शनिवार, ऑक्टोबंर 19, 2019
   
Text Size

बळवंतराव निर्मळपूरला आले, परंतु त्यांचे मित्र बनलेले महंमदसाहेब फौजदार  यांचीच आता बदली झाली. बळवंतराव व महंमदसाहेब यांचा थोड्या दिवसांत खूप परिचय झाला होता. विशेषत: फातमा व चित्रा यांची मैत्री फारच जडली होती. फातमा चित्राकडे नेहमी यावयाची. दोघींच्या गप्पागोष्टी चालायच्या. दोघी झोपाळ्यावर बसत. झोके घेत. चित्रा पेटी वाजवी, फातमा गाणी म्हणे. चित्रा आईजवळून खायला आणी व दोघी मैत्रिणी खोलीत बसून खात. ‘चित्रा, आजोबांची येथून बदली होणार. मी येथून जाणार. आपण एकमेकींपासून दूर जाणार. पुन्हा कधी, कोठे भेटू, काय सांगावे?

‘फातमा तुझे लग्नही होईल. पुढे काय काय होईल कोणी सांगावे? तू  तुझ्या सासरी गेलीस म्हणजे कदाचित पडद्यात अडकशील. हे आजोळचे प्रेमळ मोकळे स्वातंत्र्य तुला पुन्हा मिळेल की नाही? तू मला कशी पत्रे पाठवणार?

सारे मनोरथ मनातच राहातील. आपली कदाचित पुन्हा भेटही होणार नाही. मला वाईट वाटते. खरेच वाईट वाटते. फातमा, तु इतकी कशी ग चांगली? मी तुझी मैत्री जोडली, म्हणून इतर मुली माझ्याकडे येत नाहीत. न येऊ देत. तू मला एकटी पुरेशी आहेस. ’

‘चित्रा तुझी आई फार मायाळू आहे. ती मला तुझ्याकडे येऊ देते म्हणून.

ती न येऊ देती तर ?

‘माझी आई माझ्यावर जीव की प्राण करते.’

‘मला आईच नाही.’

‘परंतु तुझे आजोबा आईची आठवण नाही ना येऊ देत?’   

‘होय चित्रा, पैगंबरांचे आईबापही लहानपणीच वारले. ते पोरके होते. पोरक्या मुलांविषयी पैगंबरांना फार प्रेम वाटे. कुराणात पुन्हा पुन्हा सांगितले की, पोरक्या मुलांना फसवू नका. त्यांची इस्टेट लुबाडू नका. त्यांना प्रेम द्या.’

आजोबा मला प्रेम देत आहेत.’

‘तुझ्या वडिलांचे तुझ्यावर प्रेम नाही का?’

‘आहे, परंतु ते दूर असतात. मला कपडे पाठवितात. खाऊ, पुस्तके पाठवितात. आता मी त्यांच्याकडेच जाणार आहे. सावत्र आईजवळ. चित्रा, लवकरच माझे लग्न होईल. बाबा लग्न करणारच माझे यंदा.’

‘तुझे वडील खरेच का निवडणुकीस उभे राहाणार आहेत?’