गुरुवार, नोव्हेंबर 26, 2020
   
Text Size

ऊठ झुगारुन देई बेडी

उज्वला! निर्मला
हे भारतवर्षा
हे मंगलदेशा
ऊठ झुगारुन देई बेडी दवडी स्वक्लेशा।।

कितितरि, बापा! काळ लोटला तुजला रे निजुनी
सकल बंधने तोडिश तडातड तेजस्वी बनुनी
अमृता! भारता!
शिर वर कर आता
ऊठ झणी आता
त्वत्पदावरी त्रैलोक्य उभे ठेविल रे माथा।।

पराक्रमाने तेजे आता दास्या तुडवावे
तुझे पवाडे जगात जरि रे सकळांनी गावे
पावना! मोहना!
रमणीया भव्या
स्तवनीया दिव्या
राष्ट्रांच्या तू शिरी शोभ रे अभिनव सत्सेव्या।।

तुझी संस्कृती अनंत, रुचिरा, निर्मल, अमरा, ती
धुळीत परके मिळवु पाहती, ऊठ सोड भीती
दुर्जया! निर्भया!
सुरवरमुनिपूज्या
त्रिभुवनसंस्तव्या
अनंत कीर्ती दिगंतात तू मिरवी निज दिव्या।।

तुझे बळ किती तुझी धृतिती किती ते आणी ध्यानी
अवनीवरती धन्य होउनी शोभे स्वस्थानी
प्रेमळा! कोमळा!
प्रखर बने बापा
हटवी निज तापा
दीनापरि ना पडुनी राही दूर करी पापा।।

स्वातंत्र्याच्या स्वर्गी नांदे, दास्याते तोडी
दैन्य निराशा निरानंदता सकल झणी मोडी
सद्रता! सुव्रता!
विक्रांता दावी
भाग्याला मिरवी
दु:स्थिति अपुली विपत्ति अपुली विलयाला न्यावी।।

डोळे उघडुन केवळ पाही धैर्य मनी धरुनी
नेमेल अवनी सारी निजबळ येइल तुज कळुनी
दुर्धरा! गंभिरा!
सागरसम धीरा
मेरुपरि धीरा
वीरा! वासरणिसम तळपे करि आत्मोद्धारा।।

समय असा ना पुनरपि येइल विलंब ना लावी
व्हावा स्वातंत्र्योदय आता भाग्यवेळ यावी
सिंहसा भीमसा
ऊठ त्वेषाने
झळके तेजाने
दुर्गति अपुली विक्रमसिंधो त्वरित लयाला ने।।

स्वाभिमानघन तू रे होई खितपत न पडावे
धावे, विजये जगी वैभवे तू रे शोभावे
ऊठ रे! ऊठ रे!
तू तर जगजेठी
कृति करि तू मोठी
त्वतभाग्येदूवरी लोभु दे सकल-जगतदृष्टी।।

स्वतंत्र होउन सच्छांतीच्या सुंदर संदेशा
तूच जगा दे हीच असे रे इच्छा जगदीशा
उज्वला! निर्मला
हे भारतवर्षा
हे मंगलदेशा
ऊठ झुगारुन देई बेडी दवडी स्वक्लेशा।।

-त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३१

पत्री