रविवार, नोव्हेंबर 29, 2020
   
Text Size

कृतज्ञतेने कुणबिण किति ती हृदया भरली असे
गहिवर पोटी मावत नसे
हासत खेळत बाळक निजला क्षणात मांडीवर
आइस आवरे न गहिवर
अम्मेचे मुख कृतज्ञतेने भरल्या नेत्री बघे
शब्द न बाहेरी परि निघे
“तुम्ही हासविला मद्बाळक...”
परि तिज वदवेना आणिक
पाहे भरल्या नेत्री मुख
अम्मेचा ती हात आपुल्या हाती प्रेमे धरी
त्यावरि गळती अश्रुच्या सरी।।

भरलेल्या अंतरातून त्या वच बाहेर न फुटे
नयनी प्रेमझरा परि सुटे
हृदयामधला भाव सकल तो विमलाश्रू दाविती
तेथे शब्द सकळ खुंटती
मुकेपणा तो बेलुन दावी अनंत हृदयातले
अन्योन्यासचि सगळे कळे
थोडी ओसरली भावना
झाला अवसर संभाषणां
पुशिती पदराने लोचना
दोन अशा त्या माता दिसल्या गंगायमुनांपरी
नति मी केली दुरुनी करी।।

कुणबिण मग ती हळुच सोडिते पदराच्या गाठिस
काढी त्यातून सुपारिस
अम्मेला द्यावयास जवळी दुसरे काहिच नसे
कुणबिण दीन दरिद्री असे
कृतज्ञतेला प्रकट कराया उत्सुकता मानवा
त्याविण समाधान ना जिवा
करण्या कृतज्ञता प्रकट ती
पुरते पोद्यांची मूठ ती
असु दे वस्तु कशी वा किती
कृतज्ञतेचा सिंधु मावतो बाह्य-चिन्ह-बिंदुंत
जैसा विश्वंभर मूर्तित।।

सुपारिचे ते खांड काढिले अम्मेला ते दिले
भरले कृतज्ञतेने भले
साधे नव्हते खांड, अमोलिक मंतरलेले असे
जिविचा भाव त्यात तो वसे
माणिकमोत्यांच्या राशीहुन त्रिभुवनलक्ष्मीहुन
अधिकचि कृतज्ञतेची खुण
होती कठिण सुपारी जरी
प्रेमे भिजलेली ती परी
अम्मेच्या ती देई करी
देउन पाही पुन्हा तन्मुखा भरलेल्या लोचनी
अम्मा विरघळली ती मनी।।

होते मांडीवरती निजले मूल गोड गोजिरे
साजिरे दमले रडुनी खरे
रडावयाचे कसे थांबले? काय जादु जाहली
माझी वृत्तिच ती गुंगली
क्षणात पडला प्रकाश माझ्या हृदयी सुंदर परी
कळली गोष्ट मला अंतरी
नवपिढिचा तो बालारुण
होता करित अमित रोदन
होता भुका, न परि घे स्तन
भेदातीत प्रेम पिउन तो बालप्रभु तोषला
खुलला फुलला मग हासला।।

मुसलमान मी, मी हिंदू, हे माता त्या विसरल्या
प्रेमसमुद्री त्या डुंबल्या
माता तेथुन एकच, त्यांचा धर्म एकची असे
एकच वत्सलता ती असे
हास्य, अश्रु ते एकच असती सगळ्यांना समजती
हृदये हृदयाला जोडिती
एक प्रेमधर्म तो खरा
कळतो सकळांच्या अंतरा
परि ना रुचतो अजुनी नरा
हृदयांतील या सद्धर्माला दडपुन पायातळी
जगि या माजविती हे कली।।

पत्री