शनिवार, आँगस्ट 15, 2020
   
Text Size

समाजपुरुषाची कर्ममय पूजा करणारे हे सारे श्रमजीवी त्या थोर ऋषीला वंद्य वाटत आहेत. तो चांभाराला अस्पृश्य मानीत नाही, कुंभाराला तुच्छ लेखीत नाही, समाजाला जिवंत विचार देणा-या विचारस्त्रष्ट्यांइतकीच मडकी देणा-यांचीही तो योग्यता मानीत आहे.

“There is nothing great or small on the eyes of God.”

“देवाच्या दृष्टीने समाजसेवेचे कोणतेही कर्म उच्च किंवा तुच्छ नाही.” ती ती सेवाकर्मे मंगल व पवित्रच होत.

परंतु रुद्रसुक्तातील ऋषी सेवा करणा-यांना वंदन करीत आहे असे नाही, तर तो पतितांनाही प्रणाम करीत आहे. मनुष्ये पतित तरी का होतात?

समाजाच्या दोषांमुळेच ती पतित होतात.

“स्तेनानां पतये नमो”

असे हा ऋषी म्हणत आहे. चोरांना व चोरांच्या नायकांना हा ऋषी प्रणाम करीत आहे. हा ऋषी वेडा नाही. चोर तरी चोरी का करतो? श्रीमंताच्या मुलाजवळ शेकडो खेळणी असतात. गरिबांच्या मुलाजवळ एकही नसते. त्या गरिबाच्या मुलाने एखादे खेळणे चोरले तर त्याला फटके मारतात! शेतात मरेमरेतो काम करणा-या मजुराला जेव्हा पोटभर खायला मिळत नाही, तेव्हा तो धान्य चोरतो; त्यात त्याचा काय दोष? तो चोर नाही. त्याला उपाशी ठेवणारा समाज चोर आहे. ऋषी कळवळून म्हणतो, “अरे चोरांनो! तुम्ही चोर नाही. समाज नीट वागेल, तर तुम्हांला चोरी करावी लागणार नाही. तुमच्यातील माणुसकी मी पाहात आहे. तुमच्यातील दिव्यता मला दिसत आहे. तुमच्या आत्म्याचे वैभव दुस-या दगडांना दिसले नाही, तरी निर्मल दृष्टी असणा-या मला ते दिसल्याशिवाय कसे राहील?”

अद्वैताचा विसर पडलेल्या समाजात मग क्रांती होते. ईश्वर जगाला धडा देऊ इच्छितो. शेजारी भावाला, तो रात्रंदिवस श्रम करीत असूनही राहायला नीट घर नाही, खायला पोटभर अन्न नाही, आणि मी माझ्या प्रचंड बंगल्यात रेडिओ ऐकत बसतो! ही भारतीय संस्कृती नाही. भारतीय संस्कृतीचा हा खून आहे! उपाशी लोकांना पाहून दामाजीने कोठारे उघडी केली. घरात चोरी करावयास आलेल्या माणसास एकनाथ म्हणाले, “आणखी थोडे घेऊन जा.” चोरी करणा-या माणसास पाहून आपणांस आपली लाज वाटली पाहिजे. आपल्या समाजाची चीड आली पाहिजे.

अद्वैत म्हणजे थट्टा झाली आहे. भरल्या पोटी अद्वैताची चर्चा करीत बसतात. परंतु जीवनात अद्वैत जाणणारा भगवान बुद्ध वाघिणीला उपाशी व आजारी पाहून तिच्या तोंडात मांडी देतो! अद्वैताचा अनुभव घेणारा तुलसीदास झाड तोडणा-यापुढे आपली मान करतो व ते फुलणारे, फळणारे, छाया देणारे चैतन्यमय झाड राखू पाहतो! अद्वैताचा अनुभव घेणारा कमाल गवत कापण्यासाज्ञठी रानात गेल्यावर,

“सुटे मंद वारा डुले सर्व रान”

भारतीय संस्कृती