सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

होवोनी सकल जगात जेवि देव
दास्या ठेवुन इतरांस सर्वदैव
ना लज्जा तीळहि मनात, थोरवीच
वाटे ही, किति तरि लोक होत नीच।।

मोटारी उडविति तेवि ती विमाने
मोठाले अमित अजस्त्र कारखाने
याला ते वदति समस्त संस्कृती की
ठेवावे खितपत मात्र अन्य पंकी।।

‘मारावे इतर’ वदेल संस्कृती न
चित्ताची पशुसम वृत्ति ही निहीन
सर्वांचा जरि रमणीय तो विकास
जागा ती तरिच असेल संस्कृतीस।।

तुम्हाला जरि रुचते स्वतंत्रता ती
अन्या का पकडुन ठेविता स्वहाती
पृथ्वीचा जणु दिधलाच ताम्रपट्ट
राष्ट्रांना अबल करीत नित्य गट्ट।।

गर्वांध प्रबळ बनून पाश्चिमात्य
औद्धत्या प्रगट करी सदैव व्रात्य
ना त्याला हृदय जणू नसेच भाव
चोराचेपरि लुटुनी फिरुन साव।।

‘ज्याची ही प्रियकर भूमि तेथ त्याने
नांदावे, प्रगति करीत ती सुखाने
राष्ट्रे ही सकळ असोत ही स्वतंत्र
सांभाळू सकल मिळून विश्वयंत्र।।

घेऊ या करुन समस्तही विकास
दावू दे निखिल जन स्वयोग्यतेस
दावू दे अखिल जना स्व-सुंदरत्व
सर्वांना प्रकटवु दे विशिष्ट स्वत्व।।

उद्यांनी सकल फुलोत या जगाच्या
जावे ना पथि मुळिही कुणी कुणाच्या
राष्ट्रांनी करुनि अशी जगी व्यवस्था
निर्मावे मधुर अपूर्व शांतिगीता।।

घेवोनी गुणलव जो असे पराचा
साठा तो करु हृदयी अमोल त्याचा
वक्षाची पसरति दूर दूर मूळे
ओलावा मिळविति, ना म्हणून वाळे।।

तैसे या जगति करुन मानवांनी
घेवोनी किरण समीप वा दुरूनी
उत्कर्षा झटुन करीत हो रहावे
वाढोनी, जगति सुखास वाढवावे।।

सत्पुष्पे विविध फुलोत संस्कृतीची
अर्पू त्या प्रभुस मनोज्ञ माळ त्यांची
ती निर्मी मधुर जसा ध्वनी सतार
सदगंधा वितरिल हाहि दिव्य हार।।

भेटू या, ग्रहण करु परस्परांचा
आनंदे जरि दिधला सदंश साचा
ना घ्यावा ग्रह विपरीत तो करून
मोती ते मिळत बघाल जै बुडून।।

शेवाळ प्रथम वरी तुम्हां दिसेल
मोती ना वरवर खोल ते असेल
पंकाते विसरुन पंकजा विलोकी
नांदावे गुणवरणार्थ सर्वलोकी।।

लोकी या किति तरी दु:ख हो स्वभावे
भांडोनी सतत किमर्थ वाढवावे
केला या भुवनि विनाश मानवांनी
सामक्षा दिसती पहा स्वलोचनांनी।।

झाले जे विसरुन सर्व आज जाऊ
देवाला निशिदीन अंतरंगि गाऊ
निर्मू या सकल जगात बंधुभाव
वाढाया विपुल असो सदैव वाव’।।

संदेशा वितरित ह्या जगा रवींद्र
वाणीने मधुर नितांत हा कवींद्र
वाटे हा रवि म्हणजे मुकुंद-वेणु
वंदावा निजशिरि तत्पदाब्ज-रेणु।।

विश्वाला विसरविती दुराग्रहाते
सध्याची उपनिषदे यदीय गीते
आकाशी विहरत जो सदा पवित्र
मांगल्या पसरित नित्य यच्चरित्र।।

जो अंतर्बहि रमणीय निष्कलंक
मोठे यद्-हृदय गंभीर जे विशंक
जेथे ते अगणित स्वार्थ माजलेले
तेथेहि धृतिमति हे रवींद्र गेले।।

गावोनी गव हृदयंगम स्वगीते
स्थापोनी गुरुतर विश्वभारताते
एकत्र स्थिर करि पूर्व-पश्चिमेला
जो होता भ्रम विलयास आज गेला।।

पत्री