रविवार, नोव्हेंबर 29, 2020
   
Text Size

दुरून घोडयाच्या टापांचा टापटाप आवाज ऐकू आला. आनंदमूर्ती येत आहेत की काय? त्यांनाही रामदासाच्या अटकेची वार्ता कळली असेल व भरधाव येत असतील. दुसर्‍या कोणाचा असणार घोडा अशा वादळात? मुकुंदराव बसले राहिले व आवाज ऐकू लागले. आवाज जवळजवळ येत होता. होय, आनंदमूर्तीच होते ते. तो पहा त्यांचा मंदील पाठीवर उडत आहे. जणू पहिले बाजीराव. जणू विश्वासराव.

पाण्याचे टपटप शिंतोडे येऊ लागले. आकाशातील सर्कस जोरात सुरू झाली. रानटी जनावरे खवळली बहुधा. मॅनेजरचा चाबूक कडाड कडाड वाजत होता. आकाशाच्या तंबूतील दिवे तर दिसतच नव्हते. सर्कस का अंधारात होती? का तंबूचे कापड फार जाड असल्यामुळे आतील दिवे दिसत नव्हते?

घोडस्वार एकदम थबकला. तो खाली उतरला. मुकुंदरावांना बघून आनंदला, चकित झाला.

''तुम्ही येथे कसे?'' आनंदमूर्तींनी विचारले.

''धनगावला जात आहे. रामदासला अटक झाल्याचं कळलं. गेलंच पाहिजे. पाऊस येईल या भीतीनं वेगानं जात होतो. त्यामुळे छातीत कळ आली. अलीकडे बरेच वर्षांत अशी कळ आली नव्हती. पडून राहिलो तो घोडयांचा टापांचा आवाज ऐकला. वाटलं की तुम्हीच असावेत. अंधारात प्रकाश आला, आधार आला, संकटात सहाय्य आलं. मी प्रथम रामपूरचा रस्ता घेतला होता. तिकडे गेलो असतो तर एकटाच वादळात सापडलो असतो. देवांनच हात धरून या रस्त्याला लावलं.'' मुकुंदराव म्हणाले.

''आता कशी आहे कळ? छाती चेपू का हलक्या हातानं? का जरा पडता? आंनदमूर्तींनी विचारले.

''आता बरं वाटतं.'' मुकुंदराव म्हणाले.

''घोडयावर बसता का? तुम्ही बसून जा. मी पायी येईन.''

''मला बसता येत नाही.''

''तुम्ही बसा, मी तुम्हाला धरून पायी चालेन.''

''मला धरून घोडयावरूनच नाही का तुम्हाला जाता येणार? लौकर जाऊ.''

''परंतु छातीत कळ पुन्हा आली तर?''

''आता येणार नाही असं वाटतं.''

''बसा तर मग घोडयावर. मी दौडवीत नेतो.''

क्रांती