शनिवार, आँगस्ट 15, 2020
   
Text Size

ते शिपाई झालेले गुराखी निघाले. इतक्यात झाडाखाली रडत बसलेला तो म्हातारा त्यांना दिसला. ते सारे धावत तेथे आले. त्यांचा नायक त्रिंबकभटास म्हणाला, 'म्हातारे बाबा, का रडता? कोणता अन्याय आहे? कोणते दु:ख आहे? आमच्या राजेसाहेबांकडे चला. ते अन्याय दूर करतील. दु:ख नाहीसे करतील. उठा. 'म्हातारा उठेना. तो आणखीच रडू लागला. ती मुले म्हणाली, 'उठतोस की नाही? राजाचा हुकूम आहे. तो पाहा आमचा राजा. ऊठ. चल त्याच्याकडे. या काठया पाहिल्यास ना हातातल्या? ऊठ. बर्‍या बोलाने चल.'

म्हातारा म्हणाला, 'का छळता गरिबाला? मी दुर्दैवी आहे. या जगात मला कोणी नाही. या जगात सारा अन्याय आहे. रडू दे मला.'

मुले म्हणाली, 'आमच्या राज्यात कोणी रडता कामा नये. उठा, चला. आमचा राजा न्याय देईल. खोटेनाटे दूर करील. उठा म्हातारे बाबा. नाही तर ओढीत न्यावे लागेल बघा.'

तो म्हातारा उठला. त्या गुराखी शिपायांनी त्याला आपल्या राजासमोर उभे केले.

'काय म्हातारबाबा, काय आहे हकीगत? कोणते आहे दु:ख, कोणता झाला अन्याय?' त्या राजा झालेल्या गुराख्याने विचारले. म्हातारा काही बोलेना, काही सांगेना. ते शिपाई झालेली गुराखी काठया उगारून म्हणाले, 'सांग सारी हकीगत. सांगतोस की नाही? राजाचा अपमान करतोस?'

म्हातार्‍याने सारी हकीगत सांगितली. गुराखी हसू लागले. परंतु त्यांचा राजा म्हणाला, 'हसू नका. मी राजा येथे न्याय देण्यासाठी बसलो असता हसता कसे? पुन्हा हसाल तर शिक्षा होईल. हं, मग काय म्हातारेबाबा, राजानेही तुम्हाला न्याय दिला नाही. अरेरे: मी असतो तर तुम्हाला न्याय दिला असता. तुमचे घरदार, तुमची मुलेबाळे, तुमची बायको तुम्हाला परत दिली असती. जा, त्या खर्‍या राजाला जाऊन सांगा की रामा गोवारी - गुराख्यांच्या खेळातील राजा- योग्य न्याय देण्यास तयार आहे. जा, सांगाल की नाही?'

'कसे सांगू? मला तेथून हाकलून देतील. मारतील. तुरूंगात घालतील. म्हणतील, वेडा आहे. म्हणतील म्हातारचळ लागला याला. येथेच रडू दे. 'त्रिंबकभट रडत म्हणाला.

'तुला जाऊन सांगितले पाहिजे. आमच्या राजाचा हुकूम पाळला पाहिजे. सांगतोस की नाही जाऊन? बोल, नाही तर या काठया आहेत बघ. 'ते शिपाई झालेले गुराखी म्हणाले.

'सांगतो जाऊन. 'त्रिंबकभट म्हणला.

त्रिंबकभट खर्‍या राजाकडे जावयास निघाला, त्याच्या मनात एक विचार आला की एखादे वेळेस मोठयामोठयांना जे प्रश्र सुटत नाहीत ते प्रश्र एखादा लहान मुलगाही सहज सोडवतो. मोठयामोठयांची बुध्दीही जेथे गुंग होते, तेथे लहान अडाणी बालकही बुध्दी चालवतो. राजाला निकाल देता आला नाही. कदाचित या गुराख्याचा पोर देईल.