जनतेला स्वातंत्र्याची अशी तीव्र तळमळ, यापूर्वी मी कधी पाहिली नव्हती.  तरुण-तरुणी, मुले-मुली, सारेच काही तरी कार्य करण्याच्या ईर्षेने पेटले होते, पण आपण काय करावे ते त्यांना स्पष्ट उमजत नव्हते.

महायुध्द संपले व अणुस्फोटक गोल नव्या युगाचे प्रतीक ठरले.  या स्फोटकगोलाची योजना व शक्तिसाधनेच्या राजकारणातील गुंतागुंतीचे वक्रमार्ग यामुळे लोकांची दृष्टी अधिक निवळली, त्यांचे डोळे उघडले.  जुन्या साम्राज्यवादी राष्ट्रांचा कारभार पूर्ववत चाललाच होता, व इंडोनेशिया व इंडोचायना येथे जे काही घडत होते त्यामुळे परिस्थिती अधिकच भयानक वाटत चालली.  स्वातंत्र्याकरिता धडपड चालविलेल्या तेथील लोकांविरुध्द हिंदी सैन्याचा उपयोग करण्यात येत असलेला पाहून आमच्या असाहाय्य अवस्थेविषयी जगात आम्हाला लाज आली, राग वाढत चालला, कडू भावना निर्माण झाल्या. हिंदुस्थानात लोकमत अधिक प्रक्षुब्ध होत चालले.

महायुध्दाच्या कालात मलाया व ब्रह्मदेश या देशांत उभारण्यात आलेल्या हिंदी राष्ट्रीय सेनेचा इतिहास हिंदुस्थानात एकदम जिकडेतिकडे सर्वत्र पसरून त्या सेनेबद्दल लोकांत मोठा आश्चर्यकारक क्षोभ उसळला.  त्या सेनेतील अधिकार्‍यांची लष्करी न्यायालयासमोर जी चौकशी झाली तिच्यामुळे हिंदुस्थानात जो क्षोभ निर्माण झाला तो अपूर्व होता, लोकांच्या दृष्टीने हे सैन्याधिकारी म्हणजे स्वातंत्र्याकरिता लढत असलेल्या हिंदुस्थान देशाचे प्रतीक ठरले.  हिंदुस्थानातील भिन्न भिन्न धर्मपंथांच्या एकीचेही ते प्रतीक ठरले, कारण त्या सैन्यात हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन या प्रत्येक धर्माचे लोक होतेच.  त्या सेनेत जर भिन्न धर्मीय लोकामुळे उत्पन्न झालेला जातीयवाद आपसातच मिटला होता, तर हिंदुस्थानात ही तो आपण आपसात का मिटवू नये ?

आता हिंदुस्थानात सार्वत्रिक निवडणुकी जवळ येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे सर्वांचे सारे लक्ष तिकडे लागले आहे.  पण त्या लवकरच होऊन जातील—मग पुढे काय ?  येत्या वर्षभर बहुधा जिकडे तिकडे प्रक्षोभ, कटकटी, विरोध, धामधूम चालणार.  स्वातंत्र्य प्रस्थापनेवाचून हिंदुस्थानात किंवा जगात अन्यत्र कोठेच शांतता नांदणे शक्य नाही.

 

