शुक्रवार, नोव्हेंबर 27, 2020
   
Text Size

देशभक्ताची विनवणी!

सन्मित्रांनो! सुबांधवांनो! परिसावी मदगिरा
यथार्था परिसवी मदगिरा
गारगोटीच्या परी न व्हावे, व्हावे सुंदर हिरा
धवळावे निज-यश:सुरंगे विश्व सकल सुंदर
उठा रे, विश्व सकल सुंदर
मुकुंद पूजुन निजान्तरंगी करा यत्न दुर्धर
यत्नास यश प्रभु देई
श्रद्धेस यश प्रभु देई
आशेस फळ प्रभु देई
कर्तव्याचे कंकण बांधुन करी, न उदरंभर
बनावे, केवळ उदरंभर
महायशाते बलविभवाते संपादा सत्वर।।

ज्ञान नको, बळ नको, नको ते शील, नको ते धन
आम्हाला नको नको ते धन
निरस्तविक्रम होउन दुर्बल ऐसे म्हणती जन
खरे न हे वैराग्य, बंधुंनो! खरे तपस्वी बना
तुम्ही रे खरे तपस्वी बना
देण्यासाठी मिळवा ज्ञाना मिळवा दौलत धना
भाग्यास जगी मिरवावे
वैभवी राष्ट्र चढवावे
कीर्तिने विश्व वेधावे
स्वाभिमानधन अनंत सतत संचवून अंतरी
सख्यांनो, संचवून अंतरी
स्वर्गसुखाते संपादावे राहोनी भूवरी।।

मेंढ्यापरि ना पडा बापुडे, मरण त्याहुनी बरे
खरोखर मरण त्याहुनी बरे
मेल्यापरि हे जीवन कंठुन कोण जगी या तरे
लोखंडाची कांब त्यापरी देह करा कणखर
अगोदर देह करा कणखर
देहाहुन निज मग उत्साही करा धीरगंभिर
आकाश कोसळो वरी
पदतळी भूमि हो दुरी
मज फिकीर नाही परी
ध्येयोन्मुख मी सदैव जाइन पतंग दीपावरी
जसा तो पतंग दीपावरी
ऐसा निश्चय करा, भस्म हो, जाउ न मागे परि।।

स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये जीवात्मा रंगवा
बंधुंनो! जीवात्मा रंगवा
पारतंत्र्यशृंखला कडाकड बलतेजे भंगवा
निजांतरंगी अखंड अशादीप पाजळोनिया
गडे हो दीप पाजळोनिया
नैराश्याची निशा नाशकर सत्वर न्यावी लया
तर उठा झडकरी अता
लावा न मुळि विलंबता
द्या धीर दुर्बला हता
विजयाचा जयनाद घोषवा दुमदुमोन अंबर
जाऊ दे दुमदुमोन अंबर
स्वर्गी गातिल युष्मन्महिमा मग नारद-तुंबर।।

-अमळनेर छात्रालय, १९२७

मातृभूमिगान

हे शुभकीर्ते जगद्विश्रुते भारतमाते विमलतरे
मंगलमूर्ते मानसपूर्ते त्वन्नमने जन सकल तरे।।
अतिकमनीये शुभ रमणीये नमनीये स्तवनीयवरे
विद्यानंदे वैभवकंदे वंदेऽहं त्वां प्रेम-भरे।।
जगदभूषणे मनस्तोषणे विपच्छोषणे मधुरतरे
सकलपावने अघविनाशने कलिमलदहने पुण्यपरे।।
तत्त्वपंडिते सुमुनिमंडिते वाङमयसरिते विजयवरे
शुभगिरिभूषित सुसरित्-पूरित सुवनालंकृत अतिरुचिरे।।
सदय-मानसे वात्सल्यरसे प्रसादपूर्णे दैन्यहरे
अजरे विश्वंभरे देवते कविस्तुते परमार्थपरे।।
अन्नदायिनी ज्ञानदायिनी जगन्मोहीनी प्रभुप्रिये
तपोभूमि तू, कर्मभूमि तू, निस्तुल निरुपम निरंतरे।।
त्वदगुणगायन, त्वत्पदवंदन, त्वत्सेवन, मत्कर्म खरे
त्वत्सुत हे मदभूषण माते! परमोदारे स्नेहसरे।। हे शुभ...।।

-त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

पत्री