सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

विद्वानांचे अभिप्राय
।।एक।।


‘पत्री’ ह्या नावानेच प्रस्तुत काव्यसंग्रहाचे स्वरुप ध्यानात येते. एका श्रेष्ठ कवीने म्हटल्याप्रमाणे काव्याचा अविष्कार म्हणजे जशी झाडाला नवी पालवी फुटते, तसा असावा. श्री. साने यांची कविता झाडाच्या नव्या पालवीसारखी सहजस्फूर्त आहे. तेव्हा पत्री हे त्यांनी आपल्या कवितेला दिलेले नाव अन्वर्थक होय. दुसरे एक असे की वेळोवेळी प्रभूचा धावा करून कवीने त्रिविध तापाने होरपळलेल्या आपल्या काव्याला पत्री हे नाव पसंत केले, यात कवीची विनयशीलता दिसून येते.

श्री. साने यांची पुष्कळशी कविता भक्तिपर आहे. प्रभूप्रेमाप्रमाणे त्यांची देशभक्तीही उत्कट आहे. प्रभुप्रेम आणि देशभक्ती हे त्यांच्या काव्याचे दोन प्रमुख विषय. ह्याशिवाय त्यांचे फुलामुलांवरील प्रेम, निरनिराळ्या प्रसंगी त्यांना आलेले अनुभव, मित्रप्रेम हेही विषय प्रस्तुत काव्यसंग्रहात आढळून येतील. विषय कोणचा का असेना, कवी त्या विषयात रंगून जातो. विषयाशी त्याची समरसता होते. श्री. साने यांचे हृदय अत्यंत संस्कारक्षम, नवनीतीसारखे मृदू आहे. ‘अश्रू’ नावाच्या त्यांच्या कवितेत त्यांनी म्हटले आहे.

अश्रु माझा जीव
अश्रु माझा प्राण
अश्रु फुलवीती। जीवनतरु

असे हे हळूवार अंत:करण असल्यामुळे श्री. साने हे सर्व विश्वावर प्रेम करीत असतील, हे सांगावयास नको. विश्वावर आपण प्रेम करावे तथापी विश्वाच्या प्रेमाला सर्वस्वी आपण नालायक आहोत, ‘फत्तराला कधी पाने फुटतील का?’ अशी ते पृच्छा करतीत. यातही कवीची शालीनता दिसून येते.

असो श्री. साने यांचे अंत:करण मृदू असले तरी त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा दुबळेपणा नाही. देशाची हीनदीन स्थिती पाहिली म्हणजे त्यांच्या प्रतिभेला स्फुरण चढते, त्यांचे अंत:करण भरून येते. त्यांच्या सात्विक त्वेषाला, उत्साहाला, आवेशाला सीमा राहत नाही. आपल्या सर्वस्वाचा होम झाला तरी हरकत नाही, परंतु आपण आपल्या मायभूमीचे गतवैभव तिला प्राप्त करून देऊ, अशी ती प्रतिज्ञा करतात. मार्दव, माधुर्य, लीनता या गुणांबरोबर कणखरपणा, जोम, ओज, तेज इत्यादी गुणांचा त्यांच्या काव्यात उत्कर्ष झालेला दिसून येईल.

प्रस्तुत काव्यसंग्रहातील श्री. साने यांनी प्रभूचा धावा वाचित असता आस्तिक्यबुद्धी नसलेला वाचकसुद्धा त्यात तल्लीन होऊन जाईल. कवीची आपल्या विषयाशी झालेली तल्लीनता पाहून त्याला आनंद होईल आणि आता जे त्यांच्या भक्तिपर काव्यासंबंधी सांगितले ते त्यांच्या देशप्रेमविषयक काव्यासंबंधीही खरे आहे. त्यांची देशभक्तीविषयक कविता वाचत असता देशभक्तीचा गंध नसलेला वाचकसुद्धा श्री. साने यांची विषयांशी झालेली समरसता पाहून त्यांच्या काव्याचे कौतुक करील. श्री. साने यांच्या या समरसतेमुळे काव्यात शब्दार्थाचा एकजीव झालेला दिसून येतो. भावनेचा आवेश, कल्पनेचा विलास, उपमारुपकादि अलंकार, शब्द आणि वृत्त, या बाबतीत विसंगती किंवा ओढाताण झालेली आढळणार नाही. अशा प्रकारची काव्याची एकरूपता, साहजिकता आपल्याला क्वचितच पाहावयास सापडते. श्री. साने यांच्या भाषेतील साधेपणा, प्रसाद आणि माधुर्य हे गुण कवीच्या सरळ निष्पाप मनाची साक्ष देतात. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे प्रस्तुत कवीच्या प्रेमळ, निस्वार्थी, त्यागशील वृत्तीची छाया त्यांच्याकवितेवर सर्वत्र पसरलेली आहे आणि या व्यक्तिनिष्ठ गुणांनीच त्यांचे काव्य सर्वांना आवडेल असा मला भरवसा वाटतो.