नंतर जोडलेली शेवटची पुरवणी
अलाहाबाद : डिसेंबर एकोणतीस : सन एकोणीसशे पंचेचाळीस


अहमदनगर किल्ल्यातील तुरुंगात स्थानबध्द करून ठेवलेल्या काँग्रेस कार्यकारी समितीतील सभासदांना तेथून काढून त्यांच्या वेगवेगळ्या प्रांतात त्यांना वेगवेगळे पाठविण्यात आले.  अहमदनगर किल्ल्यातील तुरुंगात त्यांची जी छावणी केली होती ती बंद करण्यात आली, व ती छावणी पुन्हा बहुधा लष्करी अधिकार्‍याच्या स्वाधीन करण्यात आली असावी. आमच्यापैकी मी, गोविंदवल्लभ पंत व नरेंद्र देव अशा तिघांना तारीख २८ मार्च रोजी अहमदनगर किल्ल्यातून नैनी येथील मध्यवर्ती तुरुंगात आणण्यात आले.  तेथे आमचे अनेक सहकारी आम्हाला भेटले, त्यात रफी अहमद किडवई हेही होते.  १९४२ च्या ऑगस्ट महिन्यात आम्हाला पकडल्यानंतर १९४२ सालात काय काय घडले त्याचा समक्ष वृत्तान्त कळण्याची संधी आम्हाला तेव्हाच काय ती प्रथम मिळाली, कारण नैनीच्या तुरुंगातून असलेल्यांपैकी बरेचसे आमच्यानंतर पकडले गेले होते.  आम्हा तिघांना नैनी

तुरुंगातून नंतर बरेली जवळच्या इझ्झतनगर येथील मध्यवर्ती तुरुंगात आणण्यात आले.  त्यानंतर गोविंदवल्लभ पंत यांची प्रकृती बिघडल्यावरून त्यांना सोडण्यात आले.  मी व नरेंद्र देव मात्र त्याच तुरुंगातल्या खोल्यांतून एकाच ठिकाणी आणखी दोन महिने होतो.  नंतर जून महिन्याच्या आरंभाला, आलमोरा येथील डोंगरी तुरुंगात आम्हाला आणले, तेथे मी दहा वर्षांपूर्वी होतो तेव्हा ते स्थळ माझ्या चांगल्याच परिचयाचे होते.  ऑगस्ट १९४२ मध्ये अटक झाल्यापासून १०४१ दिवसांनंतर तारीख १५ जूनला आम्हाला दोघांनाही सोडून देण्यात आले.  अशा रीतीने माझी बंदिवासाची नववी व सर्वांत मोठी अशी पाळी संपली.

माझी सुटका झाल्याला आता साडेसहा महिने लोटून गेले आहेत.  बंदिवासाच्या प्रदीर्घ एकान्तवासातून मी बाहेर पडलो तो लोकांच्या झुंडींनी गजबजलेल्या, कार्याची सारखी निकड मागे लागलेल्या, सारखा प्रवास करावा लागणार्‍या जीवनक्रमात शिरलो आहे.  मी केवळ एक रात्रभर घरी राहिलो, आणि मग मुंबईला काँग्रेस अधिकारी कार्यकारी समितीची सभा भरावयाची होती तिकडे घाईने निघालो, आणि तेथून गेलो तो सिमल्याचा व्हॉइसरॉय यांनी विचारविनिमयाकरिता काही लोकांची सभा बोलावली होती तिकडे.  या नव्या बदललेल्या परिस्थितीशी जुळते घेणे मला थोडे जड गेले, नव्या कामात सहज रुळणे मला जमले नाही. आवती-भोवतीचे सारे काही माझ्या चांगल्याच परिचयाचे होते, जुन्या मित्रांची व सहकार्‍यांची भेट झाली म्हणजे समाधान वाटे, पण असे असूनही मला वाटे की यांच्यात आपण कोणी परके, अनोळखी आलो आहोत, आणि माझे चित्त पर्वताकडे, बर्फाने झाकलेल्या त्यांच्या शिखराकडे लागले होते.  सिमल्याचे काम आटोपल्याक्षणी मी तातडीने काश्मीर गाठले.  तेथे मी काश्मीरच्या दरीत न थांबता तेथील उंच प्रदेशाकडे, घाटाकडे, प्रवास आरंभला.  तिकडे एक महिनाभर मी खूप भटकलो आणि नंतर पुन्हा जनसंमर्द, क्षोभ व पुनरावृत्तीने कंटाळवाण्या वाटणार्‍या नित्याच्या जीवनक्रमाला जुंपलो.

