गुरुवार, नोव्हेंबर 26, 2020
   
Text Size

२१. अमर दिवस

किसानांत, कामगारांत, विद्यार्थ्यांत सर्वत्र नवचैतन्य संचारू लागले. नवा राष्ट्रीय धर्म येऊ लागला. खर्‍या स्वातंत्र्याच्या स्वच्छ व स्पष्ट कल्पना येऊ लागल्या. परंतु यामुळे मुकुंदरावांवरती अनेकांचा रोष होऊ लागला. जे त्यांना पूर्वी भजत तेच त्यांच्या नावाने जळफळू लागले. मित्र होते तेही शत्रू होऊ लागले. पांढरपेशांची सहानुभूती शेवटी श्रमपेशांकडे जाताना कमी पडते. श्रमजीवी लोक चळवळ करू लागताच यांना हिंसेची स्वप्नं पडू लागतात. परकी सरकारप्रमाणेच हे स्वजनही बोलू लागतात. मुकुंदरावांना वाईट वाटे. परंतु शेवटी स्वतःच्या हृदयास प्रमाण मानून ते काम करीत होते.'' ''सत्या असत्यासि मन केले ग्वाही.'' हे तुकारामाचे चरण आठवून ते वागत होते.

त्या दिवशी मुकुंदराव धनगावला आपल्या खोलीत होते. एका बाजूला निवांत अशी ती खोली होती. आजूबाजूला घरे नव्हती. त्या खोलीत दोन घोंगडया होत्या. एक चरखा होता. सूत गुंडाळावयाचा एक फाळका होता. एक बादली होती. पाण्याचा एक माठ होता. एक तांब्या व दोन भांडी होती. काही पुस्तके एका बाजूला नीट ठेवलेली होती. वर्तमानपत्रे होती. खोलीला दोन कपाटे होती. त्यातून काही कपडे होते. काही पुस्तके होती. काही वह्या होत्या. अत्यंत स्वच्छ अशी ती खोली होती. काही नसणे हेच तेथील सौंदर्य होते. स्वच्छ प्रकाश हीच तेथील शोभा.

मुकुंदराव शांतपणे चरख्यावर कातीत होते. मुखाने अभंग गुणगुणत होते.

एक वेळ करी या दुःखावेगळे
दुरिताचे जाळे उगवावे
आठवीन पाय हा माझा नवस
पुरवावी आस पांडुरंगा

हे तुकारामाचे चरण घोळून ते म्हणत होते. ते का जगाला कंटाळले, निराश झाले? या जगात दंभ आहे, त्याचे का त्यांना वाईट वाटत होते? त्यांच्या खोलीचे दार लोटलेले होते. कोणी टकटक वाजविले. मुकुंदरावांचे लक्ष नव्हते. पुन्हा कोणी टकटक वाजविले.

''उघडा दार, लोटा, कडी नाही.'' मुकुंदरावांनी सांगितले. दगडूशेट, चंदनमलशेट, त्रिंबकराव वगैरे त्यांच्याकडे आले होते. मुकुंदरावांनी आणखी घोंगडी पसरली. ते सारे बसले.

''काय काम आहे?'' मुकुंदरावांनी नम्रपणे विचारले.

''तुमच्याजवळ काही बोलण्यासाठी म्हणून आलो आहोत. मोकळेपणानं बोलण्याची इच्छा आहे.'' दगडूशेट म्हणाले.

क्रांती