रविवार, नोव्हेंबर 29, 2020
   
Text Size

आनंदमूर्तींनी मुकुंदरावांना घोडयावर बसावयास मदत केली. मुकुंदराव दोन्ही हातांनी घोडयावर धरून बसले. पाठीमागे आनंदमूर्ती बसले. त्यांनी एका हातानं लगाम धरला, एका हातानं मुकुंदरावांस धरून ठेवलं. पुढे दोन्ही हातांनी लगाम धरून ते हात मुकुंदरावांच्या वक्षःस्थळावर ठेवले.

''घाबरू नका. मी नीट धरून ठेवलं आहे; पडू देणार नाही.'' ते म्हणाले.

घोडा भरधाव जात होता. वरून जलधारा भरधाव येऊ लागल्या. दोघं भिजून ओलेचिंब झाले.

''रामदासला अटक झाली म्हणून आकाश रडत आहे बहुधा. माया घरी रडत असेल. शांता रडत असेल. रामदासचे आईबाप रडत असतील.'' आनंदमूर्ती म्हणाले.

''रडत नाहीत. देशासाठी पकडला गेला म्हणून साखर वाटतील.'' मुकुंदराव म्हणाले.

''सोमदत्त असाच वादळात सापडला होता.''

''परंतु तो बिचारा एकटा होता.''

''चारुदत्त व वसंतसेना अशीच पावसात सापडली होती. परंतु त्यांना त्यामुळे आनंदच उलट वाटला. जणू हृदयातले प्रेमाचे मेघ वर मोकळे होण्यासाठी उडून गेले व त्यांनी त्यांच्यावर भरपूर अभिषेक केला. दोघांना एकत्र प्रेमस्नान घातलं.''

''बोलू नका. घोडा दौडवा.'' मुकुंदराव म्हणाले.

''कळ कदाचित येईल म्हणून भीती वाटते?'' ते म्हणाले.

''आता कळ गेली; आता बळ आलं. पायीसुध्दा मी आता पळत जाईन.'' मुकुंदराव म्हणाले.

''पाऊस थांबत नाही. जोराने येत आहे.

''पावसाची जरुरच होती. धरणीमाय वाट बघतच होती. आता पिकं मस्त येतील.''

''परंतु पीक हाती पडेल तेव्हा खरं. मेहनत, मशागत करावी. तपश्चर्या करावी.

परंतु अतिवृष्टीनं जातं, अवर्षणानं जळतं, यातून वाचलं तर दुसरे लुटारू  लुटून नेतात.'' आनंदमूर्ती म्हणाले.

क्रांती