 

भूतकाळ व अतिदूरस्थ यांचा शोध घ्यायला आम्हा हिंदुस्थानातील लोकांना आपल्या देशाबाहेर, पदेशात जाण्याचे कारण नाही.  आमच्या देशातच ते सारे विपुल भरलेले आहेच.  आम्हाला परदेशी जावे लागते, ते केवळ ह्या वर्तमानयुगाचा शोध घेण्याकरिता.  तो शोध घेणे आवश्यच आहे, कारण वर्तमानयुगापासून आम्ही अलग पडलो तर आम्ही मागासलेले राहू, आमचा र्‍हास होत जाईल. इमर्सनच्या वेळचे जग आता राहिलेले नाही, त्या वेळी देशादेशांना एकमेकापासून विभक्त ठेवणारे बांध आता ढासळून पडत आहेत, जीवनाचे स्वरूप अधिक आंतरराष्ट्रीय होते आहे.  ह्या आगामी आंतरराष्ट्रीय जीवनात आम्हा हिंदवासीयांना आमच्या वाट्याला आलेले काम पार पाडले पाहिजे, आणि त्याकरिता आम्हाला प्रवास केला पाहिजे, इतरांना भेटले पाहिजे, त्यांच्यापासून काही शिकले पाहिजे, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत.  पण खरी आंतरराष्ट्रीय वृत्ती जगात यावयाची असली तर ती काही नुसती हवेत तरंगणारी वस्तू नाही, तिला कोठेतरी मूळ असले पाहिजे, निवार्‍याकरिता आश्रयस्थान पाहिजे.  आंतरराष्ट्रीय वाढीस लागण्याला राष्ट्रीय संस्कृती मुळात पाहिजे, स्वातंत्र्य, समता व खरी आंतरराष्ट्रीय वृत्ती सर्वत्र असली तरच या वर्तमानकालात त्या आंतरराष्ट्रीय वृत्तीची वाढ होईल.  तथापि इमर्सन याने याविषयी जागरूक राहण्याबद्दल केलेली सूचना त्याच्या त्या काळी जितकी सत्य होती तितकीच आजही आहे.  कोठेही आगंतुक म्हणून जाऊ नये, आपल्याच ध्येयाकरिता झटणारे व बरोबरीचे सहकारी म्हणून जेथे आपले स्वागत होणार असेल तेथेच जावे.  असे काही देश आहेत की, जेथे आमच्या देशबांधवांचा अपमान करण्याचा प्रयत्न चालतो, आणि हा प्रकार ब्रिटिश अधिराज्यातील युरोपीय लोकवस्ती असलेल्या देशातून विशेषच आढळतो.  ते देश आम्हाला वर्ज्य आहेत.  परकीय सत्तेचे जोखड आमच्या मानगुटी बसले आहे त्याचे कष्ट भोगणे व त्यामुळे वहावे लागणारे प्रचंड ओझे वाहणे आम्हाला तूर्त प्राप्त असले तरी आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त होण्याचा काळ आता दूर राहिला नाही.  आमचा देश म्हणजे काही क: पदार्थ नाही; आम्हाला आमच्या जन्मभूमीचा, आमच्या लोकांचा, आमच्या संस्कृतीचा, आमच्या परंपरेचा अभिमान वाटतो.  मागे होऊन गेलेल्या कोण्या एका कल्पनारम्य भूतकालाला चिकटून राहण्याची आपली इच्छा आहे, तसल्या भूतकालाचा आपण गर्व करू नये, आणि त्या गर्वापायी इतरांपासून तुटक वागण्याची, इतरांच्या भिन्न चालीरीतींत चांगले असेल ते देखील समजून न घेण्याची वृत्ती आपण ठेवू नये.  त्या गर्वापायी आपल्या दुर्बलतेचा, आपल्या अनेक दोषांचा स्वत:ला विसर पडू देऊ नये, ते घालाविण्याची आकांक्षा कमी होऊ देऊ नये.  मानवी संस्कृतीच्या व प्रगतीच्या आघाडीवर चाललेल्या इतरांच्या आपण फार मागे पडलो आहोत, ते अंतर तोडून त्यांना गाठून आपले योग्य ते त्या आघाडीतले स्थान प्राप्त करून घ्यावयाला आपल्याला खूप प्रवास करावयाचा आहे आणि तोही आता घाईने केला पाहिजे, कारण आता आपल्याला फारसा अवधी उरलेला नाही, आणि जगाची गती उत्तरोत्तर वाढत जाते आहे.  हिंदुस्थानची प्राचीन वृत्ती अशी होती की इतर संस्कृतीचे स्वागत करून त्यांना आत्मसात करून सोडावे.  आजतर ती वृत्ती विशेषच अवश्य आहे, कारण जेथे भिन्न भिन्न राष्ट्रीय संस्कृतींचा सार्‍या मानववंशाच्या एकाच आंतरराष्ट्रीय संस्कृतीत संगम व्हावयाचा त्या सारी राष्ट्रे मिळून होणार्‍या उद्याच्या एक जगाकडे आपण चाललो आहोत.  म्हणून, ज्ञान, शहाणपणा, मैत्री, सहकार्य जेथे जेथे लाभण्यासारखे असेल तेथे तेथे आपण त्याचा शोध घेतला पाहिजे, इतरांनी व आपण मिळून करावयाच्या कार्यात त्यांच्याशी सहकार्य ठेवले पाहिजे, पण ते इतरांची आपल्यावर कृपादृष्टी असावी, त्यांनी आपला पुरस्कार करावा अशा याचकवृत्तीने नव्हे.  आपली वृत्ती अशी ठेवली तर आपले खरे भारतीयत्व, आपले आशियाइत्व अबाधित राखूनही आपल्याला चांगले आंतरराष्ट्रीय, जगाचे उत्तम नागरिक बनता येईल.

