गुरुवार, मे 28, 2020
   
Text Size

माणूस होण्यासाठी शिका

“सरकार जमाखर्च दाखवा म्हणते.”

“आमचा उघडा हिशेब. सारा तोंडी सांगू. म्हणावं, आमची घरं बघा. गाडगीमडकी रिकामी आहेत. ती सांगतील की या घरात यंदा दाणे नाहीत.”

“साहेबाला पांढर्‍यावरच काळं समजतं. त्याला हिशेब हवा. काय करायचं ? तुम्हांला सारी दुनिया नाडते तरी तुम्ही चार अक्षरं शिकणार नाही. शिका म्हटलं तर म्हणालः ‘आम्हांला का मामलेदार, मुन्सफ व्हायचं आहे ?’ बाबा रे, माणसासारखं या जगात वागायचं असेल तर शिकलं पाहिजे. पदोपदी अडतं. पत्र लिहिता येत नाही, आलेलं वाचता येत नाही. पत्र लिहिणाराला द्या पैसा. मनीऑर्डर लिहिणाराला द्या पैसे. आधीच गरिबी, त्यात ही अशी दक्षिणा वाटायची. कधी तुमचे डोळे उघडायचे ? शिका. उद्या स्वराज्य आलं, तर ते कसं
टिकवायचं याची मला चिंता वाटते.”
“येणार का भाऊ स्वराज्य ?”

“येणार, इंग्रज जाणार.”

“गांधीबाप्पाची पुण्याई.”

“परंतु गांधीबाप्पांची पुण्याई कोठवर पुरणार ? आपण चांगले होऊ या. शिकू या. उद्योगी होऊ या. प्रेमानं राहू या. स्वच्छता ठेवू या.”

“होय, दादा. उद्यापासून मी हातात पाटी घेतो. आम्ही अडाणी म्हणून तर जगाचे पोशिंदे असून उपाशी मरतो !”

“बरोबर बोलतात. शिका, खरं स्वराज्य आणा.”

 

त्या वर्षी प्रथम पाऊस सुंदर पडला. शेतकरी खुशीत होते. शेते मस्त होती. सोळा आणे पीक येईल, लोक म्हणत. सरकारी आणेवारी झाली. परंतु शेतक-यांच्या हातात प्रत्य़क्ष पीक पडले तेव्हा खरे. कधी रोग पडेल, कधी टोळ येतील, कधी उंदीर खातील. तर कधी अकाली पाऊस कोसळेल. शेतक-यांचे सारे परस्वाधीन.

आणि खरेच मुसळधार पाऊस आला. पाऊस धो धो पडत होता. हातातोंडाशी आलेले पीक मातीत मिळाले. कपाशीचे पीक गेले, शेंगांना मोड आले. नद्यानाल्यांना पूर येऊन तीरावरच्या शेतांमध्ये रेती-गाळ साचून राहिला. आकाश गळत होते आणि शेतक-यांचे डोळेही गळत होते ! सारी मेहनत मातीमोल झाली.

अनेक ठिकाणी शेतक-यांच्या सभा होऊ लागल्या. खंड माफ करा; शेतसारा माफ करा; शेतक-यांस तगाई द्या; असे ठराव होऊ लागले. सरकार काय करणार, इकडे सर्वांचे डोळे होते.

कलेक्टरांकडे शिष्टमंडळी गेले.

“विचार करतो.” साहेब म्हणाले. काही दिवसांनी गावोगावच्या चावडीत सरकारी जाहीरनामे लागले,

“शेतक-यांनी पिकवले किती, खर्च किती आला, तोटा किती आला, याचे जमाखर्च सादर करावे. ज्याचे नुकसान झाले आहे असे दिसेल, त्याला शेतसारा माफ करण्यात येईल.”

शेतक-यांना लिहिता वाचता येत नाही; ते कसा जमाखर्च ठेवणार ? जे शिकलेले जमीनदार होते त्यांच्याजवळ जमाखर्च होते. त्यांना भरभरा सूट मिळत गेली; आणि गरीब शेतकरी,- त्यांचीच दाद लागेना !

त्या दिवशी गोविंदा त्या गावाला गेला होता. गोविंदा मोठा सेवेकरी. त्याची मूकसेवा होती.

“दादा, आमचा शेतसारा नाही का कमी व्हायचा ? सारा भुईमूग गेला.”