श्री. साने यांच्या काव्याचा एक ठळक दोष म्हणजे संयमाचा अभाव. अश्रू, लहानपणची आठवण, बालवृद्ध-संवाद इत्यादी त्यांच्या कविता आहेत याच्यापेक्षा आटोपशीर आणि सुटसुटीत असत्या तर बरे झाले असते. काव्यातील प्रसंग चांगले, कल्पना, भावना, अलंकार आणि शब्द यांचीही वाण नाही. पण संयमाचा अभाव असेल तर रसहानी होते, वाचकांचा विरस होतो. कवीने आत्मसंयमन केले नाही तर वर्णनाचा पाल्हाळ, पुनरुक्ती, एकाच विचाराची लावलेली लांबण हे दोष काव्यात निरंतरचे ठाणे देतात. आत्मसंयम नसेल तर काव्याची रचना शिथिल, विस्कळीत होईल आणि रचनासौष्ठव हे तर उत्तम काव्याचे मुख्य लक्षण होय. श्री. साने यांचा आणखी एक दोष म्हणजे ते शब्दांची काटकसर करीत नाहीत. अगदी थोड्या वेचक शब्दांनी जर आपला अर्थ व्यक्त करता येत असेल, तर शब्दांचा पाऊस पाडू नये. एखाद्या कद्रूप्रमाणे आपल्याजवळ असलेल्या शब्दसंग्रहाचा काटेकोरपणाने उपयोग करावा. व्यक्त अर्थापेक्षा अव्यक्तार्थाची व्यंगार्थाची महती जास्त. ध्वनी हा काव्याचा आत्मा ही गोष्ट कवीने कधीही विसरता कामा नये. श्री. साने संस्कृतज्ञ आहेत. त्यांना चकोरचंद्रिका, चातक आणि मेघ इत्यादी संकेत सहज सुचतात. तथापि अशाप्रकारे संकेत त्यांनी आपल्या काव्यात वापरू नये, हेच उत्तम.

वर सांगितलेले दोष सहज टाळता येतील. यापुढील काव्यरचनेत श्री. साने हे दोष टाळतीलही. असे झाले तर त्यांच्या काव्याची शोभा जास्तच खुलून दिसेल. दोषदिग्दर्शन हे काम कटू तर खरेच. परंतु ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ‘यदग्रे विषमिव तत्परिणामेऽमृतोपमं भवति’ या न्यायाने कटू वचनांचाही गोड परिणाम होतो. निदान श्री. साने यांच्या बाबतीत तरी हे भविष्य खरे ठरेल. कारण त्यांचे कोणी दोष दाखविले तर त्या माणसाचे ते उपकार मानीतील; चवताळून त्याच्या अंगावर धावून जाणार नाहीत.

सरते शेवटी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती ही की, प्रस्तुत काव्यसंग्रह प्रसिद्ध करण्यात यशाचा हेतू नाही, धनाची अपेक्षा नाही. मानाची हाव तर नाहीच नाही. कवीच्या काही मित्रांनी पुस्तकाच्या छपाईचा खर्च आपण प्रथम तरी देऊ असे सांगितले. यामुळे प्रस्तुत पुस्तक आज प्रसिद्ध होत आहे. महाराष्ट्रातील रसिक वाचक कवीच्या गुणांचे चीज करतील अशी मला खात्री वाटते.

दि. ३-४-१९३५                                                                                          -रामचंद्र कृष्ण लागू

पत्री