हिंदुस्थानातील व जगातील माझ्या पिढीच्या लोकांचा काळ मोठ्या यातायातीचा चालला आहे.  हे कार्य आणखी काही काळ आम्ही चालवू, पण आमचे कार्याचे दिवस संपणारच, आणि मग ते कार्य पुढच्या पिढीकडे आम्ही सोपवू.  ती पिढी त्यांचे स्वत:चे जीवन जगणार व हे कार्याचे ओझे पुढच्या टप्प्यापर्यंत वाहून नेणार.  आता संपत चाललेल्या आमच्या पिढीच्या वाट्याला आलेल्या ह्या मध्यंतरीच्या एवढ्याशा काळात आमच्या पिढीने आपली भूमिका कशी काय वठवली असेल ?  ते मला कळत नाही.  पुढच्या काळातल्या पिढीने ते ठरवावयाचे आहे.  आमचे यशापयश मोजायला माप कोणते घ्यावयाचे तेही मला माहीत नाही.  जीवनात आमच्या वाट्याला कष्टच आले असा आक्षेप जीवनाविरुध्द आम्हाला घेता यावयाचा नाही, कारण आमचे आम्हीच होऊन स्वच्छेने तो मार्ग पत्करला, आणि एकंदरीने पाहू गेले तर आमचे जीवन तितकेसे कष्टमय ठरणार नाहीही कदाचित.  कारण, ज्याला जीवन आणि मृत्यू यांच्या सीमारेषेवर उभे राहण्याचे प्रसंग अनेकवार आलेले आहेत, आपले जीवनकर्तव्य आचरताना ज्यांनी मृत्यूची धास्ती कधीच बाळगली नाही, त्यांनाच जीवन म्हणजे काय हे जाणण्याची शक्ती असते.  आमचे कितीही चुकले असले तरी निदान मनाचा क्षुद्रपणा, भेकडपणा, यांचा स्पर्श आम्ही स्वत:च्या मनाला होऊ दिला नाही, आमची आम्हालाच अंतर्यामी लाज वाटावी असे काही केले नाही.  तेव्हा, व्यक्तिश: आमच्यापुरते पाहिले तर आम्ही काही थोडेफार यशच मिळविले आहे. ''मनुष्याला जे काही लाभते त्यात सर्वांत बहुमोल म्हणजे त्याचे जीवन आणि हे आयुष्य त्याला एकदाच काय ते मिळावे असा नेम असल्यामुळे त्याने आपले जीवन असे काही जगावे की आपण मागे कधी क्षुद्रपणाने, भेकडवृत्तीने काही केले अशा जाणिवेने त्याचे कधी मन पोळून निघू नये, काही ध्येये न धरता आपण उगीच एवढी यातायात सोसली असा त्याला पश्चात्ताप होऊ नये.  त्याने आयुष्य असे जगावे की मरताना त्याला स्वत:ला असे म्हणता येईल की, 'माझे सारे जीवन माझी सारी शक्ती या जगातल्या सर्वोत्तम कार्यापायी लागली आहेत—ते कार्य म्हणजे अखिल मानवजातीला स्वातंत्र्याचा लाभ'.''*
----------------------
*  लेनिन.

