शनिवार, आँगस्ट 15, 2020
   
Text Size

'अग, मला नाही का तू ओळखीत? मी तुझा नवरा नाही का? काय रे पोरांना, बापाला ओळखता की नाही? हसता काय? हे माझे घर, ही माझी बायको, ही माझी मुले! लखंभट, तुम्हीही नाही का ओळखीत मला? त्रिंबकभट विचारू लागला. '
'अहो, हे आमचे त्रिंबकभट या घरातून बाहेर गेलेले आम्हाला आठवत नाहीत. तुम्हाला वेड लागले असावे. भुताने झपाटले असावे. निघा येथून. चावटपणाने बोलतो. म्हणे, तू माझी बायको, मी तुझा नवरा. नीघ येथून. घालवा रे याला,' लखंभट म्हणाले.

त्या खर्‍या त्रिंबकभटाला सर्वांनी हात धरून बाहेर ओढले. तो रडत रडत निघाला. ज्यांच्या सुखासाठी तो बारा वर्षे देशान्तरी गेला, त्यांनीच त्याला घालविले. मुले त्याला बाप
म्हणत ना, बायको पती म्हणून ओळखीना. त्याने बायकोसाठी लुगडी आणली होती, मुलांसाठी किती वस्तू आणल्या होत्या; परंतु काय करायचे आता त्यांचे? त्रिंबकभटजीच्या डोळयातून पाणी गळत होते.

शेवटी त्याने राजाकडे फिर्याद केली. राजासमोर खटला चालायचा असे ठरले. न्यायमंदिरात अलोट गर्दी झाली. दोन्ही त्रिंबकभट राजासमोर उभे राहिले.

एक म्हणे, 'मी त्रिंबकभट, हा लफंग्या आहे.'

दुसरा म्हणे, 'मी खरा त्रिंबकभट, हा चोर आहे.'

शेजारी म्हणत. 'त्रिंबकभट घरातून कधी गेला नाही. आज पन्नास वर्षे त्याला आम्ही पाहात आहोत.'

काय निकाल द्यावा ते राजास कळेना. त्याची बुध्दी चालेना. शेवटी तो खर्‍या त्रिंबकभटजीस म्हणाला, 'तुमचा निकाल मला लावता येत नाही. हा त्रिंबकभट इतकी वर्षे येथे आहे. शेजारीपाजारी सांगत आहेत. तुम्ही तर काल आलेत. तुम्ही खरे कशावरून? सारे लोक का खोटे? लबाड दिसता; परंतु मी शिक्षा करीत नाही. कदाचित तुम्ही भ्रमिष्ट झाला असाल, कोणी भुताबिताने झपाटले असेल. निघा येथून.'

तो खरा त्रिंबकभट रडत रडत रानात गेला. कपाळाला हात लावून बसला. म्हातारपणी मला कोणी नाही असे मनासत येऊन त्याला पुन:पुन्हा हुंदके येत. त्या रानात गुराखी गाई चारीत होते. एकीकडे गाई चरत होत्या, दुसरीकडे गुराखी खेळ खेळत होते. आज ते 'राजा व प्रजा' हा खेळ खेळत होते. एक गुराखी राजा झाला होता. काही राजाचे शिपाई झाले. काही प्रजा बनले. राजा झालेला गुराखी शिपायांस म्हणाला, 'या रानाचा मी राजा. या रानात कोणी दु:खी कष्टी नाही ना, कोणावर अन्याय झाला नाही ना? जा, सर्वत्र बघा. अन्याय झाला असेल तर तो मी दूर करीन. कोणाला दु:ख असेल तर ते दूर करीन जा. सर्वत्र पाहून या.'