गुरुवार, जुन 04, 2020
   
Text Size

घना व त्याचे सहकारी साहसी मित्र याना निरोप द्यायला सुंदरपूरचा आजचा समारंभ   होता. शेकडो विद्यार्थी जमले होते. कामगार होते. नागरिक होते.

विद्यार्थ्यांच्या वतीने गजानन म्हणाला, “घनश्यामांना आपण निरोप देत आहोत. त्यांचे सारे जीवन प्रयोगासाठी आहे. त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना नवीन दृष्टी दिली. ते आम्हांला शाळेतील विषय शिकवीतच, परंतु आम्हांला खेड्यापाड्यांतून नेत. जी घाण काढायला आम्ही कचरत असू ती काढायला ते पटकन पुढे व्हायचे. त्यांनी श्रमाची प्रतिष्ठा आम्हांला शिकवली. गरीब जनतेशी एकरूप व्हायला शिकवले. त्यांचा नवा प्रयोग यशस्वी होवो. आपण तो प्रयोग बघायला जाऊ.”

नागरिकांतर्फे शिवरामपंत म्हणाले, “घनश्याम येथून जात आहेत. त्यांनी नागरिकत्वाचे धडे आम्हा सर्वांना प्रत्यक्ष सेवेने दिले. त्यांनी कामगारांत जागृती केली. त्यांच्या संपाला यश नसेल आले, -- तरी कामगार शांततेले राहिले याचे श्रेय त्यांना आहे. त्यांनी मिळालेले बक्षीस कामगारांच्या मुलाबाळांसाठी दिले. स्वत: डोक्यावर डाळे-मुरमुरे घेऊन वाटीत. दुधाची चरवी घेऊन दूध वाटीत. या गावाला त्यांच्यामुळे साक्षरतेची गेडू लागली. शेतक-यांच्या बायका कोठे कागद दिसला तर वाचू बघतात. घनश्याम जातील तेथे चैतन्य निर्मितील. त्यांचा साहसी प्रयोग यशस्वी होवो.”

कामगारांच्या वतीने संपत म्हणाला, “ आमच्यात कसलीच जाणीव नव्हती. घनश्यामांनी आम्हांला माणसे बनवले; स्वाभिमानी बनवले. संप फसला असेल; -- जय-पराजय यांतूनच पुढे जायचे असते. आम्ही आमची संघटना वाढवू. मजबूत करू. आमच्यातील क्ही कामगार आमिषांना बळी पडले. फाटाफुटी झाल्या. नाही तर अपेश येते ना. घनश्यामांचा मोठेपणा की त्यांनी कामगारांना दोष दिला नाही. त्यांनी आपल्या शिरावर सारा बोजा घेतला. ते जात आहेत. आमची हृदये त्यांच्याबरोबर आहेत. काही कामगार बंधू त्यांच्यासंगे जात आहेत. त्यांच्या प्रयोगाला आम्हीही पै पैसा पाठवू. श्रमणा-यांची मान उंच ठेवायला, त्यांचे प्रयोग यशस्वी व्हायला आम्ही तरी मदत केलीच पाहिजे.”