   

आपली संस्कृती म्हणजे युरोपचे अनुकरण करणे होऊ नये, त्याविषयी आपण युरोपवर विशेष अवलंबून राहू नये अशी सावध राहण्याची सूचना इमर्सनने शंभर वर्षांपूर्वी अमेरिकेला केली होती.  इमर्सनचे म्हणणे असे की, अमेरिका म्हणजे काही वेगळ्याच नव्या लोकांचा देश असल्यामुळे त्यांनी युरोपमधील आपल्या भूतकालाकडे अधिक पाहात राहू नये, आपल्या नव्या देशातील विपुल जीवनातून त्यांनी नवी स्फूर्ती घ्यावी.  ''आपला परावलंबित्वाचा काळ, इतर देशांपासून ज्ञान मिळविण्याचे आपले फारा वर्षांचे शिष्यत्व आता संपत आले आहे.  जीवनात घुसत असलेल्या आपल्या भोवतालच्या लाखो लोकांना, परकीयांनी त्यांच्या देशात वाढवून गोळा करून स्वत: उपभोगून शिल्लक राहिलेल्या शुष्क उरल्यासुरल्यावर सतत जगविणे शक्य नाही.  या आपल्या देशातच असे काही प्रसंग नवे येतात, असे काही नवे कार्य निघते की त्यांचे गुणगान अवश्य झाले पाहिजे, त्यांचे स्वयंस्फूर्त महत्त्व आपोआप कळते... काही रीती, कृती, शब्द, असे आहेत की, त्यातून नवे निर्माण होते... आणि या रीती, कृती, शब्द यांचा उगम पाहू जाता ते जुन्या रूढीमुळे किंवा जुन्या शास्त्रवचनांच्या आधारे प्रचलित झालेले नसून योग्य व चांगले असेल ते जाणण्याची जी मनाची अंत:प्रवृत्ती तिच्यातून अंत:स्फूर्तीने त्यांचा प्रचार झाल्याचे आढळते.''  तसेच त्याने 'स्वावलंबन' नावाच्या निबंधात म्हटले आहे, ''इटली, इंग्लंड, इजिप्त, हे देश देवासारखे पूज्य मानून यात्रा करण्याच्या वृत्तीने तेथे प्रवास करण्याचे जे खूळ अद्यापही सर्व सुशिक्षित अमेरिकन लोकांत पसरलेले आहे त्याचे कारण त्यांच्यात स्वसंस्कृतीचा अभाव आहे.  इंग्लंड, इटली किंवा ग्रीस या देशांना लोकांच्या कल्पनेत जे पूज्यस्थान प्राप्त झाले ते ज्यांच्या कर्तृत्वाने मिळाले.  त्यांनी पृथ्वीच्या अक्षाप्रमाणे स्वत:च्या ठायीच स्थिर राहून आपले कार्य केले आहे.  आपली पौरुषवृत्ती असेल तेव्हा आपल्याला कळत असते की, आपले योग्य स्थान कर्तव्यक्षेत्रातच.  आत्मवृत्ती म्हणजे प्रवासवृत्ती मुळीच नाही, सुज्ञ असेल तो नेहमी स्वत:च्या ठायीच वर्तत असतो आणि आवश्यक म्हणून किंवा कर्तव्य म्हणून त्याला प्रसंगी आपल्या घराबाहेर किंवा परकीय क्षेत्रात जावे लागले तर कोठेही गेला तरी त्याची वृत्ती घरी असल्यासारखी आत्मसंतुष्टच असते.  त्याच्या मुद्रेवरचा भाव पाहून लोकांना असे वाटले पाहिजे की, ज्ञानाचा व नीतीचा हा जाईल तेथे प्रचार होईल, हा एखाद्या नगराला किंवा व्यक्तीला भेट देईल तर ती सार्वभौमाच्या वृत्तीने देईल, आपण कोणी एक आगंतुक आहोत किंवा आपल्याला कोणाची सेवा केली पाहिजे या वृत्तीने नव्हे.''

