शुक्रवार, नोव्हेंबर 27, 2020
   
Text Size

''निःशंकपणे बोला. मजजवळ आतबाहेर काही नाही.'' मुकुंदरावांनी सांगितले.

''मुकुंदराव, अलीकडे तुमचा जो प्रचार चालू आहे त्याची आम्हाला धास्ती वाटते. शांतीच्या मार्गानं काम करण्याची ही पध्दत नव्हे. शेतकरी अडाणी असतात. ही भुतं उठवाल, परंतु उद्या आवरता येणार नाही. तुम्ही पूर्वी खादी वगैरेवर जोर देत असा, परंतु हल्ली किसानसंघटनेकडे तुम्ही वळले आहात. सावकारांना शिव्याशाप भाषणांतून देता, सावकारांची शेतंभातं कापली जाऊ लागली. वेळीच सावध व्हा. जपून चला. हिंसेच्या मार्गानं स्वराज्य मिळणार नाही. तुम्ही तर हिंसा पेरीत आहात. द्वेष हेतुपुरस्सर फैलवीत आहात. तुमच्याबद्दल आम्हाला आदर वाटतो; तुम्हाला आम्ही सांगावं असं नाही.'' चंदनमल म्हणाले.

''कामगारांमध्येही तोच प्रचार होत आहे. परवाच मिलमध्ये गडबड होणार होती; परंतु टळली. केव्हा भडका उडेल याचा नेम नाही. शिव्या त्यांच्या लक्षात राहतात. भांडवलवाल्यांना शिव्या दिल्या म्हणजे कामगारांना आनंद होतो. परंतु त्यांच्यामुळे आपणास खायला मिळतं, हे ते विसरतात. उद्या युनियनवाले का बेकारांना काम देणार आहेत? कामगारांजवळून पैसे घेऊन या चळवळयांच्या चालतात चैनी. मुकुंदराव, तुम्ही हे भूत येथे आणलंत. तुमच्यामुळे इतर कामगार कार्यकर्ते येऊ लागले. कामगारांची मनं भडकवू लागले. तुम्ही याला जबाबदार आहात.'' त्रिंबकराव म्हणाले.

''शाळेचे चालकही असंच म्हणत होते. मुलं अविनयी होत आहेत. मास्तरांना कोणी जुमानीत नाही. तुम्ही खुशाल सांगता मुलांना की, संप करा. घरी आई-बाप असतात. कोणी सरकारी नोकरीत असतात. संस्थाचालकांना संस्था चालवावयाच्या असतात. लहान मुलांना का काही पोच असतो? सज्ञान तरी असतात का ती? त्यांना काय, वळवाल तिकडे ती वळतील.'' दगडूशेट म्हणाले.

मुकुंदराव सूत कातीत होते. ऐकून घेत होते. त्यांची बोटे थरथरत होती. ओठ हालत होते, कापत होते. ते आपल्या भावना आवरीत होते. ते सूत त्यांना संयम शिकवीत होते.

''तुम्ही काहीच बोलत नाही. तुमच्याबद्दल आम्हास आदर आहे; परंतु हल्लीचे प्रकार जरा गैरशिस्त वाटतात. तुम्हाला आम्ही आमचं समजत होतो. सत्य, अहिंसा या मार्गाचे समजत होतो. तुमचं पाऊल चुकीचं पडावं, तुमच्या तोंडून शिव्या याव्या, हे बरं वाटत नाही. इतर लोकांचं सोडून द्या.'' चंदनमल म्हणाले.

मुकुंदरावांचे कातणे थांबले. ते म्हणाले,''तुम्हाला माझ्याबद्दल आदर वाटतो याविषयी मी तुमचा ऋणी आहे. तुम्ही मला स्वतःचा मानीत होता हे ऐकून बरं वाटलं. मी आजपर्यंत शिव्या देत नव्हतो. आताच का देऊ लागलो याचं तुम्हाला आश्चर्य वाटतं. परंतु तुम्हीच आपल्या मनात का नाही विचार केला? आजपर्यंत शिव्या न देणारा शिव्या का देऊ लागला? आजपर्यंत शांत राहणारा का अशांत झाला? आजपर्यंत गोड-गोड बोलणारा आज का आग पाखडू लागला? याचा तुम्ही मनात विचार केलात का? अतिवृष्टी झालेली, पिकं बुडालेली, सरकारनं शेतसारा  यंदा माफ करावा म्हणून प्रचंड चळवळ झाली. थोडं यश आलं. परंतु सरकारं परकी समजा, तुम्ही आम्ही तर आपल्याच लोकांचे ना? या वर्षी तरी शेतकर्‍यांवर जप्ती वगैरे येऊ नये. त्यांचे लिलाव करू नयेत, त्यांची अब्रू अगदी धुळीत मिळवू नये, असे नको वाटायला? परंतु दरवर्षीपेक्षा यंदा अधिक फिर्याद, अधिक जप्त्या, यंदा अधिक लिलाव. आयाबहिणी येऊन माझ्याकडे रडतात.  गावागावांहून शेकडो शेतकर्‍यांच्या करुण कथा माझ्याकडे लिहून आल्या आहेत. त्यांच्या बायकांचे अपमान झाले आहेत. त्या एका गावी शेतकरी शेतात गेला होता. पत्नी घरी होती. पाळण्यात लहान मूल होतं. ती बायको म्हणाली, 'त्यांना घरी येऊ दे.' सावकाराचा गुमास्ता म्हणाला, 'तू, जा बोलावून आण.' ती म्हणाली. 'पाळण्यात मूल आजारी आहे भाऊ' तर माजोरा गुमास्ता म्हणतो, 'मरू दे मूल. जा त्याला बोलाव.' ती मूल घेऊन बाहेर पडली. उन्हातून पदराखाली ती कळी घेऊन अनवाणी ती माता निघाली. गुमास्ता घराला कुलूप ठोकून गेला. काय या कथा? या असत्य नाहीत. अशा एक का दोन सांगू? शेतकर्‍याचं मूल मरू दे आणि तुमची तेवढी जगावी का? सर्वांचीच जगू दे. शेतकरी कोठवर तग धरणार? म्हणे आमची शेतं कापू लागले. मग का घरात उपाशी मरावं त्यानं? कोणाची होती ती शेतं? आज कोणाची झाली? रात्रंदिवस मरतो, काळीची हिरवी करतो, त्याला खायला आहे की नाही पाहता का? या वर्षी तुम्ही खादी वापरणार्‍या सावकारांनी तरी जप्तीवॉरंट, फिर्यादी, लिलाव नको होते करायला. तुम्ही इतरांना धडा घालून दिला पाहिजे होता. तुम्ही इतर सावकारांना उद्देशून तशी पत्रकं काढली पाहिजे होती. मला आलेत उपदेष करायला ! शेतकर्‍यांनी शेतं कापताच तुम्हाला हिंसा दिसू लागली. त्यांची मुलंबाळं उपाशी मरत आहेत, त्यात नाही का हिंसा?

क्रांती