बुधवार, डिसेंबर 02, 2020
   
Text Size

“मला नाही हसू येत.”

“तुलाच तर नेहमी येते. बघ आले हसू. असे पटकन हसणे मला कधी येईल? सरले, तुझ्या मनासारखे साधे सरळ मन मला कधी मिळेल? इतकी दु:खाने आज दग्ध झाली होतीस तरी पटकन हसलीस. काही वेली अशा असतात, की त्या किती वाळल्या तरी जरा ओलावा मिळताच त्या हिरव्यागार होतात. आणि काहींना किती पाणी घाला, लौकर पाने येणार नाहीत, फुले फुलणार नाहीत. तुझ्या तोंडावर किती पटकन फुले फुलतात ! अश्रूंची वा हास्याची. खरे ना?”

“परंतु आता अश्रूंची फुले नकोत रे.”

“नकोत, खरेच नकोत. काल रात्री मी तुझ्या आठवणीत रंगलो होतो. बारीक सारीक शेकडो गोष्टी आठवत होत्या. माझे मला आश्चर्य वाटले की, इतके सारे मला आठवते तरी कसे?”

“उदय, तुझा हात कढतसा रे लागतो?”

“तरुण रक्त आहे.”

“मी नाही का तरूण?”

“परंतु दु:खाने, निराशेने, उपेक्षेने तुझ्यातील शक्ती क्षीण झाली आहे.”

“उदय, खरेच तुझे अंग कढत आहे. तू काल पावसात भिजलास. परवा रात्री त्या टेकडीवर वार्‍यात बसलास. तुला ताप आला आहे; तू घरी जा. पांघरूण घेऊन पड. येथे नको वार्‍यावर. ऊठ.”

“सरले, उगीच घाबरतेस. मला काही होणार नाही.”

“उदय, तू आईचा एकुलता एक मुलगा. तू जपले पाहिजे.”

“आणि तुझ्यासाठीही नको का जपायला?”

“आधी त्या मातेसाठी; नंतर माझ्यासाठी.”

“खरेच का ताप आला आहे? बघू तुझा हात, माझा श्वास कढत लागतो का तुझ्या हाताला? बघ, वाटतो कढत?”

“खरेच. कढत कढत श्वास. आणि तुझे तोंडही लालसर झाले आहे. डोळेही. चल, ऊठ. टांगा करून आपण जाऊ.” टांगा करून उदयच्या खोलीवर दोघे गेली. उदय अंथरुणावर पडला. सरलेने त्याला पांघरूण घातले. त्याचे कपाळ चेपीत ती बसली.

“पाय चेपू का?” तिने विचारले.

“तू आत जा. बाबा रागे भरतील.”

ती काही बोलली नाही. तिने त्याचे पाय आपल्या मांडीवर घेतले. ती ते चेपीत होती.

“सरले, जा, मला घाम येईल. मी बरा होईन.”

“बाबांना विचारून मी येत्ये. माझी मैत्रीण आजारी आहे. जाऊ का, असे विचारून येते.”