इमर्सन पुढे म्हणतो, ''मनुष्यात आत्मसंतुष्ट वृत्ती स्थिर झालेली असली व आपल्याजवळ आहे त्याहून अधिक मोठे असे काही अन्यत्र सापडेल या आशेवर तो बाहेर देशात जात नसला, तर कला, ज्ञानप्राप्ती किंवा परोपकार याकरिता कोणी पृथ्वीपर्यटन करू म्हटले तरी त्याला उगीच काहीतरी क्षुद्र वृत्तीने विरोध करण्याचा माझा उद्देश नाही.  नुसत्या करमणुकीकरिता म्हणून किंवा प्रवासाला आपल्याबरोबर नेले त्याहून काही वेगळे मिळावे म्हणून जो कोणी प्रवास करतो तो स्वत:पासून दूरदूर जात असतो, आणि स्वत: तरुण असूनही जुन्यापुराण्या गोष्टीत त्याला वार्धक्य येते.  तो थीब्स् किंवा पामिरा येथे असला म्हणजे त्याची स्वत:ची इच्छाशक्ती, त्याचे मन, तेथल्या त्या जुन्या जीर्ण अवशेषासारखेच जुने, जीर्ण होऊन जाते.  तो त्या भंगलेल्या अवशेषाकडे जातो तो स्वत:बरोबर भंगलेले अवशेष घेऊनच.

''पण प्रवास करण्याचे ज्याला त्याला लागलेले हे वेड आपल्या सर्वच बौध्दिक क्रिया दूषित करणार्‍या दुसर्‍या एका अधिकच खोल रुजलेल्या मनोविकृतीचे लक्षण आहे.... आपण इतरांचे नुसते अनुकरण करीत असतो... आपली घरे परदेशातील लोकांच्या धर्तीवर आपण बांधीत सुटतो, व त्या घरातील कपाटे परदेशी कलाकुसरीने सजवतो.  आपली मते, आपली अभिरुची, आपल्या बुध्दीची अंगोपांगी, यांना आपण सर्वस्वी आधार घेतो तो भूतकाळात केव्हातरी, दूरदेशी कधीतरी जे होऊन घडून गेले त्याचा आणि त्या आधारावरच आपण त्यांचे अनुकरण करीत राहतो.  जगात ठिकठिकाणी कला उत्कर्ष पावली.  तिची निर्मिती एकाच सर्वव्यापी आत्मतत्त्वाने केली.  कलावंताने कलेकरिता मूळ प्रतिमेचा शोध चालविला तो स्वत:च्या अंतर्यामी. आपल्याला काय करावयाचे आहे व त्याकरिता काय सांभाळले पाहिजे, काय केले पाहिजे याचा त्यांनी स्वत: विचार चालवला... स्वत्वाचा आग्रह धरा, परकीयांची नुसती नक्कल कधीही करू नका.  तुम्ही स्वत: जन्मभर सतत कष्ट करीत राहिला तर त्यामुळे जे तुम्हाला प्राप्त झाले त्याचे तुमच्या त्या शक्तिसर्वस्वासह स्वत:चे तुमचे असे दान तुम्ही लोकांना केव्हावी करू शकता; पण इतरांपासून तूम्ही अकलेची उचल केलेली असली तर तुम्ही स्वत: विचार करून ती मिळवलेली नसल्यामुळे तिच्यात तुमचे स्वत:चे असे फार तर आयत्या वेळी निम्मे काय ते येते.''

