मंगळवार, एप्रिल 20, 2021
   
Text Size

“मालक तुमच्यासाठी काय करतो ?”

“भरपूर काम होईनासें झालें तर तो घालवून देतो. डोळे अधू झाले आहेत, जरा सबुरीनें घ्या, तितकें काम नाहीं होत साहेब, असें म्हटलें तर शिव्या मिळतात. तुम्हां आंधळ्यांना पोसायला हा काय पांजरपोळ आहे ? असें मालक म्हणतो. घरी चालते व्हा, मरा. येथे का फुकट मजुरी देऊ ? काम नसेल होत तर राहतां कशाला ? अशीं मालकांची मगरूर बोलणी.”

“काय सांगायचे तुम्हांला ? आपल्या देशांत माणूस होणें पाप. व्यापारी लोक पांजरपोळ ठेवतील. व त्यांत लुळ्या गायीगुरांना पोसतील. कबुतरांना दाणे घालतील. मुंग्यांना साखर पेरतील. कुत्र्यांना खिरी देतील. परंतु या देशांत माणसाची किंमत नाही. आम्ही आमचे अमोल डोळे देऊन यांच्या खिशांत लाखो रुपये ओततो. आम्हीं येथेंच या उग्र वासांत झोंपतों. ना कोठें नीट खोली, ना निवारा. सारें जीवन येथें दवडायचें. आंधळे होण्यासाठीं येथे काम करायचें. पुढची शाश्वती नाही.”

एक भगिनी म्हणाली, “फोडणीला हिंग लागतो. परंतु येथें आमच्या दु:खावर डागणी असते. घरोघर हिंग घेतात. लोणच्याला हवा, मिरचीला हवा, परंतु लोकांना हिंग मिळावा म्हणून आम्ही किती दु:ख भोगतो! डोळे गेल्यावर कोण दादा. आमची नाहीं काहीं व्यवस्था, ना कोणी घेत दादफिर्याद.”

“तुम्हाला पंधरा वर्षांनंतर वृद्धवेतन मिळायला हवें. डोळ्यांना कांहींतरी संरक्षण मिळेल असें पंधरा वर्षांनंतर तरी तुम्हांला आराम नको का ?” मी म्हटलें.

“तुम्ही म्हणता खरें; परंतु हें कसें व्हायचें। येथें ना कायदा, ना वायदा. मालक वाटेल तेव्हां नको म्हणतो, चालते व्हा म्हणतो. त्याची लहर हा कायदा. कधीं येणार गरीबांचे स्वराज्य ? लई ऐकलें आजवर, परंतु तो सोन्याचा दिवस येईल तेव्हां खरा.”

“तुमच्या संघटनेशिवाय कसा येणार तो दिवस ? तुम्हीं संघटित झालें पाहिजे. संघटनेमार्फत सरकारकडे दाद मागितली पाहिजे, वर्तमानपत्रांतून स्थिति जाहिर केली पाहिजे. खरे ना ? आपणांस आपण होऊन कोण देणार ? नुसतें रडून कांहीं होणार नाहीं. तुमची हिंग कामगार संघटना उभी करा. मालक त्रास देतील. तोंड द्या. एकजूट ठेवा. मी तरी काय सांगूं ?”

कलिंगडाच्या साली