बुधवार, ऑक्टोबंर 21, 2020
   
Text Size

दुसरें महायुद्ध नुकतेंच संपलें होतें. अणुबाँब टाकून सुसंस्कृत अमेरिकेनें जपानी शहरें क्षणांत स्मशानवत् केलीं होतीं. लांबणारी लढाई पटकन् संपली. अणुबाँबचे उपकार कोणी मुत्सद्दी म्हणाले. महायुद्धाच्या काळांत सरकारला साहाय्य करणार्‍यांची चंगळ होती. ब्रिटिशांची सारी सत्ता त्यांच्या पाठीशीं त्यांच्या रक्षणार्थ असे. कारखानदार, जमीनदार, सारे चैनींत होते. अपरंपार नफा मिळवीत होते. धनजीभाईंची ऐट तर विचारूं नका. तो लष्करला चारा पुरवी. ठायीं ठायीं मिलिटरीच्या डेअरी होत्या. तेथें गाईगुरें होतीं. कोण त्यांची निगा ! केवढी व्यवस्था ! अमेरिकेंतील सोजिरांना रोगट दूध देऊन कसें चालेल ? हिंदुस्थानांतील जनता रोगराईनें मरत होती. त्यांना नव्हतें घरदार, नव्हतें नीट अन्न. परंतु सरकारी
डेअर्‍यांतून स्वर्ग होता.

धनजीभाई कुबेर झाले होते. अफाट कुरणें केलीं त्यांच्या मालकीचीं. एवढेंच नव्हे, तर शेतीच्या जमिनींचीहि त्यांनीं कुरणें केलीं. अधिकार्‍यांना ते पैसे चारीत आणि त्यांना कोणी विचारीत नसे. ते हंगामांत गवत कापायला आदिवासी मजूर कामासाठीं लावीत. परंतु वेळेवर मजुरी द्यायचे नाहींत. ठरवतील रुपया, हातावर ठेवतील आठ आणे ! सरकारी काम आहे, याद राखा, तुरुंगांत घालीन, अशी धमकीची भाषा ते बोलायचे.

महायुद्ध संपलें तरी अजून हिंदूस्थानांतील परकी सैन्य परत गेलें नव्हतें. एकदम बोटी कोठून
मिळणार ? हळुंहळूं गोरे शिपायी विलायतेला, तिकडे ऑस्ट्रेलियात, मधून अमेरिकेंत असे जात होते. विजय मिळाला होता त्यांच्या चैनीला आता सीमा नव्हती. शहरांतील चांगला भाजीपाला आधीं त्यांच्याकडे जाई. डेअरीचें दूध पुरत नसे. शहरांतील दूधहि त्यांच्याकडे जायचें. त्यांच्यासाठीं उत्कृष्ट गहूं, भरपूर साखर. त्यांच्या जिवावर तर राज्यें, साम्राज्यें चालायचीं.

धनजीशेटजींचा गवताचा व्यापार अजून तेजींतच होता. अजून ब्रिटिशांचीच सत्ता होती. काँग्रेसचे महान् नेते अजून अहमदनगरच्या किल्ल्यांतच होते. महात्माजी बाहेर होते. जीवनांच्या भेटीगांठी घेत होते !  त्यांतून कांहींच निष्पन्न होत नव्हतें. धनजीशेटजींना जर कोणी म्हटलें, “तुमची सद्दी आतां संपेल. काँग्रेसचें पुढारी सुटतील. स्वराज्य येईल. तुम्हांला आतां जोरजुलुम करून चालणार नाहीं.” तर ते म्हणायचे, इंग्रज सरकार का मूर्ख आहे ? ते का आपल्या हातानें साम्राज्यावर पाणी सोडतील ? इंग्रज येथून जाणार नाहीत. काँग्रेस पुन्हां पुन्हां वनवासांत जाईल. आमची चैन तर चालूच राहाणार. आम्ही जंगलचे राजे.

आणि धनजीशेट त्याच तोर्‍यांत असत. पावसाळा संपला होता. यंदा मागून पाऊस पडला नाहीं. म्हणून गवत नीट वाढलें नाहीं. त्याच्यावर कीडहि पडली. गवताला फूल आलें नाहीं. नुसत्या गवताच्या काड्या राहिल्या. भाव कडाडले. आपले गवत आधीं कापून व्हावें म्हणून धनजीभाईची कोण आटाआटी ! गांवोगांवचे आदिवासी त्यांनी कामावर आणले. धनजीभाईंचे पठाण रखवालदार गांवोगांव जात आणि आदिवासी बंधू-भगिनींना शेळ्यामेंढ्यांप्रमाणें हांकलून आणीत. धनजीभाईनें अधिक मजुरी कबूल केली होती. पुन्हां पाऊस अकस्मात् पडला तर याहि गवताचा नाश व्हायचा असें लक्षांत आणून धनजीभाई जरा उदार झाला होता.

कलिंगडाच्या साली