 

युगायुगातून अनेक लोकोत्तर नरनारी रत्ने ती प्रसवत आली आणि तिच्या त्या पुत्रांनी व कन्यांनी प्राचीन परंपरा पुढे चालविताना त्या परंपरेला त्या त्या युगाला उचित असे वळण लावण्याचे कार्य सतत चालू ठेवले.  या थोर परंपरेत शोभणार्‍या रविंद्रनाथ टागोरांच्या अंगी या आधुनिक युगाची वृत्ती व आकांक्षा होत्या त्याबरोबरच त्यांची भारताच्या प्राचीन तत्त्वावरही दृढनिष्ठा होती आणि त्यांनी स्वत:च्या जीवनात ह्या नव्याजुन्याचा समन्वय साधला होता.  ते म्हणतात, ''केवळ भौगोलिक मूर्तिपूजेच्या भावनेने किंवा या भूमीत योगायोगाने मला जन्म लाभला म्हणूनच नव्हे, तर भारतीय महापुरुषांच्या प्रज्ञादीपतीने उजळलेल्या चित्तात स्फुरलेली जिवंत वाणी भारताने युगानुयुगे अनेक उत्पातांतून तिचे रक्षण करून संभाळली आहे म्हणून भारतावर माझी भक्ती जडली आहे.''  पुष्कळांना असेच वाटत असेल, तर पुष्कळ इतर भारतीय आपल्या मातृभूमीवरील भक्तीची दुसरी काही कारणे देतील.

या हिंदमातेला मंत्रमुग्ध स्थितीत ठेवणार्‍या त्या मंत्रांचा प्रभाव आता संपलेला दिसतो ती आपल्या स्वत:च्या भोवती काय काय आहे ते पाहू लागली आहे, शुध्दीवर आली आहे.  पण तिच्यात कितीही पालट झाला (आणि तो होणारच) तरी तिच्यातही जादू नाहीशी होणार नाही.  तिच्या लोकांची तिच्यावरील भक्ती तशीच पुढेही राहणार.  तिने आपली वेषभूषा बदलली तरी अंतर्यामी ती पूर्वीची तीच राहणार आणि भोवतालचे हे जग निष्ठुरता, द्वेष, अभिलाषा यांनी भरलेले असले तरी आपल्याजवळ जे काही सत्य, शिव व सुंदर असेल ते ती, तिने आजपर्यंत साठवलेल्या ज्ञानसंचयाच्या बळावर घट्ट धरून राहील, ते हातचे जाऊ देणार नाही.

आजच्या या आधुनिक जगाने खूप कामगिरी करून दाखविली आहे, पण मानवताप्रेमाची घोषणा त्या जगाने कितीही केली असली तरी मानवाला माणुसकी प्राप्त करून देणार्‍या गुणापेक्षा ह्या जगाने विशेष भर द्वेषावर व हिंसेवरच दिलेला आहे.  युध्द म्हणजे सत्य व मानवता यांचा आभाव.  युध्द केव्हा केव्हा अपरिहार्य ठरत असेल, पण त्या युध्दाचे परिणाम पाहू गेले तर ते फार भेसूर दिसतात.  नुसत्या जीवहत्येचे एवढे विशेष नाही, कारण मनुष्य कधीतरी मरणारच, पण युध्दापायी द्वेष व धडपडीत खोट्या गोष्टींचा हेतुपूर्वक सतत प्रचार चालतो आणि मग हळूहळू लोकांच्या अंगी ती नित्याची सवय होऊन बसते त्याचे त्यांना काही वाटेनासे होते.  द्वेषाच्या तिरस्कराच्या भावनांचे वळण आपल्या जीवनाच्या दिशेला लागू देणे अनिष्ट आहे, त्यात धोका आहे.  कारण तसे वागण्यात आपली शक्ती वाया जाते, आपले मन कोते व विपरीत बनते, आणि त्यामुळे त्या मनाला सत्य दिसेनासे होते.  दुर्दैव असे की आज हिंदुस्थानात द्वेषाची भावना पसरली आहे, तिरस्कार फार आहे, कारण भूतकाल आपला पिच्छा सोडीत नाही, आणि वर्तमानकालही त्याहून काही वेगळा नाही.  एका मानधन मानववंशाच्या प्रतिष्ठेचा वारंवार अवमान होऊ लागला तर तो विसरणे सोपे नाही.  सुदैव इतकेच की, द्वेषाची भावना हिंदी लोकांच्या मनात टिकवू म्हटले तरी फार काळ टिकत नाही, त्यांच्या मनात अधिक सात्त्विक भावनाच पुन्हा पूर्ववत् येतात.

हिंदुस्थान स्वतंत्र होऊन पुढे नवी नवी क्षितिजे राष्ट्राच्या दृष्टीस पडू लागली म्हणजे हिंदुस्थानला स्वत:चे मूळ स्वरूप पुन्हा लाभेल आणि निराशा व अपमानाने भरलेल्या या स्वातंत्र्यपूर्वकाळापेक्षा भविष्यकाळ रमणीय वाटून राष्ट्राचे लक्ष त्या भविष्यकाळाकडे लागेल.  आपले मूळचे ते न सोडता इतरांपासून शिकण्यासारखे असेल ते शिकण्याची व इतरांशी सहकार्य करण्याची उत्कंठा राष्ट्राला लागून ते निर्भयपणे प्रगतीच्या मार्गाला लागेल.  एकतर आपल्या जुन्या रूढींना अंधश्रध्देने कवटाळून डोळे मिटून चालावे, नाहीतर परकीयांच्या आहारी जाऊन त्यांच्या रीतिभातींची निर्बुध्दपणे नक्कल करीत राहावे या दोन परस्परविरोधी पंथांमध्ये आज राष्ट्राचे मन हेलकावे खाते आहे.  यांपैकी कोणतेही एक काय ते पत्करण्यात राष्ट्राला तरणोपाय सापडणार नाही, राष्ट्राच्या जिवंतपणाचे ते लक्षण नव्हे, त्याने राष्ट्राची वाढ होणार नाही.  निरुपयोगी झालेल्या जुन्या कवचाबाहेर पडून आधुनिक युगाच्या जीवनात व आधुनिक जगाच्या धामधुमीत शिरण्याखेरीज राष्ट्राला गत्यंतर नाही हे स्पष्ट आहे, पण राष्ट्राची खरी खरी सांस्कृतिक व अध्यात्मिक वाढ करावयाची झाली तर ती इतरांची नुसती नक्कल करून होणे शक्य नाही हेही तितकेच स्पष्टपणे लक्षात आले पाहिजे.  जनतेशी, व राष्ट्रीय जीवनाच्या जिवंत निर्झराशी ज्यांनी आपले असलेले संबंध पार तोडून टाकले आहेत, ज्यांना त्या जनतेशी व राष्ट्रीय जीवनाशी काही कर्तव्य नाही, अशा मूठभर लोकांपुरतीच ह्या असल्या नक्कल करण्याच्या प्रवृत्तीची व्याप्ती असणार.  खरीखरी संस्कृती सार्‍या जगातून मिळेल तेथून नवे स्फूर्तिदायक विचार घेत राहते, पण प्रत्येक संस्कृतीचे संवर्धन मात्र स्वदेशीच होते व ते देशातील सामान्य जनतेच्या विशाल आधारावरच होऊ शकते.  लोकांचे लक्ष जर परकीय आदर्शाकडेच लागले तर त्यांच्या कलेत, त्यांच्या साहित्यात, अस्सल जिवंतपणा येत नाही.  संस्कृती म्हणजे चारचौघा चोखंदळ लोकांपुरतीच तिची व्याप्ती, असे संस्कृतीचे कोते रूप होते ते आता उरलेले नाही. आता आपल्याला संस्कृतीचा विचार सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनेच केला पाहिजे आणि ती संस्कृती म्हणजे त्यांच्यात पूर्वीपासून चालत आलेल्या विचारधारा पुढे वाहत्या ठेवून त्यांचे संवर्धन करणारी, व त्यांच्या नव्य आकांक्षा, निर्मितीची त्यांची नवी प्रवृत्ती दर्शविणारी अशीच प्रचलित झाली पाहिजे.

   

पुढे जाण्यासाठी .......